India

चॉकलेट उत्पादक कंपन्या आणि नव वसाहतवादाचा कुरूप चेहरा

जगातील एकूण कोको बियांच्या उत्पादनामध्ये पश्चिम आफ्रिका ७०% उत्पादन करतं.

Credit : Indie Journal

२०२० आणि २०२१ मध्ये जग कोरोना महामारीनं ग्रस्त असताना अमेरिकेतील एका सर्वेक्षणात अशी म्हटलं आहे की 'पॅनडेमिकचा काळ अमेरिकन जनतेसाठी चॉकलेट सेवनामुळं काहीसा सुखद झाला.' मात्र लहान-थोरांना प्रिय असणाऱ्या चॉकोलेटच्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीला नुकतंच अमेरिकेत, आफ्रिकेतील त्यांच्या कंपन्यांच्या कोकोच्या बागांमध्ये चालणाऱ्या बालमजुरी आणि गुलामगिरीच्या खटल्यात 'क्लीन चिट' मिळाली आहे.

जगातील सर्वात मोठी चॉकलेट कंपनी नेस्ले आणि जगात सर्वात जास्त कोको बियांचं (Theobroma cacao) उत्पादन करणारी कारगिल कंपनी यांच्यावर कोकोच्या बागांमध्ये बाल मजुरी आणि गुलामगिरी चालत असल्याचा खटला केला गेला होता. मात्र गेल्या महिन्यातच या घटना अमेरिकेच्या बाहेर चालत असल्याचं कारण देत हा खटला अमेरिकन न्यायालयानं फेटाळून लावला.

 

जगातील सर्वात मोठी चॉकलेट कंपनी नेस्ले आणि जगात सर्वात जास्त कोको बियांचं उत्पादन करणारी कारगिल कंपनी यांच्यावर कोकोच्या बागांमध्ये बाल मजुरी आणि गुलामगिरी चालत असल्याचा खटला केला गेला होता.

 

जगातील एकूण कोको बियांच्या उत्पादनामध्ये पश्चिम आफ्रिका सर्वात जास्त, म्हणजे ७०% उत्पादन करतं. चॉकलेट कोको बीनपासून बनतं, जे साधारणतः पश्चिम आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतं. पश्चिम आफ्रिकेतील देश घाना आणि आयव्हरी कोस्ट सर्वाधिक कोकोचा पुरवठा करतात. कोकोच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात बाल कामगारांचा वापर केला जातो, असे आरोप बऱ्याच वर्षांपासून आहेत. अनेकदा अगदी ५ वर्षाची किंवा त्यापेक्षाही कमी वयाच्या मुलांना इथं गुलाम म्हणून काम करावं लागतं. हे त्यांच्या जीवासाठी खूपच धोकादायक असतं.

 

'काळ्या हातांचं' बेल्जीयन चॉकलेट

 

 

१८८४-८५ मध्ये तोवर स्पर्धक असलेल्या वसाहतवादी युरोपीय देशांनी बर्लिनमध्ये आफ्रिकेच्या 'वाटपाबाबत' एक बैठक केली. या बैठकीत आफ्रिकेच्या नकाशावर रेषा मारून आफ्रिका खंड अक्षरशः एकेका युरोपीय देशाला वाटण्यात आला. त्यात काँगो हा भाग बेल्जीयमच्या वाट्याला आला. बेल्जीयमचा राजा दुसरा लियोपोल्ड यानं रबर आणि चॉकलेटच्या उत्पादनासाठी प्रचंड प्रमाणात काँगोलीझ जनतेवर अत्याचार घडवून आणला. यामध्ये १.५ कोटी लोक गुलामीमध्ये आणि बेल्जीयन सैन्याच्या अत्याचारात मृत्युमुखी पडले. पुढं बेल्जीयन कंपन्यांनीदेखील कोको उत्पादन नियंत्रित करण्यासाठी सशस्त्र दल स्थापन केलं. या सशस्त्र दलाला सूचना होत्या, काँगोच्या रबर आणि कोकोच्या शेतात जे काँगोलिझ गुलाम काम करण्यास नकार देईल त्याचं गाव जाळून टाकण्यात यावं आणि जे त्या दिवशी दिलेला कोटा पूर्ण करणार नाहीत त्यांचे हात छाटावेत.

