Americas

‘ग्लोबल नॉर्थ’ ची गुंडागर्दी

अमेरिकेच्या नेतृत्वात जगातले श्रीमंत देश गरीब राष्ट्रांची मुस्कटदाबी करत आहेत

Credit : The National Interest

पृथ्वी गोल आहे आणि योगायोगाने, औद्योगिक क्रांती आणि साम्राज्यवादाच्या जोरावर बलशाली झालेले देश हे बहुतांश या गोलाच्या उत्तर गोलार्धातले आहेत. यांना ढोबळ मानाने ‘ग्लोबल नॉर्थ’ म्हटलं जातं. याउलट आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आशियातले विषुववृत्तीय देश तुलनेनं गरीब राहिले किंवा साम्राज्यवादाच्या प्रक्रियेत गरीब बनवले गेले. यांना एकत्रितपणे ‘ग्लोबल साऊथ’ म्हणता येतं. स्वभावतः, भारतही ‘ग्लोबल साऊथ’ चाच भाग राहिलेला आहे.

या दक्षिणेतल्या राष्ट्रांची ओळख म्हणजे त्यांची कृष्णवर्णीय, गव्हाळ वर्णाची, अनेक प्रकारच्या अस्मिता आणि परंपरा असणारे जनसमूह, संथ गतीने वाढणारी अर्थव्यवस्था, साम्राज्यवादी धोरणांच्या धुरिणांनी मागं सोडलेली अस्मितादर्शी आणि सांप्रदायिक हिंसा, लुट केली गेलेली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पारंपरिक समाजसंबंधातून निर्माण होणारा ‘भ्रष्टाचाराचा’ प्रश्न. ग्लोबल नॉर्थची ओळख म्हणजे बहुतांश गौरवर्णीय साम्राज्यवादी लुटीतून संपन्न झालेली, आधुनिक राष्ट्र-राज्याच्या मूल्यांना केंद्रस्थानी ठेऊ शकलेली आणि जगाच्या धोरणांना आपल्या आर्थिक आणि सैनिकी बळावर वाकवण्याचा प्रयत्न करणारी राष्ट्रं.

दक्षिण वा ‘लॅटिन’ अमेरिका म्हणजे पोर्तुगाल व स्पेनच्या वसाहती असलेला, बहुतांश स्पॅनिश (ब्राझील पोर्तुगीझ बोलणारं राष्ट्र आहे) भाषिक राष्ट्रांचा समूह. या राष्ट्रांना पहिल्यांदा युरोपीय वसाहतवादाविरोधात चेतवायचं काम केलं सिमोन बोलीवार या सेनानीनं. बोलीवारनं स्थापित केलेल्या राजकीय तत्वज्ञानावर आधारित जनलक्ष्यी राष्ट्रं स्वतःला ‘बोलीवारियन लोकशाही’ म्हणतात. त्यांची रचना पाश्चिमात्य लोकशाहीच्या आराखड्यापेक्षा वेगळी दिसत असली तरी त्यांची त्यांची एकस्वतंत्र लोकतांत्रिक प्रक्रिया असते, जिला लॅटिन अमेरिकन जनतेने मान्यता देऊन स्वायत्तता स्थापित केली आहे.

हे सर्व सांगण्याचा प्रपंच यासाठीच कारण, व्हेनेझुएला मध्ये जे सध्या घडत आहे ते एका कुप्रसिद्ध इतिहासाची पुनरावृत्ती आहे आणि तो इतिहास आहे या स्वायत्त राष्ट्रांच्या आंतरिक व्यवहारात अमेरिकी व युरोपीय हस्तक्षेपाचा.

व्हेनेझुएला हे स्पेनपासून स्वातंत्र्य मिळवणारं पहिलं लॅटिन अमेरिकन राष्ट्र. सिमोन बोलीवारनं लॅटिन अमेरिकन राष्ट्रवादाला चेतवल्यावर, युरोपीय आणि अमेरिकन वासाहतिक हितसंबंधांना धक्का बसला आणि त्यातही हे गौरवर्णीय गुलाम व्यापारी दक्षिण अमेरिकेतल्या या स्वायत्त लढ्यावर खार खाऊन बसले. १८११ मध्ये स्वातंत्र्य मिळवलेल्या या राष्ट्रानं अनेक उलथापालथी पहिल्या. मात्र १९९८ मध्ये ह्युगो चावेज या कुशल सेनानीच्या नेतृत्वात 'बोलीवारीयन क्रांती' पहिली आणि नव्या संविधानासह 'बोलीवारियन फेडरेशन ऑफ व्हेनेझुएला' स्थापन झालं.

