India

'अजित पवारांना EVM वर विश्वास असेल तर असो, मला मतदान मतपत्रिकेवर हवं' - नाना पटोले

माझा EVM वर पूर्ण विश्वास म्हणणाऱ्या अजित पवारांना पटोलेंचा टोला.

Credit : Shubham Patil

काँग्रेसच्या EVM विरोधी आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांना तडा देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'आपला EVM वर पूर्ण विश्वास असल्याचं' विधान केल्यानं खळबळ पसरली होती. त्यावर आज नाना पटोले यांनी काँग्रेसची बाजू मांडली आहे.

"नानांनी विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार सोडला असल्यानं त्यांच्या विधानावर चर्चा करता येईल. काँग्रेस राजस्थान आणि पंजाबमध्ये EVM मशीनद्वारेच निवडून आली आहे. आपल्याकडं लोक बहुमत मिळाल्यावर सर्व ठीक आहे म्हणतात आणि काही पक्ष केवळ आपला पराभव झाल्यानंतरच EVMचा आग्रह धरतात, मशीन मॅनेज असल्याचा आरोप करतात. आपल्या गावात १० हजार मतदान झालं तर ८ हजार मतं आपल्यालाच हवी होती असं म्हणतात. EVM मशीनमध्ये काहीच घोटाळा नाहीये, ते पेपरलेस असल्यानं ठीक सुरु आहे. माझा EVM वर पूर्ण विश्वास आहे," असं काल पत्रकारांशी बोलताना पवारांनी सांगितलं.

यानंतर काही तासांतच काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष व राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना या विधानाचा समाचार घेतला. संविधानाच्या कलम ३२८ अनुसार राज्य सरकारांना विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्याव्यात की EVM मशीनवर याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. "जर मला EVM वर मतदान न करता पत्रिकेवर करायचं असेल तर मला तो पर्याय उपलब्ध असला पाहिजे. अजितदादांना EVM वर विश्वास असला तर असो, मला त्यावर विश्वास नाही. त्यांनी त्यांचं मत मांडलं आणि हे माझं मत आहे," असं सडेतोड प्रत्युत्तर पटोलेंनी पवारांना दिलं. त्यामुळं आता महाविकास आघाडीतच नाना-दादा वाद पेटल्याचं दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच नाना पटोले आणि शरद पवार यांच्यातही अप्रत्यक्ष वाक्युद्ध पेटलं होतं. पटोलेंनी नाराजीतून राजीनामा दिल्याची चर्चा सुरु झाल्यावर शरद पवारांनी 'काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळं नाना पटोले यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला' असं विधान केलं होतं. "विधानसभा अध्यक्षपद हे सरकारमधील तिन्ही पक्षांचं होतं. पटोले यांच्या राजीनाम्यामुळे या पदाची व्हेकन्सी तयार झाली आहे. हे पद आता खुलं झालं आहे. या पदाबाबत आता पुन्हा चर्चा होईल," असं संदिग्ध विधान त्यांनी केलं होतं. त्यावर 'विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि काँग्रेसकडेच राहील. काँग्रेस पक्षश्रेष्ठी कोणाला अध्यक्ष करायचे याचा निर्णय घेतील' असा पलटवार पटोलेंनी केला होता. त्यामुळं महाविकास आघाडीतील मतभेद उघडकीस आले होते.

काही दिवसांपूर्वीच पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून राज्य कॅबिनेट मंडळाला EVM सोबतच थेट मतपत्रिका उपलब्ध करून देण्याविषयी विचारणा केली होती. त्यानंतर त्यांच्या मागणीला अनेक नेत्यांनी व विविध पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. यासंबधी एका उच्चस्तरीय बैठकीतही चर्चा झाली होती.

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आज पटोले यांनी मुंबईच्या रस्त्यांवर ट्रॅक्टर रॅली काढून शक्तिप्रदर्शन केलं. काँग्रेसला राज्यात पुन्हा क्रमांक एकचा पक्ष बनवून दाखवू असं म्हणत त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला आहे.