Opinion

“हामीबी माणसं हाय, हामाला माणसांत घ्या”

पालावरच्या पारधी बाईचं राजकीय सभेत भाषण

Credit : धम्मसंगिनी रमागोरख

आम्ही म्हणजे, मी आणि शितल माळीनगरच्या श्रोत्यांमध्ये फिरत होतो. शितल साठे यांचा सभेपूर्वी शाहिरी जलसा झालेला. मग सभा सुरू झाली. आम्ही सर्वांना रॅन्डमली, कुठून आला? पक्ष- संघटना कोणती?जात कोणती असं सहज (!) विचारत होतो.

शितल म्हणाली, 'या पारधी महिला आहेत. मघाशी बाळासाहेबांचा सत्कार यांनी केला होता'.

मग जरा चौकशी केली तर त्या सांगत होत्या की, कुणीतरी "जयभीमवाला" त्यांना घेऊन आला होता.

'त्याने चल म्हणाल्यावर, तुम्ही लगेच कशा आल्या?' असं विचारलं, असता त्या सगळ्या एकदम कलकल करत सांगू लागल्या, "तो लय चांगला हाय, आमच्यासाठी धरणं आंदोलन केलेलं. आम्हाला रहिवासी दाखला, जातीचा दाखला, घरकुल मिळावं म्हणून लय आबादतोय तो. म्हणून आम्ही आलोत. आता बाळासाहेबाला सांगणार आम्ही, तहसीलदारला,त्या तलाठ्याला, त्या ग्रॅमसेवकला सरळ करणार, आता आम्ही लय लढणार,"

"मॅडम तूच सांग बरं.. ('तूच सांग' - पारधी महिला भल्याभल्यांना 'आरं -तुरं' 'आगं-तूगं' करतात. त्यांकडे 'आहो- जाहो' घालण्याचं ब्राह्मणी पितृसत्ताक कल्चर अजून पर्यंत तरी फार पोहचलं नाही.) जातीचा दाखला नसला तर शिक्षण कसं व्हणार? त्यातली एक नाॅनस्टाॅप बोलत होती.मला एक नवीनच सुचलं. मी तिला म्हणाले, 'स्टेजवर जाऊन बोलते का?'

तर ती म्हणाली, "आमाला कोण येव देतो? "आगं आपलंच स्टेज आहे ते, सांग बोलते का?" मी म्हणाले.  ती मान डोलवीत 'हो' म्हणाली. त्यांच्यापैकी एक शिकलेली म्हणाली, 'मी बोलतो, तिला तेवढं राजकारणाचं कळत नाय.!'

मग तिचा जातीचा दाखला न मिळाल्यामुळे अर्धवट डी एड सोडावं लागलेला भाऊ म्हणाला, ' मी बोलतो. यांच्यापेक्षा चांगला.'

तिथंच त्यांचं 'तू -तू मी -मी' सुरू झालं. "थांबा की जरा, ते हो म्हणले, तर जायचंय".असं मी त्यांना समजावत बोलले.

काय करावं बरं ? मला काही सुचेना.मग मी सचिनला ( सचिन माळी यांना) खाली बोलावलं आणि माझा विचार सांगितला. त्याला कल्पना आवडलेली, पण मध्येच असा कार्यक्रमात बदल करायचा म्हणजे? तसा तो घाबरून म्हणत नव्हता, पण प्रोटोकॉल भंग कसा करायचा? मला खात्री होती बाळासाहेब (प्रकाश आंबेडकर) 'हो' म्हणतीलच. पण विचारायचं कुणी? मी सभेला सहजच बारामतीतला भारिप समर्थक फ्रंटचा कार्यक्रम आटपून शितल -सचिन बरोबर आलेली. सचिन नियोजित वक्ता होता पण तो म्हणाला,"बाळासाहेबांना  मी कसं विचारू?"

खरं तर तिथं ही पारधी बाई बोलणं अत्यावश्यक होतं. ती जे सांगत होती, ते तिनं स्टेजवर सांगणं जास्त योग्य होतं.पण तेवढ्यासाठी उगीच प्रोटोकॉल तोडून स्टेजवर जाणं हे म्हणजे, 'अति' होतं. आणि ते मला स्वतःला पटेना. बरं सभेत बाळासाहेब फोन उचलतील असंही नाही.

