India
वाडा ते ऑक्सफोर्ड - पत्रकार तेजस हरडची झेप
ऑक्सफोर्ड विद्यापीठात संशोधनासाठी ‘रॉयटर्स’ची फेलोशिप
पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात, एका लहानशा गावातून आलेला, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला तेजस आज इकनॉमिक अॅंड पॉलिटिकल वीकली मासिकासाठी प्रुफ रीडर म्हणून काम करतो. लहानपणी गावात पेपरही वाचायला मिळत नसे, अशा परिस्थितीतून शिकलेल्या तेजसला अलीकडेच ‘रॉयटर्स’ या नामवंत आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थेची फेलोशिप मिळाली आहे. या फेलोशिपअंतर्गत इंग्लडमधल्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात माध्यमांशी निगडीत संशोधन करण्याची संधी त्यानं मिळवली आहे.
तेजस हरड मूळचा पालघरमधल्या वाडा तालुक्यातला बुधावली गावचा. घरची परिस्थिती गरिबीची होती. स्वत:ची शेती नाही. त्याचे वडील गवंडी काम करतात तर आई शेतमजुरी आणि इतर लहान सहान कामं करते. घरात कुणालाही उच्चशिक्षणाची पार्श्वभूमी नव्हती की शिक्षणासाठी, सर्वांगीण विकासासाठी पूरक वातावरणही नव्हतं. त्यात वाडा तालुक्यातली गावं म्हणजे अगदी बाजारासाठीही लोकांना तालुक्याला जाण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे पेपर, अवांतर वाचनासाठी पुस्तकं, वाचनालयं, ग्रंथालयं यांचाही अभाव. जिल्हा परिषद आणि नंतर सरकारी माध्यमिक मराठी शाळेत त्याचं शिक्षण झालं. महानगरांतील मोठ्या शाळांमध्ये स्वत:चा सर्वांगीण विकास करण्यासाठी सहज उपलब्ध असणाऱ्या सांस्कृतिक, कला, खेळ, साहित्यिक उपक्रम आणि स्पर्धा- संधींचीही इथं वाणवा. करिअरसाठी पुढे काय करावं हे सांगणारा एखादा शिक्षित नातलगही कुटूंबात नाही. अशा सर्वच बाजूंनी प्रतिकूल परिस्थितीत तेजस स्वत:साठी जिद्दीनं वाट शोधत राहिला. आई - वडिलांच्या कष्टांतून प्रेरणा घेत पत्रकार बनण्याचं स्वप्न नवव्या इयत्तेपासूनच बाळगू लागला.
“मला लहानपणापासून वाचायची आवड होती, पण आमच्याकडे पेपरही मिळत नसायचा, त्यामुळे मग जे मिळेल ते वाचायचो. मग आईला आठवड्याच्या बाजारासाठी ती गेली की पेपर आणायला सांगायचो. आमच्या घराजवळ एक सरकारी अधिकारी होते, त्यांच्याकडे रोज पेपर यायचा मग तिथंही जाऊन मी पेपर वाचायला लागलो. असं करत करत वाचायची आवड आणखी वाढली. इंग्रजी पेपर मी शाळेत असल्यापासूनच वाचायचो, सुरुवातीला काहीच समजत नसायचं पण मी सातत्यानं वाचत राहिलो. घरी एक जुना रेडिओ होता, त्यावर मग इंग्रजी बातम्या ऐकू लागलो. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी मी जाणीवपूर्वक कष्ट घेतले.” तेजसनं त्याच्या प्रवासाबद्दल इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं.
