India

चंद्रपूर ते लंडन व्हाया ‘टाटा इन्स्टिट्यूट’

बल्लारशाहच्या हर्षालीची प्रेरणादायी संघर्षगाथा.

Credit : Indie Journal

कुणाल रामटेके । कोणत्याही सकारात्मक बदलांची सुरुवात ही स्वतः पासून होते असं म्हणतात. पण आपल्या कुटुंबाची कोणतीही आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमी नसतांना स्वतःला सावरतच कुणाच्यातरी बदलांच्या प्रक्रियेत आपणासही वाटेकरू होता येत असेल तर ती निश्चितच मोठी गोष्ट ठरते. मग अशाच कठोर परिश्रमातून स्वतःला घडवणाऱ्या ‘कहाण्या’ इतरांनाही निरंतर प्रेरित करीत जातात. हा प्रेरणेचा झरा मोठा होत जातो आणि त्यातूनच सामाजिक परिवर्तन घडत जाते. मुळात, सामाजिक क्रांती, परिवर्तन, पुरोगामित्व या आणि अशा संकल्पना महाराष्ट्रासारख्या राज्यात नेहमीच आपण वापरत असतो. मात्र हे परिवर्तन घडणे वाटते तितके सोपे निश्चितच नसते. त्यासाठी लागणारी वैचारिक स्पष्टता आणि परिश्रमाची तयारी आपणास करावी लागते. त्यातही भारतासारख्या जाती-वर्ग-लिंगभेदाने ग्रासित असलेल्या समाजात एक महिला म्हणून स्वतःला सावरणे, पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्वतःला उभे करणे आणि आपली सामाजिक बांधिलकी मानून परिवर्तनासाठी सिद्ध होऊ पहाणे हे सारेच कठीण आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह सारख्या ग्रामीण किंवा अर्धशहरी भागातून आलेल्या हर्षाली नगराळेच्या प्रवासाकडे बघितलं की कुणालाही वाटेल हे सारे ‘शक्य’ आहे!

हर्षालीचा जन्म बल्लारशाहचा. वडील निवृत्त गिरणी कामगार आणि आई गृहिणी. घरची परिस्थिती बेताचीच. आणि अर्थातच कोणत्याही प्रकारचे सामाजिक-आर्थिक पाठबळ नसलेली. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा समृद्ध असा  विचार-वारसा मात्र भक्कमपणे तीच्या समोर उभा होता. बालपणापासूनच तिला आपल्या वस्तीत असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं मोठं आकर्षण वाटत होतं. क्षितिजाकडे असलेल्या त्या पुतळ्याचं बोट जणू तिला नवी भरारी घ्यायलाच प्रेरित करीत होतं. मग आपणही आंबेडकरांनी सांगितल्या प्रमाणे ‘खेड्यातून शहराकडे’ जावं, उच्च शिक्षण घेऊन त्यांच्या ‘पे बॅक टू सोसायटी’ या संदेशानुसार ज्या शोषित-वंचित समाजात आपण जन्मास आलो त्या समाजासाठी काही तरी करावं हा विचार तीच्या मनात सातत्याने घोळत होता.

मात्र ‘नेमकं काय करावं ?’ हे मात्र वळत नव्हतं. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ‘भौतिकशास्त्र’ या विषयात पदवीचा अभ्यास करीत अनेक बरे-वाईट अनुभव गाठीशी येत गेले. चांगले मित्र लाभले. मग विज्ञानासोबतच सामाजिक विषयांचं ही वाचन वाढत गेलं. त्यातून आपल्या समस्यांचे स्वरूप जरीही ‘भौतिक’ वाटता असले तरीही त्यांचे इतरही असंख्य कंगोरे इथल्या व्यवस्थेच्या तळाशी असतात हे तिला जाणवायला लागलं. शोषण, अन्याय, अत्याचार यावर आधारित असलेली सामाजिक व्यवस्था बदलवून समतेवर उभा असणारा समाज का स्थापन होऊ शकत नाही? असे अनेक प्रश्न तिच्या मनात घर करून उभे रहात होते.

इथल्या व्यवस्थेने हजारो वर्षांच्या कालखंडात एका बृहद अशा समाजाला अस्पृश्य म्हणून हिनवत त्यांना त्यांचे मानवाधिकारही नाकारले होते. या देशातील महिला आणि त्यातही मागासवर्गीय महिला तर इथल्या व्यवस्थेच्या अत्यंत खालच्या स्तरावर राहण्यासाठी विवश होत्या. जोवर इथल्या सामाजिक समस्यांचा शोध घेतला जात नाही तोवर परिस्थिती बदलणं निव्वळ अशक्य आहे असं वारंवार तिला वाटून जात होतं. त्यातच तिला मुंबईस्थित ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’त चालविला जाणाऱ्या ‘विमेन सेंटर प्रॅक्टिस’ या विषयातील पदव्योत्तर पदवीच्या अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. व्यावसायिक समाज कार्याचे शिक्षण देणारी जगात तिसरी आणि आशिया खंडात पहिली असणारी ‘टाटा इन्स्टिट्यूट’ ही ऐतिहासिक आणि अत्यंत महत्वाची अशी संस्था आहे.