मग मी चक्क एका कागदावर लिहलं,"एका पारधी समाजाच्या महिलेला शक्य असेल तर पाच मिनीटं स्टेजवर बोलायला द्यायला का?" - धम्मसंगिनी. सचिनने बाळासाहेबांना चिठ्ठी दिली आणि हासरा चेहरा करत,"पाठवं" या खुणेचे हातवारे त्याने केले. मग मी आणि शितल तिला सोडून यायला निघालो तर मागं चारपाच जणांचा लोंबाळा होताच.आता परवानगी मिळालीय तर एक महिला आणि एक अर्धवट डी.एड झालेला मुलगा पुन्हा 'मी जातो मी जाते', म्हणून आग्रह करू लागले. मग त्यांनी जरा पटेल असं काॅमन लाॅजिक दिलं की, 'ती शिकलेली नाही. मी शिकलेय मी चांगलं बोलीन. मला नाही तर माझ्या भावाला पाठवा. तो चांगलं बोलतो. ही आडाणी आहे.'

मग तर मी त्या 'आडाणी' अंजनालाच पाठवायचं ठाम ठरवलं. मी त्यांना म्हणाले की, शिकलेलीच शहाणी आणि आडाणी येडी असं नसतं. सगळ्यांना अक्कल आहे. अंजनाच जाणा.' पण ते अंजनावर विश्वास ठेवायला तयार नव्हते.

चांगलं भाषण करणं हे अंजनाला जमणार नाही, हेच ते पुन्हा पुन्हा सांगत राहिले. शेवटी अंजना पण म्हणाली,  "असं करा, उषाला, नायतर या आमच्या भावालाच पाठवा. मला चांगलं सांगता येणार नाय." पण मला अंजनासकट सगळ्यांचा गैरसमज दूर करायचा होता. 'अंजनाच जाणार' म्हणून, मी त्यांना थांबायला सांगून तिला स्टेजवर नेऊ लागले. तर हेही स्टेजवर चढले. मग जबरदस्ती करून त्यांना बळंबळं हे पटवावं लागलं की, 'ती जे सांगेल, जसं सांगेल, तसं  लोकांनी ऐकलं पाहिजे आणि ती करणार बरोबर. बघा तर तुम्ही!'

अंजना मंचावर बसली. नाव पुकारलं. 'माननीय अंजना पवार'. माळीनगरच्या सभेच्या सूत्रसंचालक तिला, 'माननीय अंजना पवार' असं म्हणून बोलण्यासाठी पाचारण करत होत्या! अंजना गहिरं दुःख सावरत, ठसक्यात ऊठली आणि बोलायला सुरुवात केली. ती म्हणत होती,'आम्ही बी माणसं हाय. तवा आम्हाला माणसात घ्या. आम्हाला लय तरास करत्यात. छळत्यात आम्हाला. चोरीचा आळ घेत्यात. काम मिळालं तर कोण कशाला चोरी करंलं?.आम्हाला बी रहिवासी दाखला, जातीचा दाखला, राशन कार्ड आन पेरून खायला जागा फायजी. तवा बाळासाहेबांना विनंती की, आमचे परश्न सोडवा.आमची मागणी पूर्ण करत नाहीत, लपून बसत्यात, ऊठून जावा म्हणत्यात. कोण देत नाय रहिवासी दाखला. त्यो मंगळएड्याचा तहसीलदार देत नाय.कुठपर्यंत जावं आमी? म्हणून बाळासाहेब आंबेडकर आमी तुमच्या पर्यंत ही मागणी घेऊन आलोय. आमालाबी माणसांत घ्या.”

पुढं ती म्हणाली,“आम्ही समदे पारदी बाळासाहेबांसगट राहणार.आन आमाला बी बाळासाहेबच फायजी. आता समद्या मंगळएड्याच्या पारद्यांनी ठरिवलंय की, बाळासाहेबांनाच सोबत करणार.”

