Opinion

'क्लिकबेट'च्या घाईत होतोय समूहांबाबत अन्यायकारक अपप्रचार

बंजारा समाजाबद्दल जे काही माध्यमांवर सांगितले जात आहे ते तथ्यांशी तफावत असणारे दिसते.

Credit : Shubham Patil

 

प्रशांत चव्हाण

माध्यमांमध्ये सध्या वेगवेगळ्या लोकसमूहांविषयी मांडणी करण्यात येत आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये आपली समरसता दाखवण्यासाठी किंवा आपल्या माध्यमांची सर्वसमावेशकता प्रदर्शित करण्याचं एक साधन म्हणून समाजाच्या परिघाबाहेर राहिलेल्या समाजांविषयी माहितीपर लिहिण्याची चढाओढ चाललेली दिसते. मात्र असं करताना या समाजांबद्दल वरवरच्या माहितीखेरीज केवळ पर्यटकी भावानं काहीबाही लिहिण्याचा प्रयत्न दिसून येतो. नव्या इंटरनेट माध्यमं आणि पोर्टल्सवर अशी रंजक माहिती म्हणून केवळ कुतूहल शमवण्याचा भाग म्हणून पाहिलं जात आहे. जास्तीत जास्त क्लिक्स करून पैसा आणि लोकप्रियता मिळण्याचं सोपं साधन बनलेल्या या माध्यमांमध्ये परिघाबाहेरच्या समाजांचं होणारं चित्रण बीभत्स आणि अशा समाजाचं वस्तूकरण आणि fetishization करणारं आहे. यातून विविध गैरसमज पसरून लोकसमूहांविषयी अकारण प्रश्न उपस्थित होत आहे. अनायसे, जगभर चांगल्या पत्रकारितेसाठी गौरवली गेलेली माध्यमेही यात चढाओढीनं सहभागी झाली आहेत.

यातच प्रामुख्यानं समावेश होतो तो बंजारा समाजाचा. सध्या या लोकसमूहाविषयी बराचसा मजकूर इंटरनेटवर फिरताना दिसतो. बंजारा समाजाबद्दल जे काही माध्यमांवर सांगितले जात आहे ते तथ्यांशी तफावत असणारे दिसते. समाजाबद्दल रंजक चित्र उभे केले जात आहे किंवा तपशील आकर्षक पद्धतीने मांडल्या जात आहे. बहुधा माध्यमांतून अशा जमातींबद्दल वार्तांकन करताना माहितीचे स्त्रोत सांगितले जात नाहीत. बीबीसी मराठीने सुद्धा अशाच प्रकारची मांडणी काही दिवसांपूर्वी केली आहे ज्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. हाती माहितीचे उत्तम स्रोत आणि सर्व पातळ्यांवर साधनांची उपलब्धता असताना अशा पद्धतीनं वार्तांकन करणं हे त्या लोकसमूहांविषयी पुरेशी माहिती किंवा गांभीर्य नसण्याचं निदर्शक आहे.

बंजारा ही भटकी जमात (Nomadic Tribe) आहे. विशिष्ट संस्कृती, भाषा, परंपरा असणाऱ्या समुदायाला जमात म्हणतात. बंजारा ही भटकी जमात आहे. व्यापारासाठी ही जमात भटकंती करायची. भटकणे ही त्यांच्या जगण्याची पद्धत राहिली आहे. म्हणून ही हा समाज देशभर विखुरलेला आढळते. महाराष्ट्रामध्ये विदर्भात गोर- बंजारा, मराठवाड्यात लमाण तर तेलंगणा व कर्नाटक राज्यांत लंबाडा म्हणून ओळखली जाते.

इतिहासाचे प्राध्यापक भांग्या भुक्या यांनी त्यांच्या Subjugated Nomads या पुस्तकात ब्रिटिश वसाहत आणि  निजामाच्या अधीन असलेल्या हैदराबाद प्रांतातील लंबाडा समाजाविषयीचा ऐतिहासिक अभ्यास मांडला आहे. हा अभ्यास अठराव्या शतकाच्या सुरूवातीपासून ते विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे सुमारे दोन शतके एवढा विस्तृत आहे. आधुनिक वाहतुकीच्या वाढीमुळे लंबाड्यांच्या व्यापारात अडथळा निर्माण झाला. वसाहत शासनाने त्यांना भट्क्या मार्गाने व्यापार करण्यास परावृत्त केले आणि त्यांना पडीक जमीन व वनक्षेत्रात जमिनी शेती करण्यास उद्युक्त केले. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून त्यांना पशुपालक आणि शेतीवर अवलंबून रहावं लागलं, बहुतेक वेळा ते शेतमजूर बनले. त्यांच्या वाढीव शेतीचा विस्तार वन संवर्धनास धोका असल्याचे समजून त्यांच्यावर छळ करण्यात आला व पारंपरिक गोष्टींपासून त्यांना बेदखल करण्यात आलं.