दर वर्षी या संस्थेच्या निवड प्रक्रियेत लाखो विद्यार्थी सहभागी होत असतात. बोटावर मोजण्या इतक्या विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश मिळतो. हर्षालीने ही परीक्षा दिली आणि यशस्वीरीत्या ‘टीस’ला प्रवेश मिळवला. तिथलं सारच वातावरण भारून टाकणारं होतं. विचारांना चालना देणारं होतं. हर्षाली इथल्या विद्यार्थी चळवळीत सहभागी झाली. दुसऱ्या वर्षाला तर इन्स्टिट्यूटच्या छात्रसंघच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभी राहिली. हे सारे अनुभव खूप काही शिकवून जाणारे होते. त्यातूनच व्यवस्था बदलायची असेल तर आपल्यासारख्या लोकशाही प्रधान देशात निवडणुकी शिवाय दुसरा चांगला मार्ग नाही याची खात्री तिला पटत गेली. बाबासाहेबांनी इथल्या शोषित-वंचितांना शासनकर्ती जमात होण्यास सांगितलं आहे. हा प्रवास मात्र निवडणुका, लोकशाही आणि त्यासाठी सामान संधी या मार्गानेच आपल्याला करावा लागेल, हे हर्षालीला आता उमजू लागलं होतं. 

मुळात, ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ आपल्या विद्यार्थ्यांना पोषक वातावरण, अनुभव मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नरत असते. या संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून राबवण्यात येणाऱ्या ‘इंटर्नशिप’ सुद्धा अत्यंत महत्वाच्या ठरतात. हर्षालीने या काळात मुंबईच्याच ‘महिला राजसत्ता आंदोलना’त आपली ही ‘इंटर्नशिप’ पूर्ण केली. त्यातून राजकीय क्षेत्रात आणि त्यातही पंचायत राज क्षेत्रात काम करत असणाऱ्या महिलांवरील होणाऱ्या अत्याचार आणि शोषणाबद्दल तिला माहिती मिळत गेली. पुढे त्यातूनच ‘ग्राम पंचायतींमध्ये महिला प्रतिनिधींचा लैंगिक छळ’ या विषयावर तिने संशोधन केले. त्यासाठी २०१८ साली झालेल्या ६ व्या ‘राष्ट्रीय कॉंग्रेस परिषदे’मध्ये अत्यंत महत्वाच्या अशा ‘मार्था फरेल पुरस्कारा’ने तिला सन्मानित केले गेले. हर्षालीला आता आपलं ‘क्षेत्र’ गवसलं होतं. आणि ही बदलांची नांदी होती.

 

 

पुढे ‘महिला आणि राजकारण’ या विषयावर काम करीत असतांनाच हर्षालीला पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रचार मोहिमेत प्रशांत किशोर यांच्या ‘भारतीय-राजकीय कृती समिती (आय.-पी.ए.सी.) मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यातून महिला राजकारणात आल्या तर काय बदल घडवता येऊ शकतात याचा प्रत्यक्ष अनुभाव तिला येत गेला. हर्षालीला आता सक्षम आणि सर्वसामावेशक लोकशाहीसाठी निवडणुकीचे राजकारण या क्षेत्रात काम करायचे आहे. त्यासाठी तिची लंडन येथील अत्यंत प्रतिष्टेच्या अशा ‘रॉयल होलोवे’ विद्यापीठात ‘निवडणूक, प्रचार मोहीम आणि लोकशाही (Election, Campaign and Democracy) या विषयात ‘एम.एस.सी.’ या पदव्योत्तर पदवीसाठी निवड झाली आहे.

मुळात, कोणत्याही विद्यार्थ्यासाठी अशी निवड होणे अत्यंत मानाचेच आहे. मात्र, आता तिला गरज आहे या बदलांच्या प्रक्रियेत आपणही तिच्यासोबत वाटेकरी होण्याची. बेताच्या आर्थिक परिस्थितीत हर्षालीने आपले आजवरचे शिक्षण पूर्ण केले ते केवळ सरकारी स्कॉलरशिप आणि स्नेहीजनांच्या मदतीच्या भरवशावर. या कोर्सची फी, राहण्याखाण्याचा-प्रवासाचा खर्च हे सारेच तिच्या आईवडिलांना तर झेपण्यापलीकडचेच आहे. त्यासाठी गरज आहे ती आपणही समाज म्हणून उभे राहण्याची. हर्षालीचा हा कोर्स येत्या २० सप्टेंबर (२०२१) पासून  सुरु होतोय. त्यासाठी तिने आपणासर्वांनाच मदतीचे आवाहन केले आहे. या बाबतची पारदर्शकता ठेवण्यासाठी तिने ‘मिलाप’ या अधिकृत माध्यमाची मदत घेतली आहे. आपणही हर्षालीचे हे कँपेन या लिंक वर बघू शकता किंवा harshalinagrale21@gmail.com या तिच्या ईमेल ऍड्रेस वर तिला प्रत्यक्ष संपर्क करत आपली ऑनलाईन आर्थिक मदत तिला पोहचवू शकता. भारतीय रुपयांमध्ये तिला लागणारा हा खर्च पुढील प्रमाणे आहे. 

शिकवणी फी: १८,०६,००० रुपये.

भोजन आणि निवास खर्च: (११ महिन्यांसाठी): १६,००,००० रुपये.

इतर खर्चः १,००,००० रुपये

व्हिसा आणि विमान प्रवास: १,४५,००० रुपये.

एकूण खर्च : ३६,५१,००० रुपये.

 

 

मुळात, हर्षालीचा चंद्रपूर ते लंडन व्हाया ‘टाटा इन्स्टिट्यूट’ हा सारा प्रवासाच अत्यंत प्रेरणादायी आहे. गरज आहे ती आपणही या तिच्या प्रवासात आर्थिक मदत करून तिला साथ देण्याची. 

लेखक सामाजिक विषयांचे अभ्यासक असून त्यांनी ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई’तून ‘दलित-आदिवासी अध्ययन व कृती’ या विषयात पदव्युत्तर पदवी संपादित केली आहे.