Opinion
आर्टिकल १५: हिंसक ब्राह्मणवादाला मवाळ ब्राम्हणवादी पर्याय
व्यवस्था बदलाची एजन्सी, नेतृत्व याबाबतचा ब्राह्मणी अजेंडा आर्टीकल १५ने रेटला आहे
भारतीय संविधान, दलितांचे प्रश्न-संघर्ष आणि बाबासाहेब आंबेडकर याभोवतीचे संदर्भ लक्षात घेता, आर्टीकल १५ हा सिनेमा अनेकजण बघण्याचा आग्रह, जाहिरात वगैरे करत आहेत, ते कोणत्या भावनेतून? हे समजते. (म्हणजे, काही हौशी, काही भावनिक मंडळी तर हा सिनेमा पाहण्याचा प्रचार अगदी मनोभावे करण्याबरोबरच सिनेमागृहाच्या बाहेर संविधानाच्या प्रती फुक्कट वाटत सुटलेत!) मराठीतील नागराज मंजुळेंबरोबरच आता हिंदी सिनेमा जगताने सुध्दा सिनेमाचा ग्राहक म्हणून दलितांना समोर ठेवून त्यांना हवा तो आशय,कथा, मसाला विकायला काही सिनेमाचं उत्पादन सुरू केलंय. अजूनही सिनेमे येतीलच. मुद्दा केवळ सिनेमातून पैसे कमावण्यापुरताच हा दलित प्रेक्षक आहे की, अजून काय? हे आपल्याला समकालीन, ज्ञानसंघर्ष, अस्तित्व-अस्मितांचे राजकारण यासंदर्भात सिनेमा नेमक्या कोणत्या दिशेला जाऊन थांबतो? आणि थांबवतो? हे बघावं लागेलं.
याठिकाणी मी व्यवस्था बदलाची एजन्सी, नेतृत्व याबाबतचा ब्राह्मणी अजेंडा आर्टीकल १५ने कसा रेटला आहे? याची चर्चा करेन.
सिनेमाची गोष्ट थोडक्यात अशी आहे:
लालगाव पोलिस स्टेशनमध्ये ब्राह्मण जातीय अयान रंजनची पोस्टींग झालीय. ही पोस्टींग त्याला शिक्षा म्हणून झालीय. लालगाव हे उत्तरप्रदेशातलं एक गावं. या पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर अयानला इथले पोलिस कनिष्ठ जातीय पासी जातींबाबत कसे पूर्वग्रहदूषित आहेत? हे समजतं. पासी जातीमधल्या तीन मुली गायब असल्याची नोंद घेत नाहीत. या तीघींनी मजुरी वाढवून मागितलेली दिली जात नाही. मग त्या तीघी काम सोडून चमड्याच्या कारखान्यात कामाला जातात आणि त्यांचं बघून दुसरी मजूर मुलं-मुली सुध्दा त्या कंत्राटदाराचं काम सोडून, चमड्याच्या कारखान्यात कामाला जाऊ लागतात. कंत्राटदाराचे काम ठप्प होते.
त्यामुळे चिडून कंत्राटदार अंशुने तीघा मुलींना कोंडून, सामूहिक बलात्कार सत्र सुरू केलेले असते. इथून पळून जाण्याचा प्रयत्नात तिघीतील एक हरवते पण दोघींना मारून झाडाला टांगले जाते. मजूरी वाढवण्याचा वा विरोध करण्याचा विचार करणाऱ्या कष्टकरी दलितांना दहशतीत ठेवण्यासाठी हे भयंकर कृत्य केले जाते. केवळ पोलिसच नाही, तर मुख्यमंत्र्यांपर्यंत अंशूची पोहच असल्याने पोलिस त्या मुलींमध्ये समलैंगिक संबंध कांगावा करतात. दोघींच्यातले हे समलैंगिक संबंध न पटल्याने त्यांच्या वडीलांनीच ऑनर किलींग केल्याचा बनाव रचतात आणि खोट्या आरोपात दोन मुलींच्या वडीलांनाच नाहक गोवतात
पोस्ट मार्टममध्ये बलात्कार झाल्याचे रिपोर्ट असूनही हा रिपोर्ट बदलण्यासाठी पोलिसांकडून दहशत-दबावंत्र वापरले जाते आणि कहर म्हणजे या सामूहिक बलात्कारात दोन पोलिस (ठाकूर आणि जाठ जातीचे) सामिल असतात.
फार खोलात न जाता केस क्लोज करण्याचा तगादा तिथले काही पोलिस अधिकारी (ठाकूर, चमार जातीचे) लावतात. मात्र अयान रंजन मुख्यमंत्री, CBI यांना अंगावर घेतो. या केसच्या मूळाशी जातो. दलितांमधल्या अधिक दलित असलेल्या पासी जातीमधील वाट चुकलेल्या हिंसक चळवळीला योग्य मार्गावर आणत पिडीतांना न्याय मिळवून देतो. किमान पोलिसांना तरी डीकास्ट बनवण्याची प्रक्रीया सुरू करतो. आणि याचे दैनंदिन तपशील आपल्या अभ्यासक कार्यकर्ती असलेल्या उच्च जातीय प्रेयसीला देत रहातो. ही दलितसंघर्षकथेच्या मढ्यावर फुललेली ब्राह्मणी प्रेमकथा आहे. हो,हो प्रेमकथाच. उच्चजातीय प्रियकर प्रेयसीची प्रेमकथा. याकडे बघण्याचे मुद्दे:
१) इच्छित प्रियकर प्रेयसीचे ब्राह्मणी प्रारूप:
आता या सिनेमातल्या 'इच्छित प्रियकर प्रेयसीच्या' प्रारूपाला समजावून घेताना आपल्या या सिनेमामधली उपप्रेमकथा बघावी लागेल. ही उपप्रेमकथा आहे ती दलित असलेल्या निषाध आणि गौराची. दोघेही दलितांच्या अन्याय- अत्याचारविरोधी लढ्यात जीवतोड संघर्ष करत आहेत. खरंतर हेच जोडपं कथानकाच्या केंद्रस्थानी आणता आलं असंत. पण या दोघांची जीवनकथा सिनेमात बाह्यतः जरी उपप्रेमकथा ठरली असली तरी प्रियकर प्रेयसीच्या नातेसंबंधाचे हेच प्रारूप हे ब्राह्मणी नेणिवेत 'इच्छित' म्हणून आहे.
