Quick Reads

या जागतिक महामारीनंतर आपण सुखाने झोपू शकत नाही

मागच्या वेळी आपल्यापैकी बरेच जण याला बळी पडले. पण या वेळी तसं होणार नाही हे पाहिलं पाहिजे.

Credit : The New Yorker

अराजकवादी लेखक, विचारवंत आणि कार्यकर्ते तसेच मानववंशशास्त्रज्ञ असलेले डेव्हिड ग्रेबर यांचा सप्टेंबर २०२० मध्ये अकाली मृत्यू झाला. मृत्युपूर्वी काही दिवस लिहिलेल्या या लेखात त्यांनी कोव्हिड १९ महामारी नंतर जीवन आणि राजकारण कसं असू शकेल यावर प्रकाश टाकला आहे. Jacobin Magazine ने पहिल्यांदा प्रकाशित केलेल्या या लेखात डेव्हिड ग्रेबर मांडतात की कोरोना जागतिक महामारी च्या नंतरच्या काळात आपण अशा वास्तवात ‘नॉर्मली’ परतू शकत नाही जिथे मुठभर श्रीमंत लोकांच्या लहरी पूर्ण करण्यासाठी आपल्यासारख्या बहुसंख्य समाजाला राबाव लागणं आणि आपली सातत्याने अवनती होत राहणं अशी समाजरचना ही योग्य आणि रास्तच आहे असं समजलं जातं.

पुढील काही महिन्यात कधीतरी हे संकट पूर्णपणे टळल्याच जाहीर केलं जाईल आणि आपण सगळे आपल्या ‘अत्यावश्यक नसलेल्या’ कामांकडे पुन्हा वळू. बहुसंख्य लोकांसाठी हे एखाद्या स्वप्नातून जागं होण्यासारखं असेल. 

माध्यमं आणि राजकीय वर्ग तर आपल्याला असंच विचार करायला प्रवृत्त करतील. २००८ च्या आर्थिक संकटानंतरही अगदी असंच झालं. प्रश्न विचारण्याचा एक छोटा अवकाश त्यावेळी खुला झाला होता. (शेवटी ‘वित्त म्हणजे काय? इतर लोकांचं ऋण किंवा कर्जच ना? पैसा म्हणजे काय? ते पण ऋणच ना? मुळात ऋण किंवा कर्ज म्हणजे काय? ते एक निव्वळ वचन नाही का? आणि पैसा आणि कर्ज म्हणजे केवळ आपण एकमेकांना देत असलेल्या वचनांचं एकत्रीकरण असेल तर एकमेकांना त्यापेक्षा वेगळी वचन देण हे आपल्यासाठी अधिक सोप नाही का?) पण असे प्रश्न विचारण्याची शक्यता तातडीने बंद केली गेली. तुम्ही अति विचार न करता कामाला लागा किंवा किमान काम शोधायला लागा असे आपल्या गळी उतरवणाऱ्या लोकांनीच हा अवकाश बंद केला. 

मागच्या वेळी आपल्यापैकी बरेच जण याला बळी पडले. पण या वेळी तसं होणार नाही हे पाहिलं पाहिजे. 

कारण जे संकट आपण गेल्या काही महिन्यात अनुभवलं आहे तेच मुळी एका दीर्घकालीन स्वप्नातून जागं करणारं होतं. मानवी जीवनातील प्रत्यक्ष वास्तवाला सामोरं जाणं होतं. आणि ते वास्तव हेच आहे की ‘आपण’ म्हणजे एकमेकांची काळजी घेणाऱ्या, एकमेकांचं पालन पोषण करणाऱ्या नाजूक मानव प्राण्यांचा समूह आहोत आणि ज्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत असे जे लोक या कामात सिंहाचा वाटा उचलतात ते एकतर करांच्या ओझ्याखाली दबलेले आहेत, त्यांना अतिशय कमी वेतन मिळते, त्यांची पिळवणूक केली जाते आणि त्यांना रोजच्या रोज मानहानीला सामोरे जावे लागते. तर दुसरीकडे लोकसंख्येतील एक मोठा भाग काहीही न करता केवळ कल्पनारम्य जगाची स्वप्ने दाखवत राहतो, भाडे उकळत राहतो किंवा जे लोक काही बनवतात, दुरुस्त करतात, श्रम करतात, गोष्टी इकडून तिकडे पोचवतात किंवा सामान्यतः इतर माणसांच्या गरजा भागवण्यासाठी व्यस्त असतात त्यांच्या आड येत राहतो. ज्याप्रमाणे एखाद्या स्वप्नात अतिशय विचित्र, विसंगत गोष्टीही सुसंगत वाटायला लागतात त्याप्रमाणेच जिथे हे सगळं अगदी योग्य आणि सुसंगत वाटू लागेल अशा प्रकारच्या वास्तवात आपण पुन्हा घसरू नये हे आज अतिशय आवश्यक बनलेलं आहे. 

