Quick Reads

आगासवाडी : ग्रामीण भारताचा एक्स – रे

मुलभूत प्रश्नाचं उत्तरं शोधायला तरी लोकांना गाव सोडावं लागू नये, असं माहितीपट पाहतांना वाटून जातं.

Credit : इंडी जर्नल

राहुल पैठणकर, पुणे । मानवी समाजाचा उत्क्रांतीचा इतिहास तपासून पाहिला तर आपल्याला असं दिसतं की, भटकंती पासून सुरु झालेला मानवाचा प्रवास - स्थिर होण्यापर्यंतचा हा मुलभूत गरजा आणि प्रश्नांच्या पुर्तीसाठीचाच होता/आहे. उदा. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार इत्यादी. स्थिर - स्थावर झाल्यानंतर मात्र तो/ती मुलभूत गरजा – प्रश्नांसोबत मनोरंजन, उपभोग आणि चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रयत्न करू लागला. उदा. मोबाईल, लॅपटॉप, दुचाकी, चार चाकी, मॉल मधील खरेदी इत्यादी. म्हणजे तो/ती आज पूर्णतः स्थिर – स्थावर झालाय का? तर त्याचं उत्तर नाही असंच द्यावं लागतं. कारण याच मानवी समुदायातील अनेक ‘मानव समूह’ मग ते छोटे शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित, भटके विमुक्त, आदिवासी, पर्यायी लैंगिकता असलेले, स्त्रिया, अनाथ इत्यादी आजही मुलभूत गरजांसाठी भटकत आहेत, भटकवली जात आहेत. आजच्या सामाजिक - सांस्कृतिक व्यवस्थेत त्यांना स्थिर - स्थावर होण्यासाठीचा अवकाश, भौतिक पातळीवर उपलब्ध होऊ दिला जात नसल्यामुळ त्यांचं भटकणं कधी अन्नासाठी, कधी रोजगारासाठी, तर कधी शिक्षणासाठी सुरूच आहे, त्यालाच आपण आता ‘स्थलांतर’ म्हणू लागलोयेत. नेमके हेच विषय घेऊन नव्या दमाचा सर्जनशील लेखक - दिग्दर्शक रमेश होलबोले (FTII, Pune) ‘आगासवाडी’ नावाचा माहितीपट घेऊन येतो आणि संपूर्ण ग्रामीण भारताच्या जगण्या - मरण्याविषयीचे मुलभूत प्रश्न प्रातिनिधिक स्वरुपात आगासवाडीच्या निमित्तानं आपल्यासमोर मांडतो. हे प्रश्न मुख्यत: ग्रामीण भारताच्या स्थलांतराविषयी, पिण्याच्या पाण्याविषयी, शेतीच्या संकटाविषयी, दुष्काळाविषयी, एकूण पर्यावरणाच्या प्रश्नाविषयी, रोजगाराविषयी आणि शिक्षणाविषयीचे आहेत. या सर्व प्रश्नांवर आगासवाडी माहितीपट नेमकेपणानं भाष्य करतो.  

आत्तापर्यंत भारत आणि जगभरातल्या नामांकित Film Festivals मध्ये आगासवाडीची विशेष दखल घेतली गेलीये आणि अनेक Film Festivals मध्ये आगासवाडीला आवार्डस देखील मिळाले आहेत. जसे – 

  • Best Documentary Film award at 17th  Wegiel Film Festival. Poland 2020.
  • Best Short Documentary Award at Sloe Luna Doc Film Festival, Italy 2020
  • Mana Wairoa Prize. Best Indigenous Director at Whakapapa Film Festival, Italy.2019.
  • Special Mention at Idee dal Mondo film festival, Italy, 2019
  • Best Non Fiction Film & Best Cinematography Award at Dox on the Fox  Documentary Short Film Festival USA, 2019
  • Best Non Fiction Film Award at DMCS National Short Film Festival Pune India, 2019.
  • Best Non Fiction Film & Best Cinematography Award at First Cut International Student Film Festival Pune India, 2019.
  • Paul Călinescu Award for Best Documentary Film in 22nd CineMAiubit International student film festival Romania, Dec 2018. इत्यादी. 