ब्राह्मणी नेणिवेत इच्छित असलेल्या प्रियकर -प्रेयसीची घडणपूर्ती नेमकी कशी होते आणि त्यामुळे कुणाला काय किंमत मोजावी लागते? हे समजून घ्यावे लागेल. ही प्रेयसी अयानच्याच प्रेमात असते पण तीला अयान लढावू, संघर्षशील कार्यकर्त्यासारखा हवा असतो. थोडक्यात अयान रंजनला ती परर्फेक्ट जोडिदार बनवण्याचा प्रयत्न करत असते. अयानला सुध्दा ती आवडत असते पण तिच्या नजरेत तो तेवढा उंच नाही, हे त्याला जाणवत असते. तो मित्राला म्हणतो की, "ती मला अजूनही काॅलेजचा मित्र समजतेय! आमच्या गप्पा कमी भांडणेच जास्त होतात हल्ली."(जरीIPS बनलोय तरी!) अयान रंजन तिच्या नजरेत भरण्यासाठी ऑफिसर-कम-कार्यकर्ताटाईप बनतो.
ब्राह्मणी स्त्रीवादी प्रवाहाचं प्रतिनीधीत्व अदिती हे पात्र करते. डिट्टो गिरीश कर्नाडांच्या हयवदन नाटकातील पद्मीनीसारखं! पद्मीनीला ज्याप्रमाणे बुद्धीमान आणि ताकदवान पात्र एकत्र, एकाच 'पण ब्राह्मण पुरूषातच' हवं आहे, त्याचप्रमाणे अदितीला अयानमध्ये कायद्याचा रक्षक ऑफिसर आणि सामाजिक प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता हवा आहे. जसा वडील म्हणाले म्हणून, अयान आयपीएस ऑफिसर बनलाय तसाच तो अदितीला हवा म्हणून कार्यकर्ताटाईप बनण्याचा प्रयत्न करतोय. अयान हे सगळं अदितीच्या नजरेत भरण्यासाठी, करतोय. पण त्याच्यासमोर माॅडेल म्हणून जी प्रेयसी आहे ती आहे गौरा. निषादला बघून (दिपून) गौराच्या डोळ्यांत जी (प्रतिचमक) चमक दिसते आहे; ती अदितीच्या डोळ्यांत दिसावी, ही त्याची धडपड आहे. त्याच्यासाठी निषाद जे करतोय तेच त्याला करायला हवं, पण निषाद जिवंत असताना हे अशक्य आहे. निषाद नसेल तरच त्याला सामाजिक समतेच्या संघर्षात नेतृत्व मिळेल. आणि म्हणूनच निषादच्या एन्कांन्टर होण्यातून, मरून जाण्यातूनच सामाजिक समतेच्या लढ्यात नेतृत्वेच्छू ब्राह्मण अयान चमकू शकतो. अपूर्णाचा पूर्ण बनू शकतो.
गौरा-निषाद यांना दुय्यम स्थानी ठेवून आणि निषादचा एन्कांन्टर होऊनच, हवा तसा अयान अदितीला मिळाला आणि अयानला हवी तशी दिपलेली अदितीची नजर मिळाली, या अल्पखुशीतच आर्टिकल १५ या सिनेमाचा शेवट झालाय. म्हणून या सिनेमामधले ब्राह्मण नायक- नायिका तात्पुरते तरी खूश झालेत! पण एक आंबेडकरवादी, जातीनिर्मूलनाच्या लढ्याशी बांधिलकी म्हणून मी या खूशीत भावनिक प्रेक्षकांप्रमाणे सहभागी होऊ शकत नाही. जिथे सिनेमातील अयान-अदिती या दोन्ही पात्रांनी इच्छिलेलं प्रेम हे नेणिवेत तरी जातीच्या सीमा ओलांडून जाऊ बघत होतं.
अदितीच्या नेणिवेतला नायक तर अयान नसून निषाद आहे. आणि अयानला हवी ती नायिका गौरा आहे. (हयवदन लिहिलं तेव्हा दलित स्त्रीपात्राची कल्पना गिरीश कर्नाडांना करणं शक्य नव्हतं! पण सध्या ज्ञानाच्या आणि जमिनीवरील लढ्यातील दलित स्त्रीयांचा लक्षणिय सहभाग बेदखल करता येणे शक्य नसल्याने अगदी पुसट पण गौराचं पात्र रंगवले गेलेय. तरीही तिच्या प्रासंगिक भेटीतच तो तिच्या चमकदार, ठळक-धीट पण समरस 'नजरेसारख्या नजरेला' व्याकुळला आहे. पण तशा नजरेची तो अदितीकडून (अदितीकडूनच) अपेक्षा करतोय.
अदितीशी नजरभेटही न झालेले, दलितजातीय लढावू नेता असलेले, निषाध हे पात्र एन्कांन्टरमध्ये मारले जाते तर गौरा निषादच्या जाण्याने प्रभावहीन लाचार नजरेची बनत अदृश्य होते. गौरा निषादच्या प्रेमाशयाचा बहुतांश अवकाश अयान-अदितीच्या सौम्य पण रोमॅन्टीक प्रेमकथेने व्यापलाय. जणू गौरा-निषादच्या नष्टतेवरच ही प्रेमकथा फुलते. पूर्णत्वास पोहचते.
हे मान्य की, सिनेमाला प्रियकर- प्रेयसी भोवतीचा लव्हमसाला पाहिजेच. पण म्हणून काय व्हॉट्सअपवरूनचे संवाद सौम्य रोमँटीक सीनमध्ये रूपांतरी करावेत?! आणि तेही तिथलं स्थायिक गौराच्या रूपातलं स्त्रीपात्र खुजं करून!?
आता, नाही म्हटलं तरी ज्या गावात जर निषाधसारखा उच्चशिक्षित पासी तरूण आहे, त्याच गावात उच्चशिक्षित पासी तरूणी असायला हरकत नव्हती. किंवा जर निषाध एवढा मोठा नेता आहे (जरी रावण आणि वेमुला मिक्स करून समोर ठेवला तरी!) तिथेच उच्चशिक्षण क्षेत्रातील दलित मुलींचा लक्षणीय प्रवेश आणि विद्यार्थी संघटना हक्काधिष्ठीत चळवळीतला वावर, कर्तेपणा, नेतृत्व निदान विद्यापीठाच्या मैदानात गाजत असताना, दलित नववी पास गौराऐवजी एखादी जेएनयूमधली दलित विद्यार्थी संघटनेतली कार्यकर्ती निषादची प्रेयसी दाखवली असती, तर काय बिघडलं असतं बरं?
