Americas
क्युबामध्ये कोव्हीड लसीकरणानंतर एकही लहानग्याच्या मृत्यू नाही
या छोट्या बेटराष्ट्रानं वेळीच निर्णय घेऊन स्वदेशी लस निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु केली.
क्युबन सरकारनं केलेल्या दाव्यानुसार कोव्हीड महामारीला आटोक्यात आणण्यासाठी सरकारनं लसीकरण सुरु केल्यानंतर आजपर्यंत एकही लहानग्याच्या कोव्हीडमुळं मृत्यू झालेला नाही. क्युबानं स्वतः निर्माण केलेल्या सोबेराना लसीचं हे यश असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.
कोव्हीडची महामारी आपल्या सर्वात प्रखर पातळीवर असताना क्युबाच्या आरोग्य यंत्रणेनं दाखवलेल्या शिताफीचं जगभरात कौतुक झालं होतं. क्युबा आपल्या मोफत आरोग्य सेवेसाठी आणि मोफत आरोग्य शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. तरीही लसीकरण सुरु होण्याआधी इथं १८ बालकांचा कोव्हीडमुळं मृत्यू झाला होता. तुलनेनं जगभरात २० वर्षांखालील १७,३०० बालकांचा मृत्यू झाला असल्याचं संयुक्त राष्ट्र संघाची आकडेवारी सांगते, ज्यातील ५३ टक्के मुलं १०-१९ वयोगटातील तर ४७ टक्के मुलं ०-९ वयोगटातील होती.
पेद्रो कुरी इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन च्या मारिया रोमानी याबाबत बोलताना म्हणाल्या की ऐन ओमायक्रॉन प्रकारच्या कोव्हीड लाटेतही अनेक प्रकारे अभ्यास केल्यावर असं निदर्शनास आलं की या लसींची प्रभावित २ ते ५ या वयोगटासाठी ९०.१ टक्के आहे, तीच ६ ते १८ वयोगटासाठी ९०.१ टक्के इतकी जास्त होती. यामुळं जवळपास ६३ हजार लसीकरण झालेल्या लहानग्यांना कोव्हीडपासून दूर ठेवण्यात या लसीला यश आलं.
क्युबाचे राष्ट्राध्यक्ष मीगेल दियाझ कनेल यांनी म्हटलं आहे की या लसीकरण मोहिमेच्या यशामुळं देशभरातील शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा पूर्ण क्षमतेनं सुरु करणं आणि तरुण आणि लहान मुलांचं जीवन पुन्हा सामान्य पद्धतीनं रुळावर आणणं शक्य झालं आहे.
कोव्हीडची महामारी सुरु असताना गेली ६० वर्ष अमेरिकेच्या जाचक निर्बंधांशी संघर्ष करणाऱ्या या छोट्या बेटराष्ट्रानं वेळीच निर्णय घेऊन स्वदेशी लस निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु केली. यासाठी इथल्या सरकारी प्रयोगशाळा आणि वैद्यकीय संशोधन संस्था निर्णायक होत्या. त्यांनी अत्यंत कमी कालावधीत जगातील अनेक खाजगी कंपन्यांनी निर्माण केलेल्या लसींशी स्पर्धा करू शकणारी लस विकसित केली.
फिन्ले इन्स्टिट्यूटनं सोबेराना ०२ तर सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग अँड बायोटेक्नॉलॉजीनं अब्दाला अशा दोन लसी क्युबामध्ये निर्माण झाल्या. या दोन्हीही लसी प्रथिन आधारित असल्यानं त्यांना शीत किंवा वातानुकूलित पेटीत ठेवण्याची गरज पडत नाही आणि त्यामुळं त्यांना ग्रामीण आणि डोंगराळ भागांमध्ये नेणं सहज शक्य आहे. इराण, व्हियेतनाम, निकारागुआ अशा देशांना आत्तापर्यंत क्युबानं या लसींचा पुरवठा केला आहे. नेचर या विज्ञान संशोधन पत्रात प्रकाशित एका लेखाच्या मते प्रथिन आधारित लसींचे इतर लसींच्या तुलनेनं दुष्परिणामही अत्यंत कमी प्रमाणात होतात.
क्युबा लसींवर आणखी संशोधन करत असून एका नेझल अर्थात नाकात थेंब किंवा स्प्रेच्या माध्यमातून घेण्यायोग्य लास निर्माण करण्याच्या जवळ इथले संशोधक पोहोचले आहेत.