Quick Reads

आज एका जनवादी कवीच्या कवितेची नव्यानं आठवण करायची आहे

१० फेब्रूवारी १९७५ ला लखनौमधे किंग जॉर्ज हॉस्पीटलात धूमिल ब्रेन ट्यूमरनं गेला.

Credit : satyagrah.in

- श्रीधर चैतन्य

१० फेब्रूवारी १९७५ ला लखनौमधे किंग जॉर्ज हॉस्पीटलात धूमिल ब्रेन ट्यूमरनं गेला. कविता म्हणजे, भाषेतला माणूस असण्याचा उद्गार आहे. 'कविता म्हणजे, जमावानं घेरलेल्या कुणा माणसाचा जीव तोडून केलेला एकांडा प्रतिकार आहे,' धूमिल म्हणायचा. ट्यूमरच्या असह्य वेदना सहन करत असतानाच याच फेब्रूवारी महिन्यात कधीतरी त्यानं खूण करून आपल्या भावाला, कन्हैया पांडेयला जवळ बोलावलं आणि एक कविता लिहून घ्यायला सांगितली - 

'शब्द कसे 

कविता बनतात

हे पहा

अक्षरांमधे पडलेल्या 

माणसाला पहा .

तो आवाज 

ऐकलास का तू , 

लोखंडाचा आहे की

मातीत पडलेल्या 

रक्ताचा रंग आहे .

लोखंडाचा स्वाद

लोहाराला विचारू नकोस

घोड्याला विचार

त्याच्या तोंडात 

लोखंडाचा लगाम आहे . '

 

तो असाच होता; तो कवी होता!

पण धूमिल फक्त कवी नव्हता. तो नाकारलेल्या अस्वस्थ समाजाचा आवाज होता, तो लोकशाहीआडून होत असलेल्या शोषण आणि दमनाच्या विरोधातला आवाज होता. बनारसमधे ९ नोव्हेंबरला जन्मलेल्या या जनवादी कवीचं खरं नाव सुदाम पांडेय होतं. समकालीन भारतातल्या खुळखुळा झालेल्या मूल्यहीन व्यवस्थेचं प्रतीक म्हणून त्यानं 'धूमिल' हे नाव घेतलं होतं. धूमिल म्हणजे धूसर-काळवंडलेलं. धूमिल म्हणजे जगण्याच्या प्रत्येक स्तरावर जाणवणारं, लोकांच्या इच्छा आकांक्षा धूसर आणि काळवंडणाऱ्या व्यवस्थेचं लक्षण सांगणारं नाव.

हिंदीच नव्हे, तर साठोत्तरी कवितेतलं महत्वाचं नाव असलेल्या या अफलातून जनकवीचे तीन कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. तो जिवंत असताना प्रसिद्ध झालेला-' संसद से  सडक तक' नंतरचा-'कल सुनना मुझे' आणि शेवटचा-'सुदाम पांडे का प्रजातंत्र'. 

माणूस मेल्यावर त्याची थोरवी गायची आपल्या भारताची परंपरा असल्यानं त्याला १९७९ साली, म्हणजे तो मेल्यावर 'कल  सुनना मुझे'साठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. (अर्थात तो जी जीवनप्रणाली मानत होता ती पाहता त्यांनं हा सरकारी पुरस्कार स्वीकारला नसताच ( आणि त्यामुळे पुरस्कार वापसीही  केली नसती!)) 

१९६० च्या दशकात हिन्दी आणि एकूणच भारतीय साहित्यजगात वास्तवाला भिडण्याची जी चळवळ सुरू झाली होती त्या चळवळीचा झेंडा आपल्या खांद्यांवर घेणाऱ्यात धूमिल प्रमुख आहे. त्याच्या कवितेत परंपरा, भावकवी गोग्गोडता, खोटी घरंदाजी शालीनता आणि कृत्रिम आधुनिकता या सगळ्याला विरोध आहे. या सगळ्यामागे जी वर्चस्ववादी व्यवस्था आहे तीला हा लोकांच्या साध्यासुध्या भाषेत लिहिणारा कवी नेमकं ओळखून होता. वर्चस्ववादी व्यवस्था हे सगळं स्वत:च्या फायद्यासाठी वापरते हे त्याच्या लक्षात आलं होतं. या विरोधातून त्याच्या कवितेत एक आक्रमकता, उपहासात्मकता आली. ही आक्रमकता त्याची कविता आणखी प्रभावी करते, कवितेचं बलस्थान होते. हा कवी फालतू रोमांटिझम, आत्यंतिक कल्पनाविलास, आणि जटिल प्रतीकात्मकता या संगळ्यांपासून मुक्त आहे. त्याची कविता जगण्याला आणि जगाला थेट भिडते आणि त्याला आकळलेलं सत्य तो आपल्या कवितेतून आपल्याच उठण्या-बसण्याच्या रोजच्या भाषेत मांडतो. 

