Quick Reads

भटक्या कुत्र्यांच्या नियोजनाचा तिढा कसा सुटेल?

हैदराबादमध्ये झालेल्या कुत्र्यांच्या कळपाच्या हल्ल्यात पाच वर्षीय प्रदीपचा मृत्यू झाल्यानंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत.

Credit : नितीन वाघमारे

 

राकेश नेवसेहैदराबाद इथं झालेल्या कुत्र्यांच्या कळपाच्या हल्ल्यात पाच वर्षीय प्रदीपचा मृत्यू झाल्यानंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये प्रचंड प्रमाणात भटक्या कुत्रे असून त्यांच्या नियंत्रणासाठी सरकार काय करत आहे, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कुत्र्यांच्या कळपामुळं पुण्यातील नागरिक सातत्यानं त्रस्त असतात. मात्र महानगरपालिका भारतीय प्राणी कल्याण बोर्डाच्या नियमांचा हवाला देत यावर कोणताही उपाय शोधत नसल्याचं जाणवून येत आहे. सध्या तरी या भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर वेगळ्या कोणत्याही उपाययोजनेचा विचार महापालिका करत नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

२०१८ सालच्या गणनेनुसार पुण्यात ३.५ लाख भटकी कुत्री आहेत. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या ३ टक्के प्रमाणात संख्या कुत्र्यांची आहे. पुण्यात शिक्षणासाठी आलेला शुभम सकट म्हणतो, "मला भटक्या कुत्र्यांची प्रचंड भीती वाटते. रस्त्यावर फिरणारी कुत्री मला चावतील असं वाटतं असतं, मला अभ्यासासाठी बऱ्याचदा सकाळी लवकर जावं लागत. शिवाय यायला उशीर होतो. कधी कधी ही रस्त्यावरची कुत्री माझ्यावर भुंकतात. पालिकेनं याबद्दल काहीतरी केलं पाहिजे."

पुणे महानगरपालिकेच्या पशु वैद्यकीय अधिकारी डॉ सारिका फुंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पुणे महानगरपालिका क्षेत्रातील किमान ६० ते ७० टक्के कुत्र्यांचं लसीकरण झालं आहे.

"लसीकरण झालेला कुत्रा चावला तर रेबीज होण्याची शक्यता नसते. पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात नव्यानं समाविष्ट झालेल्या गांवामधल्या कुत्र्यांचं सध्या लसीकरण आणि नसबंदी सुरु आहे. पुणे महानगरपालिका या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्यापासून होणाऱ्या रेबीज आजारापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करते," डॉ. फुंदे म्हणाल्या.

त्या पुढं सांगतात की कुत्र्यांचं लसीकरण केलं असेल आणि त्यांना पुरेसं जेवण असलं तर कुत्र्यांची कोणावर हल्ला करण्याची शक्यता खूप कमी असते.

"नागरिक कुत्र्यांना मारण्याची मागणी किंवा त्यांना त्यांच्या जागेवरून हलवण्याची मागणी करत असतात. पण २००१ च्या प्राण्यांच्या जन्मदर नियंत्रण कायद्यानुसार कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी त्यांना मारणं गुन्हा आहे. त्यांच्या संख्येचं नियंत्रण करण्यासाठी फक्त नसबंदी करणं हाच एक कायदेशीर मार्ग आहे," त्या सांगतात.

 

 

पुण्यात प्राण्यांची सेवाभावी संस्था चालवणाऱ्या शैला चव्हाण हैदराबाद इथं घडलेल्या घटनेचं कारण सांगताना म्हणतात, "हैदराबाद इथं घडलेली घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. पण, त्या व्हिडिओमध्ये त्या कुत्र्यांची लहान पिल्लंसुद्धा दिसत आहेत. पिल्लं झालेली कुत्री पिल्लांबद्दल खूप संरक्षणात्मक असते. तो मुलगा पिल्लांच्या खूप जवळ गेल्यामुळं पिल्लांच्या आईनं त्या मुलावर हल्ला केला असू शकतो. असे हल्ले काही वेळेस उपाशी कुत्रीसुद्धा करू शकतात. पण अचूक कारण देणं अवघड आहे."

गोविंद डिके एक दिवशी सकाळी लवकर बाहेर निघाले होते. त्यावेळी त्यांच्यावर काही कुत्रे भुंकू लागले. भीतीमुळं आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी छोट्या अंतरासाठी रिक्षा करावी लागली. कुत्र्यांच्या भुंकण्याचा त्रास अनेक जणांना होत असतो.

कुत्र्यांच्या भुंकण्याबद्दल बोलत असताना डॉ फुंदे म्हणतात, "भुंकणं हा कुत्र्यांचा मूळ स्वभाव आहे, निसर्गानं त्यांना स्वतःच्या संरक्षणासाठी आणि संवादासाठी भुंकण्याचा गुण दिला. कुत्री भुंकुन आपल्याबरोबर आणि इतर कुत्र्यांबरोबर संवाद साधतात. फक्त कुत्री भुंकतात म्हणून त्यांचं विस्थापन केलं जाऊ शकत नाही. नसबंदीनंतरही त्यांना त्यांच्या मूळ जागेवर सोडणं बंधनकारक आहे. आपण ही बाब स्वीकारणं गरजेचं आहे."