काँगोच्या नागरिकांच्या अशा छळाला थेट बढावाच असल्यानं, प्रोमोशन आणि नावारूपाला येण्यासाठी बेल्जीयन सैनिक आणि अधिकारी अधिकाधिक गुलामांचे शुल्लक कारणानं हात छाटू लागले. हे हात छाटून काही जण तर आपल्या कार्यालयांना सजवू लागले. या हात छाटणीच्या प्रकाराला जवळपास क्रौर्याबाबतची सर्व संवेदना ओलांडून एक अमानवी सर्वसाधारणपणा प्राप्त झाला होता. पण खरी क्रूरता तर पुढं आहे.

 

 

बेल्जीयममध्ये आजही 'ब्लॅक हॅन्ड्स चॉकोलेट मिळतं. तुटलेल्या हाताच्या आकाराचं हे चॉकलेट असतं. आता बेल्जीयमच्या याबाबतच्या स्पष्टीकरणाची मते, हा हात सिल्व्हीयस ब्राव्हो या मिथकातून येतो, ज्यानुसार सिल्व्हीयस हा एक काल्पनिक रोमन सैनिक, ड्रूऑन अँटीगून या राक्षसाचा पराभव करतो. हा राक्षस एका नदीवरच्या पुलावर थांबून लोकांना पूल ओलांडायचे पैसे मागतो आणि जर पैसे दिले नाहीत तर तो त्या व्यक्तीचा हात तोडून नदीत टाकतो. एक दिवस याला कंटाळून सिल्व्हियस या राक्षसाचाच हात तोडून नदीत टाकतो. हे मिथक खरं जरी मानलं, तरी बेल्जीयमच्या काँगोमधल्या कोको आणि रबराच्या शेतीत केलेले प्रचंड अत्याचार या ब्लॅक हॅन्ड चॉकलेटला फक्त एक विकृत प्रतीक बनवून ठेवतो. 

 

न्यायासाठी धडपड

२००५ साली तस्करी करून जबरदस्तीनं काम करून घेतलेल्या ६ मुलांनी जगातील सर्वात मोठ्या चॉकलेट कंपन्या नेस्ले आणि कारगिलविरुद्ध कायदेशीर खटला दाखल केला होता. दोन्ही कॉर्पोरेशन जागतिक स्तरावर कार्यरत आहेत. परंतु त्यांची मुख्यालयं अमेरिकेत आहे. हा खटला मानवी हक्क आणि अधिकार मिळण्यासाठी माली येथील रहिवाशांद्वारे एलियन टॉर्ट स्टॅच्यूट (एटीएस) अंतर्गत तो दाखल केला होता. यावर तब्बल १६ वर्षांनी निर्णय देताना जुन २०२१ मध्ये अमेरिकेतील न्यायालयानं हा खटलाच फेटाळून लावला. त्याचं कारण देताना न्यायालयानं ही घटना अमेरिकेच्या बाहेर झाल्याचं म्हटलं आहे. अमेरिकन कायदा अमेरिकेबाहेर लागू पडत नाही, असं म्हणतं त्यांनी कंपनीची बाजू घेतली. तक्रारकर्त्यांचं म्हणणं आहे की नेस्ले आणि कारगिलच्या कोका उत्पादनाची व्यवस्था, देखभाल, समर्थन आणि संरक्षण करणारे जवळजवळ सर्व निर्णय हे अमेरिकेतल्या कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयात घेतले जातात.

यावर कंपन्यांनी असा युक्तिवाद केला की हा सर्व प्रकार त्या भागातील मानवी तस्करी करणाऱ्यांकडून, तसंच कोको बियांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून होतो. त्यांच्या युक्तिवादानंतर बहुमतानं न्यायालयांनी हा खटला खारीज केला. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय मानवी हक्क अ‍ॅडव्होकेट्सचे कार्यकारी संचालक टेरी कॉलिंग्सवर्थ म्हणाले की, "तस्करी आणि गुलामीविरुद्ध न्यायालय आम्हाला काही दिवस अजून देईल अशी अजूनही आशा आहे. बाल तस्करी आणि बाल गुलामी हे कोणत्याही न्यायाधीशांनी किंवा कोणत्याही अमेरिकन न्यायालयानं नाकारले नाही." त्यांचा सांगायचा रोष हा होता की अनेक वर्ष या भागात लहान मुलांना गुलामगिरीच्या भीषण घटनांना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे आशा आहे की ही लढाई अजून बरीच वर्षं चालण्याऐवजी न्यायालय त्यावर निर्णय घेईल. तसंच जनसंपर्क कंपन्यांवरील आणि पब्लिक रेलिशनवर कोट्यवधी डॉलर्स खर्च करण्याऐवजी नेस्ले आणि कारगिल यांनी बालमजुरीवर अवलंबून राहणं थांबवलं पाहिजे," असं त्यांनी म्हटलं. 

 

कंपन्यांनी असा युक्तिवाद केला की हा सर्व प्रकार त्या भागातील मानवी तस्करी करणाऱ्यांकडून, तसंच कोको बियांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून होतो.

 

कारगिल कंपनीनं यावर स्पष्टीकरण देताना असं म्हटलं आहे की, "सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही समर्थ करतो. आणि ते समर्थन करताना आम्ही हेही सांगू इच्छितो, की हा खटला पुढे चालवण्यात कोणताही आधारही नाही. बालकामगारांना कोको उत्पादनातून बाहेर काढायला कारगिल काम करत आहे. आणि ते थांबवण्यासाठी आम्ही नियमित कामही करत आहोत. तिथले जे मूलभूत प्रश्न आहेत, जसं शिक्षण आणि गरिबी, त्यावरही आमचं लक्ष आहे."

बालमजुरी अस्वीकारार्ह आहे हे सांगत असताना नेस्लेच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, “म्हणूनच आम्ही हे टाळण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत. आणि आम्ही बाल मजुरी या जागतिक समस्येवर मात करण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था आणि उद्योगातील भागीदारांसह काम करत आहोत." यावर सुनवाई देताना अमेरिकन सर्वोच्च न्यायालयातील नऊ न्यायाधीशांनी एकमतानं संमत दिली की नेस्ले आणि कारगिल विरोधात हा खटला चालविण्याचं कोणतही कारण योग्य नाही.

या खटल्यादरम्यान कोकोआ बागेत काम करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी त्यांना मिळणाऱ्या अमानवी वागणुकीची हृदयद्रावक वर्णनं केली आहेत. आयव्हरी कोस्टमधल्या एका कोकोआ बागेत काम करणाऱ्या एका जॉन डो नं (निनावी व्यक्तीनं), जो या खटल्यातील प्रतिसाधित व्यक्तीसुद्धा होता, त्यानं या बागेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा निरीक्षकांनी त्याला पकडलं, तेव्हा त्यांनी त्याच्या पायाचे तळ कापले आणि मिरचीचा मिरपूड त्याच्या जखमांवर घासले. त्याच्या हाताला कायमचं नुकसान होईपर्यंत त्याला झाडाला बांधून मारहाणही करण्यात आली. जॉन डोनं ही साक्ष देताना असं सांगितलं की त्याला लघवी पिण्यासही भाग पाडलं होतं. इतकंच नाही तर जेव्हा तो आजारी पडला तेव्हादेखील त्यानं काम करावं यासाठी त्याला मारहाण झाली.

इतर प्रतिसादकर्त्यांनी म्हटलं त्यांना दररोज बारा ते चौदा तास, आठवड्यातून किमान सहा दिवस आयव्हरी कोस्टमधील कोकोच्या शेतात काम करण्यास भाग पाडलंजायचं. त्यांना पैसे नाही मिळायचे, आणि त्यांना खाण्यासाठी फक्त उरलं सुरलं अन्न देण्यात यायचं. जेव्हा त्यांच्या निरीक्षकांना वाटलं की ते पुरेसं काम करत नाहीत तेव्हा त्यांना चाबूक आणि झाडाच्या फांद्यांनी मारहाण केली गेली. त्यांना इतर मुलांसह लहान, लॉक असलेल्या झोडद्यांमध्ये, घाणीमध्ये झोपवलं जायचं आणि त्यांना पळण्यापासून रोखण्यासाठी बंदुकीच्या सहाय्यानं पहाराही दिला जायचा.

माईको अब्दुलये, हे त्या भागातील  प्राध्यापक आहेत. ते १९९६ पासून कोको बागांमधील बाल तस्करी आणि बाल मजुरीवर लढा देत आहेत. त्यांनी आयव्हरी कोस्टमधील सर्वोच्च न्यायालयाच्या अशा खटल्यांमध्ये काम केलं आहे. १९९६ पासून ते २००० च्या दरम्यान त्यांनी डझनभर मुलांना कोको बागांमधून वाचवलं होतं. त्यांनी बालमजुरी आणि बाल तस्करीवर असंही सांगितलं की "तस्करी आजही ह्या भागात आहे, पण तस्करांनी त्यांचे मार्ग बदलले आहेत."  त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मे महिन्यात आयव्हरी कोस्टमधील पोलिसांनी कोकोच्या शेतात काम करणाऱ्या ६८ मुलांची सुटका केली, यातील बहुतेक मुलं शेजारच्या बुर्किना फासो इथून तस्करी आणली गेली करून आणली होती. त्यातील एक मुलगा तर अवघ्या १३ वर्षांचा होता.

अमेरिकेच्या कामगार विभागानं आणि शिकागो विद्यापीठातील एनओआरसी या संशोधन संस्थेनं प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटलं आहे की घाना आणि आयव्हरी कोस्टमध्ये ५ ते १७ वर्षे वयोगटातील कोकाआ शेतात काम करणाऱ्या मुलांचं प्रमाण गेल्या दशकात १४ टक्क्यांनी वाढलं आहे.  गेल्या दशकात ३१ पासून ४५% इतकं वाढलेलं हे प्रमाण सूचित करतं की गेल्या दशकात कोकोच्या उत्पादनात जी ६०% वाढ झाली आहे त्या वाढीचा थेट संबंध कोकाआ बागेतील  वाढत्या बाल मुजुरीशी आणि बाल तस्करीशी जोडला जाऊ शकतो. 

इतकेच काय जवळजवळ ९५% कोकाआ बागेत काम करणाऱ्या सुरक्षा धोक्यात आहे, असं संशोधनात सांगितलं आहे, ज्यात साधारण फूटबॉलच्याएवढ्या आकाराच्या शेंगा कापण्यासाठी धारधार शस्त्रांचा वापर केला जातो. तसंच कीटकनाशकांनी फवारलेल्या जमिनीवर काम करणंही या मुलांसाठी धोकादायक आहे. गतवर्षीच्या कापणीच्या हंगामात हजारो कोको धारकांचं सर्वेक्षण करणाऱ्या एनओआरसीच्या म्हणण्यानुसार पाच वर्षात कीटकनाशकांचा वापर २० टक्क्यांनी वाढला आहे. या अहवालात म्हटलं आहे की, "कोको शेतात मोठ्या प्रमाणात मुलं जड भार उचलतात, जमीन साफ करतात. मुलांद्वारे नोंदवलेल्या गेल्याल्या इजा कोका शेतीशी संबंधित आहेत."

१८६५ साली अमेरिकेतील कायद्यामध्ये दुरुस्ती करून गुलामी संपवली गेली. तरी जगात सर्व गोष्टींमध्ये स्वतःला अग्रेसर समजणारी अमेरिका आणि तिथल्या बलाढ्य कंपन्या आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आशियातील देशांना त्यांची प्रयोग शाळा समजतात. अमेरिकेच्या प्रगतीसाठी वाटेल ते प्रयोग ते या भागातील देशांवर करतात. १८६५ मध्ये गुलामी फक्त अमेरिकेत संपली, इतर देश अजूनही त्यांचे गुलामच आहेत असं ते मानतात. हे त्यांच्या साम्राज्यवादी दृष्टिकोनातुन सतत दिसत असतं.