म्हणजे, निषादचं पात्र ज्या चंद्रशेखर रावणवर बेतलेलं आहे. त्याचा शेवट मात्र रोहित वेमुलाप्रमाणे होतोय, तर त्याची प्रेयसी कितवी शिकलेली असावी? ती कशी दिसावी वा दिसायला हवी? हे जे ठरवलंय ना, त्या पाठिमागे ब्राह्मणी नेणिवा कार्यरत आहेत. वेमुला वा रावण कोणीही असो, तिथे उच्चशिक्षित लढावू आणि महत्त्वाचे म्हणजे अकॅडेमीशन मुलगी टाळून बरीच बाजी मारलेली आहे!
२) परिवर्तन लढ्याचा कर्तेपणा, नेतृत्वप्राप्तीचे ब्राह्मणी सत्ताकारण:
ब्राह्मण अयान विरुद्ध दलित निषाद हा नेतृत्वसंघर्ष अगदी सफाईदारपणे टाळला आहे तो निषादला भूमिगत ठेवून. या शिवाय स्वायत्त पण बेभरवशी पुतळाप्रेमी नेता आणि हिंदूत्ववाद्यांच्या नादी लागलेल्या दलित नेता या दोघांनाही नकार देत समांतर चळवळ करणारा निषाद हा दलित नेता प्रस्थापित उदारमतवादी जाळ्यात अलगद अडकतो. कोणत्याही खात्रीच्या नियोजनाशिवाय बेसावध होतो. जातीव्यवस्थेच्या उभ्या-आडव्या गुंतागुंतीच्या सत्ताकारणाची नासमझ, वैचारिक स्पष्टतेचा आणि
पुरेशा धुर्त-धोरणीपणाचा अभाव यामुळे, सनातनी-सरंजामी-उदारमतवादी याच वर्तुळात फिरणारी मार्जिनल दलितांच्या चळवळीची धुरा खांद्यावर असलेला हा भूमिगत नायक निषाद अयानने बाबासाहेबांचं नाव घेताच सफाई कर्मचाऱ्यांचा संप मिटवतो.
संसदीय चाकोरीत अडकलेले प्रस्थापित दलित राजकारण आणि दलित नेते यांच्या संकुचित व्यहार-दृष्टीने आणि नाकर्त्येपणामुळे मार्जिनल जाती आपल्या अस्तित्व -अस्मितेची धडपड आपल्या अल्पसमज-क्षमतेसह करीत आहेत. ही अधिक तळातील मुक्तीदायी दृष्टी खरं तर सर्वव्यापी होण्याच्या शक्यता गोठवत बाह्यतः आंबेडकरपाईक असलेल्या उदारमतवादी ब्राह्मणी प्रवाहांच्या नेतृत्वाखाली अशाच भाबड्या आंबेडकरप्रेमाने दलित तरूण अडकतो निषादच्या पात्राने ही बाब ठळक होते.
यातले जाटवजी हे तर कातडीबचाव दलित मध्यमवर्गीय सुरक्षित कोषात जगू ईच्छिणारे, मृतपात्र आहे अयान येताच हे पात्र जिवंत होते. कर्तव्यदक्ष बनते. शिवाय या सिनेमात जी जातीनिहाय पात्रे आहेत त्यात शेतकरी जातसमूहातील जाट बालात्कारी असूनही फसवला गेलेला आहे, (काय करणार? त्यांच्या धडावर त्याचं डोकं नव्हतं! ) कारण त्याला या गुन्हेगारांनी दारू पाजलेली होती म्हणून, सहानुभूतीचा हक्कदार आहे.
आणि कायस्थजातीय मयंक (देखल्या देवाला दंडवत घालणारा, भिडस्त, निरूपद्रवी पापभीरू अजातशत्रु वगैरे वगैरे! असं कसं काय कुणास ठाऊक?) आणि क्रूर दोषी कोण तर ठाकूर! जसं महाराष्ट्रात गेल्या वीस वर्षात मराठी सिनेमांमध्ये पासंगाची भूमिका वठवत आलेल्या मराठेत्तर जाती पिडीत, दुय्यम तर मराठा या मुख्य राजकीय स्पर्धक जातींची क्रूर, बलात्कारी,भ्रष्टाचारी प्रतिमा रंगवण्याच्या मोठा प्रकल्प दिसून येतो. यात ब्राह्मण हतबल, निरूपद्रवी, देशभक्त, त्यागी, धाडसी वा नैतिकता पाळणारेच असतात!
ही 'पुरोगामी ब्राह्मणी' खेळी सहज ओळखता येण्यासारखी आहे.
निषादच्या एन्कांन्टरने तर अयान रंजनला मैदान मोकळेच आहे! जातीच्या श्रेणीबद्धतेच्या आणि उपजातींच्या समानहितसंबधी शत्रूभावी स्पर्धेच्या मूळापर्यंत जाणाऱ्या, वाद- प्रतिवादाला मोठ्या कौशल्याने टाळत ब्राह्मण नायक दलित संघर्षकथेच्या केंद्रस्थानी सिनेमातून येताना दिसतो. या सिनेमामधून प्रतिकात्मकरीत्या दलितेत्तर ब्राह्मणेत्तर बड्या शेतकरी जातीविरोधात उभ्या असलेल्या भिन्नहितसंबधी ब्राह्मण, दलित, मार्जिनल दलितेत्तर ब्राह्मणेत्तर यांच्या प्रासंगिक एकत्र वाटचालीतून
ठळक होणारी संघर्ष सुत्रे समजून घ्यावी लागतील. ती ढोबळमानाने अशी:
अ) दलित स्त्री गौरा विरूद्ध ब्राह्मण पुरूष अयान रंजन:
अगदी सुरूवात आणि शेवट जरी बघितला तरी तुम्हाला व्यवस्था बदलाच्या एजन्सी आणि नेतृत्वाचं शिफ्टींग कसं झालंय हे प्रतिकात्म स्वरूपात समजून घ्यायला पाहिजे.
'बडे बडे लोगों के बडे बडे महला
और झुमर अलगसे!
कहब त लग जाई धकसे'...
हे संघर्षगाणं भर पावसात एका खुल्या छप्परात उभे राहून एक समूह गातोय. यात बहुसंख्य पुरूष आहेत. त्या समूहात मुख्य शाहीर आहे ती गौरा. गौरा तीन मुली गायब असल्याची तक्रार नोंदवायला पोलिस स्टेशनमध्ये धावतेय. पोलिसांना भांडते. (गाडीतून जाताना मयंक, जाटवजींना म्हणतो, 'गौरा तो तुमपर बहोत चढ रही थी!)
दोन मुलींना मारून झाडाला त्यांची प्रेतं टांगल्यावरही पोलिस स्टेशनमध्ये बाकी लोक डाळ शिजू देत नाही म्हणता, अप्पर पोलिस अधिक्षक अयान रंजनला भेटायला पासी लोकांसह ती त्याच्या निवासस्थानी जाते.
खरी हकीकत सांगते की, भीमसेनेचा नेता निषाद आणि साथीदारांनी पोलिसांची गाडी जाळली होती. ब्रम्हदत्तसिंग हा ठाकूर पोलिस अधिकारी अयानसमोर निषादचे हिंसक, कायदा मोडणारा असे, नकारार्थी चित्र निर्माण केले होते. मात्र गौरा अयानला भेटून पोलिसांच्या चुकीच्या व्यवहाराचा निषेध तीव्र करण्यासाठी आणि लक्ष वेधण्यासाठी, पोलिसांची गाडी जाळल्याचे सांगते. 'बहेरोंको सुनाने के लिए धमाके कीं जरूरत होती हैं !' असं बोलत आणि 'आपणही नववीपर्यंत नागरिकशास्त्र शिकलो आहोत' यावर जोर देत ती निषादच्या कृतींचे समर्थन करते. निषादने जास्तच नागरीकशास्त्र शिकल्याने तो दलितंच्या आधिकारप्राप्तीसाठी जहाल बनला असल्याचे सांगत ती त्याला शोधमोहिमेसाठी पूजाचा फोटो देते.
इथून पुढे मात्र गौराचं पात्र पाॅवरलेस होत जातं. ते अगदी निषादला पोलिस पकडून नेल्यावर तर पार कोलमडून जातं आणि पूजाच्या शोधमोहिमेवेळी एकदम आगंतुक बनतं. पूजा सापडल्यावर अयान तीला उचलून अँब्युलन्स पर्यंत पोहचवतो. या दरम्यान ती पूजांचे पाय चोळत राहते. पूजाला शुध्दीवर आणण्यासाठी 'पाय चोळणं' आवश्यकच होतं! पण एकूण या संघर्षाच्या प्रवासात पुसत चालेली असलेली गौरा या कृतीतून नावापुरतीच दाखवण्याचा शहाजोगपणा तिथे दिसतो
अयान रंजनच्या येण्याने या गौराच्या आवाजात आणि बाॅडीलॅन्गवेजमध्ये असलेली स्पष्टता, आक्रमकता पुढे पुढे गायब होते. गौरा गरजू, हतबल, दलित आणि ब्राह्मण पुरूषात शिष्ठाई करण्यापूर्ती उरते आणि शेवटी हात जोडत आयान रंजनच्या उपकारांची नोंद घेत अदृश्य बनते. मग सिनेमाच्या शेवटी संघर्षगाण्याऐवजी ही लढाई एका पाॅप गाण्याच्या रूपात आणि पुरूष मुख्य गायकाच्या, गंमत म्हणजे, अयान रांजन या ब्राह्मण नेतृत्व निगराणीत हे गाणं वाजत राहत! ते गाणं म्हणजे,
'शुरू करे क्या?
आज शुरू करे क्या?
बाते हो गई बहोत,काम शुरू करे क्या?'
जणू काहीच काम सुरू नव्हतं! अयान रंजनच्या पुढारानेच जग बदलायचं काम सुरू होणारै!
यातली डाॅ. मालती राम ही प्रामाणिक असली तरी,भेकड आहे! 'दलित स्पीरीट',संघर्षाचा बाणा हरवून बसलीय. आता इथं गंमत आहे, डॉ. मालती पोस्ट मार्टमचे रिपोर्ट देणार, हे ऐकताच ब्रह्मदत्त वैतागून, अस्वस्थ होत, 'राम रामsss ! भीमराव आंबेडकर की जय हो!' असा उपहास करतो. याचा अर्थ ती कुणाला बधणारी नव्हती, तरीही 'माजोरड्या' ठाकूर, यादवांना (महाराष्ट्रात मराठा- कुणब्यांना!) धडा शिकवायचा असेल तर तीला पुरोगामी, शिवाय धाडशी वगैरे असलेल्या ब्राह्मणांचा आश्रय घ्यावा लागेल. (समज गए बहेनजी!) आणि म्हणून मालती हे पात्र ठाकूर ब्रह्मदत्तपुढं स्पिरीटेड दाखवलंय, पण ब्राह्मण अयान पुढं ते कचखाऊ आहे. दलितांचं क्रांतीकारक असणं, प्रामाणिक असणं हे मधल्या जातींपेक्षा वरचढ असेलही पण ब्राह्मणांच्या खालीच आहे. ब्राह्मण नेतृत्वाची छाया धरल्यास अधिक प्रामाणिक, अधिक ध्यैर्यशील ते बनतात, हा यातला गाभा आहे.
ब) दलित स्त्री विरुद्ध दलित पुरूष:
दलित स्त्रीयांच्या कर्तेपणाला आणि नेतृत्वाला मुळातच नगण्य अवकाश आहे. दलित मुक्तीच्या लढ्यात त्या दुय्यम, पूरक भूमिकांमध्ये आहेत. इथे गौराच्या नेतृत्वाला वाव भेटला तो केवळ 'भीमसेना' या जहाल दलित संघटनेचा नेता निषाद भूमिगत असल्यानेच. त्यातही तो तीचा प्रियकर असल्याने हे निश्चित! जहाल मार्ग पत्करल्याने तोही उदारमतवादी चौकटीतील बदलाच्या स्पर्धेतून बाद होतोय! बाद म्हणजे, अगोदरच भूमिगत होता, नंतर एन्काउंटरच होतो! म्हणजे, दलित चळवळीतला प्रभावी परिणामकारक चेहरा अगोदरच आऊट आहे!
दलित चळवळीतली तात्पुरती पण अटळ राखीव फौज म्हणून बाई असतेच, तशी उरली होती गौरा! आपल्याला पोलिस कधी ना कधी उचलणार हे माहित असताना सुद्धा निषाद गौराशी त्याच्या अतृप्त प्रेमेच्छा बोलत बसतो. त्याने तीला कसलाच आनंद-सुख दिलं नाही याची खंत-कबुली व्यक्त करतो. पण दलितांचा लढा त्याच्या माघारी कसा चालवावा? कोणी चालवावा? गौराने काय करावं? याबाबत चर्चा होत नाही. तो गौराला केवळ प्रेयसी म्हणून बघतो, तीच्यात त्याला चळवळीतली सहकारी दिसत नाही.
मरताना सुध्दा निषादला तीचा पर्याय आठवत नाही. मिशीला पिळून देत तोही म्हणतो, 'हम आखरी थोडे हैं!' आता जिथं मिशी आली, तिथं गौरा संपलीच की! दलित स्त्री आपली चळवळीतली लढावू साथीदार होऊ शकते याचं सहजभान दलित पुरूषांना त्यांच्या पुरूषसत्ताक नेणिवेमुळे बर्याचदा येत नाही! ( मा.कांशीरामसाहेब मात्र अपवाद ठरलेत!)
