India

ब्रेकिंग: द्वेष पसरवणाऱ्या भाजपप्रणीत अ‍ॅपचा 'द वायर'कडून पर्दाफाश

‘टेक फॉग’ या छुप्या अ‍ॅपचा वापर भाजप-संबंधित यंत्रणांकडून संशयास्पद ऑनलाईन ऍक्टिव्हिटीसाठी होत असल्याचा 'द वायर'चा खुलासा.

Credit : Shubham Patil

‘टेक फॉग’ नावाचं एक छुपं अ‍ॅप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संबंधित यंत्रणांकडून सोशल मीडियावरचे ट्रेंड्स प्रभावित करण्यासाठी, जनमताचा प्रवाह ठरवण्यासाठी आणि ऑनलाईन छळ आणि ट्रोलिंग करण्यासाठी वापरलं जात असल्याचं 'द वायर' या स्वतंत्र न्यूज वेबसाईटनं आज प्रकाशित केलेल्या शोध अहवालातून समोर आलंय. जवळपास दोन वर्ष चाललेल्या या इन्वेस्टीगेशनमधून या अत्याधुनिक अ‍ॅपचा वापर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात द्वेषयुक्त पोस्ट्स आणि माहिती पसरवण्यासाठी केला जात असल्याचं समोर आलंय. 

साधारण दोन वर्षांपूर्वी, म्हणजे एप्रिल २०२० मध्ये, नाराज भाजप कर्मचारी असल्याचं सांगणाऱ्या, @Aarthisharma08 या निनावी ट्विटर अकाउंटनं भाजपची लोकप्रियता कृत्रिमरित्या वाढलेली दाखवणं, टीकाकारांना ट्रोल करणं आणि सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवरील जनतेच्या धारणांमध्ये बदल घडवून आणण्याचं उद्दिष्ट या अ‍ॅपपुढे आहे, असा दावा ट्विट्सच्या मालिकेतून केला होता. त्याचबरोबर हे अ‍ॅप ‘रि-कॅप्चा कोड्स बायपास’ करून वापरकर्त्यांना ‘टेक्स्ट्स आणि हॅशटॅग ट्रेण्ड्स ऑटो-अपलोड’ करण्याची क्षमता देतं, असंही या निनावी ट्विटर अकाउंटनं म्हटलं होतं. या अ‍ॅपच्या उल्लेखामुळे स्वतंत्र ऍनलिस्ट देवेश कुमार आणि ऍनलिस्ट आणि 'द वायर'चे लेखक आयुष्मान कौल यांनी या ट्विटर अकाउंटला संपर्क साधला, आणि तिथून हा साधारण दोन वर्षं चाललेला तपास सुरु झाला.

'द वायर'नं केलेल्या बातमीनुसार त्यांना माहिती पुरवण्याच्या व्यक्तीनं देवांग दवे, भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) माजी राष्ट्रीय सोशल मीडिया सचिव, जे सध्या भाजपचे महाराष्ट्रातील निवडणूक व्यवस्थापक आहेत, यांचं नाव या प्रकरणातील कथित सूत्रधार म्हणून घेतलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळाल्यास गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या देण्याचा वायदा केला होता. मात्र तो त्यांनी पूर्ण न केल्यामुळं या 'स्रोतानं' ही माहिती उघड केल्याचं सांगितलं.

त्यापुढची दोन वर्षं लेखकांनी त्यांच्या स्रोतांनं केलेल्या अनेक दाव्यांची पडताळणी करून, या अ‍ॅपचा वापर कशाप्रकारे केला जाऊ शकतो. 'द वायर'च्या बातमीनुसार टेक फॉग हे अ‍ॅप चार पद्धतींनी समाजमाध्यमांवर भाजपाच्या प्रचाराचा भाग बनलं.