आगासवाडी पाहतांना प्रेक्षक म्हणून आपल्याला प्रश्न पडायला लागतात की, उत्क्रांतीच्या हजारो वर्षांचा टप्पा पार करत असतांना, आधुनिक मानवानं विज्ञान - तंत्रज्ञान, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात एवढी ‘प्रगती व विकास’ केल्यानंतरही काही ‘ठराविक समूहांना’ आजही त्यांचे मूलभूत जगण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात किंवा शहरांकडं स्थलांतर का करावं लागतंय? अजूनही अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांसाठी ‘ठराविक’ लोकांचाच संघर्ष का सुरूये? आपण ज्या गावात, शहरात किंवा भौगोलिक प्रदेशात राहतोय, त्या प्रदेशातच प्रत्येक मानवाच्या किमान मूलभूत गरजा आणि प्रश्न का सुटत नाहीयेत?  

 

‘आगासवाडी’ मात्र आपणास विचार करायला भाग पाडतो की,पृथ्वीवरील सर्वच साधनसंपत्तीचा मालक जर खऱ्या अर्थानं निसर्गचं असेल, तर मग काही लोकांकडंच मुबलक जमीन का?

 

थोडक्यात मुलभूत प्रश्नाचं उत्तरं शोधायला तरी लोकांना गाव सोडावं लागू नये, असं माहितीपट पाहतांना वाटून जातं. आणि मग ‘आगासवाडी’ मात्र आपणास विचार करायला भाग पाडतो की, ही पृथ्वी जर मानवानं निर्माण केली नसेल, पृथ्वीवरील सर्वच साधनसंपत्तीचा मालक जर खऱ्या अर्थानं निसर्गचं असेल, तर मग काही लोकांकडंच मुबलक जमीन का? आणि काहीकडं जमिनीचा एक इंच देखील तुकडा स्वताच्या मालकीचा का नाही? काही लोकांची छान टुमदार घरं का? आणि काहींना पाल टाकून किंवा मोडक्या - पडक्या घरात का रहावं लागतं?  काहींच्या घरात 24 तास वीज आणि पाणी उपलब्धय, तर काहींना आजही अंधारात का रहावं लागतंय? काहींना आजही एका पाण्याच्या हंड्यासाठी मैलोंमैल पायपीट का करावी लागतेय? तर काहींच्या बंगल्यात स्विमिंग पूल कसे काय? मग ही लोकं ‘पाणी आणि वीज’ आणतात तरी कुठून? त्याचं उत्तर आपल्याला उत्क्रांतीच्या शोषण – शासनाच्या राजकारणात सापडतात. म्हणजे काय? तर आधुनिक मानवानं EMI भरण्यापर्यंत प्रवास हा निसर्गाचं आणि मानवाचं शोषण करूनच केलेला आहे / करत आहे .

आगासवाडी गावात मुख्य पिण्याचे आणि शेतीच्या पाण्यासोबत रोजगाराचे प्रश्न गंभीर आहेत. या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यापेक्षा किंवा यांची उत्तरं शोधण्यापेक्षा गावातल्या तरुण मंडळीनं यावर उपाय म्हणून केंव्हाच गाव सोडलंय. ग्रामीण भारतातल्या अशा अनेक छोट्या-मोठ्या आगासवाडीन्मधील तरुणांनी ग्रामीण भारतातल्या अनेक ‘आगासवाड्यांना’ केंव्हाच राम - राम ठोकलाय. यामुळं संपूर्ण आगासवाडी गाव रुक्ष आणि भंग पावलेलं दिसतंय. गावात कुलूप लावलेली, पडलेली आणि दुभंगलेली घरंयेत, पारावर बसलेली वृद्ध माणसंयेत, गाव परिसरात उष्ण, कोरडी आणि निस्तेज हवा वाहतेय, निर्मनुष्य सुष्क रस्तेयेत, कोरड पडलेलं माळरानेय आणि भीमरावांची दुर्दम्य इच्छाशक्ती इत्यादी शिवाय आगासवाडीत आणि पर्यायानं संपूर्ण ग्रामीण भारतात उरलंय तरी काय? असा सवाल आपल्यासमोर ‘आगासवाडी’ प्रर्त्येक ‘फ्रेमस’ मधून उपस्थित करतो. तरुणांचा भारत म्हणून ओळख असलेल्या भारतात ‘आगासवाडी’ मात्र वृद्ध, स्त्रिया आणि लहान मुलांनी व्यापलंय.तर मग तरुण मंडळी गेली कुठं? तर तरूण मंडळी रोजगाराच्या शोधात पुणे – मुंबईच्या दिशेनं रवाना झालीयेत. आता मग प्रश्‍न पडू शकतो की, यात चुकीचं काय आहे, उलट चांगलीच गोष्टय ना? तरुण रोजगारासाठी, शिक्षणासाठी शहरात जात असतील आणि शहरांच्या ‘मुख्य प्रवाहात’ येत असतील तर यात वाईट तरी काय आहे? तर यात अजिबात चुकीचं किंवा वाईट काही नाहीये.

