Opinion

फकीरा जयंती आणि मातंगांचा आजचा संघर्ष

मांग (मातंग) जातीत जन्मलेले राणोजी, फकीरा, सावळा आणि एकूण एक धाडसी आणि शूर वीर मांगाचे चित्रण अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या 'फकिरा' या कादंबरीत केले आहे.

Credit : Shubham Patil

कॉम्रेड गणपत भिसे

 

मांग (मातंग) जातीत जन्मलेले राणोजी, फकीरा, सावळा आणि एकूण एक धाडसी आणि शूर वीर मांगाचे चित्रण अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या 'फकिरा' या कादंबरीत केले आहे. फकीरा कादंबरीत अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला संदेश समजून घेतला पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे. परंतु मांग समाजातील लेखक, विचारवंत, बुद्धिमान मंडळींनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, संघर्षाचे तत्त्वज्ञान जरासे नीटपणे समजून घेत नाही. 

अण्णा भाऊ हे मांग जातीचे असल्यामुळे इतर जातींना हे तत्वज्ञान समजून घेण्यात फारसे स्वारस्य वाटत नाही. वाचकाकडून फकीरा कादंबरीचे वाचन होत असले तरी त्याची फारशी चर्चा बाहेर जाऊन करण्याची त्यांची मानसिकता नाही. कारण ही कादंबरी एका मांग लेखकानं मांग जातीवर लिहिलेली आहे असा ब्राम्हणी दृष्टिकोन धरून बसलेले आहेत. मांग समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी वाचनाचे प्रमाण फारसे वाढलेले नाही. हे प्रमाण वाढविण्यासाठी काही विशेष प्रयत्न होताना कुठे दिसत नाहीत. समाजातील शिकला सावरलेला वर्ग अशा बाबीवर वेळ न घालवता पगार-भत्ते आणि जवळचे नातेवाईक यापलीकडे जग माणायला तयार नाही. कंदूरी, जावळ, नवस, वाढदिवस आणि घरगुती समारंभ यात दिवसेंदिवस गुंतत चाललेला आहे. मिळणार्‍या पगारातून दरमहा ग्रंथ खरेदी करण्याची सवय अजून लागलेली नाही. नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यात कपाट, पलंग, फ्रीज, कुलर, एसी, टीव्ही अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू भेट देऊन श्रीमंतीचा बडेजाव करण्यात मश्गुल आहे. अशा आत्ममग्न प्रवृत्तीमुळे मातंग समाजाला सरकारी नोकरी आणि रोजगाराची संधी मिळून देखील त्याचा उपयोग समाजाला अथवा चळवळीला होताना दिसत नाही. 

जशी अवस्था समाजातील शिक्षित वर्गाची झाली आहे तशीच अवस्था सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गाची झाली आहे. समाजापेक्षा 'मला काय मिळते' यावर बहुतांश नेतृत्वाचा भर आहे. फकिराचा त्याग, बलिदान पाहून आपण स्वतःमध्ये बदल करून घेणे गरजेचे आहे. 'आपला संघर्ष हा स्वतःसह समाजासाठी असला पाहिजे,' असा संदेश फकिराने दिला आहे. त्याअंगाने फकीरा कादंबरीचं वाचन होणे गरजेचे आहे. फकीरासारखा एक शूर, प्रामाणिक, धाडसी योद्धा समाजासाठी संघर्ष करत असताना दुलारी मांगा सारखा एक मांग फकिरा सोबतच गद्दारी करतो. अशा दुलारी मांगाची देखील आज समाजामध्ये वानवा नाही. रावसाहेब पाटील, बापू खोत दादा पाटील, उमा चौगुला, दुलारी मांग अशी अनेक पात्र आहेत ज्यांना आपला गाव, आपला देश, आपला समाज यांच्याशी काही देणंघेणं नसतं. सत्तापदासाठी आणि थोडक्या लाभापायी अशी माणसं कुठल्याही थराला पोचतात. अशी माणसं असे काही इरेला पेटतात की चांगल्या नीतिमान लोकांना साथ देण्याऐवजी त्यांचा सर्वनाश करण्यातच धन्यता मानतात. अशा लोकांसाठी अण्णाभाऊ लिहितात 'माणसाने इतकं दुष्ट आणि इतकं मुर्ख नसावं' असे अनेक विचार फकीरा कादंबरीत पेरलेले आहेत.