दहावीनंतर, बारावीपर्यंतचं शिक्षणही त्यानं वाड्यातल्या कॉलेजमध्ये पूर्ण केलं आणि मग तो पदवीच्या शिक्षणासाठी मुंबईतल्या रुईया कॉलेजला गेला. तिथं बी.एम.एम. पूर्ण करत असतानाही अनेक अडचणींचा सामना त्याला करावा लागला. मोठं कॉलेज, तिथं शिकणारे उच्चभ्रू मुलं - मुली, इंग्रजीत चालणारं संभाषण, तिथलं एकंदर ‘एलिट’ वातावरण यामुळे आपोआपच एक प्रकारचा न्यूनगंड आल्याचं तेजस सांगतो. सुरुवातीला वर्गात चालणाऱ्या वैचारिक चर्चांमध्येही सहभाग घेता येत नसे, कारण उत्तम इंग्रजी बोलू शकण्याचा आत्मविश्वास त्याला नव्हता. तो सांगतो, ‘वर्गात शिकवलेलं मला समजत होतं. आकलन चांगलं होतं, आपण काही तरी नक्की करु शकतो असं वाटायचं, शिवाय शाळेत अभ्यासात हुशार होतो, नेहमी पहिला नंबर यायचा, त्यामुळे आपण चांगला अभ्यास करुन, उत्तम मार्क्स मिळवू शकतो असं वाटायचं पण प्रेझेंटेशन स्किल, बोलण्याच्या आत्मविश्वासाचा अभाव होता, भवतालातल्या दडपवणाऱ्या वातावरणामुळे हा न्यूनगंड होता पण मी कष्टानं त्यावर मात केली.”
एकंदरित प्रतिकूल वातावरणात शिकत असताना, त्याला शाळेतल्या इंग्रजीच्या शिक्षकांनी खूप मदत केल्याचं तो सांगतो. “इंग्रजीच्या सरांमुळे माझं इंग्रजी व्याकरण पक्कं झालं. चांगलं इंग्रजी लिहिता यायलं लागलं. मी नववीत असल्यापासून डायरीत दररोज काही तरी इंग्रजीतून लिहायचो, या सवयीचा फायदा झाला. रुईया कॉलेजमध्येही अशाच मदत करणाऱ्या एक प्रोफेसर होत्या. माझी वाचनाची आवड बघून त्या मला पुस्तकं देऊ लागल्या. मी ती पुस्तकं अधाशासारखी वाचू लागलो. कोणतं पुस्तक हवं? असं त्यांनी विचारल्यावर मला त्यांना सुरुवातीला एकही नाव सांगता आलं नाही, कारण इंग्रजी साहित्य म्हणजे कोणती पुस्तकं, महत्वाचे लेखक कोण यांची नावंच तोवर माहित नव्हती. मग वाचनाचा जो सपाटा लावला त्यात, इंग्रजी साहित्य, नाटकं, माहितीपर पुस्तकं अशी बरीच भर पडत गेली. मराठी तर वाचत होतोच.पुस्तकं विकत घेण्याची चैन त्यावेळी परवडणारी नव्हती, त्यामुळे दोन - अडीच इंची स्क्रीन असणाऱ्या साध्या मोबाईलवरही जमेल ते वाचत होतो.”
पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यावर एकही दिवस घरी बसण्यासारखी त्याची परिस्थिती नव्हती, त्यामुळे लगेचच त्यानं शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेत नोकरी करणं सुरु केलं. तिथं काम करत असताना मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातून तो आई - वडील आणि लहान भावंडांच्या शिक्षणासाठी हातभार लाऊ लागला. तिथं वर्षभर नोकरी केल्यानंतर इपीडब्ल्यूमध्ये भरती निघाली आणि त्यानं मेहनतीनं ती संधी मिळवली. इपीडब्ल्यूमध्ये काम करताना बरंच काही त्याला शिकता आलं, इतकंच नव्हे तर तो तिथं मागच्या पाच वर्षांपासून इतक्या उत्तम प्रकारे काम करतो, की त्याच्या वरिष्ठ सहकाऱ्यांच्या अनुपस्थितीत तो त्याच्या टीमची धुरा सांभाळतो आणि इथं काम करत असतानाच त्यानं रॉयटर्सच्या फेलोशिपसाठी अर्ज केला. येत्या सप्टेंबरदरम्यान तो संशोधनासाठी इंग्लडला जाणार आहे.