 

एकीकडं गावगाडा आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेच संतुलन पूर्णतः ढासळलं. पर्यायानं गावांच्या ग्रामीण सामाजिक संरचनेत परिवर्तन झालं. तर दुसरीकडं मात्र या स्थलांतरामुळं शहरांच्या देखील अनेक समस्या वाढल्यात.

 

स्वतंत्र भारतात आजही अनेक खेड्यांचा मुख्य व्यवसाय शेतीच आहे. अनेक खेड्यांचा गावगाडा हा १८ अलुतेदार आणि १२ बलुतेदार मिळून चालवत असायचेत, जो ‘जातीवर’ आधारित होता. तो आता काही प्रमाणात का खिळखिळा झालाय ते उत्तमच झालं आणि गरजेचं देखील होतं. अनेक चित्रपटांनी अशा प्रकारची गावं आपल्यासमोर चीतारतांना गावाचं वास्तव चित्रणाबरोबर अवास्तव ‘गौरवीकरण’ देखील केलंय. कारण एकीकडं भारताला कृषिप्रधान -  खेड्यांचा देश म्हणून ओळखलं जात असलं तरी, वास्तवात मात्र भारतात आज खेड्यांची, शेती करणाऱ्यांची आणि खेड्यात राहणाऱ्यांची टक्केवारी दिवसेंदिवस कमी – कमी होत चाललीये. तर दुसरीकडं विशेषतः जागतिकीकरणानंतर प्रसारमाध्यमे, टीव्ही, मोबाईल फोन, दळणवळणाच्या सोयीसुविधा इत्यादींमुळे गावा - गावात शहरं पोहचलीयेत, तर काही गावं याला अपवाद देखीलयेत. भारतातल्या अनेक गावांमध्ये अजूनही हवं त्या प्रमाणात शहरांनी प्रवेश केलेला नाहीये. अनेक गावं - वस्त्या अजूनही प्राथमिक गरजांच्या प्रश्नांतच व्यस्तयेत. आगासवाडी या अनेक गावांपैकी एक आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय खेड्यांचा विचार केला तर, औद्योगीकरण, शहरीकरण, जागतिकीकरण, शैक्षणिक संधी, रोजगाराचा शोध, माहिती व तंत्रज्ञानाचा वाढता वेग इत्यादींचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष परिमाण शेती, शेतीशी संबंधित जोडव्यवसाय, जातीधारित व्यवसाय आणि हस्तउद्योगांवर झाला.