 

 

१. फेसबुक आणि ट्विटरवर हॅशटॅग्स ट्रेंड करणं: या अ‍ॅपमधील ऑटो शेअर आणि ऑटो रिट्विट फीचर्स द्वारा एखादा मजकूर किंवा हॅशटॅग हा ट्विटर आणि फेसबुक वरील ट्रेंडिंग विषयांच्या यादीत समाविष्ट करून येतो. त्यासाठी लागणारे बनावट युझर अकाउंट्स स्वयंचलितपणे तयार करण्याचंही फीचर यात दिलं गेलंय. हा मजकूर एकाच वेळी अनेक खऱ्या-खोट्या अकाउंट्स वरून प्रकाशित करून एकप्रकारे या साईट्सवरील जनमतालाच आपल्या प्रभावाखाली आणता येऊ शकतं. 'द वायर'च्या तपासात आढळून आलेल्या स्क्रिनशॉट्सवरून लक्षात येतं की हे सर्व फीचर्स भाजपाकडून आपल्या राजकीय शत्रूंवर निशाणा साधण्यासाठी, विरोधी चर्चेतील विषयांची गळचेपी करण्यासाठी वापरले गेले आहेत. 

२. निष्क्रिय असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्सची चोरी व दुर्वापर: हे अ‍ॅप सध्या निष्क्रिय असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट्सचा फक्त फोन क्रमांकाद्वारे ताबा मिळवून त्या नंबर्सशी जोडल्या गेलेल्या कॉन्टॅक्टसना एकाचवेळी ठराविक मजकूर पाठवू शकतं. अशा प्रकारे फक्त एका निष्क्रिय व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाच्या आधारे अनेक जणांपर्यंत पोहोचता येतं.

 

 

३. पत्रकार, नेते, इन्फ्लुएन्सर्सचा डेटाबेस आणि त्यांचा शाब्दिक छळ करण्याची सुविधा: टेक फॉग या अ‍ॅपवर अनेक व्यक्तींच्या अकाऊंट्सचा क्लाऊड डेटाबेसही आहे ज्याचा वापर करून  व्यवसाय, भाषा, वय, लिंग, राजकीय विचारसरणी आणि अगदी शारीरिक वैशिष्ट्यांनुसार एखाद्या व्यक्ती किंवा समूहाला निवडून त्यांच्यावर शिवराळ आणि अपमानास्पद भाषेत ऑटो-रिप्लाय करता येतात. हे रिप्लाईस गूगल शीट्स किंवा अ‍ॅपमध्येच पुरवल्या शब्दांच्या यादीतून निवडता येतात. खासकरून महिला व पत्रकार हा समूह या फीचरचं लक्ष्य आहे.

४. पुरावे नष्ट करण्याची सोय: हे अ‍ॅप फक्त बनावट अकाऊंट्स तयारच नाही तर स्वतःहून नष्टदेखील करू शकतं. या अकाऊंट्ससोबत त्यांच्याद्वारे प्रकाशित केली गेलेली सर्व माहितीसुद्धा डिलीट होत असल्यानं याबाबतीतला संपूर्ण पुरावाच नष्ट केला जातो.

'द वायर'च्या पडताळणी मधून समोर आलेली अजून एक महत्वाची बाब म्हणजे कॉर्पोरेट-तंत्रज्ञान क्षेत्रातील पर्सिस्टण्ट सिस्टम्स आणि मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचाही संबंध 'टेक फॉग'शी असल्याचं दिसून आलंय. यासंबंधी तपासा दरम्यान अ‍ॅपच्या फीचर्सची पडताळणी केल्यानंतर लेखकांनीं त्यांच्या स्रोताला त्याच्या एम्प्लॉयरविषयी माहिती पुरवण्याची विनंती केली. त्यानं पाठवलेल्या खातेपत्रिका आणि वेतनपत्रिकांमध्ये या खासगी कंपन्यांची नावं समोर आली. ‘द वायर’नं पर्सिस्टण्ट सिस्टम्समध्ये सध्या काम करणाऱ्या एका स्वतंत्र स्रोतापर्यंत पोहोचून टेक फॉग ऑपरेशन्समधील कंपनीच्या भूमिकेचा तपास केला, आणि या स्रोताने कंपनीच्या मायक्रोसॉफ्ट शेअरपॉइंटचे (अंतर्गत सहयोग साधन) स्क्रीनशॉट्स शेअर केले. यामध्ये ‘टेक फॉग’ या सर्च टर्मद्वारे सुमारे १७,००० असेट्स आयडेंटिफाय झाली, असं आज प्रकाशित झालेल्या बातमीमध्ये म्हटलंय. 

