Quick Reads
‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ वेब सिरीज स्वरूपात
मार्केझच्या कादंबरीवर आधारित वेब सिरीज नेटफ्लिक्सवर
-jpg.jpg)
गॅब्रिएल गार्सिया मार्केझची 'वन हंड्रेड इयर ऑफ सॉलिट्यूड' ही जगप्रसिद्ध कादंबरी. वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड आता वेब सिरीजच्या रुपात आपल्याला पहायला मिळणार आहे. गॅब्रिएल गार्सिया मार्केझ म्हणजेच ज्याला प्रेमानं लोक गॅबो म्हणतात, तो दक्षिण अमेरिकेतला नोबेल विजेता सुप्रसिद्ध लेखक. मार्केझच्या 'हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड' या कथानकावरील वेब सिरीज लवकरच नेटफ्लिक्सवर येणार असल्याचं बुधवारी नेटफ्लिक्सनं जाहीर केलं. त्याच्या जन्मदिनी ६ मार्चला नेटफ्लिक्सनं ही घोषणा केली. रॉड्रिगो आणि गोझॅंलो मार्केझ ही मार्केझंची दोन्ही मुलं यासाठी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.
१९६७ ला प्रकाशित झालेली ही कादंबरी कोलंबियातल्या मॅकोंडोमधल्या बुएंडिया कुटुंबाचा सात पिढ्यांचा प्रवास सांगते. मॅकोंडो, अराकटका हा मार्क्वेजचं बालपण ज्या प्रदेशात गेलं, तो भाग. त्यामुळे तो भूभाग, तिथले लोक, तिथल्या शहरांच्या अनोख्या कथा, शहरांची व्यक्तीमत्वं त्याच्या लिखाणातून डोकावतात. 'वन हंड्रेड इयर ऑफ सॉलिट्यूड'च्या बाबतीतही त्याच्या नायकाचं एक कल्पनेतलं शहर वसवण्याची धडपड हा यातल्या कथानकाचा एक मुख्य धागा. या कादंबरीचा आजवर ३७ भाषांमध्ये अनुवाद झालेला असून पुस्तकांच्या कोट्यवधी प्रती विकल्या गेल्या आहेत. कादंबरी हा लेखनप्रकार जरी काल्पनिक लेखनाचा असला तरी अनेक कादंबऱ्यांमध्ये बरेचदा घडून गेलेल्या काही प्रसंगांचं, वास्तव घटनांचं प्रतिबिंब असतं, या कादंबरीतला एक महत्वाचा कथनात्म भाग एका महत्वाच्या वास्तव घटनेवर बेतलेला आहे. ती घटना म्हणजे १९२८ साली कोलंबिया मध्ये घडलेलं 'बनाना हत्याकांड.
साहित्यात जादुई वास्तववाद आणि लॅटिन अमेरिकन बुमची जोरदार चर्चा त्यावेळी ज्या लेखकामुळे होऊ लागली होची, त्या मार्केझचा जन्म ६ मार्च जन्म १९२७ साली अरकाटका या कोलंबियन शहरात झाला. तो पत्रकार, लेखक आणि पटकथा लेखकही होता. १९८२ साली मार्केझला साहित्यासाठी 'नोबेल' पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मार्केझनं साम्राज्यवादाचा कडाडून विरोध केला आणि लॅटिन अमेरिकेच्या वसाहतवादी शोषणाविरोधातला आवाज आपल्या लेखनातून व्यक्त केला. अशा मार्केझच्या कादंबरीवर आधारित कलाकृती दृकश्राव्य स्वरुपात उपलब्ध होणं, ही त्याच्या चाहत्यांसाठी आणि ज्यांनी मार्केझ वाचला नाही अशांसाठीही पर्वणीच आहे.
मार्केझच्या जवळच्या मित्रांपैकी एक आणि त्याचा चरित्रकार गुस्तावो ग्युअरा यांनी मात्र ही वेब सिरीज बनवण्याबाबत टीका करत म्हटल, "खुद्द गॅबोला ही कथा पडद्यावर बघायला आवडली नसती." तरीही ही गोष्ट पुनर्जीवित होऊन कोलंबिया, दक्षिण अमेरिका आणि गॅबो यांना पुन्हा अनुभवायची संधी जगाला मिळेल.”