India
न्यायालयीन कामाजातही अर्णबची 'अँकर'गिरी; न्यायाधीशांचा दणका बसल्यावर झाले शांत
अर्णव गोस्वामीला बुधवारी अलिबाग कोर्टात सुनावणीसाठी हाजीर करण्यात आलं.
अलिबाग: सुनावणीदरम्यान कोर्टातच 'अँकर'गिरी करायला निघालेला रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीला कोर्टानं त्याची जागा दाखवून दिली. सुनावनीदरम्यान मध्येमध्ये करत न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या या पत्रकाराला मुख्य दंडाधिकारी सुनैना पिंगळे यांनी 'संशयित आरोपी आहात, तर तसंच वागा. न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करू नका,' असा सज्जड दम भरल्यानंतरच अतिउत्साही गोस्वामी खजिल झाल्याचं या सुनावणीत पाहायला मिळालं.
आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्याखाली मुंबईतील राहत्या घरातून अटक करण्यात आल्यानंतर आरोपी अर्णव गोस्वामीला बुधवारी अलिबाग कोर्टात सुनावणीसाठी हाजीर करण्यात आलं. यावेळी कोर्टाच्या मुख्य दंडाधिकारी सुनैना पिंगळे यांनी पुढच्या १४ दिवसांसाठी म्हणजेच १८ नोव्हेंबर पर्यंत गोस्वामीला न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली. या सुनावणीदरम्यानच कोव्हीडचा सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडत हाताला झालेली दुखापत न्यायाधीशांना दाखवण्याचा अतिउत्साहीपणा करणाऱ्या गोस्वामीला न्यायालयानं चांगलंच झापलं.
मृत पीडित इंटेरिअर डिझायनर अन्वय नाइक यांचे वकील विलास नाईक यांनी अर्णब गोस्वामीनं न्यायालयीन कामकाज सुरू असताना दंडाधिकारींच्या डायसवर चढून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. सुनावणीदरम्यान पीडितेच्या बाजूनं ॶॅडवोकेट विलास नाईक युक्तीवाद करत असतानाच वारंवार त्यांच्या बोलण्यात अडथळा आणून 'पोलिसांनी मला मारहाण केली, हे बघा माझ्या हातावरची जखम' असं ओरडत गोस्वामी न्यायालयीन सभ्यतेचा भंग करत होते. त्यामुळे चिडलेल्या न्यायाधीशांनी विनाकारण गोंधळ घालणाऱ्या या संशयित आरोपीला खडे बोल सुनावले.
सुनावणीदरम्यान संबंधित वकिलांचा महत्त्वाचा युक्तिवाद सुरू असताना 'मध्येमध्ये बडबड करू नका अन्यथा कोर्टातून हाकलून दिलं जाईल', अशी सक्त ताकीद दंडाधिकारी पिंगळे यांनी दिल्यानंतरच गोस्वामी गप्प बसले. सुनावणी सुरू असताना बेकायदेशीररित्या सुनावणीचं ऑडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोस्वामीची पत्नी सम्यब्रता गोस्वामी हीलासुद्धा कोर्टानं यावेळी फैलावर घेतलं. याशिवाय गोस्वामीच्या समर्थनार्थ न्यायालयात आलेले भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांचीही न्यायालयीन कामकाजात अडथळा आणल्याबद्दल कोर्टातून हकालपट्टी करण्यात आली. न्यायालयीन कामकाजात सहकार्य न करणाऱ्या या भाजप आमदाराला शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करून कोर्टाबाहेर हाकलून लावलं.
सुनावणी झाल्यानंतर अर्णाब गोस्वामीची भेट घेण्यासाठी भाजपचे किरीट सोमय्या अलिबागला आले होते. गोस्वामीला भेटण्यासाठी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोमय्या यांनाही पोलीसांनी यावेळी हुसकावून दिलं. त्यामुळे बुधवारची ही न्यायालयीन सुनावणी गोस्वामी आणि त्यांच्या समर्थकांनी दाखवलेल्या अतिउत्साहीपणामुळे त्यांच्यासाठीच अपमानास्पद अशी ठरली.
एडिट ०७-११-२०२०, २०:३०: या बातमीच्या आधीच्या आवृत्तीत दंडाधिकारी पिंगळे यांचं नाव चुकलं होतं व किरीट सोमय्या यांना आमदार म्हटलं गेलं होतं. सुधारणा करण्यात आल्या आहेत. चुकांबद्दल क्षमस्व.