Quick Reads

अर्थ ओव्हरशुट डे: आपण पृथ्वी गमावली आहे

हवामानबदलाची परिस्थिती ही आज आत्त्ताची आहे

Credit : Global Footprint Network

एका खोलीत काही लोकांना बसवलं आहे. वीस ते चाळीशीच्या दरम्यान वयोगटातले लोकं यात आहेत. त्यातल्या प्रत्येकाला एक कोरा कागद आणि सोबत पेन्सिल दिली जाते. समोरच्या टीपॉयवर विविध रंगाचे क्रेयॉन खडू ठेवले आहेत. या लोकांना सूचना देणारी व्यक्ती असं सांगते की, तुम्हाला मी दिलेल्या कागदावर एक चित्र काढायचं आहे. समोर ठेवलेल्या रंगांमधून तुम्ही तुमच्या आवडीचे रंग वापरू शकता. तुमच्यानंतर अजुनही काही लोक इथं येणार आहेत. त्यांच्यासाठी वेगळे रंग आपल्याकडे नाहीत. त्यांनाही यातलेच रंग वापरायचे आहेत. सर्वजण पटापट चित्र काढतात. आपापल्या आवडीनुसार चित्र रंगवतात. आता ह्या लोकांना काही वेळेसाठी बाहेर पाठवलं जातं. 

नंतर दुसरा ग्रुप येतो. यात फक्त लहान मुलं असतात. सूचना देणारी व्यक्ती त्यांनाही एक कागद देते. पेन्सिल देते. आणि समोरच्या उरलेले रंग वापरून चित्र काढून रंगवायला सांगते. ही लहान मुलेही चित्र काढतात. टीपॉयवर उरलेले रंग वापरून चित्र रंगवतात.

शेवटी दोन्हींपैकी पहिला ग्रुप ज्यात मोठी माणसे होती त्यांना आणि दुसऱ्या ग्रुपमधील लहान मुलांना एकत्र बसवलं जातं. सूचना देणारी व्यक्ती आता पहिल्या ग्रुपला विनंती करते की तुम्ही काढलेली चित्रे ह्या मुलांना दाखवा. त्या चित्रात भरपूर रंग वापरलेले असतात. हिरवी झाडे, पाणी, आकाश, पशु, पक्षी असं सर्व काही रंगीबेरंगी असतं.

दुसऱ्या ग्रुपमधील लहान मुलं आपलं चित्र पहिल्या ग्रुपमधील मोठ्या माणसांना दाखवतात. मुलांनी काढलेल्या चित्रात फक्त राखाडा, काळा असे रंग दिलेले असतात. लहान मुलांचं चित्र उदास दिसायला लागतं. पहिल्या ग्रुपमधील माणसांना वाईट वाटतं. त्यातला एकजण भावूक होऊन म्हणतो. “मी हे रंग जपून वापरू शकलो असतो. बरेच रंगीत खडू अर्धे तोडून आम्ही वापरले असते तर ही लहान मुले नंतर अर्धे खडू त्यांच चित्र रंगवण्यासाटी वापरू शकले असते.”

आज आपण वास्तव्य करत असलेली पृथ्वी आपल्याला पुर्वजांकडून मिळालेली देणगी नसून ती पुढच्या पिढ्यांकडून आपण उसनी घेतली आहे या मुद्द्यावर Pravash नावाच्या संस्थेने केलेल्या या व्हिडियोतली छोटीसी गोष्ट पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधने जपून वापरत आपण जबाबदारीने वागण्याचा संदेश देते. 

पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी एखाद्या व्यक्तीची, संस्थेची किंवा राष्ट्राची असावी हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. विकसनशील राष्ट्रे  विरूद्ध विकसीत राष्ट्रे यांच्यात नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावरून होणारा संघर्ष नेहमीचा आहे. कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावर जागतिक पातळीवर अमेरिकेसारखी राष्ट्रे माघार घेत असले तरी व्यक्ती किंवा संस्थात्मक पातळीवर अनेकजण पर्यावरण संरक्षणासाठी धडपड करत आहेत. 

यावर्षी २९ जुलै रोजी अर्थ ओव्हरशुट डे साजरा करण्यात आला. मानवी समूहाला एका वर्षाभरासाठी लागणारे जेवढे नैसर्गिक स्रोत म्हणजे उदाहरणार्थ पाणी पृथ्वीवर उपलब्ध आहे तेवढे आपण वापरून संपल्याची तारीख म्हणजे ओव्हरशुट डे. ग्लोबल फुटप्रिंट नेटवर्क या संस्थेने हे काम सुरू केलं. याची सुरवात २००६ साली झाली. या संस्थेने तयार केलेल्या कार्यपद्धतीनूसार नॅशनल फुटप्रिंट अकाउंटिंग केले जाते. त्यावरून वर्षाच्या ३६५ दिवसाचा हिशोब लावून दरवर्षी एका तारखेला हा अर्थ ओव्हरशुट डे साजरा केला जातो. हा इकॉलॉजिकल फुटप्रिंटचा डेटा हा data.footprintnetwork.org या ओपन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

अर्थ ओव्हरशुट डे साजरा करणे हे फक्त भावनिक अवाहन नाही. पृथ्वी वाचविण्यासाठीची ही एक कृतीशील चळवळ आहे. ओव्हरशुट डेची तारीख पुढे ढकलवणे म्हणजे #MoveTheDate हे आपले सर्वांचे उदिष्ट असायला हवे. शाश्वत विकासाच्या बरोबर या पुढील पाच मुद्यांवर सर्वांनी एकत्र काम केलं तर पृथ्वीला वाचवण्यासाठी आपण एका व्यक्तीपासून ते समूह आणि राष्ट्रांपर्यंत प्रयत्न करू शकतो. 

