India
राजधानी दिल्लीत सांप्रदायिक घोषणा देणाऱ्या भाजप नेत्याला अटक
उघडपणे मुस्लिमविरोधी घोषणा देऊनही गेले दोन दिवस त्यांच्याविरुद्ध काहीच कारवाई न झाल्यामुळं न्यायतज्ज्ञांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि दिल्ली भाजपचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांच्यासह पाच लोकांना दिल्ली पोलिसांनी आज अटक केली. रविवार ८ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या जंतर मंतरला झालेल्या 'भारत जोडो आंदोलना' दरम्यान धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्याबद्दल उपाध्याय आणि अन्य पाच जणांवर ही कारवाई करण्यात आलीये. उघडपणे मुस्लिमविरोधी घोषणा देऊनही गेले दोन दिवस त्यांच्याविरुद्ध काहीच कारवाई न झाल्यामुळं न्यायतज्ज्ञांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि दिल्ली भाजपचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी पुकारलेल्या रविवारच्या रॅलीला शेकडो लोकांची उपस्थिती होती. रविवारी जंतर मंतरवर त्यांनी "वसाहती-युगाच्या कायद्यांविरोधात" मोर्चा काढला होता, ज्यात दाहक, मुस्लिमविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार आयोजकांना परवानगी नव्हती, तरी रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नव्हती, ज्यावरून दिल्ली पोलिसांवर आणि केंद्र सरकारवर टीका होत होती.
उपाध्याय यांनी या रॅलीचा कॉल दिला होता. कार्यक्रमाच्या कथित व्हिडीओमध्ये लोक मुसलमानांना हानी पोहोचवण्याची धमकी देत घोषणा देत असल्याचं दिसून आलं. भारत जोडो आंदोलनाच्या मीडिया प्रभारी शिप्रा श्रीवास्तव म्हणाल्या, "माझ्या माहितीत अशा कोणत्याही (दाहक) घोषणा नव्हत्या... तिथे ५,००० लोक होते आणि जर कोपऱ्यात पाच-सहा लोक अशा घोषणा देत असतील, तर आम्ही त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करतो," असंही त्या म्हणाल्या.
Source: Twitter
दिल्ली पोलिसांनी कलम-१५३अ अंतर्गत दोन समूहांमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्याला प्रोत्साहन देणं यावरून अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवली आहे. दिल्ली पोलिसांनी असं देखील सांगितल की आयोजकांना रॅलीसाठी परवानगी नव्हती आणि त्यांनी कोविड मार्गदर्शक तत्त्वांच्या उल्लंघनाशी संबंधित डीडीएमए कायद्याच्या उल्लंघनासाठी कलाम १८८ आणि ५१ देखील जोडले आहेत.
या सर्व प्रकारात लहान मुलांचाही वापर केला गेला. रॅलीमध्ये असणाऱ्या काही मुलांच्या हातामध्ये 'इस्लाम का विनाश' असं लिहिलेली पत्रकं होती. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम होतो आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावर एक शब्दही बोलत नाहीत. यावरून आपला समाज किती कट्टरपंथी होत चाललाय याची कल्पना येते.