India
आत्महत्येतून बचावलेला शेतकरी लावून देतोय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं
या हॉटेल मालकाने आतापर्यंत २२ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न लावले आहे.
प्रसन्न जकाते
सततची नापिकी, डोक्यावरील कर्ज, निराशा यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपले प्राण मगावले आहेत. अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सरकारकडून आजपर्यंत ठोस मदत मिळालेली नाही. आजही पॅकेजच्या नावाखाली शेतकरी कुटुंबांची बोळवण होत आहे. सरकार एकीकडं आपलं कर्तव्य पूर्ण करण्यात कमी पडत असताना अकोल्यातील एक हॉटेलचालक व्यक्ती अशीही आहे, ज्यांनी जमीन अधिग्रहणातून मिळालेले पैसे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी खर्च केले आहेत. यातून या हॉटेल मालकाने आतापर्यंत २२ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न लावले आहे. ते देखील कोणताही मोबदला किंवा परतफेडीची अपेक्षा न करता.
मुरलीधर राऊत हे त्या हॉटेल मालकाचे नाव आहे. नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर त्यांचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आता फक्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न लागतात. अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली, त्यावेळी राऊत यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहित करण्यात आली. त्यामुळे राऊत यांचे जुने हॉटेल तोडण्यात आले. शासनाने राऊत यांच्यासह शेतकऱ्यांना वेळेवर मोबदला दिला नाही. कागदपत्रांसाठी अनेक शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवायला लावले. त्यामुळे राऊत यांच्यासह सहा शेतकरी पुरते निराश झालेत. त्यामुळे राऊत यांच्यासह सहा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
विष घेतल्यामुळे राऊत यांचे प्राण धोक्यात आले होते. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. मरणाच्या दारातून परतल्यानंतर राऊत यांनी सकारात्मक संकल्प केला. हा संकल्प करीत असतानाच त्यांना जमिनीच्या मोबदल्यातून दीड कोटी रुपये मिळायचे आहेत. मिळू शकणाऱ्या एकूण रकमेवर त्यांनी उचल घेऊन त्यातली काही रक्कम खर्च करीत एक नवीन हॉटेल उभारले. उरलेली रक्कम शेतकऱ्यांच्या नावाने बाजूला टाकली. त्यानंतर त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये फक्त आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या विवाहाचा कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली. या सर्व विवाह आयोजनांचा खर्च ते त्याच पैशातून करीत आहेत.
"मी विष घेतले त्यावेळी सगळे संपले असे वाटत होते. पण मी मरणाच्या दारातून परत आलो. मी शेतकरी असल्याने शेतकऱ्यांसाठी काही तरी करावे, असा मनाशी निश्चय केला. कुटुंबानेही त्यात साथ दिली. आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या चेहऱ्यावर आनंद पाहिल्यानंतर आपण जीवनाचे सार्थक केल्याचे समाधान वाटते," असं राऊत इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले.
राऊत यांना साथ मिळत आहे ती त्यांचे मित्र अमोल जामोद आणि महेश आंबेकर यांची. जामोद हे राऊत यांना विनामूल्य मंडप बिछायत पुरवतात. महेश आंबेकर हे वधु-वरांचे फोटो अल्बम विनामूल्य तयार करून देतात. त्यामुळे या तिघांच्या कार्याची सध्या पश्चिम विदर्भात सकारात्मक चर्चा सुरू आहे. राऊत यांना जे जमले ते राज्यकर्त्यांना का जमत नाही, असा संतप्त सवालही यानिमित्ताने शेतकरी उपस्थित करतात.