Quick Reads

'टेफ्लॉन'ची थरारक कथा सांगणारा सिनेमा

सिनेमाओळख: डार्क वॉटर्स

Credit : Indie Journal

 

ऋत्विक शंकर गौतमी । एखादा नट एका अतिप्रचंड सिस्टीम मधल्या सर्वात मोठ्या सिनेमा फ्रँचाइजचा अती महत्त्वाचा हिस्सा बनतो, नातवंडं आरामात बसून खाऊ शकतील असा पैसा कमावतो. आता शिल्लक राहतं एकच...एखाद्या मोठ्या थेस्पियन प्रमाणे अत्यंत चोखंदळ भूमिका करत निवांत जगत राहणं, मोठ मोठ्या फिल्म स्कूल ना फॅकल्टी म्हणून अधून मधून भेटत राहणं, 'थर्ड वर्ल्ड कंट्री'च्या सफरी करत दुसऱ्याच्या पैश्यांवर एखादा जाज्वल्य सामाजिक सिनेमा करणं वगैरे वगैरे...मग फिल्मोग्राफीचा आलेख चढत ऑनररी अवॉर्ड घेत आरामात मरून जाणं. हॉलिवूड मध्ये अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. अर्थात काही मान्यवर अपवाद सगळीकडे असतातच. उदाहरणार्थ 'फ्रीडा'च्या चरित्रपटाची निर्मिती करून स्वतःच्या फ्रीडा सारखं दिसण्याचं व्यवस्थित मार्केटिंग केलेली सलमा हायेक असो किंवा भारतात म्हणाल तर गिरीश कासारवल्ली कडे स्वतः जाऊन 'द्विपा' सारखा मास्टर पिस बनवणारी सौंदर्या. आणि असे आणखी बरेच.

या सगळ्याला छेद देत मार्क रफलो एक असामान्य गणित मांडतो. मार्क रफलो म्हणजे मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स मधल्या जगप्रसिद्ध अवेंजर्स सिरीज मधला सर्वांचा लाडका हल्क. 'अवेंजर्स'चे सगळे भाग, सोबत फ्रॅंचाईझ मधील इतर अनेक नवीन सिनेमे आणि सिरीज मध्ये हल्कच्या रूपात तो आपल्या भेटीला आलाय येत राहील. पण तेवढ्यावरती गप्प न बसता मार्क रफलोने 'डार्क वॉटर्स' ह्या अत्यंत महत्वाच्या कलाकृतीची निर्मिती केली आणि त्यातील ध्येयवेडा वकील रॉबर्ट बिल्टस ची भूमिका सुद्धा केली.

 

 

"The system is rigged. They want us to believe that it'll protect us, but that's a lie. We protect us. We do." हा 'डार्क वॉटर्स' मधला त्याचा शेवटचा मोनोलॉग आहे.

"The Lawyer Who Became DuPont's Worst Nightmare" हा 'द न्यूयॉर्क टाइम्स मॅगझीन' मधला २०१६ साली प्रकाशित झालेला लेख किंवा शोध निबंध ज्याचा लेखक आहे तो नेथॅनीयल रिच. याच लेखावर आधारित आहे टॉड हेन्झ या दिग्दर्शकाचा मार्क रफेलोने प्रोड्युस केलेला डार्क वॉटर्स हा सिनेमा.

आता थोडी पार्श्वभूमी- ड्यूपॉन्ट नावाची फ्रेंच अमेरिकन केमिकल कंपनी आहे जिचं प्रमुख उत्पादन आहे वेगवेगळ्या पद्धतीचे सिन्थेटिक पॉलिमर जे फॅब्रिक, रोजच्या वापरातील प्लास्टिक, पेंट, ते अगदी केवलारच्या बुलेटप्रूफ जाकीटापर्यंत अनेक ठिकाणी वापरले जाते. आपल्या सर्वांच्या आयुष्यात महत्वाचा भाग बनलेले नायलॉन आणि स्ट्रेचेबल कपड्यातील लायक्रा मटेरियल सुद्धा याच ड्यूपॉन्टनं बनवले. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीला वेगवेगळी पेटंट, टेक्नॉलॉजी आणि युद्ध सामुग्री देणाऱ्या १५० अमेरिकन कंपन्यांमध्ये सिंहाचा वाटा होता या ड्यूपॉन्ट कंपनीचा. १९८४ साली झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेची शिल्पकार असलेली युनियन कार्बाइड आणि तिची मदर कंपनी असलेली डाऊ केमिकल ही सुद्धा २०१५ साली ड्यूपॉन्ट चा हिस्सा बनली.