विकिपीडिया सिमोन बोलीवार. सौ- विकिपीडिया   


समाजवादी व्हेनेझुएला  

ह्युगो चावेज बोलीवारवादी तर होतेच, त्यात ते मार्क्सप्रणीत समाजवादानेही प्रभावित होते. त्यांनी साम्यवाद-समाजवाद-बोलीवारवाद यांच्या मिश्रणातून जनवादी धोरणांची सुरुवात केली. व्हेनेझुएला जगातील सर्वात मोठा तेलसाठा असलेला देश आहे. त्यानं या खनिज संपत्तीचं राष्ट्रीयीकरण केलं आणि यातून मिळणाऱ्या अवाढव्य परताव्यातून स्थानिक-आदिवासी-गरीब जनतेसाठी शेकडो कल्याणकारी योजना सुरु केल्या. व्हेनेझुएलाच्या जनतेनं मागची दोन दशकं बोलीवारियन क्रांतीची फळं चाखली. मात्र अर्थात अमेरिकाप्रणित ग्लोबल नॉर्थच्या हे पचनी पडणार नव्हतंच. 

chavez ह्युगो चावेज. सौ- चॅनेल ४ 

ह्युगो चावेजची हत्या करण्याचा, त्यांची सत्ता 'हुकूमशाही' घोषित करून उलथून लावण्याचा एक मोठा प्रयत्न २००२ मध्ये करण्यात आला. तो फसला. चावेजचा २०१३ मध्ये मृत्यू झाल्यावर त्यांच्या अफाट लोकप्रियतेच्या जोरावर त्यांच्याच पक्षाचे निकोला मादुरो तिथं निवडून आले आणि राष्ट्रपतीपदी नियुक्त झाले. मादुरो यांनी चावेजच्या धोरणांना पुढं रेटलं खरं, मात्र चावेज यांच्याप्रमाणे त्यांना लॅटिन अमेरिकन हितसंबंधांना आंतरराष्ट्रीय कूटनीतीची जोड देता आली नाही. एकट्या तेलाच्या जीवावर समाजवादी धोरणं चालवली जात होती. अमेरिकेचं मित्र राष्ट्र असलेल्या सौदी साम्राज्यानं ग्लोबल नॉर्थच्या व्यूहरचनेअंतर्गत बाजारात स्वस्त तेलाचा रतीब लावला आणि तेल बाजार पडले. व्हेनेझुएलासोबतच ब्राझील, रशिया यांची मुस्कटदाबी करण्यासाठी २०१४ पासून सौदी अरब साम्राज्य नुकसान सोसत तेलाचे भाव पाडत आहे.

या आर्थिक अतिरेकी धोरणांमुळं, ब्राझीलच्या 'पेट्रोब्रास' या राष्ट्रीयीकृत कंपनीवर आलेला ताण आणि भ्रष्टाचारविरोधात अचानक उसळलेल्या जनक्षोभातून समाजवादी विचारांच्या डेल्मा रुसेफ यांना पायउतार व्हावं लागलं. त्यांची जागा काही महिन्यांपूर्वीच बोल्सनारो या कट्टर उजव्या विचारांच्या राष्ट्रपतीनं घेतली आहे. बोल्सनारो यांनी सत्तेवर येताच, आदिवासी, मूलनिवासी आणि समलैंगिक व तृतीयपंथी समूहांसाठी असलेल्या संरक्षक तरतुदी काढून घेतल्या आहेत. लॅटिन अमेरिकन समाजवादी नेतृत्वाला हटवून तिथं उजवे हुकूमशहा लोकशाहीच्या नावानं पेरायचा उत्तर अमेरिकेचा इतिहास क्युबा, चिले आणि कोलंबिया या राष्ट्रांनी पाहून झालेला आहे. 

