India

छोटा राजन मृत्यूच्या अफवेनं पिंपरी चिंचवडच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनवर नव्यानं प्रकाश पडला

शहरातील एका प्रमुख पोलिस ठाण्यातील C-नोटचा अभ्यास केल्यास तिघा संशयतीत दहशतवाद्यांचे रेकॉर्ड उपलब्ध होईल.

Credit : इंडी जर्नल

रोहित आठवले: बहुरुप्याचे सोंग घेऊन घराचे (पोलिस ठाण्याचे) वासे मोजण्यापेक्षा अंडरवर्ल्डचा शहरातील अंडर करंट शोधण्याची आज खरी गरज आहे. करोनाने जगात खास करून पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तिसऱ्या टप्प्यात रुग्ण आणि मृत्यू संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेकांनी याकाळात आप्तेष्ट गमावले असताना कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा करोनामुळे दिल्लीमधील एम्स रुग्णालयात मृत्यू झाल्याची अफवा वजा बातमी पसरली. हातघाईला आलेल्या ब्रेकिंग न्यूजच्या स्पर्धेतून समाज माध्यमांमुळे (सोशल मीडिया) ही पोस्ट व्हायरल झाली आणि पिंपरी चिंचवडकर त्यावर व्यक्त झाले.

मात्र काही तासातच ही बातमी निव्वळ अफवा असल्याचे समोर आले. परंतु तोपर्यंत विविध प्रतिथयश माध्यमांच्या फेसबूकवर आलेल्या वेब पोर्टलच्या लिंक वर भारताव्यतिरिक्त जगासह आणि खास करून पुणे, पिंपरी-चिंचवडमधील काही लोक भाव'पूर्ण व्यक्त होत होते. अगदी "नाना भावपूर्ण श्रद्धांजली", "मामा नमन" "देश विरोधी दहशतवाद्याला जगाच्या पाठीवर सर्वतोपरी तोंड देणाऱ्याला माय भूमीत करोनाने गाठले" अशा अनेक पोस्ट फेसबुक वर केल्या जात होत्या, यातूनच राजनचे समर्थक-चाहते कोण व किती हे दिसत असताना दुर्दैवाने माझ्या सहकाऱ्यांना अधिकाऱ्याच्या बहुरुप्याचे सोंगच यादरम्यान जास्त भावले.

 

अगदी "नाना भावपूर्ण श्रद्धांजली", "मामा नमन" "देश विरोधी दहशतवाद्याला जगाच्या पाठीवर सर्वतोपरी तोंड देणाऱ्याला माय भूमीत करोनाने गाठले" अशा अनेक पोस्ट फेसबुक वर केल्या जात होत्या

 

पिंपरी चिंचवड मधील अनेक तथाकथित "कंपनी कनेक्ट" लोकांचे कनेक्शन स्थानिक पोलिसांसह तपास यंत्रणांना आजही सापडू शकत नाही ही शोकांतिका आहे. तसेच याबाबत आपण जागल्याची भूमिका वठवावी असेही कोणाला या भाव'पूर्ण वातावरणात वाटले नाही. सोशल मीडियावर जेवढ्या तत्परतेने श्रद्धांजली वाहिली गेली तेवढ्याच तत्परतेने ही बातमी म्हणजे केवळ अफवा आहे; हे खात्रीलायक वृत्त पिंपरी-चिंचवड मधूनच संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे कार्य काही तथाकथित "CR कनेक्ट" लोकांनी केले. त्यामुळे शहरातील अनेक व्हाईट कॉलर आजही या काळ्या जगताचा एक भाग असल्याचे कोणाच्या गावीही नसणे हे न पटणारे आहे. नाना चा बर्थ-डे म्हणाला की उघडपणे गाणी लावून नाचणारे कोणी नसेलही मात्र, शहरातून याच नाना ला शुभेच्छा देण्यासाठी खास नंबरवर फोन करणारे अनेकजण आजही आहेत. महत्वाचे म्हणजे यात सगळ्याच क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.

लोकप्रियता मिळविण्यासाठी किंवा एखाद्याचा KRA भरून काढण्यासाठी कोणी कोणती सोंग घ्यावीत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, हे सगळ करताना शहरातून यापूर्वी झालेले अंडरवर्ल्ड संबंधातील जमिनीचे व्यवहार, जागांवरील या लोकांचा ताबा, अपहरण आणि खुनाचे प्रकार, यापूर्वी पकडले गेलेले यातील काही लोकांचे शूटर सध्या काय करतात हे तपासण्याचे कष्ट आता कोणी घेताना दिसत नाही.

पिंपरी चिंचवड आणि परिसरात देशभरातील सर्वच तपास यंत्रणांनी छापे टाकून बरेच वाँटेड पकडले. यातील काहीजण तर अनेक वर्ष यंत्रणांना गुंगारा देणारे होते. शहर वेगाने धावत असताना या लोकांचा मुक्त वावर होता. आता करोनाने औद्योगिक पट्यातील खडखडाट शांत झाल्याने लोक घरात बसून आहेत. अशातच कायमच सेफ झोन समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड आणि परिसरात नकोती लोक पुन्हा आश्रयाला आलेली नाहीत ना हे तपासावे लागणार आहे.

शहरातील एका प्रमुख पोलिस ठाण्यातील C-नोटचा अभ्यास केल्यास तिघा संशयतीत दहशतवाद्यांचे रेकॉर्ड उपलब्ध होईल. या तिघांवर दहशतवादी कारवायांमध्ये प्रत्यक्ष सहभाग किंवा या कामासाठी लॉजिस्टिक्स सपोर्ट दिल्याचा संशय असून, काही बॉम्ब स्फोटाच्या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याप्रकरणी खटले दाखल झाले आहेत. सध्या ही तीनही लोक जामिनावर बाहेर असून, यातील एकाचे कुटुंब राजकीय पक्षाचा शहरातील गाडा हाकत आहेत. त्यामुळे या लोकांची बदलती जीवनशैली, त्यांचे उंचावलेले राहणीमान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शहरातील एका कोपऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गृहसंकुलाचे संशयास्पद बांधकाम (NIA रिपोर्ट मध्ये याचा पुसटसा उल्लेख आढळतो) याकडे सोंग घेऊन लक्ष ठेवण्याची खरी गरज आहे.