Quick Reads

एमीझचे वारे: वॉचमेन, रुपांतर कसे करावे याचा पाठ

एमीझचे वारे लेखमालिका

Credit : HBO

-अभय साळवी 

 

१९८६-८७ दर्म्यान प्रसिद्ध झालेले ‘वॉचमेन’ हे ग्राफिक नॉव्हेल पारंपारिक सुपरहिरो कॉमिक्स च्या सर्व प्रस्थापित मर्यादा मोडून टाकणारी ठरले होते! कॉमिक्स किंवा ग्राफिक नॉव्हेल या माध्यमाला साहित्य म्हणून गांभीर्याने घेणं अतिशय गरजेचं ठरण्यात जे काही मोजके कलाविष्कार कारणीभूत आहेत त्यात ‘वॉचमेन’ प्रचंड मानाच्या स्थानी अढळ आहे!

एखादं माध्यम डिफाईन करणाऱ्या अश्या एखाद्या कलाकृतीचं दुसऱ्या माध्यमात होणारं रुपांतर साहजिकच किचकट काम आहे. मूळ कलाकृतीच्या प्रेमात असणाऱ्यांचा अपेक्षाभंग होण्याचीच शक्यता अधिक असते! २००९ साली प्रदर्शित झालेल्या याच ग्राफिक नॉव्हेलवर आधारित सिनेमाचं काहीसं असंच घडलं. कालांतराने त्या सिनेमाचा सुद्धा एक समर्पक प्रेक्षकवर्ग तयार झाला पण रुपांतर म्हणून पाहता मूळ कलाकृतीला ज्ञाय देणं त्या सिनेमाला जमलं असं कुणीच ठामपणे म्हणू शकत नाही! पण डेमन लिन्डलॉफची यंदाचे एमी नामांकन गाजवणारी एचबीओ सिरीझ ‘वॉचमेन’ मूळ कलाकृतीहून प्रचंड भिन्न असूनही त्याच मूळ कलाकृतीला केवळ ज्ञाय नव्हे तर पोएटिक जस्टीस मिळवून देणारी आहे असं माझं मत आहे!

डेमन लिन्डलॉफ याच सिरीझ संदर्भात असलेल्या एका पॉडकास्टमध्ये म्हणतो, “लोकांनाही सिरीझ आवडूनही हिचं नाव ‘वॉचमेन’ का ठेवलं? असा प्रश्न पडला तर ते सिरीझचं अपयश ठरेल!” लिन्डलॉफच्या या म्हणण्यामागे प्रचंड तथ्य आहे ते असं की प्रथमदर्शनी या सिरीझ मधली पात्र, यातील घटना, यातील एस्थेटिक एलिमेंट्स, प्रथम कळून येणारे जॉनर्स हे सगळंकाही मूळ कलाकृतीपासून इतकं स्वत्रंत्र वाटतं की हा प्रश्न मनात डोकावतोच! मात्र सिरीझ पूर्ण पाहून झाल्यावर या प्रश्नाचं प्रचंड समाधानकारक उत्तर आपल्याला मिळालं असतं!

 

 

ही सिरीझ मूळ कलाकृती पासूनच स्वतःचं डीएनए उचलते. मूळ कलाकृती जो भावनिक अनुभव प्रेक्षकाला/वाचकाला देत असावी तोच अनुभव ही सिरीझ अनेक वेगवेगळी कथानकाची, रचनेची, फिलॉसॉफीची तंत्र वापरून पुनर्निर्मित करते! वास्तविक या सिरीझचं सरळसोट सिनॉप्सीस वाचलं तर वाटतं मूळ कलाकृती जिथे संपते त्या नंतर काही वर्षांच्या कालावधीनंतर हे कथनक वाढू लागतं. हे सत्य असलं तरी ही सत्याची एक बाजू आहे. याच सिरीझ मधलं देवासमान शक्तिशाली असलेलं पात्र म्हणजे नीलकण्ठ राव उर्फ डॉ. मॅनहॅटन अनेकदा म्हणत असतं की तो ज्या प्रकारे ‘काळ’ अनुभवतो त्यानुसार काल, उद्या असं काहीच नसतं. तो सर्वकाही एकाच वेळी अनुभवत असतो. इतर माणसांसाठी ते घडून गेलेलं असो किंवा न घडलेलं. काहीशी हीच धारणा पूर्ण सिरीझला लागू पडते! विशेषतः ज्या प्रकारे इथे इतिहीसाची समांतर पुनर्निर्मिती केली गेली आहे. अनेक भूतकाळातल्या घटना वास्तवापासून प्रचंड साम्य असलेल्या इथे वापरल्या जातात. त्याच धाग्याला खेचत खेचत वर्तमानापर्यंत पोहोचता पोहोचता ही सिरीझ त्याच्याशी खेळू लागते. गंमत अशी की ही समांतर पुनर्निर्मिती तरीसुद्धा आजच्या प्रत्यक्ष वास्तवावरच बेतलेली आहे!