क) दलित स्त्रीविरूध्द ब्राह्मण स्त्री:
केवळ अयान रंजन सगळं निस्तरायला आलाय म्हणून, असं होत नाही तर, अयान रंजनची प्रेयसी असलेली आदिती जी लालगावला रहात नसूनही, कर्तेपणाची आणि नेतृत्वाची (दुय्यम का होईना!) वाटेकरी झालेली दिसते. सिनेमातील बराच काळ अदितीने लालगावला अनुपस्थित असतानाही घेतलाय, जो वेळ गौराला देऊन तीचं पात्र अधिक फुलवता आलं असतं. म्हणजे, अयान रंजन अदितीशी फोनवरून, व्हॉट्सऍपवरून इकडच्या घडामोडी सांगत असतो. ते सीन सुध्दा सिनेमातला गौराचा अवकाश हिरावून घेतात.
सुरूवातच बघा, 'हे पासींचं गाव आहे, त्यांचा स्पर्श, सावली पण चालत नाही,' असं, ड्रायव्हर म्हणतो, हे ड्रायव्हरचं वागणं त्याला 'फनी' वाटतं, तसं तो व्हॉट्सऍपवरून लिहून अदितीला कळवतो. ती लिहते, 'यात काय फनी? आता आतापर्यंत माझी आईपण भांडी वेगळी ठेवत होती.' इथंपासून ते तीन मुलींना मारून झाडाला टांगल्यांचं तीन रूपये मजूरी वाढवून मागितल्याने मुलींवर बलात्कार, मर्डर झाल्याचे, आणि या सगळ्या परिस्थीशी नविन मार्गाने लढायला हवं वगैरे हे सगळं तो अदितीशीच फोनवर बोलतो.
आणि खरं म्हणजे, अयान रंजनला दलितांसोबत केला जाणारा जातीभेदाचा अस्पृश्यतेचा व्यवहार फनी वाटतो,पण अदिती याबाबत अज्ञानी नाही, घरातच आईकडून हा व्यवहार होता, हे ती त्याला सांगते. जेंडर इक्वॅलिटी, ह्यूमनराईट्वर लेख लिहणारी अदिती मुलींचे खून पडून त्यांची प्रेते टांगल्यावर, मुलींवर बलात्कार झाला हे कळताच काळजीने घटनास्थळी येत नाही, ती फोन काॅलवरून, चॅटवरून अपडेटस् घेत असते. ती फार भावनिक नसून खूपच तटस्थ अभ्यासक आहे. तर या सगळ्या संघर्षात अयान रंजन खूप ताणतणावात असल्याने त्याला तीची गरज, भावनिक आधार लागेल हे जाणून ती लालगावला आली होती. पण जे काम ती लेखनाच्याद्वारे करतेय ज्या पिडीत स्त्रीयांची, दलितांची वकालात करतेय त्यांच्याशी तिचा संवादच नाही!
डाटा कलेक्शन आणि थेअराईझेन यातील श्रमविभाजन (डिव्हीझन ऑफ लेबर) याबाबत सध्या ज्ञाननिर्मीतीच्या मैदानात दलित आणि उच्चजातवर्गीयांमध्ये घमासान सुरू आहे याकडे बिनदिक्कतपणे दुर्लक्ष करत 'अभ्यासक अदिती' पात्र पुढे सरकत राहते. अदिती सिध्दांतांकन करणारी, तर गौरा जनतळातील कार्यकर्ती, माहितीचा स्त्रोत. पण ही माहिती अदितीकडे व्हाया अयान जातेय. दलित स्त्रीया या डाटा कलेक्शनपुरत्या उतरतात. त्या ब्राह्मणी स्त्रीवादी वर्तुळाचा भाग बनत नसतात. माहिती आणि सिद्धांतांकन याच्यात जी दरी, तुटलेपणा आहे तोच गौरा आणि अदितीमध्ये आहे.
ब्राह्मण पुरूषांना दलितांचा/ शोषितांचा मसिहा बनायची जन्मदत्त भारी हौस आहे! आणि त्याचबरोबर 'लिबरल'/उदारमतवादी ब्राह्मण स्त्रीयांना याच अर्धवट अक्कलेवर 'सर्व स्त्रीयांच्याच' नव्हे तर 'सर्व मानवजातीच्यावतीने' लिहण्या-बोलण्याची आणि त्याचा आवाज बनत त्याच्या जागा बळकावण्याची सुप्तेच्छा भारी गंमतशीर आणि तितकीच केविलवाणी वाटते! दलित स्त्रीप्रश्न वेगळा न बघता स्त्री प्रश्नावर एकसूरी,एकसाची दृष्टीकोन असलेल्या उच्च जातीय स्त्रीवाद्यांची नव्वदच्या दशकातच दलित स्त्रीवादी प्रतिवादाने बोलती बंद करत, स्वतंत्र प्रवास सुरू केला होता. या प्रवासाचा पुढचा टप्पा काय आहे? तर आपल्यावतीने (दलितांच्यावतीने) दुसऱ्या कोणी खासकरून उच्च जातीयांनी लिहण्या -बोलण्याला तरूण दलित अभ्यासक तिव्राक्षेप घेत आहेत. सध्यकालीन ज्ञाननिर्मीतीचे हे सत्ताकारण सिनेमात अगदीच बेदखल केले गेले आहे.
अदितीला स्त्रीवादी फुले-आंबेडकरवादी अभ्यासक-कार्यकर्त्या स्त्रीपात्राने इतकं सहज सोडलं असतं का? गौराला अल्पशिक्षीत आणि अदितीला तीच्याशी अपरिचीत ठेवून आदिती आणि गौरामधील संभाव्य संघर्ष आवरून धरलेला आहे. या व्यवस्थेत उच्चजातवर्गीय स्त्रीयांना, स्त्रीवाद्यांना बदलांच्या एजन्ट म्हणून कसा स्पेस मिळतो, मिळू शकतो, याला या सिनेमाने ठळकपणे अधोरेखित केलंय. (जरी ते करायचं नसलं तरी ते झालंय!)
