Quick Reads

एमीझचे वारे: किलिंग इव्ह

स्त्रीपणाच्या प्रतिमा बदलणारी कथा

Credit : AMC TV

-सानिया भालेराव

 

जसं जसं जग पुढे जातं आहे तसं तसं वेगवेगळ्या 'इझमच्या' कक्षा रुंदावत आहेत. म्हणजे “अ +ब +क = अमुक एक इझम” असा जो फॉर्म्युला रूढ झालेला असतो त्यामध्ये व्हॅरिएबल फॅक्टर ऍड होऊ शकतो ही शक्यता निर्माण होते आहे. फेमिनिझमचा जुना फॉर्म्युला मागे टाकून स्वतःवर अमुक एक ठप्पा मारून न घेता, नुसतं बोलण्यापेक्षा आपल्या कामातून, आपल्या वागण्यातून, आपण जे विचार मानतो ते दाखवता येतात ही एक अत्यंत सेक्सी अशी कल्पना जगाच्या पटलावर मांडली जाते आहे... आणि हे करते आहे माझी अत्यंत आवडती ‘फ्लीबॅग’ aka ‘फिबी वॉलर ब्रिज’. मागच्या वर्षीच्या एमीमध्ये फिबी तिच्या अनऑर्थोडॉक्स लेखणीच्या जोरावर काय कमाल करू शकते हे संपूर्ण जगाला ‘फ्लीबॅग’ या मालिकेल्या मिळालेल्या यशामधून दाखवून दिलं होतंच.

यावर्षी किलिंग इव्हला एमीमध्ये बेस्ट ड्रामा सिरीज ह्या विभागात नामांकन मिळालं आहे. ह्या व्यतिरिक्त सात, अशी एकूण आठ नामांकनं ह्या मालिकेला मिळाली आहेत. या मालिकेचे आजवर तीन सीझन्स आले आहेत आणि चौथा सिझन लवकरच चित्रित होणार आहे. ल्युक जेनिंग्सच्या 'व्हीलेनेल' या नॉव्हल सिरीजवर बीबीसीची ही मालिका आधारित आहे. प्रत्येक सीझनसाठी एक नवीन स्त्री लेखिका मुख्य लेखकाच्या भूमिकेत असणं हे मालिकेचं अजून एक वैशिष्ट्य. पहिल्या सीझनसाठी फिबी वॉलर ब्रिजने लिखाण केलं आहे आणि तिने एक सुंदर पाया उभा केला आहे आणि म्हणून तिचा उल्लेख करणं महत्वाचं!

“किलिंग इव्ह” चा ढोबळमानाने जॉनर सांगायचा झाल्यास त्याला ब्लॅक कॉमेडी, क्राईम थ्रिलर असं म्हणता येईल.  ही मालिका जेव्हा तुम्ही पाहायला सुरवात करता तेव्हा मात्र "च्यायला हे असं पण होऊ शकतं?" या कॅटेगरीमध्ये ही सिरीज कधी पोहचते हे आपल्याला कळत सुद्धा नाही. कथानक फारसं न उलगडता या सिरीजबद्दल लिहिणं अवघड आहे. पण सीरिजच्या कथेपेक्षा तिच्या एसेन्सबद्दल बोलणं जास्त इंट्रेस्टिंग आहे. 

तर ही गोष्ट आहे इव्ह आणि व्हीलनेलची. इव्ह एक एम. आय. फाईव्ह एजेंट असते, जिला फिमेल सिरीयल किलरबद्दल एक सुप्त आकर्षण असतं. तिच्या डिपार्टमेंटमध्ये सिरीयल किलिंगची केस येते आणि काही काळाने सिरीयल किलर हा पुरुष नसून स्त्री आहे हे तिला उमजतं. ही सिरीयल किलर असते व्हीलनेल. ‘मिस्टीरियस ट्वेल्व्ह’ या ग्रुपसाठी ती कॉन्ट्रॅक्ट किलिंगचं  काम करत असते. पहिल्या सीझनमध्येच फिबी वॉलर ब्रिजची चौकटीत न बसणारी लेखणी इथे तळपायाला लागते. कोल्ड ब्ल्डेड सायकोपॅथ किलर आपण आजवर खूप बघत आलो आहोत पण एक स्त्री मॅडछाप मर्डर्स करते आहे आणि ते एन्जॉय करते आहे, हे तसं नाजूक मनाच्या लोकांना पचवायला अवघडच आहे.