लोकांचे विसविशीत पोकळ आदर्श आणि  विचार बदलणारी, त्यांच्या जीवनाबद्दल बोलणारी, त्यांना बदलाच्या रस्त्यावर नेणारी, प्रेम आणि निरागसता नष्ट करणाऱ्या दमनकारी सत्तेच्या मस्तीला ध्वस्त करणारी, स्वातंत्र्य आणि मुक्ती भावनेच्या अभिव्यक्तीची कविता म्हणजे जनवादी कविता आणि अशी कविता लिहिणारा कवी म्हणजे जनवादी कवी. 'ऊनके शहर में सूर्यास्त, शहर का व्याकरण, नगरकथा, प्रौढ शिक्षा, लोकतंत्र ताजा खबर,  मोचीराम, पटकथा, रोटी और संसद, मुनासिब कारवाई, देश प्रेम मेरे लिए, किस्सा जनतंत्र' अश्या  बऱ्याच कवितांमधून त्याचा जनवादी दृष्टीकोन स्पष्ट होतो. जनवादी कवी म्हणजे काय असणं हे धुमिलच्या कविता वाचून समजतं. त्याचं सगळं लिखाण त्याच्या जनवादी चेतनेचा परिणाम आहे. त्याची कविता १९६० मधल्या पिढीच्या आक्रोशाचा आणि विद्रोहाची कविता आहे.

मोचीराम, बीस साल बाद, पटकथा, रोटी और संसद, लोहे का स्वाद, रक्तपात, हरित क्रांति, घर में वापसी या धूमिलच्या सगळ्यात महत्वाच्या आणि प्रसिद्ध कविता आहेत. (यातली मोचीराम ही कविता हिंदीच्या पुस्तकात प्रसिद्ध झाल्यावर भाजपानं २००६ साली आंदोलन केलं आणि ती कविता पुस्तकातून काढायला लावली होती. (रा.स्व.संघ नेहमीच कवी, लेखकांना घाबरत आलाय!) 

या सुदामा पांडेय नावाच्या 'धूमिल' कवीनं लोकांच्या विद्रोहाला, लढ्याला, नकाराला आणि समाधानानं कष्ट करून जगण्याच्या स्वप्नांना भाषा दिलीय. स्वातंत्र्यानंतर मुखभंग झालेल्या पिढीचा आक्रोश आणि संतापाला शब्द देणारा हा कवी व्यवस्थेला आरसा दाखवतोच पण लोकसंघर्षात लोकांची बाजू घेताना कुठेही तडजोड करत नाही. 

आजच्या पोस्ट ट्रूथ विरुद्ध रिअल ट्रूथ संघर्षाच्या भोवंडून टाकणाऱ्या काळात धूमिलला नव्यानं वाचायला हवय, त्याचं लिखाण नव्यानं समजून घ्यायला हवय. अश्या या आपल्या कवीच्या समग्र लिखाणाचे तीन खंड आज १० फेब्रुवारीला लोकार्पित होताहेत. हा लोकार्पण सोहळा मुंबईत आहे . 

धुमिल च्या काही कवितांचे अंश (मराठीत अनुवादित)

१. 

एक माणूस 

भाकरी थापतोय . 

एक माणूस 

ती खातोय .

एक तिसरा माणूसही तिथं आहे . 

जो भाकरी ना थापतोय 

ना भाकरी खातोय . 

तो फक्त भाकरीशी खेळतोय .

हा तिसरा कोण आहे ?

माझ्या देशाची संसद गप्प आहे . 

२. 

रापीवर रोखलेली नजर काढून 

त्यानं मला क्षणभर न्याहाळलं . 

आणि पातळ आवाजात हसत म्हणाला , 

' खरं सांगू साहेब , 

माझ्या हिशोबानं 

कुणी  माणूस छोटा नाही 

आणि कुणी मोठा नाही . 

माझ्यासाठी प्रत्येक माणूस 

पायताणाचा एक जोड आहे , 

माझ्या समोर दुरुस्तीला  

उभा आहे .'

३.  

सगळ्यात जास्त खून समन्वयवाद्यांनी पाडले 

तत्वज्ञानी सगळ्यात जास्त दागिने खरीदले . 

गर्दीनं त्या माणसाला खूप हाणलं 

ज्याचा चेहरा येशू सारखा दिसत होता . 

४.  

ते वकील आहेत 

शास्त्रज्ञ आहेत ,

प्राध्यापक आहेत , 

लेखक आहेत , कवी आहेत ,

कलाकार आहेत 

म्हणजे तो कायद्याची भाषा बोलणारा

गुन्हेगारांचा  संयुक्त परिवार आहे . 

५.   

ऐक , 

मी  तुला सत्य सांगतो . 

या सत्यापुढे जगातलं प्रत्येक सत्य छोटं आहे . 

भुकेजल्या माणसांचं एकमेव तत्वज्ञान भाकरी आहे .

----------------------

धूमिल समग्र: संपादन या पुस्तकाचा लोकार्पण समारोह १० फेब्रुवारीला संध्याकाळी ५.३० वा केशव गोरे स्मारक ट्रस्ट, आरे रोड, गोरेगाव(पश्चिम) मुंबई इथे होतोय. जनवादी  लेखक संघ, प्रगतिशील लेखक संघ, धूमिल शोध संस्थान, जन संस्कृति मंच, आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र असे सगळे मिळून हा कार्यक्रम आयोजित करता आहेत. आपण इथं असणं ही गरजेचं आहे.