त्यामुळं गावातून लोकांचे शहरांकडं स्थलांतराचं प्रमाण वाढलं, शब्दशा लोंढेच्या – लोंढे गावातून शहराकडं दरदिवशी स्थलांतरीत (हे आपण सर्व्यानी कोरोना काळात ‘घरबसल्या’ टीव्हीवर अनुभवलंच) होतात, त्यामुळं एकीकडं गावगाडा आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्थेच संतुलन पूर्णतः ढासळलं. पर्यायानं गावांच्या ग्रामीण सामाजिक संरचनेत परिवर्तन झालं. तर दुसरीकडं मात्र या स्थलांतरामुळं शहरांच्या देखील अनेक समस्या वाढल्यात. त्यात सर्व्यात महत्वाचं म्हणजे शहरांवर या अतिरिक्त स्थलांतरित लोकसंख्येचा भार आला, त्यातून शहरांचा आकार वाढला, शहरांच्या मुलभूत सोयी - सुविधांवर ताण पडू लागला. एकूणच शहरी समस्यांत वाढ झाली. याच स्थलांतराकडं सांस्कृतिक दृष्टीकोनातून पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की, खेड्यातील जीवनपद्धती सोडून लोकं शहरांच्या परीघावर कुठं तरी आपली रहायची व्यवस्था करून घेतात. शहरांची म्हणून एक स्वतःची स्वतंत्र बहुभाषिक, बहुधार्मिक जीवनपद्धती असते. ती कधी एकत्रितपणं, कधी समायोजन करत तर कधी संघर्ष करत नांदत असते. अशा शहरी बहुसांस्कृतिक वातावरणात गाव खेड्यातून आलेल्या स्थलांतरीतांची जीवनपद्धती शहर आणि शहरी मुख्यप्रवाह टप्याटप्यान गिळंकृत करत असतो. थोडक्यात स्थलांतरामुळं गावखेड्यातील माणूस आज सांस्कृतिक संक्रमणाच्या अवस्थेत सुद्धा येवून पोहचलाय. कारण स्थलांतर फक्त मानवाचंच होत नाही तर मानवासोबत संस्कृतीचंही होत असतं. म्हणून स्थलांतराचा प्रश्न नुसता शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि उपजीविकेपुरताच मर्यादित राहत नाही तर तो एक जसा ‘राजकीय प्रश्न’ आहे त्याचप्रमणे ‘सांस्कृतिक प्रश्न’ देखील आहे. म्हणून तो तितकाच सार्वत्रिक ‘गंभीर’ प्रश्न देखील आहे. 

 

शहरी बहुसांस्कृतिक वातावरणात गाव खेड्यातून आलेल्या स्थलांतरीतांची जीवनपद्धती शहर आणि शहरी मुख्यप्रवाह टप्याटप्यान गिळंकृत करत असतो.

 

म्हणून आगासवाडी निमित्तानं आपण आपली विकास, विकास धोरणं तपासली पाहिजेत आणि विकास, विकास धोरणांमध्ये सर्व ‘नागरिक’ समान पातळीवर समाविष्ट आहेत की नाही? विकासाची फळ सर्व नागरिकांना समान मिळत आहेत की नाही? हे विचारलं पाहिजे. आणि सोबतच हा शहरी मुख्यप्रवाह म्हणजे आहे तरी काय? किंवा या मुख्यप्रवाहाला पोषक वातावरण तिकडं शहरांतच असतं का? या मुख्य प्रवाहाचं शहरांतच केंद्रीकरण का झालंय? याच मुख्यप्रवाहानं शहरांच्या आणि पर्यायानं गाव खेड्यांच्या समस्या तर नाहीना वाढवल्यायेत? किंवा हा मुख्यप्रवाह आमच्या गाव – वस्त्या, खेड्यापाड्यात आणि दऱ्याखोऱ्यात का पोहोचला नाही? 

खरतर शहर - गावाचा आणि एकूण भारताचा प्रगती - विकासाचा समतोल साधायचा असेल तर एकाच केंद्रीकृत शहरी मुख्य प्रवाहात सर्वांना न आणता, मुख्य प्रवाहानेच सर्वत्र पोहचलं पाहिजे, खरं म्हणजे या मुख्यप्रवाहाचंच विकेंद्रीकरण झालं पाहिजे. असा सवालही आगासवाडी पाहतांना ‘भारतीय नागरिक’ म्हणून आपल्या समोर उपस्थित राहतो.

