India
२०१३ मध्ये काढलेल्या मोर्चाबद्दल २०२१ मध्ये डीवायएफआयच्या प्रीथी शेखर यांना अटक
आझाद मैदान पोलीसांनी त्यांना अटक केली.
भारतीय जनवादी युवक संघटने डीवायएफआय (डीवायएफआय) च्या महाराष्ट्र राज्य सचिव प्रीथी शेखर याना मंगळवारी सांयकाळी ४:३० ला त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. २०१३ सालच्या एका जुन्या केस अंतर्गत आज आझाद मैदान पोलीसांनी त्यांना अटक केली.
रोजगार आणि शिक्षणाच्या संधींची मागणी करत २९ नोव्हेंबर २०१३ रोजी हजारो तरुण आणि विद्यार्थी मुंबईच्या रस्त्यावर जमा झाले होते. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि डीवायएफआयनं आयोजित केलेल्या या आंदोलनात शेखर या प्रमुख आयोजकांपैकी एक होत्या. या विरोध प्रदर्शनात त्यांनी गाणे म्हणून आणि ढोल वाजवत निषेध केला होता, तसंच राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. या मोर्च्यात ठाणे, सोलापूर, पुणे, बीड, औरंगाबाद, जालना, नांदेड, रायगड, मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यांमधून आंदोलक एकत्र आले होते.
डीवायएफआयचे प्रसाद सुब्रमण्यम यांनी संदर्भात इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं, "नोव्हेंबर २०१३ रोजी एसएफआय आणि डीवायएफआयनं एक मोठा मोर्चा काढायचं आवाहन केलं होत. हा मोर्चा भायखळा ते मंत्रालय या मार्गावर आयोजित करण्यात आला होता. आझाद मैदान जवळ हा मोर्चा पोलिसाकडून थांबण्यात आला. त्याची एक व्हिडिओ क्लिप पोलीसाकंडे आहे. त्याच व्हिडीओवरून त्यांनी प्रीथी शेखर यांना आज संध्याकाळी अटक केली. खरं तर ही अटक सकाळी झाली असती तर यावर जामीन मिळवायचा प्रयत्न तरी करता आला असता. पण शिक्षण आणि बेरोजगारीविरुद्ध मोर्चा नेला म्हणून अटक करणं, हे महाविकास आघाडी आणि मुंबई पोलिसांचं वागणं खूप चुकीचं आहे."
"शिक्षण आणि बेरोजगारीविरुद्ध मोर्चा नेला म्हणून अटक करणं, हे वागणं खूप चुकीचं आहे."
तेव्हा हा मोर्चा काढला जाऊ नये म्हणून भायखळा पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन करत मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि युवकांनी यात सहभागी झाले.यामुळं पोलिसानाआंदोलकांसमोर नमतं घ्यावं लागलं. सरकारनं विद्यार्थी आणि युवाकांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आझाद मैदानावरील जाहीर सभेत या मोर्चाचा समारोप झाला. मात्र त्याचवेळी प्रीथी शेखर आणि मोर्च्यात असणाऱ्या बऱ्याच लोकांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.
आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूषण बेळनकर याबाबत इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले, "ही अटक आम्ही कोणताही पूर्वग्रह न ठेवता केलेली आहे. यामध्ये कोणताही अवैध प्रकार नाही. इथल्या सत्र न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसारच त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे."
आझाद मैदानावर झालेल्या सभेत एसएफआय-डीवायएफआयच्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या नव-उदारमतवादी धोरणावर तीव्र टीका केली होती, ज्यात त्यांनी शिक्षणाचं जलद व्यापारीकरण हेच तीव्र बेरोजगारीचं मूळ कारण आहे, असं म्हटलं होतं. बेरोजगारीतून निर्माण होणाऱ्या समस्यांचा वापर समाजांमधील द्वेष वाढवण्यासाठी होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला होता. यापूर्वी देखील डीवायएफआयनं जातीय आणि धार्मिक हिंसेच्या पीडितांना एकत्र बोलूवून एक जनजागृतीचा कार्यक्रम घेतला होता, असं प्रीथी यांच्या काही साथीदारांनी सांगितलं. या कार्यक्रमानंतरही प्रीथी शेखर यांना अशा प्रकारे अटक झाली होती.