India
दिवाळीत केजरीवालांनी करदात्यांच्या ६ कोटींचा चुराडा केल्याचं आरटीआयमधून उघड
३० मिनिटांच्या सोहळ्यावर एका मिनीटाला २० लाख उधळले गेल्याचा धक्कादायक खुलासा.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोव्हेंबर महिन्यात केलेला लक्ष्मीपूजनाचा भव्यदिव्य कार्यक्रम सरकारी खर्चातून करण्यात आला, आणि त्यासाठी करदात्यांचे तब्बल ६ कोटी रूपये उधळले गेले असल्याचं माहिती अधिकारातून समोर आलंय. ३० मिनिटांच्या या सोहळ्यावर एका मिनीटाला २० लाख या प्रमाणं करदात्यांचेच पैसे उधळले गेल्याचा धक्कादायक खुलासा दिल्ली सरकारच्याच पर्यटन आणि परिवहन विभागानं माहिती अधिकाराच्या पत्राला उत्तर देताना केला.
१४ नोव्हेंबर रोजी दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचा केजरीवालांनी केलेला हा कार्यक्रम दिल्ली राज्य सरकारच्या वतीनं अधिकृतरित्या साजरा करण्यात आला होता. त्यावेळेसही याबाबत अनेक प्रश्न विचारले गेले होते. विशेषत: हिंदुत्ववादी भाजपविरोधातील धर्मनिरपेक्ष राजकीय आघाडीची मोट बांधण्यास कधीकाळी पुढे सरसावलेल्या केजरीवालांच्या आम आदमी पक्षानंच सरकारच्या वतीनं लक्ष्मीपूजनाचा भव्यदिव्य असा जाहीर सोहळा पार पाडल्याबद्दल त्यांच्यावर टीका होत होती. माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ट्वीट करत केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर ताशेरे ओढले. धर्मनिरपेक्षतेचे ढोल बडवणाऱ्या आम आदमी पक्षाच्या दुटप्पीपणावर बोट ठेवत त्यांनी, "हेच ६ कोटी रूपये दिल्ली दंगलीत नुकसान झालेल्या कुटुंबांचं पुर्नवसन करण्यासाठी खर्च करणं या सरकारला गरजेचं वाटलं नाही," म्हणत नाराजी व्यक्त केली.
Breaking:
— Saket Gokhale (@SaketGokhale) December 22, 2020
Delhi AAP Govt. spent 6 crores (approx $0.8 million) of taxpayer money for the Laxmi Puja event & its live telecast done by @ArvindKejriwal on 14 November, 2020.
This whopping cost of 6 crores public money was for a 30-minute puja.
Thats 20 lakh rupees per minute. pic.twitter.com/oWf7Ekixq3
मागच्याच विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधक असलेल्या भाजपच्या धार्मिक कट्टरतावादावर टीका करतंच केजरीवाल सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळं भाजपच्या हिंदुत्ववादाला आव्हान ठरू शकेल अशा पद्धतीची राष्ट्रीय आघाडी बनवण्यासाठीचा महत्वाचा दुवा म्हणूनही केजरीवालांकडे तेव्हा पाहिलं गेलं. मात्र, आपलं सरकार आल्यानंतर केजरीवालांनी सोयीस्कररित्या आपली राजकीय भूमिका बदलली असल्याची टीका त्यांच्यावर होत होती. त्यातंच इतक्या उघड पद्धतीनं आपली पत्नी आणि सहकाऱ्यांसोबत धार्मिक सोहळ्याचं आयोजन करून हिंदू मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भाजपच्या हिंदुत्ववादाला विरोध करता करता केजरीवाल राजकीय स्वार्थ साधत स्वत:च हिंदुत्ववादी भूमिका घेत असल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे.
निवडणुकीच्या आधीही दिल्ली दंगल, नागरिकत्व सुधारणा कायदा, जामिया आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील उसळलेल्या हिंसेनं राष्ट्रीय वातावरण ढवळून निघालं होतं. त्यादरम्यानही पोलीस दडपशाहीच्या विरोधात आंदोलकांच्या बाजूनं थेट भूमिका घेताना केजरीवाल दिसले नाहीत. राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरतील अशाच स्थानिक आणि प्रशासकीय मुद्यांवर त्यांनी ही निवडणूक लढवली आणि जिंकलीही. त्यामुळं हिंदुत्ववादी भाजपविरोधातील राष्ट्रीय आघाडीचा भाग असूनदेखील केजरीवाल राजकीय गणितं सांभाळत भाजपशी थेट दोन हात करण्यास कचरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. दिवाळीतील त्यांच्या या लक्ष्मीपूजनाच्या सोहळ्यानं भाजपला असलेला आपला हा विरोध हा वैचारिक नव्हे राजकीय संधीसाधूपणातून आलेला होता, यावर स्वतः केजरावालांनीच शिक्कामोर्तब केलं. माहिती अधिकारातून या सोहळ्यासाठी करदात्यांच्याच ३० कोटी रूपयांचा चुराडा झाल्यानंतर केजरीवालांवरील राजकीय संधीसाधूपणाची ही टीका आणखी कडवी होणार असल्याची चिन्हं आहेत.
बदल: हेडलाईनमधील चूक सुधारण्यासाठी बदल करण्यात आला.