ग्लोबल फुटप्रिंट नेटवर्कचे अभ्यासक असं सांगतात की आत्ता मानवी समुहाने शहरे, ऊर्जा, अन्न, वातावरण आणि लोकसंख्या या पाच घटकांवर आपण लक्ष देणे गरजेचे आहे.  

जगभरात २०५० पर्यंत ७० ते ८० टक्के लोकसंख्या शहरात राहणार आहे. एकूण जागतिक कार्बन उत्सर्जनामध्ये शहरातील वाहतुकीतून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा वाटा १७ टक्के आहे. सध्या जगात असलेल्या एकुण कार चालवणाऱ्या एकतृतियांश लोकांनी सार्वजनिक वाहतुक वापरली तर अर्थ ओव्हरशुट डेची तारीख आपण ११.५ दिवसांनी पुढे ढकलू शकतो. स्मार्ट सिटी नियोजन आणि संयुक्त राष्ट्रसंघाने २०३० सालासाठी निर्धारित केलेल्या ११ शाश्वत उदिष्टांमध्येही या बाबींचा उल्लेख आहे. 

ऊर्जा संसाधनांचा सुयोग्य वापर करतानाच २०१५ साली पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ठरावानूसार जागतिक तापमान वाढ २ अंश सेल्सियसपेक्षा कमी राखणे हे आपले उदिष्ट आहे. कार्बनउत्सर्जनाचे प्रमाण निम्म्यावर आणु शकलो तर ओव्हरशुट डेची तारीख आपण तब्बल २१ दिवसांनी पुढे ढकलू शकतो. 

अन्नधान्याच्या उत्पादन, वाहतूक आणि साठवणीत होणारे नुकसान हा चिंतेचा विषय आहे. दरवर्षी मानवी आहारासाठी उत्पादित होणारं १.३ अब्ज टन अन्नधान्यापैकी एक तृतियांश अन्न वाया जाते.

अमेरिकेत ४० टक्के अन्नाची नासाडी होते. अमेरिकेत होणारा अन्नाचा हा अपव्यय पेरू आणि स्वीडनमध्ये वापरल्या जाणाऱ्या एकूण जैविक परिसंस्थेच्या आकारमानाएवढा आहे.

प्राण्यांच्या अन्नासाठी होणाऱ्या वाढत्या वापरातून मिथेनचे उत्सर्जन वाढत आहे. जगातील एकूण प्राण्यांचा मांस म्हणून होणाऱ्या वापरात ५० टक्क्यांने घट करून इतर वनस्पतीवर आधारीत अन्नधान्याचा वापर केल्यास १५ दिवसांनी ओव्हरशुट डेची तारीख पुढे ढकलता येणार आहे. 

शुद्ध पाणी, सुपीक जमिन आणि प्रुदुषणमुक्त हवा या मानवी अधिवासासाठी आवश्यक असलेल्या घटकांची पुर्तता करण्यासाठी वनांचे संवर्धन करावे लागणार आहे. वनीकरण, पुर्ननिर्मितीक्षम शेती आणि शाश्वत मासेमारी ह्या धोरणांचा अवलंब करत ३५ कोटी हेक्टर क्षेत्रावर वनीकरण केल्यास पृथ्वीचे ८ दिवस वाचवता येतील. लोकसंख्यावाढीच्या मुद्याचा विचार करतानाच स्त्री-पुरूष लिंग समानतेकडे लक्ष देण्यावर ग्लोबल फुट प्रिंट वेटवर्कच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. 

ग्लोबल फुट प्रिंट आणि पर्यावरणात काम करणाऱ्या कितीतरी संस्थांनी मांडलेली ही तथ्ये वैयक्तिकपणे लोकं, तुम्ही आम्ही  किती गांभिर्याने घेतील यावर शंका असण्याला वाव आहे. पर्यावरणाविषयी आपण वाचलेली माहिती ऐकून लोकं सजग होत आहेत का हाही प्रश्न आहे. Yale’s climate survey program च्या सर्वेक्षणानुसार ७४ टक्के महिला आणि ७० पुरूषांना असे वाटते की हवामानात होणारा बदल हा भविष्यात होणारी गोष्ट असून त्याचा परिणाम सध्या आपल्यावर होणार नसून पुढच्या पिढीवर होणार आहे. अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पॅरिस हवामानबदल करारातून माघार घेण्याचा निर्णय राजकीय होता. परंतू येले क्लाईमेट सर्व्हे प्रोग्रामच्या अभ्यासातून आलेली बाब ज्यात सामान्य लोकांना हवामान बदल भविष्यात होईल असे वाटणे हे धक्कादायक आहे. 

जागतिक हवामान बदलावर भाष्य करणारे Fourth National Climate Assessment आणि 2018 Lancet Countdown दोन महत्त्वाचे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. हा अहवाल अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. २००० वर्षी १२ कोटी तीस हजार लोकांनी उष्णलहर अनुभवली. या लोकांव्यतिरिक्त २०१६ साली १५ कोटी ७० लाख लोकांनी अमेरिकेत उष्ण लहरींचा प्रभाव जाणवला. या उष्माघातामुळे होणारा परिणामाची किंमत जगभरातील १५ कोटी तीस लाख तास मानवी श्रमांच्या बरोबर आहे. झिका, डेंगू ताप, मलेरिया आणि चिकनगुनिया पसरवणारे डास किती अंतरावर प्रवास करू शकतात ही त्यांची क्षमता वाढत आहे. हवामानबदलाची परिस्थिती ही आज आत्त्ताची आहे हा मुद्दा पर्यावरण आणि जैविक परिस्थितीत होणार्‍या बदलातील तथ्ये या दोन्ही अहवालात मांडली आहेत.