व्हेनेझ्युएलावर लावलेले आर्थिक निर्बंध, तेलाचा कोसळलेला बाजार, यात आंतरिक गोंधळ सुरु झाला आणि व्यवस्था कोलमडू लागली. या गोंधळाचा फायदा घेत अमेरिकी गुप्तहेर संघटना 'सीआयए' नं युआन गियादो या विरोधी पक्षाच्या नेत्याशी २०१७ मध्ये गाठभेट व वाटाघाटी सुरु केल्याचं वृत्त खुद्द न्यू यॉर्क टाइम्सनं प्रकाशित केलं आहे. ब्राझीलच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातदेखील सीआयए चा हस्तक्षेप होता अशी माहिती समोर येत आहे. या गोंधळाचा फायदा घेऊन गियादो याने स्वतःला राष्ट्रपती म्हणून घोषित करताच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला राष्ट्रपती म्हणून अमेरिकेची स्वीकारार्हता देऊन टाकली. थोड्या वेळापूर्वीच युरोपीय संघाच्या सर्व देशांनी गियादोला राष्ट्रपती म्हणून मान्यता जाहीर केली. गियादो हे बोल्सनारो यांच्याप्रमाणेच गौरवर्णीय आहेत. 

मादुरो गियादो आणि मादुरो. सौ- जमैका लूप 


मुद्दा आहे स्वायत्ततेचा 

अमेरिकेच्या मनरो डॉक्ट्रीन नावाच्या कूटनीतिक धोरणात 'लॅटिन अमेरिका हे अमेरिकी संयुक्त राज्य संघाचं अंगण असल्यानं इथं हस्तक्षेप करणं हे अमेरिकी हितसंबंधांसाठी महत्त्वाचं आहे', अशी धारणा आहे. यामुळं लॅटिन अमेरिकन स्वायत्तता अमेरिकेने अनेकदा धुडकावून लावत इथल्या आंतरिक राजकारणात ढवळाढवळ केली आहे व अजूनही करत आहे. कोलंबियामध्ये अमेरिकेच्या धोरणांमुळं ७० लाख लोक निर्वासित झाले. चिलेचे निवडून आलेले समाजवादी राष्ट्रपती साल्वादोर आयेंडे यांची भर संसदेत हत्या केली गेली व त्यांच्याजागी हुकूमशहा ऑगस्तो पिनोशे याला अमेरिकेनं सत्तेवर आणलं. 

त्यामुळं हे स्पष्ट आहे की या हस्तक्षेपामागं जनतेच्या हिताचं किंवा 'लोकशाही' स्थापन करण्याचा कोणताही हेतू अमेरिका वा ग्लोबल नॉर्थचा नाही. अमेरिका आणि ग्लोबल नॉर्थचा डोळा आहे तो व्हेनेझुएलाच्या भरमसाठ खनिज संपत्तीवर आणि व्यावसायिक हितसंबंधांना मोकळं रान करून देण्यावर. व्हेनेझुएलामध्ये असलेले प्रश्न कोणालाच नाकारता येणार नाहीत. तिथल्या गैरव्यवस्थापनाला मादुरो जवाबदार असतील किंवा आहेतही. मात्र त्यांची बदली करण्याचा निर्णय हा पूर्णतः व्हेनेझुएलाच्या जनतेचा हवा.

त्यांच्या संवैधानिक प्रक्रियेवर युरोप किंवा अमेरिकेनं वरचढ होता कामा नये. भारतानेही असल्याचं साम्राज्यवादी शक्तीची उचलबांगडी करत स्वातंत्र्य मिळवलं आहे आणि भारत सरकार आणि भारतीय जनतेनं व्हेनेझ्युएलामधील हस्तक्षेपाचा विरोध करायला हवा. कारण प्रश्न लोकशाहीचाच असता, तर अमेरिका सौदी अरबसारख्या मागास विचारांच्या राजवटीच्या उंटावर बसून शेळ्या हाकत नसती.  

निकोला मादुरो यांना धमकावणं, सैनिकी कारवाईचा धाक दाखवणं, हे ग्लोबल नॉर्थच्या गुंडागर्दीचं लक्षण आहे. त्यांनी अशा धमक्या देऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून निष्पाप लोकांचा बळी घेण्यासाठी जगावर आणखी एक युद्ध थोपवू नये. अशा सैनिकी कारवाईविरोधात खुद्द अमेरिकी सैन्याचे वरिष्ठ अधिकारी बोलत आहेत. अशात मादुरो यांनी देखील रक्त सांडण्याची भाषा न करता आपल्या सरकारच्या भोंगळ कारभाराची गळती थांबवून लोकांची होरपळ थांबवावी. कारण ही स्वायत्तता लॅटिन अमेरिकन जनतेच्या हौतात्म्यातून मिळाली आहे.