India
कपड्यांवरून केलेला अवांछित स्पर्श हा लैंगिक अत्याचार नाही: मुंबई उच्च न्यायालय
तज्ञ व कार्यकर्त्यांकडून निकालावर नाराजी व्यक्त होत आहे.

मुंबई: नुकत्याच दिलेल्या एका निकालात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं म्हटलं आहे की अल्पवयीन व्यक्तीचे कपडे न काढता केलेला अवांछित स्पर्श हा लैंगिक अत्याचार ठरवला जाऊ शकत नाही. एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं हा निवाडा देऊन आरोपीला दिलेली शिक्षा बदलली.
न्या. पुष्पा गणेडीवाला यांनी हा निवाडा केला. हा निकाल देताना न्यायाधीश म्हणाल्या, "पॉक्सो (बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचाराची व्याख्या ही पेनीट्रेशन (अवयवात वस्तू, हात किंवा लिंगाने प्रवेश करणं) न करता, लैंगिक हेतूनं केलेला कोणताही त्वचेचा स्पर्श, अशी आहे. त्यामुळं अल्पवयीन व्यक्तीचे कपडे न काढता वरतून केलेला स्पर्श हा लैंगिक अत्याचार म्हणून ग्राह्य धरण्यासाठी आणखी स्पष्ट पुरावे अथवा कारण गरजेचं आहे."
न्यायाधीश पुढं म्हणाल्या, "तिचे कपडे किंवा टॉप काढला नसल्यानं अशा अस्पष्टतेमुळं या १२ वर्षवयीन पीडितेच्या स्तनांना कपड्यांच्या वरून केलेला स्पर्श हा लैंगिक अत्याचाराच्या व्याख्येत बसणार नाही. मात्र या कृतीला भा.द.स कलम ३५४ नुसार विनयभंग म्हणता येईल." पॉक्सो कायद्यांतर्गत आरोप सिद्ध झाल्यास गुन्हेगाराला किमान ३ व कमाल ५ वर्षांची कैद होऊ शकते. तेच कलम ३५४ अंतर्गत ही शिक्षा किमान १ व कमाल ५ वर्ष आहे.
बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर अभ्यास आणि काम करणाऱ्या 'मुस्कान' संस्थेच्या शुभदा इंडी जर्नलशी बोलताना म्हणाल्या, "आधीच्या काळी बालकांवर होणारा लैंगिक अत्याचार हा वयस्कांसाठी निर्माण झालेल्या बलात्कारविरोधी कायद्याच्या कचाट्यातून सुटत असे. त्यामुळं आपल्याकडं पॉक्सो सारखा एक मजबूत आणि अतिशय प्रागतिक कायदा निर्माण केला गेला. लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार हे काही फक्त अवयव प्रवेशातूनच होत नाहीत. अनेक लहान मुलामुलींवर लैंगिक शेरेबाजी, अवयव प्रदर्शन, अवांछित स्पर्श, अश्लील साहित्य-चित्रफीत दाखवणं या सगळ्याचा विपरीत परिणाम होतच असतो. अशातून आलेला धक्कादायक अनुभव अनेकांना शाळा सोडण्यास, आयुष्यभर तणावग्रस्त असण्यास, नातेसंबंधांमध्ये अडचणी येण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळं मुलांवर बलात्काराचीच वेळ आली पाहिजे असं काही नाही. याविषयी काम करणारे सामाजीज कार्यकर्ते या निकालानं विचलित झाले आहेत कारण या निवडायचा संदर्भ देऊन भविष्यात अशा खटल्यात न्याय मिळवणं अवघड होऊन बसेल."
या सुनावणीतील आरोपीनं पीडित अल्पवयीन मुलीला पेरू खायला देण्याच्या निमित्तानं एकांतात नेऊन तिचं शारीरिक शोषण केलं होतं. तितक्यात तिथं तिची आई आल्यावर मुलीनं रडत असल्याचं कारण सांगताना आपल्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला ज्यानंतर तिच्या आईनं आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती.