India

बारसू रिफायनरी प्रकरणी राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदीची नोटीस

समाज माध्यमांवर पोस्ट करण्यासही मज्जाव!

Credit : Indie Journal

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना मंगळवार (२ मे) पासून रत्नागिरी जिल्हा बंदीची नोटीस बजावण्यात आली असून यासोबतच बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य किंवा सामाजिक माध्यमांवर लेख, छायाचित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. ही बंदी ३१ मे पर्यंत लागू राहणार आहे.

रत्नागिरीतील बारसू परिसरात खनिज तेलाचा शुद्धीकरण प्रकल्प लावण्याची महाराष्ट्र सरकारची योजना असून या प्रकल्पाला बारसू गावातील स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. या प्रकल्पाविरोधात होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी राजू शेट्टी रत्नागिरीला जाणार होते. 

काल रात्री उशिरा रत्नागिरी पोलिसांकडून त्यांना जिल्हा बंदीची नोटीस देण्यात आली. "जिल्हा बंदी करणं आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास बंदी करणं म्हणजे माझ्या व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला आहे. मी या नोटिसीला आव्हान देणार असून आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी रत्नागिरीला जाणार आहे. मी तिथल्या आंदोलनकर्त्यांशी सातत्यानं संपर्कात आहे," असं राजू शेट्टी इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले. 

 

 

या पूर्वीदेखील रत्नागिरी पोलीसांकडून रिफायनरी विरोधातील आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या सत्यजित चव्हाण आणि मंगेश चव्हाण यांना जिल्हा बंदी करण्यात आली होती. शिवाय त्यांना रत्नागिरी पोलीसांकडून अटक करण्यात होती. 

या आंदोलनाबाबत समाज माध्यमांवर या विषयी काहीही टाकण्यात राजू शेट्टी यांना घालण्यात आलेली बंदी कोणत्या कायद्यांतर्गत घालण्यात आली आहे याची माहिती इंडी जर्नलला मिळू शकली नाही. राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा बंदी कायद्याच्या कथित कलमानुसार ही बंदी घालण्यात आली असून त्याबद्दल त्यांना स्पष्ट माहिती नाही. तर रत्नागिरी पोलीसांनी या प्रश्नाचं उत्तर देण्यास टाळाटाळ केली. 

बारसू प्रकल्पाला स्थानिक शेतक-यांकडून विरोध होत असताना शासनाकडून जबरदस्तीने प्रकल्पासाठी जमीनीची गुणवत्ता चाचणी घेतली जात आहे. या चाचणी विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतक-यांवर लाठीमार आणि अश्रूधूराचा वापर केला जात आहे.

सोमवारी रात्री उशिरा अप्पर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख यांच्यावतीनं रत्नागिरी पोलिस दलातील अधिकारी राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी दाखल होवून त्यांना समक्ष नोटीस देण्यात आली. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये व विविध ठिकाणी हिंसक आंदोलन करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याचं कारण दाखवतं सदर नोटीस त्यांना देण्यात आली.