तेजस ओबीसी प्रवर्गातून येतो आणि त्याची आर्थिक परिस्थिती आता त्यानं संघर्ष करुन सुधारली असली तरी ती कधीच शिक्षणासाठी अनुकूल नव्हती. जात - वर्गाचा इथं मुद्दाम उल्लेख करण्याचं कारण इथल्या एकूण ब्राम्हणी सांस्कृतिक, शैक्षणिक वातावरणात आणि नवउदारमतवादी धोरणांच्या विळख्यात विशिष्ट जातवर्गीय प्रिविलेजेस (विशेषाधिकार/संसाधनं) नसणाऱ्या मुलांनी उच्च शिक्षणाची, संशोधन करण्याची केवळ स्वप्नं पाहणंही या व्यवस्थेत परवडणारं नाही. आंतरराष्ट्रीय अशा महत्वाच्या फेलोशिप्सना कशा प्रकारे अप्लाय करायचं, त्यासाठी आवश्यक काय तयारी करायची, कोणत्या कौशल्यांवर काम करायचं...अशा सगळ्या मार्गदर्शनाचा दलित, बहुजन, आदिवासी, मुस्लीम, कष्टकरी मुलांकडे अभाव असतो. मार्गदर्शन मिळालं तरीही आवश्यक साधनं म्हणजे पुस्तकं, अभ्यास करण्यासाठी किमान जागा, स्टेशनरी, लॅपटॉप, इतर साधनं यांचा अभाव भरुन काढणारी कोणती व्यवस्था नाही. काही स्कॉलरशिप्स, योजना असल्या तरीही पोट भरण्यासाठी अनेकांना नोकरी केल्यावाचून गत्यंतर नसतं. अशा परिस्थितीत या देशातल्या अशा किती विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण, संशोधन, कलात्मक काम याबद्दल रुची निर्माण व्हावी वा ती टिकून रहावी अशी परिस्थिती आहे? तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या स्वप्नांसाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तेजसची ही कहाणी प्रेरणादायी आहे. भाषा, परिस्थिती, ग्रामीण भागात झालेली वाढ, संसाधनांचा अभाव अशा अनेक कारणांनी आलेला न्यूनगंड झटकून टाकत त्यानं कष्टानं हा महत्वाचा टप्पा गाठला आहे.
त्याच्या या संघर्षात आई - वडिलांची मोठी साथ लाभल्याचं तो सांगतो. आई - वडील अशिक्षित आहेत मात्र त्यांनी कायम शिक्षणासाठी पाठिंबा दिला. “मी पत्रकार झालो, याचा त्यांना अभिमान आहे पण मी इपीडब्ल्यूमध्ये नोकरी करतो म्हणजे नेमकं काय करतो, इपीडब्ल्यू किती मोठं आहे..हे काहीही त्यांना कळत नाही. आताही मी ही संधी मिळवल्याचा आनंद त्यांना झाला पण ऑक्सफोर्डमध्ये संशोधन करणं म्हणजे नेमकं काय करणं हे त्यांना कळत नाही. शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना हे समजत नाही, मात्र आमच्या या पिढीत हा अभाव राहणार नाही.” तो सांगतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना आपलं प्रेरणास्रोत मानणाऱ्या तेजसला वाटतं,”सामाजिक आणि सांस्कृतिक भांडवल हे भारतासारख्या देशात विशिष्ट अशा मूठभर उच्चजातवर्गीय लोकांनी स्वत:कडे एकवटून ठेवलं आहे. त्याच्या बळावर आपल्याच जातवर्गातील लोकांची शैक्षणिक - सामाजिक प्रगती व्हावी, यासाठी हे मूठभर लोक प्रयत्न करत असतात, यामध्ये ते इतरांच्या विकासासाठी समान संधींच्या हक्कांचीही पायमल्ली करतात. हे सोशल कॅपिटल, प्रिविलेजेस नसणाऱ्या मुला - मुलींना काही बनण्यासाठीच नव्हे तर साध्या अस्तित्वासाठीही खूप मोठा संघर्ष करावा लागतो.”
यामुळेच तेजसच्या या संघर्षमयी प्रवासातला हा महत्वाचा यशस्वी टप्पा, अभावांशी झगडत उच्च शिक्षणाची, संशोधनाची स्वप्नं पाहणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरक आणि सकारात्मक बळ देणारा आहे.