India
बलात्काराच्या आरोपामुळे धनंजय मुंडेंच्या संकटांमध्ये वाढ
राजकीय उलथापालथीच्या शक्यतांना उधाण.
राज्याचे समाजकल्याण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. साहजिकच या घटनेचे पडसाद बीड तसंच भगवानगड परिसरातल्या पाथर्डी तालुक्यातही उमटताना दिसत आहेत.
अशात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज "मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत," अशा दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मुंडेंवर पक्षपातळीवर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे. याच भीतीमुळे राष्ट्रवादीच्या (स्थानिक) धनंजय मुंडे समर्थकांमध्ये तणावाचं वातावरण तर भविष्यात तयार होणाऱ्या संधींमुळे पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण जाणवत आहे.
बीड जिल्हा व अहमदनगर जिल्ह्याचा दक्षिण भाग विशेषत: भगवानगडाच्या आजूबाजूचा परिसर हा मुंडे कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. अगदी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही त्यांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींची सुरुवात भगवानगडावरून केली होती. दरवर्षी दसऱ्याला होणाऱ्या मेळाव्याची चर्चा राज्यभर गाजत असते. त्यातल्याच एका मेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा मुंडेंना आपला राजकीय वारस म्हणून घोषित केलं होतं आणि याच घोषणेनंतर धनंजय मुंडे यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. भगवान गडावरील दसरा मेळावा आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर गडावरून राजकीय मेळावा घेण्यास गडाच्या महंतांनी नाकारलेली परवानगी यावरून धनंजय व पंकजा या भावंडांमध्ये राजकीय चढाओढीसही सुरुवात झाली होती. यामुळे भगवानगड व पाथर्डी परिसर राज्यभर सतत चर्चेत राहिला. दिवंगत गोपीनाथ मुंडेसुद्धा "परळी ही माझी आई तर पाथर्डी ही माझी मावशी आहे," असं म्हणत. त्यामुळेच पंकजांनीही पाथर्डीमधून विधानसभेची निवडणूक लढवण्याची चाचपणी केली होती. आजही या परिसरामध्ये पंकजा व धनंजय मुंडे यांना मानणारे दोन गट आहेत. हे दोन्ही गट सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर व त्यांनी स्वतः त्यांच्या विवाहबाह्य संबंधांची जाहिर कबुली दिल्यानंतर त्याचे पडसाद या परिसरात ठळकपणे उमटताना दिसत आहेत. अर्थातच पंकजा मुंडे गट या घटनेचा राजकीय फायदा उठवण्याच्या तयारीत आहे. सध्या दोन्ही बाजूक़़डील नेतेमंडळी जाहीरपणे या घटनेवर प्रतिक्रिया देत नसली तरी याबाबत या परिसरात मोठ्या प्रमाणात चर्वितचर्वणं सुरु आहेत.
या प्रकरणाबाबत, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यास प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता त्यांनी भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मुंबईत, सदर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा हवाला देत, धनंजय मुंडे यांची पाठराखण करत सावध प्रतिक्रिया दिली आहे. तर पंकजा मुंडे यांचे समर्थक मुकुंद गर्जे इंडी जर्नलला प्रतिक्रिया देताना म्हणाले, "या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी त्यांचे विवाहबाह्य संबंध व त्यातून त्यांना झालेली अपत्यप्राप्ती याची जाहीर कबुली दिलेली आहे. ही सर्व माहिती त्यांनी निवडणूक लढवताना निवडणूक आयोगापासून लपवलेली असल्यानं, ही जनतेची तसंच आयोगाची शुद्ध फसवणूक आहे. त्यामुळे आम्ही त्यांची आमदारकी रद्द केली जावी, यासाठी कोर्टात याचिका सादर करणार आहेत. गरज पडल्यास मोठं आंदोलनही करू."
या प्रकरणामुळे राज्यभर राजकीय वातावरण तापलेलं असताना राजकीय उलथापालथींच्या अनेक शक्यतांबाबतही चर्चांना उधाण आलेलं दिसत आहे.