अमेरिकीत सध्या उभ्या राहिलेल्या 'ब्लॅक लाईव्हज मॅटर' या चळवळीला पोषक खतपाणी घालणारी ही कलाकृती आहे. ही चळवळ आज उभी राहत असताना अनेकांना थोडं आश्चर्य वाटलं असावंच की अजूनही अमेरिकेत अश्या प्रकारची असमानता अस्तित्वात आहे! अजूनही व्हाईट सुप्रीमिस्ट रस्त्यांवर खुलेआम घोषणा देत फिरू शकतायत! वॉचमेनच्या पहिल्याच काही एपिसोडमध्ये एक बर्यापैकी कर्तव्यनिष्ठ वाटणारं पोलिसाचं पात्र आपल्या व्हाईट सुप्रीमिस्ट पूर्वजांची एक सुव्हीनर म्हणता येईल अशी एक गोष्ट आपल्या घरात लपवून असते तेव्हा असं वाटतं की जे घोषणा देणारे व्हाईट सुप्रीमिस्ट आहेत फक्त त्यांच्या विरुद्ध अश्या चळवळी उभ्या राहतायत असं नाही! आपल्या पूर्वजांच्या कुर्कर्मांना आपली ‘लेगसी’ मानणारे सुद्धा शांतपणे या समाजात आपल्या अवतीभवती वावरत आहेत! ही वस्तुस्थिती खरंतर जातीयतेच्या बाबतीत आपल्या भारतीय समाजाला सुद्धा तितकीच लागू पडते! या शांत असलेल्या लोकांमधली मानसिकता बदलणं खरंतर अधिक गरजेचं आहे. वॉचमेन पूर्ण सिरीझमधून अनकेदा हे मुद्दे अधोरेखित करत राहते!

 

 

कथानकाची गुंतागुंत आजच्या घडीला एक नॉर्म असल्याप्रमाणे अनेक यशस्वी ड्रामा सिरीझमध्ये जणू एक अलिखित नियम म्हणून पाळली जाते. ती गुंतागुंत इथेही आहेच. मात्र ती प्रेक्षकाला डोईजड होणार नाही याची जाणीवपूर्वक किंवा अजाणता इथे काळजी घेतली गेली आहे! यात एक तंत्र असं आहे की सर्वच महत्वाच्या पात्रांना अंतर्बाह्य आपण ओळखून घेत असतो. अनेक एपीसोड्स पात्र स्पेसिफिक तयार केलेले आहेत. कथानक अनेकदा अब्सर्ड वाटावं इतपत खेळ यात केला जातो. तेव्हा तर ही गुंतागुंत सोडवण्याची आवश्यकताच न वाटता आपण केवळ मनोरंजन म्हणून हा खेळ पाहत राहतो! या खेळात तर्क अनेकदा सोडला जातो. मात्र तो सोडला जातोय याचं भान सिरीझला स्वतःहून आहे असंही वाटत राहतं!

सुपरहिरो जॉनर अलीकडे मुख्य प्रवाहात इतका एक्सप्लॉईट झाला आहे की २००९ साली आलेलं सरळसोट रुपांतर मूळ कलाकृती अजरामर असली तरीही त्यात काहीच विशेष गंमत वाटली नसती! डेमन लिन्डलॉफ आणि त्याच्या लेखकांच्या टीमने या रूपांतरावर घेतलेली सखोल मेहनत अनेक वर्ष शाश्वत राहील अशी आशा मला आहे. एकंदरीत रुपांतर कसे करावे आणि मुळात का करावे या प्रश्नांची आजच्या घडीला परफेक्टली साजेसे उत्तर ही सिरीझ देते. आणि रूपांतरांमध्ये एका नवा पायंडा टाकून ठेवते!