India

२२ वर्षीय तरुण झाला अकोल्यातल्या गावाचा सरपंच

अकोल्यापासून अवघ्या १२ किमी अंतरावर असलेलं आपोती बु. गावानं विकासाच्या अपेक्षेनं एका २२ वर्षीय तरुणाला आपल्या गावाचा सरपंच म्हणुन निवडला.

Credit : Indie Journal

- प्रेरणा देशमुख

 

अकोल्यापासून अवघ्या १२ किमी अंतरावर असलेलं आपोती बु. हे गाव. ज्या गावात महिन्यातून एकदा फारफार तर दोनदा पाणी येतं, त्या गावानं विकासाच्या अपेक्षेनं एका २२ वर्षीय तरुणाला आपल्या गावाचा सरपंच म्हणुन निवडला. तेही बिनविरोध. वैभव देवीदास तराळे हा तो तरुण. लॉकडाऊनच्या काळात पाच-सहा महिन्यांसाठी गावी गेलेला वैभव आता पाच वर्षांसाठी गावाचा सरपंच बनलाय.

"जळगावला इंजिनीअरिंगला शिकत असताना Roteract क्लबचा मी सदस्य होतो. कॉलेजसाठी University Representative  देखील होतो. आपल्याकडे नेतृत्वगुण आहेत हे माहिती होतं, पण त्यांचा उपयोग झाला तो लॉकडाऊनच्या काळात. आपण एखाद्या चांगल्या कामासाठी पुढाकार घेतला तर अवघ गाव त्याला जोडलं जातं याचा अनुभव आला आणि म्हणुन मग ही कामं करायची अस ठरवलं," या प्रवासाची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगताना वैभव म्हणाला.

वैभव इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असतानाच कोरोनामुळे लॉकडाउन सुरु झालं. तो त्याच्या इतर मित्रांसोबत गावी आला. शिक्षणासाठी बरीच वर्ष शहरात राहिलेल्या वैभवला पहिल्यांदाच गावातल्या विजेपासून ते पाण्यापर्यंतच्या समस्यांची झळ जाणवली. आपल्या शिक्षणाचा समाजाला फायदा व्हावा म्हणून सुरुवातीला समाजकार्यात आणि नेतृत्वगुणांचा फायदा गावाला व्हावा म्हणून मग निवडणुकीत उतरला.

वैभवचे वडील एस.टी.महामंडळात कंडक्टर तर आई गृहिणी. कुठलाही राजकारणाचा ना वारसा ना अनुभव. पण  लॉकडाऊन मध्ये गावातल्या शाळा बंद असल्यामुळे मुलांना जमवून शिकवलं, जमेल त्या कामात, जमेल तशी गावकऱ्यांना मदत केली. मुख्य म्हणजे कधीकाळचे बंद पडलेले पथदिवे, वैभव आणि त्याच्या मित्रांनी चालू केले. यासोबतच गावकऱ्यांचा विश्वास कमवला.

"तुमचं पोरगं हुशार आहे. तुम्ही काळजी करू नका. आम्ही म्हणतो म्हणून त्याला मेंबर बनवा. आम्हाला पण कामं करून घ्यायला कुणीतरी हक्काचं मिळेल," असं गावातल्या वयस्करांनी वडिलांना सांगितलं आणि निवडणूक लढवायची यावर शिक्कामोर्तब झालं, असं वैभव सांगतो.

स्वतःचं पॅनल तयार करत त्यानं प्रचार केला. या पॅनेलमध्ये त्याची बहीण पूजा तराळे आणि त्याचे इतर मित्र होते. गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने त्याच  मुद्द्यावर त्याने आपल्या प्रचारावर भर दिला. त्याचं काम आधीच पाहून असल्यामुळं आणि त्याच्या शांत आणि सयंमी स्वभावामुळं गावकरी त्याच्या पाठीशी उभे राहिले आणि या तरुणाईनं ही निवडणूक लढवली. सरपंचपदी जरी वैभवची निवड बिनविरोध झाली असली तरी विद्यमान सरपंचाच्या मुलाविरुद्ध उभं ठाकून त्यानं ती जिंकली. उपसरपंच पदासाठी मात्र त्याला आणि त्याच्या मित्रांना खूप जोर लावावा लागला, आणि तिथं राजकारण नेमकं काय असतं हे त्याला कळलं. सात सदस्यीय ग्रामपंचायतीवर पाच सदस्य वैभवच्या या तरुण पॅनेलचे आहेत. महत्वाचं म्हणजे त्याची बहीण गावात सर्वाधिक मताधिक्क्यानं निवडून आलीय.

गावातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी त्यानं विजयाच्या दुसऱ्याच दिवशी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात केली आहे. सरकारच्या जास्तीत जास्त योजना लोकांपर्यंत पोहोचवता याव्या यासाठी वैभव आणि त्याचं पॅनल काम करेल. महिला बचत गटाच्या सदस्यांना भेटून इंटरनेटच्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल हेही तो बघतोय. गावातील शाळेचं डिजिटायझेशन करणं आणि गावाची स्वछता हे या तरुण सरपंचाचं लक्ष्य आहे.

"खेड्यातली माणसं खूप साधी असतात. तुम्ही थोडं जरी काम केलं तर त्यांना त्याचं फार कौतुक असत. माझ्यासारख्या शिकलेल्या तरुणांनीं त्यांना काहीतरी नवीन आणि चांगलं करून दाखवलं तर ते विश्वास टाकतात. म्हणूनच तरुणांनी, खासकरून शिक्षित तरुणांनी राजकारणात यायला हवं. व्यवस्थेत राहून आपण आपल्याच लोकांचं भलं करू शकतो. या देशाचं चित्र पालटवू शकतो. तेवढी ताकद आणि बुद्धिमत्ता आपल्याकडे असतेच. इतर क्षेत्रांसोबतच राजकारणातही तिचा वापर केला तर फार बरं होईल," वैभव सांगतो.