Quick Reads

अ‍ॅनी अर्नो: शिक्षिका, स्त्रीवादी लेखिका ते साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेती

फ्रेंच लेखिका आणि साहित्याच्या प्राध्यापिका असल्याने अर्नो यांचे कार्य बहुतेक आत्मचरित्रात्मक, समाजशास्त्राशी जवळून संबंधित आहे.

Credit : शुभम पाटील

विवेक कोरडेदरवर्षीप्रमाणे या वर्षीही विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या विद्वान लोकांचा नोबेल पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. परंतु या सर्वामध्ये एक नाव मात्र समस्त स्त्रीवादी चळवळ व जागतिक पातळीवर महिलांच्या हककांसाठी लढणाऱ्या स्त्री पुरुषांना औस्त्युक्याचे ठरले, ते नाव होते फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो यांचे. त्याला कारण म्हणजे २०२२ या वर्षाचे साहित्यातील नोबेल पारितोषिक अर्नो यांना प्रदान करण्यात आले आहे. त्यांचा हा सन्मान म्हणजे जीवनातील अनुभव शब्दात मांडून आणि त्यांच्या हृदयाचा आवाज बनून पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या महिलांचा सन्मान आहे. नोबेल समितीने म्हटले आहे की अ‍ॅनीची नोबेलसाठी निवड सामाजिक बंधने उघड करण्यासाठी, तिच्या आठवणींच्या मुळाशी तिच्या धैर्याने आणि नैतिक अचूकतेने खोदण्यासाठी करण्यात आली आहे.

अ‍ॅनीचा जन्म १ सप्टेंबर १९४० रोजी झाला. फ्रेंच लेखिका आणि साहित्याच्या प्राध्यापिका असल्याने अर्नो यांचे कार्य बहुतेक आत्मचरित्रात्मक, समाजशास्त्राशी जवळून संबंधित आहे. त्यामुळेच त्या कामगार-वर्गाच्या पार्श्वभूमीतून आल्या आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यांचे बालपण हे फ्रान्स मधील नॉर्मंडीच्या यवेटमध्ये गेले. नंतर अर्नो यांनी रौन आणि बोर्डो विद्यापीठांमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. सुरुवातील आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात त्यांनी शालेय शिक्षिका म्हणून केली. सोबतच पुढील शिक्षण घेत आधुनिक साहित्यात उच्च पदवी प्राप्त केली.

१९७४ मध्ये 'लेज् आर्मूआर' या आत्मचरित्रात्मक कादंबरीने अर्नो यांनी आपल्या साहित्यिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचे 'द इयर्स' हे पुस्तक समीक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरले आहे. हे पुस्तक २००८ मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकात दुस-या महायुद्धाच्या समाप्तीपासूनच्या सध्याच्या फ्रेंच समाजाचा उल्लेख आहे. या पुस्तकाला अनेक पारितोषिके आणि सन्मान मिळाले आहेत. अ‍ॅनीला या पुस्तकासाठी २०१९ मध्ये प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. अर्नो यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभवांवर २० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यामध्ये आपले प्रेम, गर्भपात, विश्वासघात, आई-वडिलांपासून विभक्त होण्याच्या वेदना असे अनुभव अगदी मन मोकळेपणाने त्यांनी आपल्या सहित्यामधून मांडले.

 

 

तिच्या निवडीचे स्पष्टीकरण देताना स्वीडिश अकादमीने सांगितले की अर्नो "सातत्याने आणि वेगवेगळ्या दृष्टीकोनातून लिंग, भाषा आणि वर्गाच्या दृष्टीने मोठ्या फरकाने चिन्हांकित केलेल्या जीवनाचे परीक्षण करतात." अर्नो साहित्यिक पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या पहिल्या फ्रेंच महिला आहेत. स्वीडिश टेलिव्हिजन एस. व्ही. टी. ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, "नोबेल पारितोषिक ही एक मोठी जबाबदारी आहे."

पुढे जगाला अचूक आणि न्याय्य साक्ष देण्यासाठी त्या म्हणतात, "लेखन ही एक राजकीय कृती आहे, जी सामाजिक असमानतेकडे आपले डोळे उघडते. आणि म्हणूनच कल्पनेचे बुरखे फाडण्यासाठी ती ‘चाकू’ म्हणून भाषा वापरते.”

अर्नो यांना त्यांच्या उद्देशात यश आले आहे. आता संपूर्ण जग तिचे लिखित आणि बोलणे ऐकत आहे. प्रेम, लिंग, गर्भपात आणि लज्जा याविषयीच्या त्याच्या मतांना स्वतःचे महत्त्व आहे. नोबेल साहित्य समितीचे अध्यक्ष अँडर्स ओल्सन यांनी असेही म्हटले आहे की "अ‍ॅनी कठोर सत्यांना सामोरे जाण्यास घाबरत नाही. ती त्या नावाने गोष्टींबद्दल लिहिते, ज्या गोष्टींबद्दल सहसा कोणी लिहण्याचे धाडस करीत नाही."

अर्नो यांच्या माध्यमातून आपल्या देशातील स्त्रीवाद मांडणाऱ्या मंडळींनी सुद्धा खूप काही शिकण्यासारखे आहे. आपण बघितले तर सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रांत स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारी प्रणाली म्हणजे स्त्रीवाद. प्रारंभी स्त्रीवाद ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर पश्चिमी देशांत उद्भूत झाली आणि नंतर ती जागतिक स्तरावर हळूहळू प्रसृत झाली. पुढे ती चर्चेचा गंभीर व मूलभूत विषय बनली. आता पुन्हा अर्नो यांनी पश्चिमी देशांत मांडलेल्या स्त्रीवादी चळवळीला जागतिक स्तरातील सर्वात मोठे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. त्याच धर्तीवर त्यांनी आपल्या लेखनातून मांडलेली स्पष्टता संपूर्ण जगातील स्त्रीवादी चळवळ मध्ये रुजण्यास मदत होईल अशी अपेक्षा करणे वावगे ठरणार नाही.

आपण अपेक्षा करूया की आपल्या देशातून सुद्धा आपल्या सामाजिक स्त्री जीवनाचे समाजातील कल्पनेचे बुरखे फाडण्यासाठी अर्नोप्रमाणे चाकू म्हणून आपली भाषा वापरणारी आमच्यातीलच एक भगिनी तयार होईल व एकदिवस अ‍ॅनीला मिळालेल्या सन्मानापर्यंत जाऊन देशाची मान अभिमानाने उंचावेल.

 

लेखक शिक्षण विषयक जाणकार आहेत.