याठिकाणी परिवर्तनाच्या लढ्यातला कर्तेपणा आणि नेतृत्व सत्ताकारणात हरवून गौराच्या संपून जाण्यावर जास्त फोकसं करण्याचं कारण की, सिनेमा उत्तर प्रदेशात घडतो, जिथं दलित जातीय बहन मायावती चारवेळा मुख्यमंत्री राहिल्यात. आणि तिथं घडणाऱ्या संघर्षकथेत दलितांचा लढावू नेता पुरूष आहे शिवाय स्वार्थी, स्वपुतळाप्रेमी दलित नेता देखील पुरूषच आहे! (मायवतींचा पुतळे बांधकामाचा उपहास करण्यापुरताच अप्रत्यक्ष संदर्भ येतो, हे बेदखल करणं सलतच राहतंय. दलित स्त्री-नेतृत्वाला उच्चजातीय स्त्रीपुरुषांसह स्वजातीय दलित पुरूषांसोबतही नेतृत्वप्राप्तीसाठीचा संघर्ष अटळ आहे. या सर्व आघाड्यांवर लढताना गौरा पुसट झालीय म्हणून नेतृत्व प्राप्तीचे सत्ताकारण समजावून घेताना गौराला आरंभबिंदू म्हणून बघितलंय.एका मर्यादित अवकाशात गौराचं नेतृत्व विकसित करायची संधी होती; पण ब्राह्मणी पुरूषसत्ता, दलित पुरूषसत्ता आणि ब्राह्मणी स्त्रीवाद या बाबी अडसर म्हणून उभ्या राहतात. एवढ्या संकटातून सिनेमात सुध्दा एखाद्या दलित स्त्रीचं नेतृत्त्व वा कर्तेपणा फुलवणे हे ब्राह्मणी नेणिवांच्या निर्मात्यांना जमणे तसं कठीण आहे!
३)दलितांमधील उपजातींचा अंतर्गत सत्तासंघर्ष आणि उच्च जातीय पुरोगामी नेतृत्वाचा अवकाश
मुद्दा केवळ उत्तरप्रदेशातल्या जातीय सत्तासमीकरणाचा नाही. तर मतदार समूह निश्चीतीसह एकूणच प्रबोधन परिवर्तनाच्या लढ्याचा अनुयायी, श्रोता, प्रेक्षक, पाठीराखा, प्रोत्साहनदाता मात्र गरजू , गरिब आणि ज्ञान, संपत्ती,राजकीय सत्तेपासून दूर असलेल्या समूहात नेतृत्वप्राप्तीचा अवकाश पाया ढासळलेला उदारमतवादी प्रवाह भारतभर शोधत आहे.
आर्टीकल १५ या सीनेमाला जरा पाॅलिटीकली बघितलं तर चित्र एकदम स्पष्ट दिसतय. समाजवादी सायकल पंक्चर, फुलवाली भाजपा घातक, बसपाचा हाथी बेभरोशी!
मग राहिलं कोण? अर्थात मवाळ, उदारमतवादी ब्राह्मणी काँग्रेस! तर अशाप्रकारे जहाल/ हिंसक ब्राह्मणवादाला मवाळ / लिबरल ब्राह्मणवादाचा पर्याय घेऊन आलेला आहे आर्टिकल १५ सीनेमा!!
आता खरंतर, निवडणूकीय राजकारणाच्यापलिकडे व्यवस्थापरिवर्तनाच्या लढ्यातील स्वतःचे स्थान डळमळीत होऊ लागल्याच्या काळात उदारमतवादी ब्राह्मण समूहातून जी अस्वस्थता आणि पुरोगामी भाबडेपणा, आणि इतरांचं नेतृत्व करण्याचा सोस जाणवतो; त्याचे प्रतिनीधीत्व अयान रंजन करतोय. तो स्वतःची जागा पक्की करतोय. तो स्वतःचा शोध घेतोय. म्हणजे, दंगली लावणारा महंतजी आणि उदारमतवादी, कनवाळू, न्यायाची चाड असलेला ब्राह्मण अयान रंजन एक नाहीत; तेव्हा सर्व ब्राह्मण सारखे नाहीत हे तो ठसवायच्या प्रयत्नात आहे.
जे दलितांच्या वतीने बोलतात, दलितांचं नेतृत्व करतात ते तरी दलितांमधल्या दलितांना बरोबरीचं वागवतात का? दलितांतर्गत श्रेणीबद्धताहा सिनेमा ठळक करत, जे राजकीयदृष्ट्या प्रस्थापित, तगडे, हुशार दलित त्यांच्या नेतृत्वात येणार नाहीत, त्यांना तो पुसून टाकतोय, अनुल्लेखाने मारतोय. तर गरजू, रस्ता चुकलेल्या (हिंसक) फसलेल्या दलितांचा वाटाड्या बनतोय, आवाज बनतोय. (खरंतर तीही गरज नाही! पण उत्तर प्रदेशात मागास दलित असलेल्या वाल्मिकी/भंगी, मुसाहर, पासी, रहगर या जाती ज्या बसपाऐवजी भाजपाशी जोडलेल्या आहेत). यूपीत सुध्दा इतर राज्यांप्रमाणे आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या या लाभवंचित दलित जातींनी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा लढा उभा केलेला आहे. म्हणजे, भाजपाने सत्तेतला सन्माननीय वाटा देण्याऐवजी आणि या लाभवंचित जातींना दलित आरक्षणांतर्गत आरक्षण वर्गीकरण लढा आणि हिंदूत्ववाद या दोन मुद्द्यांवर गुंतवलं आहे. आरक्षणाची लाभार्थी, आणि राजकिय सत्ताप्राप्तीच्या संघर्षात तसेच सत्तेच्या संचलनात अग्रभागी असलेली चांभार जात मागास, आरक्षित (Vulnerable) पासी/ वाल्मिकी इत्यादी जातींबाबत कशी बेफिकीर, आणि तुच्छतावादी आहे? हे जाटव पी.एस.आय,च्या रूपात ठळक होते.
याठिकाणी हे नक्कीच मान्य करायला हवं की, उत्तर भारतातला चांभार, महाराष्ट्रातला बौद्ध (बौद्धधम्मदिक्षापूर्व महार), कर्नाटकातील होलेर, आंध्रप्रदेशातील माला, तमिळनाडूतील परीया, गुजरातीमधील धेड या जातींच्या संघर्ष आणि प्रतिरोध प्रतिशोधाच्या क्षमता त्या त्या राज्यातल्या मार्जिनल दलित जातींच्या तुलनेत प्रभावी आहेत. आणि म्हणूनच या प्रभावी दलित जाती संसदीय राजकारण, प्रशासन, शिक्षण क्षेत्रात आघाडीवर आहेत. मागास दलितांच्या मागासपणाला ते स्वतःच जबाबदार असल्याचे नेहमीच पण 'कुजबुजीच्या' स्वरूपात या पुढारलेल्या दलित जाती बोलत असतात.