याच कंपनीने बनवलेले एक चमत्कारी रसायन होते टेफलॉन. दुसऱ्या महायुद्धापूर्वी या टेफलॉनचा जन्म झाला, आणि याचा वापर केला गेला युद्धातील रणगाड्यांना वॉटर प्रूफ करण्यासाठी. पण मग ड्यूपॉन्टने विचार केला की फक्त रणभूमी कशाला आपण या जादुई गोष्टीचा वापर घराघरापर्यंत आणू आणि मग या चमकदार केमिकलचं कोटिंग असलेली नॉन स्टिक भांडी संपूर्ण अमेरिकेच्या खाद्य संस्कृतीचा अत्यंत महत्वाचा हिस्सा बनली. टेलिशॉपिंग आणि रिएलिटी शो आणि न्यूज चॅनल्सनी टेफलॉनच्या वारेमाप जाहिराती केल्या, टेफलॉन असलेली नॉन स्टिक भांडी स्टेटस सिम्बॉल बनली, गृहिणींनी नवऱ्यांच्या मागे लागून लागून स्वयंपाकघरं टेफलॉनच्या भांड्यानी भरून टाकली. मात्र हे टेफलॉन विष होतं.

कंपनीनं ज्या ज्या उंदरांवर याच परीक्षण केलं होतं, त्या उंदरांचे अवयव एखाद्या फुग्यासारखे फुगून फुटले. कॅन्सरनं त्या उंदरांना पोखरून टाकलं, एवढंच काय उंदरांच्या माद्यांनी जन्मताच अपंगत्व असलेल्या पिल्लाना जन्म दिला. मात्र टेफलॉन मधून मिळणारा फायदा अतिप्रचंड होता आणि उत्पादन थांबवणं तोट्याचं होतं. त्यामुळं कंपनीनं मानवी परीक्षण सुरु केलं. या विषानं युक्त अनेक पदार्थ त्यांनी आपल्या कामगारांना भेट म्हणून द्यायला सुरुवात केली, एवढंच काय या विषाचे स्प्रे मारलेल्या सिग्रेट त्यांनी कामगारांना फुकट वाटल्या. टेफलॉन लाईन वर काम करणाऱ्या एका गर्भवती महिलेला जन्मतः एक डोळा आणि एक नाकपुडी नसलेले बाळ झाले आणि त्यांनी रातोरात तिला आणि इतर महिलांना टेफलॉन लाईन वरून बाजूला केलं. तिने जेंव्हा आपल्या बाळाच्या व्यंगाचा आणि टेफलॉन चा काही संबंध आहे का असे विचारले तेंव्हा तिला उडवा उडवीची उत्तरं दिली आणि टेफलॉन लाईनवर पुन्हा बायकांना कामाला जुंपले. हे थोडेफार ड्यूपॉन्ट विषयी. आता वळूया आपल्या कथानकाकडे.

'हिलबिली' अथवा हिक ही व्हाइट अमेरिकन खेडुतांसाठी वापरली जाणारी संज्ञा आहे. गावात राहणारा अर्धवट अक्कल नसलेला माणूस म्हणजे हिक. असाच हिलबिली सदरात मोडणारा वेस्ट व्हर्जिनिया या शेतकरी बहुल असलेल्या राज्यातील पार्कर्सबर्ग नावाच्या शहरातून विल्बर टेनेट नावाचा एक शेतकरी रॉबर्ट बिल्ट या वकिलाकडे येतो. रॉबर्ट ओहायो राज्यातील सिनसिनाटी शहरात एका अत्यंत प्रतिष्ठित लॉ फर्म (टाफ्ट) मध्ये वकील म्हणून काम करतो. मोठमोठ्या केमिकल कंपन्यांचे खटले सांभाळणं हे काम रॉबर्ट करतोय. थोडक्यात व्यवस्थेला वाचवण्यासाठी जी वकिलांची फौज उभी असते त्यातलाच एक शिलेदार आहे आपला नायक रॉबर्ट.

 

 

रॉबर्ट एका महत्वाच्या मिटिंग मध्ये आपल्या सगळ्या भागधारकांसोबत असताना अचानक विल्बर एक मोठा बॉक्स घेऊन त्याच्या ऑफिस मध्ये येतो. रॉबर्ट ला समजत नाहीये की ह्या खेडुताला आपला नंबर आणि पत्ता कोणी दिला? विल्बर सांगतो की तुझ्या आजीने मला सांगितले की माझा नातू सिनसिनाटी शहरात एक मोठा एन्व्हायर्मेंटल लॉयर आहे तो तुला मदत करेल. या माणसाचा एक भाऊ ड्यूपॉन्ट मध्ये कामाला होता. त्याची जमीन ड्यूपॉन्ट ने विकत घेतली आणि त्यात खड्डे करून वारेमाप PFOA (टेफलॉन ज्यापासून बनते ते कँसरजन्य रसायन) चा शिल्लक कचरा त्यात पुरून टाकलाय. विल्बर एक रँच चालवणारा शेतकरी आहे म्हणजे पशुपालन व्यवसायासाठीचं एक मोठं शेत. बाजूच्या जमिनीचा तो शेतीसाठी वापर करतो.