म्हणून पुढे खंडणी लावून त्यांचे भूखंड हिसकावण्यास सुरवात झाली. जमींदारांनी पडीक जमिनींवर हक्क सांगितला आणि त्यावर कर आकारला. राज्य आणि जमीनदार यांच्या शोषणामुळे लंबाड्यांना शेतात मजुरीचे काम करावे लागले. सतत पडणारे दुष्काळ यामुळे त्यांची परिस्थिती अजून दयनीय झाली. उपजीविकेचे साधने हरवल्यानंतर काहींनी दरोडेखोरी सुरू केली. राज्याच्या मालमत्तेवर दरोडे घातले. यामुळे वसाहत शासनाने कायदा लादून ‘गुन्हेगार जमाती’ त्यांच्यावर म्हणून शिक्का लावला.

प्रदीर्घ काळ दु:ख व छळ यामुळे लंबाडा लोकांनी राज्याविरुद्ध बंड उभारला. मौखिक परंपरेत ही त्यांची अभिव्यक्ती दिसून येते म्हणून बंजारा समाजाचा इतिहास सांगताना त्याचा हवाला दिला जातो. समाजाचे आणखी महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे वर्णव्यवस्था किंवा जाती आधारीत समाजापासून दूर राहिलेला हा समाज जसजसा स्थायी होत गेला तसतसा जाती - समाजासोबत संपर्कात आला आणि स्थानिक समाजाच्या प्रथा-परंपरा अंगिकारू लागला. यामुळे त्यांच्या सामजिक स्थानात बदल होऊ लागला. त्यांना अस्पृश्य जरी समजलं जात नसलं तरी जातीच्या उतरंडीत खालच्या स्थानात समजले जायचे. एकेकाळी मुलींना लग्नात मदत करणारा हा समाज हुंडा घेऊ लागला. त्यामुळं या समाजात रूढ हिंदू परंपरेतील काही जाचक परंपरा सामावल्या गेल्या. बंजारा समाज व्यापारासाठी गाय किंवा बैलांचा वापर करायचा असे आढळते. दिवंगत प्राध्यापक मोतीराज राठोड यांनी गोरबंजारा शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ सांगताना 'गोर म्हणजे गाय किंवा बैल यांचा वापर करणारे लोक' असा उल्लेख केला आहे. 

BBC मराठीनं प्रकाशित केलेल्या सदर रिपोर्ट मध्ये बऱ्याच तथ्यात्मक त्रुटी आहेत. या समाजाविषयी अभ्यास करणाऱ्या अनुकूल चव्हाण यांनी त्याची यादी दाखवून दिली. 

१. बंजारा समाजाचे दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेत. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक. मनोहरराव नाईक हे सुधाकरराव नाईक यांचे कनिष्ठ बंधू व महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत.

२. बंजारा समाजाचा उगम राजस्थान इथून झाला नाहीय. बंजारा समाजाच्या जाणकार-इतिहासकारांनी मोहेंजो-दारो व हरप्पा संस्कृती मध्ये मिळालेल्या अवशेष, अलंकारांवरून त्यांच्याशी थेट संबंध असल्याचे पुरावे व प्रबंध सादर केलेले अनेक उदाहरणे आहेत. थेट मध्य-पूर्व युरोप येथील रोमा जिप्सी यांची बोलीभाषा सुद्धा गोरमाटी आहे.

३. बंजारा समाज व्यापारी होता आणि घोड्यांवरून व्यापार न करता बैलांवरून व्यापार करायचा. त्यात मीठ हा मुख्य असला तरीही थेट चीन, रशियापर्यंत धान्य, कापड, वगैरे सर्व साहित्यांचा व्यापार समाजातील व्यापारी करायचे. मध्ययुगातील लक्खिशाह बंजारा हे त्याकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यापारी होते व मुघल दरबारातुन  त्यांना 'शाह' ही पदवी बहाल झाली होती.

४. फक्त स्थळ मार्गानेच नव्हे तर जलमार्गाने सुद्धा बंजारा समाज दक्षिण आशिया व युरोप सोबत व्यापार करायचा. मखनशह बंजारा हे जलमार्गाने व्यापार करणारे मोठे व्यापारी होते. बंजारा समाजाच्या प्राचीन व्यापारमार्गावरूनच इंग्रजांनी रेल्वेमार्ग बनविले व त्यामुळे बैलांवरून होणारा व्यापार थांबला गेला. आजचे राष्ट्रीय महामार्ग व त्यालागतचे अनेक शहर हे प्राचीन बंजारा व्यापार मार्गांवर आधारलेले आहेत.