जाटवजी हे मयंक याच्याशी आपल्या दलित नोकरदार म्हणून मर्यादा सांगत असताना, बलात्कार का होतात? याचं मजेशीर कारण देतात. ते म्हणतात, "ऐसी बस्तीमें रहोगे वही हगोगे, वही खाओगे, वही जानवर छिले पडे हैं! ऐसी जगही रहेंगी लडकीया सुरक्षित?" आणि कायस्थ मयंक दुजोरा देत म्हणतोय, "कैसे रहेंगी?" (तसा मयंक लाॅजिकमध्ये, समाजिक प्रश्नांच्या आकलनात निषादच्या तुलनेत कच्चा आहे हे तो कबुलच करतो म्हणा!)
पण जाटवजीची ही मतं टिपीकल मध्यमवर्गीय दलितांचा सामूहिक धारणेतून येतात. दलितांमधील अतीमागास जाती या मागास असल्याची आणि तीव्राधिक आरक्षित (Vulnerable) कारणे केवळ शिक्षण आणि नोकरीशी जोडणे ही एक फॅशन बनून गेलीय! महाराष्ट्रात तर आणखीणच कहर आहे, महाराष्ट्रातले सुधारलेल्या पुढारलेल्या जातीकडून नेहमीच, 'बौद्ध धम्मदिक्षा घेतल्यानेच आमची प्रगती झाली आणि तुम्ही हिंदूच राहिल्याने मागास दुबळे हतबल झालात!' हे ठसक्या-ठेक्यात ऐकवले जाते!
आणि हे कुठं घडतंय? जिथं बहेन मायावती चारवेळा मुख्यमंत्री होत्या त्या राज्यात!
शोषण शासनाची मोठी चौकट दुर्लक्षित करत 'मार्जिनल दलित आणि डाॅमिनन्ट दलित' हा कलगीतुरा कनवाळू, उदारमतवादी अभ्यासकांनी अकॅडमिक क्षेत्रात लावून दिलाय. याचा वापर लिबरल, सनातनी हिंदूत्ववादी तसेच ब्राह्मणेत्तर हे सर्व प्रवाह सामाजिक समतेचा लढा पुढे नेण्यासाठी न करता दलितसमूहाचे राजकारण (बहुजन समाज पार्टीला) अधिक शक्तीहीन करण्यासाठी करतात. पासी/ इतर मागास दलित आणि चमारांमधली अदृश्य भिंत सिनेमाने ठळक केलीय. अर्थात ती आहेच, तीचा वापर उच्च जातीय लिबरल, सनातनी, संरंजामी आपल्या सत्ताप्राप्तीच्या संघर्षात करणार हे निश्चित. पण सिनेमाच्या शेवटी व्हिक्टीमाईझ म्हणून समोर आणलेला पंजा किती मैदान मारणार? हे सिनेमातील कोणत्या प्रतिवादाला मार्जिनल दलित बळी पडतात यावर अवलंबून आहे.
४) नक्षलवाद वा जहाल दलितचळवळीविरुद्ध दलितांना 'वळण' लावणारा सिनेमा:
मुख्य म्हणजे अयान केसच्या मूळाशी जाताना तो सत्ताहीन दलितांमध्ये (पासी) सुरू असलेल्या प्रतिक्रियारूपी हिंसक, जहाल घटनाबाह्या चळवळींना सनदशीर 'वळण' लावतो. संविधानाच्या चौकटीत आपण आपले प्रश्न सोडवून शकतो, हा वस्तूपाठ तो घालून देतो. निषादने हिंसेच्या मार्ग चुकला असल्याची कबुली दिली. हिंसाधिष्ठीत लढे उभारणाऱ्या वा नक्षलवादाकडे आकर्षित होणार्या दलितांना, निषादचा एन्काउंटर हा ईशारा होता.
जर सिनेमा नीट बघितला तर सिनेमाचा मुख्य गाभा दलितांमधील जहाल गटांना 'वळण लावणे' आणि तेही त्यांच्या मनातील खोलवर रूजलेल्या बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानप्रेमाला अवाहन करीत 'वळण लावणे', हा सिनेमाचा मुख्य हेतू लपून रहात नाही. दलितांचा संविधानाच्या अंमलबजावणीतील कोणत्याही यंत्रणावरचा विश्वास उडत चाललेला आहे. दलितांमधील कनिष्ठ जातवर्गीय प्रासंगिक पण नाकेबंदी करणारा असहकार तर क्वचित हिंसाही करत आहेत. याशिवाय नियोजनबध्द हिंसेचा मार्ग दाखवणारा विचार म्हणजे, माओवाद आणि माओवादावर चाललेल्या सशस्त्र चळवळीचा शेवटाचा पर्याय दलितांना खुनावत आहेत. अशावेळी सशस्त्र मार्गशिवाय इतर मार्ग काय? याचे दिशा-दिग्दर्शन फुले- आंबेडकरवादी विचार व्यवहारात सूचित असताना देखिल, समग्र व्यवस्था पुनर्मांडणीची सोडून, भांडवली उदारमतवादी चौकटीचं लाॅलीपाॅप हा सिनेमा देतो. काय तर म्हणे, 'आर्टीकल १५'!
उच्च जातीय 'पुरोगामी क्रांतीकारक' सध्या कायद्याच्याबाहेर जाऊन आदिवासी भागात जल-जंगल-जमिनीवर भांडवलदारांच्या आक्रमकणाविरोधात कार्यरत आहेत. मात्र यावर उच्च जातीय पुरोगामींचा निषादसारखा एन्कांन्टर होणार नाही, हे निश्चितच. कितीतरी आदिवासी स्त्रीपुरुष जेलमध्ये आहेत किती जण एन्कांन्टरमधे मारले गेलेत? त्याचा हिशेब नाही. पण गवगवा होतो तो त्या संघर्षात एलियन्स म्हणून उतरलेल्यांचा.
ब्राह्मण असल्यामुळे अयान रंजनच्या विद्रोहाला सलाम करणारे दलित (ज्यात मालती राम जाठव, गौराही आहे.) तर सहकार्य, प्रोत्साहन देणारे ब्राह्मण ज्यात प्रेयसी अदिती तर आहेच, पण उच्चपदस्थ शास्त्रीजी, जे गृहमंत्री आहेत. पदच्युती झाल्यावर सुध्दा तो स्पष्टपणे सीबीआय ऑफिसरला सांगतो की, पूजाला शोधण्यासाठी मी 'काहीही करेन', अगदी 'कायद्याच्याबाहेरही' जाईन! कारण गृहसचिवपदी बसलेले उच्चजातीय पदस्थ अयानच्या कायदाबाह्य पण 'महत्त्वाच्या/पवित्र' कामांना पाठिंबा देत 'कुल' म्हणत असतात!