फकीरा आणि पात्र काल्पनिक नसून वारणा खोऱ्यातील इंग्रजी सत्तेला 'सळो कि पळो' करून सोडणाऱ्या मांगाचा खराखुरा इतिहास आहे. हाच इतिहास या पुढच्या काळात गलितगात्र झालेल्या मांग समाजाला आणि मातंग चळवळीला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. ज्या बहाद्दूर मांगांना मांग समाजाचं भलं व्हावं असं वाटतं' वाघासारखं जगावंस वाटतं त्याला फकिराच्या विचारा शिवाय गत्यंतर नाही. फकिराचा विचार गुलामगिरी संपविणारा आहे, शोषितांच्या न्यायासाठी पुकारलेला 'एल्गार' आहे. 'जिथं भूक तिथं फकीरा, जिथं जुलमी कायदा तिथं बंड' असा संदेश फकिरानं दिला आहे. 

इंग्रजांच्या जुलमी कायद्यानं मांग जातीला हद्दपारी दिली. मांग जातीला दिवसातून तीन वेळा हजेरी लावून अतोनात शोषण केलं, छळ केला, मांगांना गावातून पळवून लावलं, लाखो मांग आपली मांग नावाची ओळख पुसून भटके बनले. वाटदिसेल तिकडं पळून गेले, बाहेरच्या प्रांतात जावून जात व भाषा, तसेच नाव बदलून राहू लागले. इंग्रजांनी मांग जातीला शिकू दिले नाही. गुन्हेगार जमातीचा शिक्का भाळी मारुन हजारो मांगांना वनवास दिला. मांग हा 'लायक' असूच शकत नाही असा नियम झाला. 'लायकी' हा शब्द मांग जातीपासून अलग करून कैक मांगाना गावापासून, घरापासून, पोरांबाळा पासून अलग करून टाकले. मांग जातीतील झुंजार वृत्ती नमावी, नाहीशी व्हावी, त्यांनी 'लाचार' व्हावं हाच त्या कायद्याचा अंतस्थ हेतू होता. आणि इंग्रज सरकारचा तो हेतू जवळपास साध्य झाला आहे. आजच्या काळात मांग जातीतील लोप पावलेली झुंजारवृत्ती आणि शैक्षणिक मागासपण इंग्रजी राजवटीत राबलेल्या जुलमी कायद्याचा परिपाक आहे. मांग जातीतील झुंजार वृत्ती पुनर्प्राप्त करण्यासाठी मांग जातीला फकिराच्या शौर्याचा विचार अंगिकारल्या शिवाय गत्यंतर नाही. अन्यथा स्वातंत्र्यपूर्व काळात विदेशी इंग्रजांनी मांगाला देशोधडीला लावले आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशी इंग्रज मांगाला देशोधडीला लावतांना मांगाच्या बाजूनं कोण उभं आहे? मांगाला गुलाम बनवण्यासाठी सगळे टपून बसले आहेत. महानायक फकिरा स्वतः फासावर चढला आणि समाज इंग्रजांच्या दावनीतून मुक्त केला. फकिरानं इंग्रजांकडे प्राणाची भिक्षा मागीतली नाही, तलवार आणि घोडा मागीतला. घोडा अनं तलवार आपल्या साठी फकिरा सोडून गेला आहे. ज्याची मांड पक्की आहे आणि शिवाजीराजानं दिलेली तलवार पेलण्यासाठी मनगट मजबूत आहे अशांना महानायक फकीरा यांच्या जयंती निमित्ताने सलाम.

फकीरा यांच्याबाबत इतिहासातही उपेक्षा झाली. त्यांचे तैलचित्र कुठंही उपलब्ध नव्हतं.  यापूर्वी फकिरा या महानायकाचा फोटो जे कुणी वापरत असत, तो संगणकावर छेड छाड करून कुणाचा हात, कुणाचे, पाय, कुणाचा घोडा, कुणाची तलवार अशी जोडजाड करून तयार केलेला फकिरा दिसायचा आणि खूप वाईट वाटायचं. जो फकिरा अण्णा भाऊ साठे यांच्या मुळे घराघरात पोचला होता त्या फकिराचे एक वास्तव चित्र नसावं, याची उणीव भरून काढण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. अविनाश आगळे या व्हिजुअल आर्टिस्ट आणि त्याच्या सोबतच्या कलाकारांनी फकिरा कादंबरीचं वाचन केलं, फकिरा समजून घेतला आणि तत्कालीन परिस्थितीत मानवी मूल्यांसाठी, इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढणारा फकिरा जशाच्या तसा उभा केला. त्यांनी पहिल्यांदा फकीरा दृश्य स्वरूपात समोर आणलं आहे. नागपूर येथील प्रेसवरून या चित्राच्या हजारो प्रती छापून तयार आहेत. त्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात पोचवण्यासाठी लालसेनेकडून प्रयत्न होत आहेत.

 

कॉम्रेड गणपत भिसे हे परभणीमध्ये 'लालसेना' नावाचं संघटन चालवतात. लेखात व्यक्त केलेली मतं त्यांची असून इंडी जर्नल त्याच्याशी सहमत असेलच असं नाही.