India
अमित शाहांवरील विनोदामुळं कॉमेडियन मुनव्वर फारूकीला अटक
हिंद रक्षक संघटनेनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर मध्य प्रदेश पोलिसांची कारवाई.
हिंदू देव-देवता आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विनोद केल्याचा आरोप ठेवत प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारूकीला अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे. हिंद रक्षक संघटना या हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख एकलव्य सिंग गौर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मध्य प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली. एकलव्य सिंग गौर इंदौरच्या महापौर आणि भाजप नेत्या मालिनी गौर यांचे सुपुत्र आहेत.
शुक्रवारी रात्री इंदोरमधील मनरो कॅफेत हा शो सुरू असतानाच एकलव्य सिंग आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ आणि मारहाण करत हा शो उलथवून टाकला. "हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवणं आणि गोध्रा दंगलीतील गृहमंत्री अमित शहांच्या सहभागावरून भावना दुखावणारी वक्तव्य केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे," अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. शिवाय हा कार्यक्रम भरवून सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन करण्यात आलं आहे की नाही, याविषयीही तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.
"सतत हिंदूद्वेषी विनोद करणाऱ्या मुनव्वर फारूकीच्या या शो ला मी आणि माझे सहकारी तिकीट खरेदी करून मुद्दाम गेले होतो. हिंदू देवता, गोध्रा हत्याकांड आणि गृहमंत्री अमित शहांबद्दल अपमानास्पद वक्तव्य हा कॉमेडियन करत असताना आम्ही त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. यानंतर हा हॉल रिकामा करायला लावून आम्ही मुनव्वर आणि या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या ४ जणांना तुकोगंज पोलीस स्थानकात घेऊन गेलो," अशी माहिती तक्रारकर्त्या गौर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. याशिवाय एका छोट्याश्या हॉलमध्ये १०० जणांचा कार्यक्रम भरवून सोशल डिस्टन्सिंगचेही नियम मोडण्यात आल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमात गौर आणि त्यांच्या हिंद रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदरील ठिकाणी हुज्जत घालून मारहाणही केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लोकांच्या धार्मिक भावना दुखावून हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करणं आणि आणि पुरेशी काळजी न घेता (कोव्हीडचा) संसर्गजन्य रोग पसरवणं या गुन्ह्यांखाली आयपीसीच्या कलम २९५ - अ आणि २६९ अंतर्गत कॉमेडियन मुनव्वर आणि इतर ४ जणांवर ही कारवाई करण्यात आली. "शुक्रवारी रात्री उशीरा एकलव्य सिंग गौर यांनी व्हिडिओ फूटेजचा पुरावा आमच्याकडे जमा केल्यानंतर त्या आधारावर या ५ जणांना आम्ही अटकेत घेतलं," अशी माहिती तुकोगंज पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी कमलेश शर्मा यांनी माध्यमांना दिली.
मूळचा गुजरातमधील जुनागढचा राहीवासी असलेला मुनव्वर फारूकी विनोदी शैलीतून राजकीय सामाजिक विषयावर भाष्य करण्याच्या आपल्या शैलीमुळे भारतातील आघाडीच्या स्टॅन्ड अप कॉमेडियन्सच्या यादीत आघाडीवर आहे. संवेदनशील विषयांवर विशेषतः हिंदूंच्या धार्मिक भावनांवर विनोद केल्यानंतर अडचणीत अडकल्याची कॉमेडियन्सवर आलेली ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच शिवाजी महाराजांवर विनोद केल्यामुळे कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिला सुद्धा अतिशय हिणकस टीकेचा आणि ट्रोल्सचा सामना करावा लागला होता. यासंबंधी विशेषतः हिंदुत्ववादी गटांकडून अग्रिमा जोशुआला बलात्कार आणि हत्येच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या.