त्याच्या या शेताशेजारी एक ओढा जातोय ज्यात ड्यपॉन्ट ने PFOA चा कचरा असलेले सांडपाणी सोडले आहे. बव्हंशी हिलबिली सदरात मोडणारी माणसे कॉन्स्पिरसी थियरी वर विश्वास ठेवणारे असतात असं म्हटलं जातं. विल्बरला ड्यूपॉन्ट च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की त्या ओढ्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे आणि भावाच्या शेतात पुरलेल्या गोष्टीचा सुद्धा त्याला त्रास होणार नाही पण विल्बरचा या सर्वावर बिलकुल विश्वास नाहीये. पण विल्बर एवढा श्रीमंतही नाहीये की सगळा संसार उचलून दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होईल. विल्बरच्या गायींमध्ये दूषित पाण्याचे आणि पुरलेल्या कचऱ्यातील PFOA मुळे अत्यंत विचित्र बदल घडू लागलेत. त्यांच्यात वेगवेगळ्या अवयावांमध्ये कॅन्सर होतोय, जनावरं वेड्यासारखी वागतायत आणि एक एक करून मारतायत. आत्तापर्यंत त्याची १९० गुरं विचित्र लक्षणांनी मेलेली आहेत. विल्बर ने नशीब म्हणू या सगळ्याचे व्हिडीओ डॉक्युमेंटेशन केलंय. फक्त आजीचे नाव घेतले या कारणाने रॉबर्ट विल्बरला थोड्या काळासाठी इंटरटेन करतो पण त्याला मिटिंग मध्ये परत जायचं आहे. तो स्वतः एका हिक चा नातू असला तरी ती ओळख स्वच्छ पुसून त्याने एक नवे रूप धारण केलंय. वेस्ट व्हर्जिनिया या खेडुतांच्या राज्याशी त्याला कसलाच संबंध आता नकोय...एका नव्या कोऱ्या पाटीने तो ओहायो मध्ये स्वतःची ओळख लिहितोय आणि मुळव्याधासारखा हा विल्बर अचानक त्याच्या आयुष्यात आलाय. तो या असभ्य शेतकऱ्याला काही लॉयर मित्रांचे नंबर देऊ पाहतो पण म्हातारा विल्बर म्हणतो "तुझ्या आजीने सांगितलं तू मला मदत करशील, माझा इतर कोणावर विश्वास नाहीये". 

"The system is rigged. They want us to believe that it'll protect us, but that's a lie. We protect us. We do."

हे वाक्य विल्बर टेनेट चे आहे. एका हिलबिली, कॉन्स्पिरसी थेअरीस्ट असलेल्या वेस्ट व्हर्जिनिया मधल्या साधारण शेतकऱ्याचे ज्याचं मर्म समजायला रॉबर्टला १२ वर्षांचा अविरत संघर्ष करावा लागतो, त्या १२ वर्षांचा गोषवारा म्हणजे हा सिनेमा. स्वतःच्या मुळांना तोडून एका वेगळ्या वर्गामध्ये जाऊ पाहणारा रॉबर्ट ते एक ध्येयवेडा संसारावर तुळशीपत्र ठेवलेला कार्यकर्ता वकील हा व्यक्तिमत्वातला बदल मार्क रफलोने सशक्तपणे उभा केलाय. कसलाही हिरोइझम न आणता, टाळ्यांची शिट्यांची वाक्ये न घेता अत्यंत प्रॅक्टिकल पद्धतीने गोष्टींना तोंड देणारा रॉबर्ट तुम्हाला अलगद बोट पकडून त्याच्यासोबत घेऊन जातो. मी मुद्दाम सगळे तपशील सांगत नाहीये कारण गोष्टींची तीव्रता समजत जाण्याचा चढता क्रम सिनेमात तुम्हाला गुंतवून ठेवतो. कॉर्पोरेट नफ्याच्या गणितात मानवी आयुष्याची किंमत किती नगण्य आहे हे 'डार्क वॉटर्स' आपल्याला दाखवतो. रॉबर्ट च्या लढ्यामुळे ९६ हजार पार्कर्सबर्गचे नागरिक आपले रक्त तपासण्यासाठी तयार होतात त्यातल्या जवळपास ४००० लोकांना ड्यपॉन्ट ने मुद्दाम दूषित केलेल्या पाण्यामुळे गंभीर स्वरूपाचे आजार झालेले आहेत! रॉबर्टच्या न्यायालयीन लढ्यात त्यानं हजारो नागरिकांच्या हक्काचे तब्बल १११ कोटी डॉलर्स ड्यूपॉन्ट कंपनीकडून मिळवून दिले.

मार्क रफलो आणि रॉबर्ट बिल्ट यांना माझा सलाम!

दुर्दैवाने भारतात हा सिनेमा कुठल्याही प्लॅटफॉर्म वर उपलब्ध नाही.