India

भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू

नवजात शिशूंसाठीच्या विशेष अतिदक्षता विभागात आग लागल्यानं ही घटना घडल्याचं समजतं.

Credit : India Today

जिल्हा रुग्णालयात आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा येथे घडली आहे. नवजात शिशूंसाठीच्या विशेष अतिदक्षता विभागात, म्हणजेच Special Newborn Care Unit (SNCU) मध्ये आग लागल्यानं ही घटना घडल्याचं समजतं. एकूण १७ बालकांना या अतिदक्षता विभागातठेवलं होतं, पैकी ७ बालकांना अग्निशामक दलाकडून वाचवण्यात आलं आहे. यात अगदी एक दिवसाच्या जन्मलेल्या बाळापासून ते तीन महिन्याच्या बालकांचा समावेश आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी, जिल्हा अधिकारी तसंच पोलीस अधीक्षकांना या घटनेची पूर्ण चौकशी करण्याचे निर्देश दिले असल्याचं समजतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या घटनेनंतरराज्यातील सर्व दवाखान्यांचं तात्काळ ऑडिट करण्याचा आदेश दिला आहे.

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नुसार SNCU मधे शनिवारी रात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली. रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी अग्नीरोधक वापरून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. तत्काळ अग्निशामक दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आलं, पण तोपर्यंत १० बालकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. इतर वॉर्ड मधील रुग्णांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं देखील रुग्णालयाकडून सांगण्यातआलं.

आगीचं  कारण अद्याप स्पष्ट नसलं तरी SNCU मध्ये बालकांसाठी असणार्‍या वॉर्मर मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळं ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. देशभरातील राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे.