India

आणखी मुस्लिम प्रवाशांना मारण्याच्या प्रयत्नातला चेतनसिंह प्रवाशांनी आरडा-ओरडा केल्यानं थांबला

हत्या द्वेषभावनेतूनच, रेल्वे पोलिसांचा निर्वाळा

Credit : Indie Journal

 

काही प्रत्यक्षदर्शींनी बुधवारी पोलिसांसमोर नोंदवलेल्या साक्षीनुसार, ३१ जुलै रोजी पालघरजवळ चालत्या रेल्वेमध्ये ४ जणांचे जीव घेणारा रेल्वे सुरक्षा बलाचा हवालदार चेतनसिंह चौधरी, हा आणखी मुस्लिम प्रवाशांना मारण्याच्या तयारीत होता, मात्र इतर प्रवाशांनी आरडा-ओरडा केल्यानं तो गोंधळला आणि त्यानं तिथून पळ काढला. चौधरी याच्या हल्ल्यात ३ मुस्लिम प्रवासी, तर १ वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकार मारले गेले होते. 

द इंडियन एक्स्प्रेस आणि हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांसमोर काही प्रत्यक्षदर्शींनी नोंदवलेल्या साक्षीनुसार, चौधरी एकामागून एक मुस्लिम प्रवाशांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्नात होता. एस ६ डब्यात असघर अली या प्रवाशाची हत्या केल्यानंतर चेतनसिंह एस ५ डब्यात शिरला व त्यानं एका बुरख्यात असलेल्या मुस्लिम महिलेवर आपली बंदूक रोखली होती. 

 

 

इथं त्यानं मोठ्यानं मुस्लिमद्वेषी भाषण देत प्रवाशांना रेकॉर्डिंग सुरु करण्यास सांगितलं. आपल्या पतीसोबत जयपूरवरून मुंबईला निघालेल्या त्या महिलेनं पोलिसांना घटनेचं वर्णन करताना सांगितलं की, "त्यानं माझ्याकडं बंदूक रोखली होती आणि मला 'जय माता दी!' असं म्हणायला सांगत होता. मी त्याच्या बंदुकीला दूर करत 'तू आहेस कोण?' असं म्हटले, मात्र तो मला ठार मारण्याची धमकी देत होता. त्यानं पुन्हा माझ्याकडं बंदूक रोखली मात्र इतर सहप्रवाशांनी आरडा-ओरडा सुरु केला आणि तो गोंधळला आणि गाडी थांबवून खाली उतरला. आम्हाला वाटलं त्याच्या बंदुकीतल्या गोळ्या संपल्या आहेत म्हणून आम्ही वाचलो." मात्र इतर पोलिसांनी त्यांना नंतर सांगितलं की त्याच्या बंदुकीत अजूनही गोळ्या शिल्लक होत्या. 

सिंह यानं बी २ डब्यात सय्यद सैफुद्दीन या प्रवाशाची हत्या करण्यापूर्वी जाफर खान, यांनाही धमकावलं होतं. लघवी करण्यासाठी स्वच्चतागृहाकडं निघालेल्या एका विशीतील तरुणानं सिंह आणि त्याचे वरिष्ठ अधिकारी टीका राम मीना यांचं बोलणं ऐकलं होतं. "तो तरुण बाहेर पडल्यावर त्याला मीना यांचं मृत शरीर दिसलं आणि तो घाबरून पुन्हा स्वच्छतागृहात लपला. त्याच्या आईला त्यानं संपर्क करून सर्व प्रकार सांगितला. तो इतका घाबरला होता की बोरिवली येईपर्यंत जवळपास १ तास तो आतमध्येच लपला होता," चौकशी करणाऱ्या पोलिसांपैकी एक अधिकारी सांगतात. 

चौधरीचे दुसरे बळी ठरलेले अब्दुल कादर भानपूरवाला, यांच्याशी गप्पा मारलेल्या एका प्रत्यक्षदर्शीनंही आपला जवाब नोंदवला. "त्या दोघांनाही मीना यांची हत्या करण्यासाठी चालवलेल्या गोळीचा आवाज आला नव्हता. जवळपास २० मिनिटात वैतरणा स्थानकावर उतरण्यासाठी भानपूरवाला दरवाजाकडं जात असतानाच सिंह यानं त्यांची हत्या केली. पुढं त्यानं असगर अब्बास शेख यांचीही हत्या केली. 

 

हत्या द्वेषातूनच 

संपूर्ण घटनाक्रम समोर आला त्यावेळी अनेक माध्यमांनी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांनी, चेतनसिंह हा मानसिक आजारानं ग्रस्त असल्याचं म्हटलं होतं. हे कृत्य त्यानं त्या अस्थिर मनस्थितीत केलं, असं त्यांचं मत होतं. मात्र या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडियो मध्ये, एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात उभा असलेला सिंह प्रवाशांना पाहून 'या देशात राहायचं असेल तर मोदी, योगी आणि तुमचे ठाकरे, हेच पर्याय आहेत' असं भाषण देत असताना दिसला होता. 

रेल्वे विभागानं सिंह याला नोकरीवरून बडतर्फ करताना न्यायालयाच्या वक्तव्यांचा आधार घेतला आहे. न्यायालयानं असं मत नोंदवलं की, " टीका राम मीना यांची हत्या जरी रागाच्या भरात केली असली, तरी हे स्पष्ट आहे की इतर तीनही हत्या त्यानं निवडकपणे द्वेषभावनेतून केल्या आहेत." 

त्याच्या बारखास्तीची नोटीस काढत रेल्वे सुरक्षा दलानं म्हटलं आहे की, "आरोपीच्या विभागअंतर्गत चौकशीमध्ये वेळ वाया जाईल आणि रेल्वे सुरक्षा बलाची बदनामीदेखील होईल. यामुळं दलाची शिस्त आणि विश्वासालाही इजा होईल. यामुळं चेतनसिंह याला आरपीएफ कायदा १९८७ नुसार बडतर्फ करण्यात येत आहे."

 

 

द्वेषाचा इतिहास

हवालदार चेतनसिंह चौधरी, याचा मुस्लिमद्वेष प्रासंगिक नसून त्याला इतिहास असल्याचं ईटीव्हीची ही बातमी सांगते. सिंह याआधी तीन वेळा शिस्तभंग केल्याच्या कारवाईला सामोरे गेलेला होता. २०१७ साली सिंह यानं मध्य प्रदेशच्या उज्जैन मध्ये आरपीएफच्या श्वान पथकात असताना एका मुस्लिम प्रवाशाला पकडून आणलं होतं. त्यानंतर त्या प्रवाशाला सिंह यानं विनाकारण त्रास देत त्याचा छळ केला. यानंतर त्याच्या वरिष्ठांनी चौकशीदेखील बसवली होती. 

इतर दोन प्रसंगांमध्ये एकदा सिंह यानं गुजरातमध्ये सेवेवर असताना आपल्याच एका सहकाऱ्याला मारहाण केली होती. तर दुसऱ्या एका प्रसंगात त्यानं आपल्या एका सहकाऱ्याच्या एटीएम कार्डचा वापर करून त्याच्या खात्यातून पैसे काढले होते. सिंह मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता.