India

दानिश सिद्दिकीच्या कुटुंबीयांची तालिबानविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव

गेल्या वर्षी जुलै महिन्यात अफगाणिस्तानमध्ये युद्धाचं वार्तांकन सिद्दीकी यांची तालिबाननं हत्या केली होती.

Credit : Indie Journal

भारतीय फोटोजर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांच्या कुटुंबानं आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टतं तालिबानचे नेते आणि उच्चस्तरीय कमांडर्स यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात अफगाणिस्तानमध्ये युद्धाचं वार्तांकन सिद्दीकी यांची तालिबाननं हत्या केली होती. त्यांच्या हत्येची चौकशी करून जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सिद्दिकींच्या कुटुंबीयांनी केली आहे. 

जुलै २०२१ मध्ये ३८ वर्षीय सिद्दीकी जेव्हा मारले गेले, तेव्हा ते अफगाणिस्तानमध्ये असाइनमेंटवर होते. अफगाणिस्तानच्या कंदाहार शहरातील स्पिन बोल्डक जिल्ह्यात अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यातील संघर्षाचं वार्तांकन करत होते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं अफगाण स्पेशल फोर्सेससह त्यांना एम्बेड केलं होतं, जिथं ते तालिबानच्या हल्ल्यात जखमी झाले. "त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी एका मशिदीत नेण्यात आलं, जे त्या भागातील आश्रयस्थान होतं. तालिबाननं मशिदीवर हल्ला केला आणि दानिशला ताब्यात घेतलं, छळ करून त्याची हत्या करण्यात आली," असं सिद्दीकी कुटुंबानं दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.

 

 

"पालक या नात्यानं आम्हाला भावनिक आणि नैतिकदृष्ट्या ही कारवाई करणं बंधनकारक आहे. संघर्ष आणि युद्ध परिस्थितीत रिपोर्टिंग करताना पत्रकारांना सामोरं जावं लागणार्‍या गंभीर आव्हानांची आणि धमक्यांची जगानं दखल घेतली पाहिजे. आमचा मुलगा परत येणार नसला तरी, कधीतरी न्याय मिळेल या आशेनं आमची ही याचिका आमच दु:ख हलक करेल," सिद्दिकिंचे वडील प्रा. अख्तर सिद्दीकी म्हणतात. ते दिल्लीच्या जामिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. 

"दानिशच्या हत्येनंतर, त्यांच्या शरीराची विटंबना करण्यात आली. त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा आणि १२ गोळ्या प्रवेश करून बाहेर पडण्याच्या खुणा आढळून आल्या होत्या. मात्र त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर गोळीबाराच्या खुणा नव्हता. हे स्पष्ट आहे की ते एक पत्रकार आणि भारतीय असल्यामुळे त्यांचा छळ करण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली," असं त्यांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. 

दिल्लीचे रहिवासी असणाऱ्या दानिश सिद्दीकी यांना त्यांच्या रोहिंग्या निर्वासितांच्या संघर्षाच्या वार्तांकनासाठी २०१८ चा पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. तसंच कोविड लॉकडाउन दरम्यान त्यांनी काढलेल्या फोटोंचीही जगभरात चर्चा झाली होती. 

 

फोटो - दानिश सिद्दीकी

 

"दानिश हा आमचा लाडका मुलगा होता, तालिबाननं केवळ पत्रकारितेचं कर्तव्य पार पाडल्याबद्दल त्याची हत्या केली," अस दानिश यांच्या आई शाहिदा अख्तर म्हणाल्या. "कोठडीत असताना त्याचा खूप छळ आणि जाच करण्यात आला. दानिश नेहमी त्याच्या कामात प्रामाणिकपणा आणि सचोटीसाठी उभा राहिला आहे. त्यानं नेहमीच त्याच्या कामातून लोकांच्या वेदना आणि वेदनांचं प्रदर्शन केलं. तो कायम शूर आणि धैर्यवान बनून काम करत होता," त्या पुढं म्हणाल्या.

मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा, तालिबानचा सर्वोच्च कमांडर, मुल्ला हसन अखुंद, तालिबान लीडरशिप कौन्सिलचे प्रमुख, मुल्ला अब्दुल गनी बरादर, मुख्य प्रवक्ता तालिबान, मौलवी मुहम्मद याकूब मुजाहिद, एस. गुईआघा शेरझाई आणि जबिहुल्ला मुजाहिद, तालिबान प्रवक्ता, या तालिबान कमांडर्स आणि नेत्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणारे वकील अवी सिंग म्हणाले की तालिबाननं दानिशला लक्ष्य केलं याचं कारण तो एक होता पत्रकार आणि भारतीय होता हे आहे. आणि हा आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे. "आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्ट अफगाणिस्तानमधील मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि युद्ध गुन्ह्यांचा तपास करत आहे. दानिशची हत्या ही काही वेगळी घटना नाही. तालिबानची लष्करी आचारसंहिता 'लायहा'मध्ये तालिबानी सैनिकांना कसं लढायचं याची माहिती दिली जाते. यामध्ये पत्रकारांसह नागरिकांवर हल्ले करण्याचं धोरण आहे असल्याचं याचिकेत नमूद केलं आहे.