त्याचबरोबर मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं फ्लॅगशिप उत्पादन असलेल्या शेअरचॅटचा वापर बनावट बातम्या, राजकीय प्रचार व द्वेषपूर्ण भाषणं तयार करणं आणि ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यापूर्वी त्यांची चाचणी घेणं यांसाठी केला जात होता, असा दावा स्रोतानं केला होता. 'द वायर'च्या रिपोर्टनुसार या दाव्याची पडताळणी करण्यासाठी तसेच अ‍ॅपच्या व्यापक ऑपरेशनमधील प्लॅटफॉर्मच्या संबंधाबाबत माहिती पुरवण्यासाठी जागल्याने 'टेक फॉग'मार्फत नियंत्रित केल्या जाणाऱ्या १४ अकाउंट्सची यादी दिली. यातील प्रत्येक अकाउंट शेअरचॅटवरील अकाउंटशी जोडलेले होते. १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२० या ३० दिवसांच्या 'द वायर'नं या अकाउंट्सद्वारे शेअरचॅटवर करण्यात आलेल्या पोस्ट्स आणि त्याच अकाउंट्सद्वारे फेसबुक/ट्विटरवर करण्यात आलेल्या पोस्ट्स यांच्यावर लक्ष ठेवलं. या पोस्टस्च्या तुलना करणाऱ्या एका स्क्रिप्टमधून दिसून आलं की, यातील ९० टक्के पोस्ट्स विविध प्लॅटफॉर्म्सवर टाकण्यात आलेल्या आहेत. या पोस्ट्सवरील वेळेचे शिक्के तपासले असता लक्षात आलं की, सर्वत्र आढळणाऱ्या पोस्ट्स प्रथम शेअरचॅटवर टाकण्यात आल्या आहेत आणि तेथून त्या ट्विटर किंवा फेसबुकवर गेल्या आहेत.

 

 

याप्रकरणी दवे यांना 'द वायर'नं यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी हे सर्व आरोप ईमेलद्वारे फेटाळले. मात्र, या बातमीत नमूद केलेली एक महत्वाची गोष्ट, जी भाजयुमोचा या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संसंशयालाच अजून बळकटी देते, ते म्हणजे दवे यांनी ‘द वायर’च्या प्रश्नांना उत्तरे पाठवली, त्याच्या एक तास आधी मूळ स्त्रोताच्या ट्विटर अकाउंटचा ताबा घेतला गेला. यूजरनेम @AarthiSharma08 होतं, ते बदलून @AarthiSharma8 असे करण्यात आल्याचं 'द वायर'च्या निदर्शनास आलंय. या अकाउंटच्या जुन्या ट्विटच्या यूआरएलवर गेलं असता तिथून नवीन यूजरनेमला रिडायरेक्ट केलं जाऊ लागलं असल्याचंही या बातमीत म्हटलंय.

द्वेषपूर्ण पोस्ट्स आणि ऑनलाईन छळ पसरवणाऱ्या अ‍ॅप, ऑनलाईन ट्रोलिंग सर्रासपणे चालणाऱ्या काळात अशा प्रकारे सरकारी तसंच खासगी यंत्रणांनी एकत्र येऊन डिजिटल प्रणालीच्या साहाय्यानं जनमताचा प्रवाह ठरवणं आणि लोकांची ऑनलाईन ऍक्टिव्हिटी नियंत्रित करणं हे जगातल्या सर्वात मोठी लोकशाही महाहवणाऱ्या देशासाठी धोकादायकच नाही तर लाजिरवाणं देखील आहे. या अ‍ॅपबद्दलचे, दिल्ली दंगल, सीएएविरोधातील चळवळ, कोव्हिडची साथ, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर कसा वापर केला गेला, याचा खुलासा देखील 'द वायर' त्यांच्या पुढील भागांमधून करणार आहे.