 

म्हणजे रक्ताच्या चिळकांड्या उडत आहेत, जीवानिशी मारण्याचा नवनवीन युक्त्या ही बाई योजते आहे, समोरच्याला छळून छळून मारताना हिच्या चेहेऱ्यावर जे समाधानाचं हसू पसरतं आहे... ते पाहून क्षणभर का होईना पण "बाई हे असं करू शकते" असं माझ्या मनाला सुद्धा वाटून गेलंच. गॅस समोर उभं राहून, घामाच्या धारा अंगातून वाहत असतांना, "जरा अजून एक पोळी दे गं" असं पानावर बसलेल्याने म्हणावं आणि 'चला आजचा बेत आवडलाय' असं मनात म्हणून तिच्या चेहेऱ्यावर समाधानाचं हसू पसरावं... आणि तसंच हसू या व्हीलनेलच्या चेहेऱ्यावर पसरावं... फक्त समोरच्याला चेचून मारतांना.. ही पॉसिबिलीटी आहे.. होऊ शकते.. हे असं निदान कॅनव्हासवर आणण्यासाठी या लेखिकेचे, मालिकेचे आभार मानायला हवेत.   

आपण जेव्हा फेमिनिझमबद्दल बोलतो तेव्हा खूपदा ते आपल्या सोयीनुसार असतं. बाईची अमुक एक प्रतिमा असते असा विचार... मग ती प्रतिमा नेभळट असेल तर हे फेमिनिझ नाही किंवा बंडखोर असेल तरच ते फेमिनिझम... हे जे काही स्त्रीवादाचे फॉर्म्युले बनवले जातात... ते किती तकलादू आहेत हे फिबीच्या सिरीज पाहिल्या की जाणवतं. बाई काय करू शकते, बाईला काय वाटू शकतं, काय आवडू शकतं, काय आवडू शकत नाही हे जे काही आठशे अडुसष्ट कॉम्बिनेशन्स आहेत आणि ते असले की तिचं स्त्रीवादी असणं व्हॅलिडेट होणार, या विचारसरणीला कचऱ्याच्या पेटीत टाकून, ही जुनी गणितं मोडीत काढून, तिला काहीही आवडू शकतं... ती काहीही करू शकते... हे सूत्र अशा सिरीज कुठेही प्रीची नं होता फार सहज मांडून जातात. बाई आणि पुरुषाचं वाटणं... यात वाटणं महत्वाचं... जेंडर नाही... हे वाटणं, पटणं आणि समजणं... गरजेचं आणि ज्यांच्या पर्यंत हे पोहोचू शकतं त्यांना नक्कीच ही सिरीज आवडू शकेल असं वाटतं.

 

 

