India
लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक घोषित
११ एप्रिलपासून सात टप्प्यात मतदानाला सुरुवात
निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेत जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला ११ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यातलं २५ एप्रिलला तर चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला पार पडणार आहे. पाचवा टप्पा मे महिन्यात सुरु होणार असून ६ मेला या टप्प्यातलं मतदान तर १२ मेला सहाव्या टप्प्यातलं मतदान आणि १९ मेला सातव्या टप्प्यातलं मतदान पार पडेल. २३ मेला लोकसभा निवडणुकांचे निकाल येतील.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक चार टप्प्यात पार पडणार असून महाराष्ट्रातील जागांवर ११ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान मतदान होईल. महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण ४८ मतदारसंघ असून त्यातल्या ७ जागांसाठी ११ एप्रिलला, १० जागांसाठी १८ एप्रिलला, १४ जागांसाठी २३ एप्रिलला आणि उर्वरित १७ जागांसाठी २९ एप्रिलला मतदान होईल.
आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, ओरिसा या राज्यांतील विधानसभा निवडणुका या लोकसभा निवडणुका सुरु असतानाच होणार आहेत, म्हणजेच या चारही राज्यांत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होतील.
जम्मू काश्मीरमध्ये सध्या म्हणजेच लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुका होणार नाहीत. याशिवाय ज्या राज्यांमध्ये विधानसभांच्या पोटनिवडणुका निर्धारित केलेल्या आहेत, त्या त्याच तारखांना पार पडतील असंही मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी जाहीर केलं आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच देशात अचारसंहितेचीअंमलबजावणी सुरू झाली आहे. आचारसंहितेचे नियम पाळले न गेल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असंही आयु्क्त अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. यावेळी व्हीव्हीपॅटचा वापर सर्व मतदान केंद्रात होणार आहे. निवडणूक आयोगानं अशी घोषणा केलीय की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी देशातल्या सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट यंत्रं बसवण्यात येतील.
मतदारानं उमेदवाराला दिलेलं मत सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं ही यंत्रणा वापरली जाते.
लोकसभा निवडणुंकांचं वेळापत्रक
पहिला टप्पा - ११ एप्रिल
दुसरा टप्पा - १८ एप्रिल
तिसरा टप्पा - २५ एप्रिल
चौथा टप्पा - २९ एप्रिल
पाचवा टप्पा - ६ मे
सहावा टप्पा - १२ मे,
सातवा टप्पा - १९ मे
निकाल - २३ मे