५) सामाविष्ठीकरणापलिकडच्या दलित संघर्षदृष्टीचे भान नसलेला सिनेमा:
एकूण काय? तर हा दलितांना वळण लावयला निघालेला ब्राह्मणी नायक खरंतर, खूपच खुजा आणि जातीव्यवस्थेच्या आकलनात अर्धवट असल्याचे दिसत राहते. ज्या नव्या मार्गाने तो दलितांचा मसिहा बनू पहातोय; तो मार्गच दलितांचे दुय्यमत्व ठळक करणारा होणार आहे, हे त्या ब्राह्मणी नायकाच्या गावीही नाही! इथे दलितांच्या मार्गदर्शनात नवी दृष्टी घेण्याची, स्वतः दलितांकडून शिकण्याची मोठी जागा होती. दलित विचार- व्यवहारातून उच्चजातीय ब्राह्मणांचं प्रबोधन, सुधारणा, बदल होतोय हे प्रामाणिकपणे ठळक करण्याची संधी होती.
पण कनिष्ठ जातीयांकडून काहीतरी मुक्तीदायी शिकलो, याची ब्राह्मणी छावणीकडून कबुली मिळणं एकदम कठीण बाब! ब्राह्मणजातीय आणि ब्राह्मणी दृष्टीचा नायक प्रस्थापित करण्यापायी संविधानाच्या अंमलबजावणीचा आग्रह धरत विखुरलेल्या पण सातत्याने सुरू असलेल्या चळवळी मोडीत निघतात. शिवाय तो म्हणतो की, नविन मार्ग शोधायला हवा. नविन मार्ग काय? तर आर्टिकल १५ चा प्रचार! म्हणजे, खूपच मजेशीर! जिथं आता सिव्हिल राईटस् च्या पुढची नेतृत्व आणि कर्तेपणाची भाषा दलित डिस्कोर्समधून बोंबलली जातेय तिचं भान इंथे कुठेच ठेवलेलं दिसत नाही.
सत्तरच्या दशकात स्पष्ट लिहून झालंय की, 'ब्राह्मण गल्लीत आम्हाला जागा नकोय.' आदिवासी कवी आणि नेते वहारू सोनवणे यांनी कवितेत कडवट प्रश्न केलाय की, 'मेधा तू पाण्यात बुडणारांना वाचवतेस त्यांना पोहायला का शिकवत नाहीस?' साधारणपणे या दहा वर्षात विद्यापीठीय क्षेत्रात दलित आदिवासी मुस्लीम विद्यार्थी थेअरी शिकता शिकता या थेअरीला प्रश्नांकित करत आहेत, पर्यायी मुक्तीदायी विचार व्यवहार उभा करत आहेत. हैदराबाद सेंट्रल विद्यापीठ, जेएनयू दिल्ली , TISS, मुंबई , लखनौ, बनारस, सर्वच विद्यापीठाच्या मैदानात फुले-आंबेडकरवादी विद्यार्थी ज्ञानक्षेत्रात नवी मांडणी करत, आणि कृतीशीलतेच्यासंदर्भातली नवी प्रारूपं देत, ब्राह्मणी धुरीणत्व झुगारत आहेत. या सगळ्या घुसळणीतून ब्राह्मणी कर्तेपणा आणि नेतृत्वाला तगडं आव्हान उभं रहाण्याच्या शक्यता असताना, दिल्लीत स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा अयान रंजन जातीव्यवस्थेभोवती चाललेल्या चर्चाविश्वाबाबत एकदम अंजान, मासूम आहे.
अगदी अलीकडेच तेजस्वीनी तभाने या विद्यार्थीनीने शशी थरूर यांना लिहून झालय की, 'मिस्टर थरूर आम्हाला उच्चवर्णियांच्या किचनमध्ये प्रवेश नकोय, आम्हाला मंदिरात प्रवेश नकोय.' आम्हाला उच्च शिक्षणक्षेत्रात प्रवेश हवा आहे. आम्हाला अकादमीशीयन बनायचंय, आम्हाला प्रशासनात जायचंय आणि आम्हाला मंदिरात पुजारी बनायचंय!'
एखाद्या परिघावरच्या वा परिघबाह्य समूहाची केंद्रवर्ती समूहाकडून मान्यता, आदर, समाविष्टीकरण, सामिलीकरण यापलिकडे दलित चळवळ गेलेली आहे तरी ब्राह्मणी सुधारणावादी दृष्टी ही अशी भोपळ्याच्या चौकात फिरून आलीय! आज विद्यापीठांच्या मैदानात केवळ दलितांचे प्रश्न सोडवण्याची भाषा बोलली जात नाही. तर दलितांच्या नेतृत्वात, दलितांसह सर्वांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीची भाषा बोलली जातेय. म्हणून, हा लढा आता केवळ दलित प्रश्नांपुरता उरलेला नाही तर कोण, कुणाच्यावतीने, का बोलतो काय बोलतो, हे प्रश्न कळीचे बनलेत.
आम्हाला आमची मुक्ती स्वतःच करायचीय. आम्हाला आमचंच ताहरणहार बनायचंय आहे. आम्हाला भागीदार बनायचंय, आम्हाला या देशाच्या साधनसंपत्तीवर जल-जंगल-जमिनीवर न्याय वाटा हवा आहे. आणि तुम्ही तुमच्या सुखसुविधा ऐशोरामासाठी करत असलेला पर्यावरणाचा विध्वंस, ऱ्हास थांबवायचा आहे. आम्हाला मुक्तीदायी दृष्टी द्यायची आहे. मार्गदाते बनायचंय आहे. (यात तुमचीही मुक्ती आहे बरं!)
एवढं चर्चेचं गुर्हाळ पुढं येऊनही दलितांच्या मुक्तीचे मापदंड सवर्ण दृष्टीकोनातून मांडणं बंद काय होईना! दलितांना स्वतःच्याबरोबरच इतरांच्या प्रश्नसोडवणूकीचं भान आणि नड व्यापक पातळीवर निर्माण झाल्याचा हा काळ असताना, दलित स्वतःचा आवाज, स्वतःचे अस्तित्व जोरकसपणे ठळक करू ईच्छितात. त्यासाठी संघर्ष करत आहेत. पण जर अयान रंजनच त्याच्यावतीने बोलू लागला तर, मग संघर्षगान गणाऱ्या आणि 'मनुवाद/ब्राह्मणवाद मुर्दाबाद'च्या घोषणा देणाऱ्या दलितांना नव्यानेच फुटलेल्या कंठाचं काय करायचं?