जाऊद्या आगासवाडीच्या निमित्तानं तुम्हाला आमच्याच गावाची गोष्ट सांगतो. आमच्या गावाजवळ दोन मोठाले डोंगर होते. त्या दोन डोंगरांच्या मध्यातून  एक बारमाही नदी वाहत होती. गावातील लोकं नदीच्या पाण्यावर छान शेती करत होती. गावापासून साधारण शंभर – सव्वाशे किलोमीटर अंतरावर मोठं आधुनिक शहर होतं, त्या आधुनिक शहराला वीज - पाण्याची टंचाई भासू लागली, कारण इतर गावांतून लोक मुख्यता रोजगारासाठी त्या आधुनिक शहरात स्थलांतरित झाली. म्हणून मुख्य प्रवाहाचं लक्ष आमच्या गावावर अर्थात नदीवर गेलं. म्हणून आमच्या गावाचा ‘विकास’ करण्याचं मायबाप सरकारनं ठरवलं, आणि आमच्या नदीवर मोठं धरण बांधलं. त्यामुळं आम्हाला तिथून हुसकावण्यात आलं म्हणजे विस्थापित केलं आणि उपलब्ध जागेवर, मूळ गावापासून लांब कुठंतरी आणून बसवलं म्हणजेच पुनर्वसित केलं. बरं नुसतं धरणच बांधलं नाही तर त्या धरणावर वीज निर्मितीही केली. म्हणजे आमच्या गावाच्या जमिनीवर, आमच्या गावाजवळून जाणाऱ्या नदीवर पिण्याच्या पाण्याचा आणि विजेचा प्रश्न शहरवासीयांचा सुटला, हे ऐकून आम्हा समस्त गावकर्याना प्रचंड आनंद झाला. परंतु आम्ही मात्र आता आमचं मुळगाव सोडून पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी वणवण भटकतोय ‘अंधारात’.

 

 

‘आगासवाडी’ यावर तर बोलतोय. आगासवाडीच्या जमिनीवर वीज निर्मितीसाठीचा पवन उर्जा प्रकल्प उभारला गेलाय. प्रकल्पात निर्माण होणारी वीज मात्र आगासवाडीला अंधारात ठेवून इतरांना ‘प्रकाशमय’ करण्यासाठी निघून गेलीये. या विजेनं आणि एकूणच रोजगार व पाणी प्रश्नानं आपल्या सोबत गावातील तरुण पोरंही नेलीत. आगासवाडी मात्र अजूनही खंबीरपण किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विहीर खोदत बसलंय, पोरांना चौथीनंतर सुद्धा गावातंच शिकता यावं म्हणून प्रयत्न करतंय कारण गावात चौथीपर्यंतच शाळाय, गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत असावी म्हणून मीटिंग घेतंय, पवनऊर्जा प्रकल्पात गावातल्या ७ पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळावा म्हणून धोरणं आखतंय, पाऊस नाहीच पडला तर पुढं काय करायचं याचं नियोजन करतंय. आपले प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवतंय, आवाज उठवण्यासाठी संघटीत झालं पाहिजे असं ही म्हणतंय, शासनापर्यंत आपला आवाज पोहचला तर ठीक किंवा आपल्या आवाजाची मायबाप सरकारनं दखल घेतली नाहीतर मतदानावरच बहिष्कार टाकावा म्हणतंय. 

परंतु पवनऊर्जा प्रकल्पाच्या फॅनच्या पात्यांचा आवाज एवढाय की, त्या आवाजात ग्रामीण भारतातल्या असंख्य आगासवाड्यांचा आवाज वरच्या वर हवेत विरून जातोय, म्हणजे मायबाप सरकारपर्यंत आगासवाड्यांचा आवाज पोहचतच नसावा किंवा मायबाप सरकार अजून दुसऱ्या आगासवाड्यांचा ‘विकास’ करण्यात व्यस्त असेल. आगासवाड्या मात्र इमान इतबारे प्रत्येक निवडणुकीला आशेनं मतदान करतंय आणि मतदानानंतर पवनउर्जेच्या पात्यांचा आवाज भेदून आपला आवाज मायबाप सरकारपर्यत पोहचावा म्हणून पुढच्या निवडणुकी पर्यंत जोर – जोरानं आरोळ्या मारत खंबीरपण उभंय, आकाशकडं तोंड करून.