'साहस' या प्राण्यांच्या सेवाभावी संस्थेच्या गीता तौर यांनी कुत्र्यांच्या स्वभावाबद्दल दिलेल्या माहितीनुसार, "कुत्र्यांची उत्क्रांती कोल्ह्यापासून झाली आहे. त्यामुळं कळप करून राहणं, कळपाच्या प्रदेशाचं संरक्षण करणं, हे गुण कुत्र्यांमध्ये जन्मजात असतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा कळप अनोळखी व्यक्तींवर भुंकतात, काही वेळेस धावून येतात. ते त्यांच्या प्रदेशाचं संरक्षण करत असतात."

गाडी चालवत असताना कुत्री मागे लागल्याचा अनुभव सर्वांनाच आला आहे. चव्हाण कुत्र्यांच्या गाडीमागे पळण्याचं कारणदेताना सांगतात, "कुत्रा आणि इतर प्राण्यांची संवेदनशक्ती माणसापेक्षा खूप जास्त असते. कुत्र्यांना गाडीच्या आवाजाचा त्रास झाला किंवा त्यांना त्या गाडीच्या आवाजानं उत्तेजित केलं तर ती कुत्री गाडी मागे पळतात."

दिगंबर शिंदे राहतात त्या परिसरात बरीच कुत्रे आहेत. त्यांना सुरक्षेबरोबर परिसराच्या स्वच्छतेची चिंता सतावत असते. ते म्हणतात, "परिसरात लहान मुलं खेळत-फिरत असतात. भटक्या कुत्र्यांमुळं त्यांच्या सुरक्षिततेची चिंता असते, शिवाय हे कुत्रे परिसरात घाण करतात. कुत्र्यांना मारणं मलाही बरोबर वाटत नाही. महानगरपालिकेनं या कुत्रांना कुठं तरी लांब सोडून दिलं पाहिजे."

मात्र भारतीय प्राणी कल्याण बोर्डाच्या नियमांनुसार कुत्र्यांच्या भूंकण्याचा त्रास होतो, कुत्र्यांचे कळप गाडी मागे पाळतात, आवारातल्या कुत्र्यांमुळं भीती वाटते, या किंवा अशा इतर कोणत्याही कारणासाठी कुत्र्यांचं विस्थापन केलं जाऊ शकत नाही. असं काही केल्यास बोर्ड महानगरपालिकेवर दंड आकारू शकतो, अशी माहिती डॉ फुंदे यांनी दिली. त्यामुळे पालिकेला नागरिकांच्या संरक्षणासाठी जास्त नाविन्यपूर्ण मार्ग शोधण्याची गरज आहे.

 

 

तौर परिसंस्थेतील कुत्र्यांचं स्थान अधोरेखित करताना सांगतात, "कुत्री शहरातील परिसंस्थेचा महत्वाचा भाग आहेत. भारतासारख्या विकसनशील देशातील शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भटकी कुत्री हा घनकचरा खातात, जर त्यांनी हा कचरा खाल्ला नाहीतर उंदरांची संख्या वाढून शहर साथीचे रोग पसरू शकतात. अशी घटना सुरतमध्ये घडली होती. त्यामुळं कुत्री एकप्रकारे शहरात अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात."

पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार कुत्र्यांच्या संख्येवर आणि आक्रमकतेवर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात मानवीय आणि शास्त्रीय मार्ग म्हणजे नसबंदी आहे.

"कुत्र्यांची हत्या किंवा त्यांचं विस्थापन करून प्रश्न सुटत नाही. जुन्या कुत्र्यांची जागा पुन्हा दुसरे नवे कुत्रे घेतात आणि त्या कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी केली असेलच याची शाश्वती नसते. त्यामुळं कुत्र्यांना मारण्यापेक्षा किंवा त्यांच्या जागेवरून हटवून दुसरीकडे सोडण्यापेक्षा महानगरपालिका त्यांचं लसीकरण आणि नसबंदी करते."

तौर पुढं म्हणतात, "लसीकरण आणि नसबंदीमुळे कुत्र्यांमध्ये आक्रमकता कमी होते. त्यामुळं कुत्र्यांना मारण्यापेक्षा त्यांचं लसीकरण आणि नसबंदी एक जास्त व्यावहारिक मार्ग आहे."

प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सर्व संस्थांच्या मते हैदराबादसारखे प्रकार टाळले जाऊ शकतात. "सर्वचं कुत्रे आक्रमक नसतात, शिवाय कुत्र्यांची आक्रमकता कमी केली जाऊ शकते. त्यासाठी नसबंदी, लसीकरण, कुत्र्यांना खाद्य वाटप, त्यांना त्रास न देणं, इत्यादी मार्ग आहेत. तसेच मानवानं इतर प्राण्यांबरोबर एकत्र राहायला शिकलं पाहिजे," असा सल्ला त्यांनी दिला आहे.

पुणे महानगरपालिकादेखील आजूबाजूच्या परिसरातील कुत्र्यांचा सांभाळ करण्याचा, त्यांना खायला देण्याचा, त्यांचं लसीकरण आणि नसबंदी करण्याचा सल्ला देते. यामुळे ते कुत्रे तुमच्या परिसराचं संरक्षण करतील आणि इतर कुत्र्यांपासून तुमचा बचाव करतील, असं महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर लिहिलेलं आहे.