India
परीक्षा की पहिलं मतदान : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकामुळं प्रथम मतदारांचा हिरमोड
एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यान सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक तरुण आपलं पहिलं मत देतील.
स्वराली पवार, पुणे । एप्रिल आणि मे महिन्यांदरम्यान सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक तरुण आपलं पहिलं मत देतील. त्यासाठी कदाचित ते उत्सुकही असतील. याचदरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये सराव परीक्षा आणि सत्र परीक्षा सुरू असून, त्यातल्या काही विभागांमध्ये मतदानाच्या दिवशी सुद्धा सुट्टी नसल्यानं, किंवा असली तरी दोन पेपरच्या मध्ये एकच दिवस असल्यानं, आणि त्यामुळं मतदानाचा अधिकार बजावता येणार नसल्यानं विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहेत. विद्यापीठाचं मात्र म्हणणं आहे, की सुट्टी दिलेली आहे आणि ती पुरेशी आहे.
लोकसभा निवडणूकीच्या च्या पहिल्या दोन टप्प्यांतील निवडणुका झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानुसार पहिल्या टप्प्यात १०२ मतदारसंघांमध्ये ६६.१४ टक्के (सुधारित आकड) तर दुसऱ्या टप्प्यात ८८ मतदारसंघांमध्ये ६६.७ (सुधारित आकडा) टक्के मतदान झालं आहे.
मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ३.४४ आणि २.७४ टक्क्यांची घट झाली आहे. मतदानाचा टक्का का घसरला यावर राजकीय विश्लेषक, संपादक विश्लेषण करत आहेत. पण या मतदानप्रक्रियेत तरुण पिढीचा सहभाग किती, हे पाहणं आवश्यक होतं. नवमतदारांची संख्या देशात प्रचंड आहे असंही लक्षात येतं. पण मतदानाच्या दिवशी परीक्षा असल्यानं, किमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी मतदानप्रक्रियेत सामील होणार नाही याची शक्यता दाट आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संपूर्ण भारतातून आणि भारतात बाहेरूनही विद्यार्थी आहेत त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या प्रामुख्यानं आहे. महाराष्ट्रातील पश्चिम, मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यातील बरेच विद्यार्थी इथं आहेत. निवडणूक आणि सत्र परीक्षा यांच्या वेळापत्रकाच्या समांतर असण्यानं या विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. जसं, काहींच्या मतदारसंघातील मतदानाच्या दिवशीच काही विभागांनी परीक्षा ठेवली आहे, तर काही विभागांनी फक्त मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली आहे, मात्र एक दिवस आधी किंवा नंतर सुट्टी नाही. त्यामुळं मतदानाला घरी गेले, तर परीक्षेला मुकतील, अशी विद्यार्थ्यांची स्थिती आहे.
विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि सराव परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटी सुरू आल्या आहेत. त्याचवेळी विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांमध्ये मतदानाला गृहीत न धरताच परीक्षेचे वेळापत्रक आखलेलं आहे असं दिसतं. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरण, इलेक्ट्रॉनिक्स, संख्याशास्त्र या विभागांनी मतदानाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या परीक्षा ठेवलेल्या आहेत.
१९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे आणि २० मे रोजी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या टप्प्याचे मतदान आहे आणि त्याच दिवशी या विभागांच्या परीक्षा आहेत. यासोबतच काही समाजशास्त्रांमधील विमेन अँड जेंडर स्टडीज आणि आंतरविद्याशाखीय विभागात येणारे बी. ए. लिबरल आर्टस् यांनी सुध्दा तिसऱ्या टप्पाच्या निवडणुकीच्या वेळेस म्हणजे ७ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांची परीक्षा ठेवली आहे. तर वाणिज्य शाखेत २० मे म्हणजे निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात परीक्षा ठेवली आहे.
अशा वेळापत्रकाप्रमाणे मतदानासाठी गावाला कसं जावं असा सवाल विद्यार्थ्यांना पडला आहे.
यावेळी काही विद्यार्थ्यांनी आमचं गाव खूप दूर आहे आणि एक दिवसामध्ये जाऊन येणं शक्य नाही, म्हणून आम्ही मतदानाला जाणार नसल्याचं सांगितलं.
“आमच्या घरी राजकीय पक्षाचं वातावरण आहे, माझ्या घरचे मला निवडणुकीला बोलवत आहेत, पण त्याच दिवशी परीक्षा असल्यानं मी मतदानाला जाऊ शकणार नाही.” असं एका विद्यार्थिनीनं सांगितलं.