काही ठिकाणी सिरीजची थीम मोनोटोनस वाटू शकते. विशेषतः पुढच्या सीझन्समध्ये, पण हा एक भाग वगळता या सिरजचा फ्लेवर नक्कीच वेगळा आणि खास आहे. फिबी ज्या पद्धतीने फिमेल सिक्शुएलिटी हाताळते... सो कॉल्ड ऍबनॉर्मल गोष्टींनां प्रेक्षकाला अलगद अनकंफर्टेबल करत जे पाहतो आहे ते नॉर्मल आहे असं जे ती दाखवून देते ही मला सिरजची सगळ्यात जास्तं आवडलेली गोष्ट आहे. सुरवातीला इव्हला मर्डर्सबद्दल वाटणारं आकर्षण, सिरीयल किलरबद्दल तिच्या मनात निर्माण होणारा सॉफ्ट स्पॉट आणि व्हीलनेलचं मॅड सायकोपॅथिक किलर स्पिरिट, हे किती ऍबनॉर्मल आहे असं आपल्याला वाटत असताना काही एपिसोड्स झाल्यावर या दोघीच खरंतर नॉर्मल आहेत आणि बाकीचे लोक ऍबनॉर्मल आहेत अशी एक अत्यंत भयानक पण सुखद फिलींग आपल्या आत निर्माण होते. आणि हे असं होणं मला जाम आवडतं. नॉर्मलसी आणि ऍबनॉर्मलीटीच्या मध्ये झोके घेणं आणि ही दोन टोकं एक होऊन जाणं.. विचारांच्या कक्षा रूंदावणं म्हणजे कदाचित हेच असावं. या मालिकेचा सेन्स ऑफ ह्युमर पण मला खूप आवडला. जिथे हसू येण्याची तिळमात्र शक्यता नसते अशा जागी हसू येणं... हे कै च्या कै लाजवाब असतं आणि असे क्षण या मालिकेमध्ये बऱ्याचदा येतात. विशेष करून पहिला सिझन जो फिबीने लिहिला आहे तो अत्यंत खास आहे. आणि त्यामुळे पुढच्या सिझनची थीमसुद्धा फार नेमकी सेट झाली आहे.

माझं म्हणून विचाराल तर मला स्वतःला ओव्हर द टॉप मारामारी, रक्तपात वगैरे बघायला फार आवडत नाही. ‘किल बिल’ हा चित्रपट एकमेव एक्सेप्शन होता आणि त्यानंतर आता ही सिरीज. कारण वरवर जरी एका सिरीयल किलरला पकडण्याची ही केस आहे असं वाटत असलं तरी फिबीचं खास मानवी नात्यांना आणि भावनांना अत्यंत प्रभावीपणे स्पर्श करणारं लिखाण या मालिकेला फार वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. दुसऱ्या सीझनमधल्या एका एपिसोडमध्ये व्हिलनेल म्हणते "Most of the time, most days, I don’t feel anything” तो मोनोलॉग ऐकताना काळजात चर्रर्र होतं. पुढच्या सिझनचं लिखाण करणाऱ्या रायटर्सने फिबीने आखलेल्या प्रिमाईसला अत्यंत सुरेख पद्धतीने फुलवलं आहे.  स्त्रीवाद वगैरे जर काही असेल तर तो एकमेकींचे पाय न ओढता अशा सुंदर पद्धतीने एकमेकींना साथ देणं असा असावा असं वाटून गेलं.  

 

 

मागच्या वर्षी एमीमध्ये बेस्ट लिडिंग अॅक्ट्रेसचं अवॉर्ड व्हिलनेल साकारणाऱ्या जोडी कॉमरला मिळालं होतं. माझी अत्यंत आवडती व्हॉयला डेव्हिस नॉमिनेटेड होती पण तरीही हे अवॉर्ड जोडीलाच मिळावं असं मला मनापासून वाटत होतं. कारण एक बाई अमुक एकच विचार करते किंवा करू शकते ही जी काही दृश्य - अदृश्य चौकट आहे, त्या चौकटीला खिळखिळं करण्याचं काम जोडीने आणि या मालिकेच्या संपूर्ण टीमने केलं आहे. आता हेच बघा ना... एरवी साधा एक डास मारताना मला कसं तरी होतं... आणि तो हाताने मारला तर "ई SSSS " असा टिपिकल आवाज करत मी लगेच हात धुवून घेत असते... पण ही मालिका बघताना "आपण चार पाच लोकांना तर चुटकी सरशी मारू शकू" असा डेंजर आत्मविश्वास वगैरे काही काळासाठी का होईना पण माझ्यामध्ये निर्माण झाला आणि याचं श्रेय जातं फिबीच्या लेखणीला आणि या मालिकेला! काही तरी हटके पाहायचं असेल आणि पचवायची ताकद असेल तर नक्कीच ही सिरीज पाहा...

Cheers to New Normal, Cheers to the Possibilities, Cheers to Eve and Villanelle!