India

पहिल्या टप्प्यात ३ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं होणार मोफत लसीकरण: आरोग्यमंत्री हर्ष वर्धन

जुलै महिन्यात दुसऱ्या टप्प्यात २७ कोटी लोकसंख्येचं लसीकरण करण्याची योजना.

Credit : Outlook India

लसीकरणाच्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात देशातील जवळपास ३ कोटी कोरोना योद्धयांना मोफत लस दिली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आज केली. याशिवाय जुलै महिन्यात या मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्यात २७ कोटी लोकसंख्येचं लसीकरण करण्याची योजना लवकरंच आखली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र, दुसऱ्या आणि नंतरच्या उर्वरित टप्प्यातील सामान्य नागरिकांना लस मोफत टोचली जाईल का, यावर अद्यापही केंद्र सरकारनं घेतला नसल्याचं आज स्पष्ट झालं.

कोव्हीडच्या लसीविषयी सुरू असलेल्या अपप्रचारावरही त्यांनी आपली भूमिका सरकारच्या वतीनं आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. "कोव्हीड -१९ ची ही लस पूर्णतः सुरक्षित असून सर्व तपासण्या झाल्यानंतरंच हा लसीकरणाची मोहीम आखण्यात आलेली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी पोलिओ लसीकरणाच्या वेळेसही अशाच वावड्या उठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकांनी अशा कुठल्याही अफवांना बळी न पडता लसीकरणाच्या मोहीमेत सहभाग नोंदवावा," असं आवाहन हर्षवर्धन यांनी आज केलं.

 

 

भारतातील कोव्हीडची ही लसीकरणाची मोहीम जगातील सर्वात मोठी असून यासाठीची पूर्वतयारी म्हणून याची रंगीत तालिम आज देशातील विविध रूग्णालयात घेतली जात आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राजधानी दिल्लीतील जीटीबी हॉस्पीटलला भेट दिली. १९९४ सालच्या पोलीओ लसीकरण मोहिमेचा दाखला देत त्यांनी कोव्हीड लसीकरणाची मोहीमही तितकीच यशस्वी होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्राझेनेकानं विकसित केलेल्या 'कोव्हीशिल्ड' लसीला अद्याप Central Drugs Standard Control Organisation (CDSCO) कडून ग्रीन सिग्नल मिळणं बाकी आहे. वैद्यकीय तज्ञांच्या केंद्रानं नेमलेल्या समितीनं 'कोव्हीशिल्ड' सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा निर्वाळा आधीच दिलेला असून CDSCO ची परवानगी मिळाल्यानंतर लसीकरणाची मोहीम भारतात अधिकृतरित्या सुरू होईल. पुढच्या टप्प्यांमध्ये देशातील सर्व नागरिकांसाठी हे लसीकरण मोफत असेल की यावर केंद्र सरकारडून अद्याप कुठलाही स्पष्ट निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, केरळ, दिल्ली आणि तमिळनाडूसह अनेक राज्य सरकारांनी कोव्हीडची लस नागरिकांनी मोफत दिली जाणार असल्याची घोषणा याआधीच केलेली आहे.