Quick Reads

हिकीझ गझेट

भारताच्या पहिल्या वर्तमानपत्राची गोष्ट

Credit : NULL

भारतातलं पहिलं वर्तमानपत्र म्हणजे हिकीझ बेंगॅाल गझेट. जेम्स ऑगस्टस हिकी याने हे वर्तमानपत्र सुरु केलं इतकी तुटक माहिती निदान माध्यमात काम करणाराला तरी असते. अॅन्ड्र्यु ओटिस हा एक पीएचडी करणारा संशोधक यूनिवर्सिटी ओफ मेरिलँडमधे संज्ञापनाचा व माध्यमशास्त्राचा विद्यार्थी आहे. मागच्या आठवड्यात त्याचं ‘हिकीज बेंगॅाल गझेट’: द अनटोल्ड स्टोरी ओफ इंडियाज फर्स्ट न्यूजपेपर’ हे पुस्तक आलंय.

भारतातल्या इतिहासात डोकावून त्यातल्या पहिल्या वर्तमानपत्राच्या संग्रहित मळकट पानांवर संशोधन करुन पुस्तक लिहायचं हे तसं रुक्ष कामये. पण ओटीसच्या पुस्तकात तो कोरडेपणा साचेबद्धपणा नाहिये. संशोधित माहितीच्या आधारे अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने काही ठिपके जुळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

या विषयावरल्या पुस्तकाची मांडणी म्हणून लेखक या नात्याने ओटिस वेगळा आहेच. मात्र संशोधन करत असताना त्यानं माहिती गोपनीय न ठेवता लोकसहभागातून माहिती समृद्ध करत जाण्याची पद्धत वापरली आहे. फेसबुक आणि इतर माध्यमातून तो लोकांशी संशोधनाबाबत संपर्कात राहिला. लोकांपासून दुर जाऊन एकांतांत संशोधन करत अचानक कामाचं बाड हातात घेऊन एंट्री करण्याचा ट्रेंड बदलणा-याच्या यादीत त्याला बसवावं लागेल. संशोधनातून मिळणारी कच्ची माहिती काम पूर्ण होण्याअगोदरंच लोकांसमोर उघड केल्यानं ब-याचदा अपरिपक्व टीका टिप्पणी होण्याचा धोका असतो.

मागे ली बर्जर (Lee Berger) याचं Almost Human हे पुस्तक आलं. बर्जर मानववंशशास्त्रज्ञ आहे. त्याच्या संशोधनाच्या कामाची पद्धत वेगळी आहे.  मानवी उत्क्रांतीतल्या सुमारे २-३ लाख वर्षांपूर्वीचा टप्पा त्याला त्याने Homo Naledi म्हटलं आहे. काळाचे संदर्भ देत अफ्रिकेतल्या मातीतला आकाराने लहान मेंदू असलेला मानव ते सारासार विचार करणारा आजचा प्रगत मानव यादरम्यानच्या विकसनातील प्रचंड गुंतागुंतीचे टप्पे त्याने अभ्यासले आहेत.

संशोधनात गृहितकं धरुन एका शास्त्रीय पद्धतीने काम केलं जातं. दरम्यान मिळवलेली कच्च्या स्वरुपातील माहिती आणि निरिक्षणांची गुप्तता राखणं ही पारंपरिक संशोधनाची शिस्त बर्जरने मोडित काढली.

नॅशनल जिओग्राफीक मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणतो, “संशोधन करत असताना अर्धवट मिळालेल्या कच्च्या माहितीवरुन लोकंही घाईने आपल्या कामाबद्दल अपरिपक्व टीका करु शकतात हा धोका आहेच. पण विज्ञानाचं संक्रमण व्हावं म्हणून माहितीचं असं ओपन सोर्सिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. संशोधनासंबंधीची अशी माहिती, थ्री-डी छायाचित्रं मी लोकांसमोर मांडतो म्हणजे आपण विज्ञानाला जास्त प्रायोगिक बणवत असतो. नवख्या संशोधकांना हे प्रेरित करणारं ठरु शकेल.

ओटिसच्या पुस्तकापुरती ह्या विषयाची व्याप्ती न ठेवता हा परिघ संशोधनाच्या पातळीवर ठेवायचा हा प्रयत्न आहे. जेम्स ओगस्टस हिकीनं २९ जानेवारी १७८०ला बंगाल गझेट हे भारतातलं पहिलं वर्तमानपत्र बंगाल प्रांतात सुरु केलं. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात एक आयरिश माणूस भारतात एक वर्तमानपत्र काढतो यात सरळ व्यावसायिक हेतु होता हे उघड आहे. पण तो निव्वळ व्यावसायिक नव्हता. हिकी आपल्या अंकात लिहतो, “अनाधिकृत, अवैध असं माझ्या पेपरात काही नसेल. तटस्थपणे आम्ही सत्य आणि वस्तुनिष्ठतेला धरुन राहू.”

हिकीचा हा वर्तमानपत्राचा प्रयोग फक्त दोन वर्ष टिकला. दोन वर्ष चाललेल्या या वर्तमानपत्रात व्यापारी जहाजांच्या येण्या-जाण्याचं वेळापत्रक, व्यावसायिक जाहिराती आणि काही स्थानिक आणि राष्ट्रीय घडामोडी होत्या. इतकी माहिती आपण आताच्या काळात छातीठोकपणे सांगुन मोकळे होऊ.

