India

केरळ मॉडेलचा चेहरा असणाऱ्या शैलजा टीचरच नव्या मंत्रिमंडळात नाहीत, विजयन सरकारवर जनतेतून टिका

कोविडची भयावह परिस्थिती असताना राज्याचा आरोग्य मंत्री बदलल्यामुळे सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

Credit : इंडी जर्नल

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नवीन मंत्रीमंडळामध्ये के.के.शैलजा यांना स्थान मिळालेलं नाहीये. आरोग्यमंत्री असताना त्यांनी कोरोना काळात जे काम केलं त्यासाठी जगभरातून त्याचं कौतुक झालं होतं. के.के.शैलजा यांच्यासोबतच जे मंत्री मागच्या मंत्रिमंडळाचा भाग होते अशा कुठल्याच मंत्र्यांना या मंत्रिमंडळात प्रवेश मिळालेला नसून फक्त मुख्यमंत्री सी. एम. विजयन हेच यासाठी अपवाद आहेत. कोविडची भयावह परिस्थिती असताना राज्याचा आरोग्य मंत्री बदलल्यामुळे सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

“पक्षांतील सर्वाना मंत्रिमंडळात काम करता यावं या दृष्टीने हा निर्णय घेतला गेला आहे. पक्षाच्या धोरणांमधील निर्णय असून मी त्याबद्दल नाराज नाहीये. मंत्रीमंडळामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली तरच ते सुद्धा मिळालेल्या संधीचा फायदा उठवतील आणि चांगलं काम करतील,” अशी प्रतिक्रिया के. के. शैलजा यांनी एका मुलाखतीत दिली.

 

 

एलडीएफ सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात आधीच्या कुठल्याच मंत्र्यांना जागा दिलेली नसून फक्त मुख्यमंत्री विजयन हेच पुन्हा मंत्रिमंडळाचा भाग आहेत. सदर निर्णय हा पक्षाचा असून बऱ्याच अनुभवी उमेदवारांना सुद्धा या मंत्रिमंडळात प्रवेश मिळालेला नाहीये. शैलजा यांनासुद्धा हा निर्णय मान्य असल्याचं त्यांनी एनडीटीव्हीने घेतलेल्या मुलाखतीत सांगितलं. तसेच त्या म्हणाल्या की, “मी खूप समाधानी आहे कारण माझ्या सहकाऱ्यांच्या सोबतीने चांगल्याप्रकारे काम करू शकले. पाच वर्षे काम करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. नीपाह, कोविड सारख्या संकटावर आमच्या सरकारनी मात केली. खूप जपून ठेवण्यासारखे अनुभव काम करताना आले आणि जे यश मिळालं ते फक्त टीमवर्कमुळे मिळालं.”

के.के. शैलजा यांना मंत्रिमंडळात प्रवेश न मिळाल्यामुळे देशातील राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त होतायेत. कॉंग्रेसचे मंत्री शशी थरूर यांनीदेखील या घटनेबद्दल ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी केलेल्या ट्वीट मध्ये असं लिहिलंय की, "केरळच्या नवीन मंत्रिमंडळात के. के. शैलजा नाहीयेत याचं वाईट वाटतंय. त्यांच्या कार्यक्षमतेसोबतच मला कोरोनाकाळात त्या आरोग्यमंत्री म्हणून नेहमीच मदत करणाऱ्या, जबाबदारीची जाणीव असणार्‍या आणि कायम उपलब्ध असणार्‍या मंत्री वाटल्या. त्यांची कमतरता जाणवेल.

"मिळालेल्या माहितीनुसार या नवीन मंत्रीमंडळामध्ये  एम. व्ही. गोविंदान, के. राधेकृष्णन. के. एन. बालगोपाल, प. राजीव, व्ही. एन. वसावन, साजी चेरीयन, व्ही. सिवनकुट्टी, मोहम्मद रियाज, आर. बिंदु, वीना जॉर्ज, व्ही. अब्दुल रेहमान यांना संधी मिळालेली आहे.२०२० साली युकेमधील प्रॉस्पेक्ट या मासिकाकडून त्यांना ‘टॉप थिंकर ऑफ द इयर २०२०’ हा पुरस्कारदेखील मिळाला होता. याचबरोबर ६४ वर्षे वय असणार्‍या के. के. शैलजा मत्तनुर ह्या त्यांच्या मतदारसंघातून साठ हजार मताधिक्यानी निवडून आलेल्या उमेदवार असून सर्वात तगड्या उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नीपाह वायरसच्या साथीमध्येही त्यांनी उत्तम प्रकारे काम केलं होतं. आरोग्यमंत्री म्हणून नावाजल्या गेलेल्या शैलजा यांना ‘शैलजा टीचर’ म्हणूनही ओळखलं जातं. द गार्डियननं मे २०२० लिहिलेल्या एका बातमीमध्ये त्याचं कौतुक करत असताना त्यांचा उल्लेख ‘केरळच्या रॉकस्टार आरोग्यमंत्री मध्ये के.के.शैलजा' असा केला होता. 

 

 

यंदाच्या निवडणुकीत केरळच्या राजकारणात महिलांचा सहभाग वाढला असला तरी तो फक्त १५ टक्के इतकाच आहे. केरळच्या एलडीएफ सरकारच्या मागच्या मंत्रिमंडळात शैलजा एकमेव महिला मंत्री होत्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं नवीन धोरण आखत, कोणत्याही मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपद पुन्हा मिळणार नसल्याचा निर्णय घेतला व त्यात झालेल्या मंत्रिमंडळ बदलात आता या पिनारायी विजयन यांच्या लोकप्रियतेला तोडीस तोड असणाऱ्या एकमेव महिला मंत्री देखील आता नव्या कॅबिनेटमध्ये नसणार आहेत. मात्र या नव्या मंत्रिमंडळात ३ नवीन महिला मंत्री असणार आहेत.

त्यामुळं सोशल मीडियावरून आता 'स्वतःला प्रागतिक म्हणणाऱ्या केरळ सरकारमध्ये शक्तिशाली महिला सहन होत नाहीत.' अशा आशयाची टीकेची झोड उठली आहे. ट्विटरवरदेखील #bringbackshailajateacher असा ट्रेंड सुरु झाला आहे. पक्षाचा कथित धोरण निर्णय हा एक मुद्दा असला तरी शैलजा या उत्तमप्रकारे जबाबदारी पार पडलेल्या आरोग्यमंत्री असल्यामुळे सर्वांकडून नाराजी व्यक्त केली जातीये.  

या बातमीत 'शैलजा यांच्यानंतर नव्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाहीत असं विधान आलं होतं. ही चूक दुरुस्त करण्यात आली आहे.