तिचं भाषण अगदी बाळासाहेबसुध्दा लक्ष देऊन ऐकत होते.अनेकजण चकित झालेले.आपल्या भाषणातही बाळासाहेब अंजनाच्या भाषणाची दखल घेत म्हणाले की, आपली सत्ता आल्यावर अशी  व्यवस्था आणू की, कुठल्या पारधी महिलेला हे प्रश्न घेऊन बोलायची गरज पडणार नाही.

अंजना खरंच निडरपणे बोलली. त्याचं कारण एक होतं ती म्हणाली, मी का घाबरू? माझ्या पण भावाचं नाव बाळासाहेब हाय. तिचं आम्ही सर्वांनी कवतुक केलं पण तरीही उषा म्हणाली, "मी अजून 'चांगलं', 'शुध्द' भाषेत बोलले असते." तेव्हा मग मी त्यांना सगळी भाषा चांगली असल्याचं सांगितलं.

पण अंजना वेगळंच म्हणाली,"आता आमाला मिसळून घेणार नाय तर चांगली भाषा कसं शिकणार?"

बाबासाहेबाला शाळा नीट शिकू नाय देले हे लोक मंग आमी तर पारधी हाय.

पण आमी आता बाळासाहेबा संगट लढणार.” ती बोलतच होती “आता पारद्यांना बोलावतो, पुडच्या आठवडी. मंग बाळासाहेब यील का आमच्याकडं?

मी तिला आपलं उगीच विचारलं, किती पारधी येतील? तर म्हणाली, "शंभर -दोनशे पारधी येणार."  मी विचारात पडले. दोनशे लोकांसाठी बाळासाहेबांना कसं विचारणार? ती म्हणाली, “हामची तेवढी विच्छा पूरी करं बरं मॅडम. आन् बघ बाळासाहेब आले का, हामी एवढं नटणार, एवढं नटणार की विचारू नको. हामी समदे नटणार. सणासारखं नटणार. त्यातली एकजण म्हणत होती की, बाळासाहेब त्या मोदीच्या जागी येणारेय का? मी प्रश्नार्थक नजरेनं शितलकडं बघितलं, तर ती म्हणाली, "हो पण आताच नाही त्याला वेळ आहे. मग एकजण म्हणाली की, “आता तू सांग हामी चांगलं दिसत नाय का? स्वच्च नाय का? मी म्हणाले, हो... किती स्वच्छ दिसताय.

'खरं ना?'

'हो खरंच.'

हे ऐकून अंजना, उषा आम्हाला खेटून रेटून बसल्या. सारखं हातात हात घेत बोलत्या होत होत्या. हामाला मिसळून घितलं तर मानसात आल्यावाणी, माणूस आसल्यावाणी वाटणार का नाय? गाववाले लय त्रास करत्यात. पोलिस लय तरास करत्यात पण तू नक्की बाळासाहेबाला आन बग.

मी म्हणाले, बाळासाहेबांचं पुढं, पण आम्ही दोघी (शितल आणि मी ) येतो. तुझ्या गावाला.

“बरं ये. बघ कसं राहत्यात पालातली माणसं? किती तरास हाय जिवाला?” त्या नाॅनस्टाॅप त्या बोलत होत्या.

असंख्य प्रश्न, असंख्य दुःख,असंख्य नकार, दमन, पिडन, शोषण तरीही चेहऱ्यावर आश्वासक हसू कसं फुटंत असंल बरं यांच्या?

मी आणि शितल ठरवतोय त्यांच्या गावी जायचं. तहसिलदार, कलेक्टरला भेटून यांचे रहिवासी जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा. कुठं अडलंय ते बघायचं. खरं म्हणजे अगोदरच त्यांच्यासोबत कुणी 'जयभीमचा' माणूस काम करतोय त्याला बळ, प्रोत्साहन द्यायचं. आणि मुख्य म्हणजे या पारधी बायांचं नेतृत्व उभं करायचं.

प्रश्न सुटतीलच पण माणूस म्हणून आपुलकीचा, विश्वासाचा हात, गळाभेट याला आसुसलेल्या या बायांचा सुरूवातीला बिचकत बिचकत आणि मग हक्काने केलेला स्पर्श माझ्या हातावर अजून रेंगाळतोय. मला अधिक संवेदनाक्षम बनवतोय. त्यांना धारदार, अनुभवी नजरेनंच कळतंय की, 'कोण बघून', 'कोण न बघून' तर 'कोण बघून न बघितल्यासारखं' करतं, कोण नुसतं डोळ्यांनी सत्ता गाजवतंय.