 

Andrew Otis

अॅन्ड्र्यु ओटिस

 

ओटिस या पुस्तकात आपल्याला याच माहितीच्या पलीकडं उभं राहून संशोधनाधारित महत्तवाच्या गोष्टीतून तथ्य सांगत राहतो. हिकीनं फक्त पॅम्फ्लेट छापावेत तसा पेपर छापला नाही. गवर्नर जनरल वॅारन हेस्टिंगच्या खाजगी आयुष्यावर लिहण्याचं धाडस हिकीनं केलं होतं. महिला आणि पुरुषांची लैंगिकता, यौनसंबंधावर त्यानं लिहलं. अठराव्या शतका अगोदरच्या फसव्या आधुनिकतावादाच्या काळात हिकी, व्यवस्थेला झोंबणा-या विषयांवर बोलत होता. या उदाहरणावरुन त्याला उदारमतवादी म्हणण्याची घाई करता येणार नाही कारण ‘स्त्रियांनी शिकुन नव-याच्याच आज्ञेत रहावं’ असाही संकुचित विचार तो करायचा.

हिकीनं भारतात वर्तमानपत्र सुरु केलं तरी त्याचे वाचक युरोपियन होते. तेच सभासद आणि जाहिरातदारही होते. त्याचं वर्तमानपत्र घडणं बिघडणं गो-या साहेबाच्या हातात असतानाही हिकीनं भारतातल्या लोकांच्या बातम्याही छापल्या. कलकत्ता शहरात लागलेल्या आगीनंतर लोकांना राहण्याची सोय व्हावी अशी सूचनावजा बातमी त्यानं केली.

‘बेंगॅाल गझेट’ फार प्रस्थापित माध्यम नसला तरी सत्तेविरुद्धचा संघर्ष त्याला चुकणार नव्हता. ईस्ट इंडिया कंपनीच्या भ्रष्ट अधिका-यांवर तो लिहायला लागला. पण अब्रुनुकसानीचा दावा लागेल अशी टांगती तलवारही होतीच. हिकीनं यावर मार्ग काढला आणि अधिका-यांना टोपण नावं दिली. बंगाल प्रांताचा मुख्य न्यायाधीश एलिझा एम्फे याचा उल्लेख तो पेपरात  ‘Poolbandy’ असा करायचा. बंगालमधे नद्यांच्या पुलबांधणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याची कुजबुज होती. त्यात एम्फेचं नाव होतं. हिकीनं त्याला Poolbandy नावं देऊन बातम्या छापल्या. हिक्कीच्या पत्रकारितेचे अनेक किस्से या पुस्तकात आहेत.

बेंगॅाल गझेटचं काम जोमात असतानाच दीड वर्षानंतर जॅान झॅसरिच अन् वॅारन हेस्टिंग या दोन बड्या अधिका-यांनी हिकीवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. त्याला कारण होतं असं की, झॅसरिने मिशनरीमधला निधी बेकायदेशीर खर्च केला आणि वॅारन हेस्टिंगला शीघ्रपतनाचा त्रास आहे अश्या आशयाचं लिखाण हिकीनं केलं होतं.

हिकीला अटक झाली. तरी तुरंगात राहूनही त्यानं बेंगॅाल गझेट चालवण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. शेवटी १९८२ला सर्वोच्च न्यायालयानं हिकीचा छापखाना बंद करण्याचे आदेश दिले, आणि अशाप्रकारे भारतातलं पहिलं वर्तमानपत्र बंद पडलं.

अगदी दोन वर्षाच्या काळात हिक्कीला फार काही करता आलं नसलं तरी त्यानं त्याचा एक विशिष्ट वाचकवर्ग तयार केला होता. नेहमीच्या वार्तांकनाला त्यानं वेगळा खुमासदार संस्कार देऊन रोचक केलं होतं. इतर जगभरातली वर्तमानपत्रं हातघाईला आली असताना बेंगॅाल गझेट भरभराटीत होतं हे विशेष. आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारणाबरोबरंच स्थानिक आणि रंजक घटना, गुन्हेगारीविषयक बातम्यांना आणि विषयाला त्यानं जागा दिली. ईस्ट इंडिया कंपनीच्या वसाहतवादी, भ्रष्ट कारभारावर त्यानं केलेल्या टीकेनं बेंगॅाल गझेटला लोकप्रियता मिळवून दिली. पण पुढं या टीकेनं कंपनीचा रोषही हिकीनं ओढावून घेतला.

हिकीच्या या पेपरानं त्यावेळी भारतीयांना काही दिलं नसलं तरी त्याच्या प्रयोगाने पुढच्या काळात वर्तमानपत्राच्या चळवळीला पायवाट करुन दिली. ओटीस म्हणतो, “भारतातलं हे वर्तमानपत्र अनेक अर्थांनी वैश्विक होतं. त्या काळातल्या व्यवस्थेचा स्विकार करत घालून दिलेल्या मर्यादा जाणिवपूर्वक मोडून त्या चौकटीत काम करणारा  तो एकमेव धाडसी प्रयोग होता.”

अॅन्ड्यू ओटिसनं एका कोरड्या, बोजड विषयावर लिहताना लालित्यपूर्ण असा साहित्यिक फॅार्म वापरलाय. संशोधन पुस्तिका वाचतोय असा भाव कुठंच येत नाही. पुस्तक थेट आमच्या हातात आलं नसलं तरी सन्डे गार्डियने या पुस्तकातले छापलेले उतारे पुरेसे बोलके आहेत.

 

नव्या पिढीतले काही लोकं संशोधन अधिकाधिक लोकाभिमुख करताहेत. ओटिसचं हे पुस्तक त्या वाटेनं जाणारं तर आहेच शिवाय माध्यमातल्या अभ्यासक आणि संशोधकांसाठी महत्त्वाचं आहे.

 

हिकीज बेंगॅाल गझेट: द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाझ फर्स्ट न्यूजपेपर 

प्रकाशक : वेस्टलँड पब्लिशर्स

किंमत: ५५७ रुपये