५. क्रिमिनल कायद्यामुळे बंजारा सोबत इतर स्थानिक जातींना 'गुन्हेगारी जमात' म्हणून इंग्रजांनी घोषित केले. काही स्थानिक तह झाले असतील तरीही भारतीय स्वातंत्र्य चळवळीत बंजारा समाजाने तितकीच महत्वाची भूमिका बजावली आहे हे लिखित इतिहास आहे. 

६. महाराष्ट्रात बंजारा हे VJ (विमुक्त जाती) या प्रवर्गात येतो व केंद्रात OBC. तसेच विविध राज्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा वेगवेगळ्या प्रवर्गात येतो.

७. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशातील १३ राज्यात बंजारा समाजाची लोकसंख्या वाखाणण्याजोगी आहे . एकूण संख्या कोट्यवधी असली तरी विविध राज्यात विविध प्रवर्गात समाज विखुरलेला असल्यामुळे पूर्ण आकडा मिळत नाही.

८. बंजारा समाजात निसर्ग संगोपन, स्त्री अधिकार, सार्वजनिक न्याय, ई पुरोगामी विचार फार पूर्वीपासून रुजलेले आहेत. Structured न्यायव्यवस्था, community accounting, ई. तांड्यात पूर्वीपासून आढळतात.

 

गोर बंजारा धर्म

बंजारा आणि ब्राम्हण कधी एकमेकांचा संपर्कात आले नव्हते. कोणत्याही विधी साठी ते ब्राम्हणांवर अवलंबून राहिले नाही. जन्म, लग्न आणि मृत्यू संबंधी त्यांच्या वेगळ्या विधी असून ते समाजातीलच ठरलेल्या लोकांकडून पार पडायच्या. त्यांची परंपरा मुख्यधारेतील हिंदू परंपरेपेक्षा वेगळी राहिली आहे. त्यांचे सण, लग्न आणि रोटी बेटी व्यवहारांची वेगळी पध्दत आहे. आजही जर एखाद्या वृद्ध महिलेला तुमचा धर्म काय असा प्रश्न विचारला तर ते गोर किंवा बंजारा धर्म असा उत्तर देतात. 

 

गोर आणि कोर

आपल्या समाजातील लोक म्हणजे गोर आणि इतर जाती किंवा धर्मातील लोक म्हणजे कोर असा फरक समाजातील लोक करतात. म्हणून गोर म्हणजे धर्म असा समज या समाजात आहे. अलीकडे समाजात काही संघटना उदयास आल्या ज्या समाजाचा सांस्कृतीक वेगळेपण अधोरेखित करत आहेत. उदाहरणार्थ गोर सिखवाडी ही संघटना तांड्या तांड्यात जाऊन जुनी परंपरा सांगण्याचे काम करत आहे. 

हा समाज आर्थिकदृष्ट्या अजूनही मागासलेला आहे. उपजीविकेच्या अपुऱ्या साधनांमुळे पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक तांडेच्या तांडे ऊसतोड मजूर म्हणून स्थलांतर करत असतात. आजही त्यांच्या पिढ्यानपिढ्या ऊसतोड मजूर म्हणून काम करत आहेत. यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम झाला. या समाजात शिक्षणाविषयी जागरूकता अजूनही कमी आढळते. त्यातही उच्च शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळं अशा समूहांचं प्रतिनिधीत्त्व करणारे समूह आपल्या लेखनात अन वार्तांकनात पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून एक other म्हणूनच अशा समाजांकडं पाहत आहेत हे स्पष्ट होतं. 

अशा माध्यमांनी केवळ काही क्लिक्ससाठी आपण चुकीचं चित्रण करत नाही ना याची पुनर्तपासणी करणं गरजेचं आहे. वाचकांना आकर्षून घेण्यासाठी बनवलेला मथळा किमान आपल्या लेखनाशी साधर्म्य दाखवेल एवढी नैतिकता बाळगता येईलच.  लोकसमूहांचं चित्रण करताना किमान एवढं गांभीर्य दाखवणं गरजेचं आहे. 

लेखक बंजारा समाजाचे अभ्यासक असून टाटा समाजविज्ञान संस्थेचे पदवीधर आहेत. परिघाबाहेरील विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध व्हावं म्हणून कार्यरत असणाऱ्या एकलव्य संस्थेशी ते निगडीत आहेत.