या संदर्भात विद्यापीठाचे कार्यकारी कुलसचिव विजय खरे यांच्याशी बोललो तेव्हा ते म्हणाले, “आम्ही आधीच मतदानाच्या सगळ्या सुट्ट्या जाहीर करूनच वेळापत्रक जाहीर केले आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी कोणतीच परीक्षा ठेवलेली नाही”.
नवमतदारांशी संवाद साधल्यास त्यातील शिर्डी मतदारसंघातील एक मुलगी म्हणाली, “मी २०२४ मध्ये पहिल्यांदा मतदान करणार आहे, यासाठी मी खूप उत्सुक आहे. पण दुसऱ्यादिवशी परीक्षा असल्यामुळं परीक्षेचं दडपण आहेच आणि मला घरचे उन्हामुळं ‘धावपळ करू नको’ सांगत आहेत, म्हणून माझं जाण्याचं निश्चित नाही.”
परीक्षा आणि मतदान याबद्दल विचारल्यावर सोलापूरच्या विद्यार्थ्यानं सांगितलं, “मला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली आहे, मात्र ६ आणि ८ मे ला लगेच पेपर असल्यामुळं एका दिवसात जाऊन येणं शक्य नाहीये. रात्रीच्या ट्रॅव्हल्सनं जरी प्रवास करायचं म्हटलं तरी दुसऱ्या दिवशीच्या पेपरच्या अभ्यासाला अजिबात वेळ मिळणार नाही”.
ज्या विभागांनी मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली आहे तेथील विद्यार्थी म्हणाले “आमच्या वेळापत्रकात मतदानाचा दिवस सोडल्यास आधी नंतर लगेच पेपर आहेत त्यामुळं आम्हाला जाणं शक्य नाही.” असं खूप विभागांच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं.
तर अहमदनगर, कोल्हापूर, सातारा येथील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाला जाण्यावरून संभ्रम आहे.
विद्यार्थ्यांना एक दिवसात घरी येऊन जाणे शक्य नाही याबाबत खरे म्हणाले, “आम्ही मतदानाची एक दिवसाची सुट्टी दिली आहे. पुन्हा एक दिवस सुट्टी वाढवणे म्हणजे पूर्ण वेळापत्रकावर त्याचा परिणाम होतो. विद्यार्थी येण्या जाण्यासाठी जास्त सुट्ट्या मागत असतील तर मुलांना काय मुलं तर परीक्षेलाही नकोच म्हणतील. पण जर एखाद्या विभागात मतदानाच्या दिवशी सुट्टी नसेल असं लक्षात आलं तर आम्ही त्याविषयी चौकशी करू.
विद्यार्थ्यांनी विभागामध्ये तक्रार केली का याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, “वर्गाचा सीआर आणि शिक्षकांची मीटिंग झाली होती, तेव्हा आम्ही काही बोललो नाही.”
तर काहींचं म्हणणं होतं, “काही विभागात विदयार्थ्यांना तक्रार करु शकतो याची कल्पना नव्हती आणि काहींमध्ये तसं धाडस नव्हतं.”
काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी निमूटपणे वेळापत्रक मान्य केलं आहे तर काहींच्या बोलण्यात ‘राजकीय गोष्टीत आवड नाही, त्यात काहीही रस नाही’, असेही प्रतिसाद आले.
काही विभागांमध्ये मात्र विद्यार्थ्यांना विचारून आणि त्यांना मतदानाच्या सोयीनुसार परीक्षेचं वेळापत्रक बनवलं आहे.
निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदान जागृतीसाठी ठिकठिकाणी पोस्टर, फ्लेक्स लावत असते. छापील, दृकश्राव्य, डिजिटल सर्व माध्यमांतून ते जनजागृतीचं काम करत असतात. जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं आणि लोकशाही आणखी मजबूत करावी हा त्यामागचा उद्देश. मात्र विद्यापीठ या प्रक्रियेला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे निर्माण करत असल्यास मतदान, निवडणुक, आणि एकंदर लोकशाहीबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात गांभीर्य कमी होऊ शकते.
विद्यापीठानं दिलेल्या वेळेपत्रकानुसार त्या वेळेतच आम्हाला परीक्षा घ्यायची असते. परीक्षेचे वेळापत्रक हे एक ते दीड महिना आधीच जाहीर केलेलं होतं तसंच आम्हाला विद्यार्थ्यांनीही येऊन ‘मतदानाला जायचे आहे’ असे सांगितले नाही किंवा कोणतीही तक्रार केलेली नाही. असं विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील एका विभाग प्रमुखांनी सांगितलं.