 

 

एखाद्या माणसाचं काम हे जितकं जास्त उघडपणे इतरांच्या फायद्याचं असेल तितके कमी पैसे त्याला त्यासाठी मिळतात ही गोष्ट ‘नॉर्मलच’ आहे असं पाहणं आपण बंद का करत नाही ? किंवा वित्तीय बाजारपेठा आपल्याला पृथ्वीवरील संसाधने, जीवसृष्टी नष्ट होण्याकडे नेत असल्या तरी त्या ‘दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एकमेव सर्वोत्तम मार्ग’ आहेत ह्याचा आग्रह धरणं आपण का सोडत नाही ? 

त्यापेक्षा, सध्याची संकटाची परिस्थिती टळल्यावर आपण या सगळ्यातून काय शिकलो हे लक्षात ठेवू शकतो का: ‘अर्थव्यवस्था’ या शब्दाचा जर काही अर्थ असेल तर तो हाच असायला हवा की (खऱ्या अर्थाने) आपल्याला जिवंत असण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी एकमेकांना पुरवण्याचा, त्यांचं आदान प्रदान करण्याचा मार्ग. आणि ज्याला आपण ‘बाजारपेठ’ किंवा मार्केट म्हणतो ती म्हणजे खरंतर श्रीमंत माणसांच्या एकूण इच्छा, हव्यास यांची आकडेवारी तक्त्यांमध्ये व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. आणि त्या श्रीमंतांपैकी बहुतांश लोक हे काही प्रमाणात विकृत तरी आहेत आणि त्यांच्यातीलही जे अधिक शक्तिशाली लोक आहेत, त्यांच्या मर्जीतली माणस आपल्या भाषणांतून ‘येणाऱ्या संकटांची जाणीव आपल्या कोणालाच नव्हती आणि आपण सामूहिकरीत्याच त्याला जबाबदार आहोत’ असं जरी म्हणत असली तरी ते आधीपासूनच त्यांना पळ काढता येईल अशी आपली सिक्रेट बंकर्स डिझाईन करण्याच्या मागे होते आणि आपणच त्यांच्यावर विश्वास ठेवण्या इतके मूर्ख ठरलो.

यावेळी तरी किमान आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकतो का? 

आपण सध्या जे काही काम करतो त्यातील बहुतांश काम हे ‘ड्रीम वर्क’ आहे. त्याचं अस्तित्व फक्त त्याच्यापुरत सीमित आहे. एकतर श्रीमंत लोकांना स्वतःबद्दल अधिक चांगलं वाटण्या करता किंवा गरीब लोकांना स्वतःबद्दल अधिक वाईट वाटण्याकरता ते अस्तित्वात आहे. आणि ते करणं आपण थांबवलं तर आपण स्वतःला काही संयुक्तिक आणि तर्कशुद्ध म्हणता येईल असं प्रॉमिस करू शकण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, अशी ‘अर्थव्यवस्था’ तयार करणं जिथे जे लोक आपली काळजी घेत आहेत, आपली देखभाल करण्यासाठी श्रम करत आहेत त्यांची आपल्याला काळजी घेता येईल, देखभाल करता येईल.

 

अनुवाद: अनुज देशपांडे