या पारधी बाया भलत्याच संवेदनशील आहेत. भलत्याच भावुक आहे. पण आत एकदम खोल.

वरून मात्र पारधी कालवा. नुसता कलकलाट, गोंगाट, थयथयाट.

त्याचं आतलं भावुकपण, खोलवरची संवेदनशीलता टिकून राहो. आपली हक्काची माणसं, जागा मिळुस्तोवर आणि शितलं म्हणतेय तसं 'सत्तेचं दार ऊघडूस्तोवर'.

माळीनगरच्या या सभेनंतर अंजना पवारचे सात आठ फोन झाले. “मॅडम ईचार की, बाळासाहेबाला हामच्याकडं कवा येणार? हामी समदी वाट बघतुय! हामच्या पालावरच्या समद्यांना सांगितलो, मी काय भाषाण केलं ते. अजून चार दिवस मंगळवेढ्याला हाय मी. मंग मिरजला जाणार. तिथं पण समद्या पारद्यास्नी सांगतो बघ. जमलं तर तिथं तर बोलाव की, बाळासाहेबाला. व्हय?” मला गलबलूनच येतं. पण मी सांगणारे बाळासाहेबांना, 'जाता - येता कधीतरी अंजना पवारला भेटाच' ( ती चिठ्ठी लिहिताना सचिनला मी म्हणत होते, 'विचारायला काय जातंय? हो तर म्हणतील, नायतर नाय म्हणतील!) खरं म्हणजे, अंजना पवारचं नेतृत्व वाढवण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही.

dhammasangini


तळटीप

अंजना पवारांबाबत मी जे फेसबुकवर लिहलंय ते खूपच लोकांना आवडलंय. म्हणजे फेसबुक भाषेत सांगायचं तर ४१७ लाईक आणि ६७ शेअर आतापर्यंत या दिर्घ पोस्टकरता मिळालेत! अनेकांनी या पोस्टच्या संदर्भाने लेख देण्याची विनंती केली तरीही मला अंजना पवार यांच्यासंदर्भात लिहलेली कहाणीवजा पोस्ट सैध्दांतिक सोपस्कर करून लेख म्हणून मीडियात, वर्तमानपत्रात छापायला द्यायची ईच्छा नाही.

याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. एक म्हणजे अंजना पवार जे बोलली ते इतकं सटीक आणि चपखल होतं की, त्यावर पुन्हा स्पष्टीकरण, विश्लेषण करून लिहणं म्हणजे उगीच शहाणपणा केल्यासारखं होतंय.ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेत 'कर्तेपणाचे' फार मोठे राजकारण असते. दुय्यम स्थानावरचे लोक तपशील गोळा करायला, सांगायला आणि प्रकल्प प्रमुख त्या माहिती -तपशिलांचे, कहाण्यांचे-वर्णनाचे विश्लेषण, कोडिंग- डिकोडिंग करणार! तर मला अजंना पवारचा कर्तेपणा अबाधित ठेवायचा होता आणि आताही तोच प्रयत्न करत आहे. काळ्या स्त्रियांच्या प्रश्नांना दुर्लक्षित करणाऱ्यांवर गोऱ्या स्त्रीवादी दृष्टीकोनाची मर्यादा अचूकपणे दाखवत 'मी बाई नाही का?' असं ठासून विचारणारी सोजर्नर ट्रूथ ही कार्यकर्ती. तिने केलेल्या भेदक प्रश्नामुळे काळ्या स्त्रीवादी चर्चाविश्वात अजरामर ठरली.

स्त्रीवादी अभ्यासक म्हणून मी हे जाणीवपूर्वक ठरवलंय की, अंजना पवारच्या कर्तेपणाला धक्का लागेल असं काही लिहायचं नाही. मला अंजना पवारमध्ये ती सोजर्नर ट्रूथवाली झलक दिसली. तसं तर त्या तीन - चार पारधी बायकाही थोड्याफार फरकानं असंच काहीसं बोलल्या असत्या.

अंजना पवार ही भटक्या समुहाची प्रतिनिधी म्हणून जे बोललीय, ते आपल्या प्रत्येकाचे दृष्टीकोन विस्तारित व्यापक करणारं बोलली. तिच्या बोलण्यानं सारी सभा अवाक झाली. काहींच्या डोळ्यात पाणी आलं, काहींना दाटून भरून आलं. ते सगळंच मला या कहाणीतून पोहचवता आलेलं नाही. पण तो छोटा प्रयत्न मी केलाय.नसता मी   

या ठिकाणी उदाहरणासह दोन मुद्दे आपल्यापुढे चर्चेसाठी ठेऊन सविस्तर चर्चा करू शकले असते.

एक म्हणजे वंचित आघडीच्या माध्यमातून सामाजिक लोकशाहीचा विचार व्यवहारात कसा येत आहे?

आणि दुसरा मुद्दा म्हणजे भारतातील जातवर्गीय राजकारण वंचित आघाडीच्या या माॅडेलशिवाय काय वेगळं असू शकेल?

हे सर्वांना माहित असेलच की, वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रस्थानी 'मार्जिनल ओबीसी जातसमूह' आहेत. तसेच जशा सत्तावंचित जाती आहेत तशाच ज्यांची भारतीय म्हणून ओळखीसाठी आणि गरीब भारतीय म्हणून मिळणाऱ्या सुविधांसाठी आवश्यक रहिवासी दाखला, मताधिकार ओळखपत्र, जातीचा, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड यासाठी तडफड धडपड सुरू आहे, अशा भटक्या जातीसुध्दा वंचित आघाडीची कमान सांभाळत आहेत. वंचित आघाडीची संरचनात्मक बांधणीच सैल आहे आणि सैल असण्याचे काही फायदे तर काही तोटेही आहेत.

सगळ्यात जमेची बाजू काय? तर परिघाबाहेरच्या ओबीसी भटक्या जात समुहातले लोक स्वतःचे प्रश्न स्वतः मांडत आहेत.

वंचित आघाडीने इतरांच्या अवाजाला वाव देणं, जागा देणं ही अतिमहत्वाची बाब आहे. वंचित-शोषितांना बोलतं करण्याऐवजी, त्यांना कर्तेपणा देण्याऐवजी त्यांचा कर्तेपणा चाणाक्षपणे हिसकावून घेत त्यांच्यावतीने बोलत स्वनेतृत्व प्रस्थापित करण्याच्या खेळ्या उच्चजातीय प्रस्थापित आणि पुरोगामी वर्तुळातही आजवर करण्यात आल्या. अजूनही तेच सुरू आहे. जेव्हा एखाद्या समूहाला आवाज नसतो तेव्हा तो आवाज देणं, मात्र त्यांना कंठ फुटताच मागे उभा राहणं हे खरं पुरोगामित्व आहे. अशा प्रकारच्या कृतींमधून वंचित बहुजन आघाडी चांगला पायंडा पाडत आहे.

फारसं वलय नसलेल्या, कधीही स्टेजवर भाषण न केलेल्या पारधी समाजातील अंजना पवार यांना निमंत्रित वक्त्यांच्या यादीत स्थान नसताना केवळ एक चिठ्ठी देऊन केलेली सूचना मान्य करत बोलायला देणे ही मोठी आशादायी बाब आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय यश - अपयशाची चर्चा करण्यापेक्षा मला असं वाटतं की, सामाजिक लोकशाहीच्या दिशेने होत असलेल्या प्रक्रिया, लक्षणीय घटना त्यातल्या कर्त्यांचा कर्तेपणा अबाधित ठेवत वाचकांना कहाणीस्वरूपात सांगायला हव्यात. मुख्य म्हणजे, यातला अजून एक अदृश्य कर्ता आहे, ज्यांने पारध्यांच्या नागरी हक्कांचा लढा उभा केलाय. अंजना आणि इतर पारधी महिला त्याला 'जयभीमचा माणूस' असं म्हणंत होत्या. त्यांच्या संघर्षस्वरूपी कामामुळे तर या पारधी बायकांना कंठ फुठलाय! आणि हिंमतही आलीय.

 

(वरील मतं लेखनकर्त्यांची वैयक्तिक मतं आहेत.)