Quick Reads
लिंगभिंगातून: शिव्या
शिव्या आणि त्यांच्या मागचे लैंगिक सत्तासंबंध
परवा मला कुणीतरी मस्करी मस्करीत “भाड मे जा” असं म्हटलं. अर्थात मी ही ते मस्करीतच घेतलं, पण तरीही माझा स्वभाव नडलाच. म्हटलं नक्की काय अर्थ होतो या वाक्याचा जरा शोधूया. मग आम्ही ‘भाड’ शब्दाचा अर्थ शोधायला लागलो आणि आमच्या लक्षात आलं की भाड हा शब्द ‘भाडखावू’ शब्दातलाच असावा. भाडखावूचा अर्थ होतो देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांना गिऱ्हाईक पुरवून त्या स्त्रियांना मिळणाऱ्या कमाईतून दलाली खाणारा व त्यावर आपला उदर निर्वाह चालवणारा एजंट. मला ‘भाड में जा’ अस बोलणाऱ्या व्यक्तीला हा अर्थ कळल्यावर फारच ओशाळायला झालं त्याला, पण आम्ही ते सर्व फारच नॉर्मली घेतलं. लोक बोलतात म्हणून आपणही असलं बरच काही अर्थ माहित नसतांना केवळ व्यक्त व्हायचं म्हणून बोलत असतो असं त्याच म्हणण होतं.
अर्थात वरील प्रसंग हा केवळ निमित्त व संदर्भ म्हणून इथे वापरलाय. रोजच्या जीवनात देखील आपण असेच शिवी वा शिवीसदृष्य अनेक शब्द वापरत असतो. तो आपल्या भाषेच्या सवयीचा भाग झालेला आहे असं आपल्याला वाटतं. आपला तसं काही बोलण्याचा प्रत्येकवेळी हेतू असतोच असं नाही. उदाहरणार्थ मुंबईसारख्या शहरात काही प्रमुख शब्द जवळजवळ ९५% पुरुषांच्या तोंडून कधी ना कधी ऐकायला मिळतात, काही पुरूषांचं तर त्या शब्दांशिवाय वाक्यच पूर्ण होत नाही. त्यातले प्रमुख शब्द म्हणजे ‘आई झवली’ आणि आई झवाड्या’. त्याला लागुनच दुसरा शब्द असतो मग ‘मादरचोद’. ही लिस्ट फार मोठी आहे हे आपण सर्व जाणतोच. अगदी ‘गांड तुझी’ पासून तर ‘गांडीत जा’ आणि ‘भोसडीच्या’ पासून तर ‘गांडच मारेल तुझी’ इथपर्यंत. बर ही सगळी मंडळी खुप वाईट वगैरे असतात अस नाही. ती मनाने, स्वभावाने खुप चांगली, हळवी आणि बऱ्याचदा तर सामाजिक प्रश्नांच्या प्रती संवेदना असलेलीही असतात. शिवाय त्यांना वरील शब्दांतून व्यक्त होणारी कृती त्यांना स्वतःला खरोखरच करायची असते किंवा समोरची व्यक्ती तशी कृती करते असे काही म्हणायचे असते असेही नाही, पण तरीही हे असे आणि इतर बरेच शब्द फार सहज बोलले जातात, बोललेले ऐकले व स्वीकारले जातात.
असे शब्द वापरणं हे आपल्याला आपल्या भाषेचा बाज वाटू शकतो. राग, द्वेष वा इतर कोणतीही भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणूनही आपण त्यांच्याकडे बघतो. अगदीच कुणी आक्षेप घेत असेल तर त्याला आपण ‘हा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे’ असंही वेळ आली तर सुनवू शकतो. शिवाय जर असे शब्द वापरल्यानं कुणी तशी कृती करण्यास प्रवृत्त होत असेल तर कायद्याने ती व्यक्तीच त्याच्या कृतीला जबाबदार असेल, आपला त्याच्याशी काही संबंध नाही, असेही आपण म्हणू शकतो.
समाजात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हिंसेशी आपल्या भाषेचा काही संबंध असतो की नाही हा संशोधनाचा विषय असू शकतो. पण सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक कायद्यांमध्ये भाषिक हिंसा ही संज्ञा स्वीकारली गेलेली आहेच. मुद्दा भाषेतून कुणी खरोखरच हिंसा करते किंवा नाही हा नाही, तर हिंसा करण्याचा कोणताही उद्देश नसतांना सहजपणे वापरली जाणारी हिंसक भाषा किंवा शब्द प्रत्यक्ष हिंसेस हातभार लावते का हा आहे. आपल्या समाजात रोजच बलात्कार, मारझोड, खून अशा प्रकारच्या हिंसा होतांना आपण पाहतो आहे.
जोपर्यंत हिंसा करणारा म्हणून किंवा हिंसापिडीत म्हणून आपण त्या घटनेत कुठेही सहभागी नसतो, तोपर्यंत आपल्याला वाटतं की आपला त्या हिंसेच्या घटनेशी काहीही संबंध नाही. कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर ते खरंही आहे, की आपला त्या घटनेशी काही संबंध नाही. ज्यानं कुणी हिंसा किंवा तसा गुन्हा केलेला असेल तो व्यक्तिगत रित्या त्या हिंसेला जबाबदार असेल असेच आपण समजतो. पण हा झाला कायद्यानं व्यक्तिगत जबाबदारी निश्चित करण्याचा भाग. पण कायद्याच्या पलीकडं जावून या घटनांकडे बघितलं तर नक्की काय दिसतं?
कोणत्याही गैरजबाबदारीच्या, बेकायदेशीर कृत्याला कायद्याने ते कृत्य करणारी व्यक्ती जबाबदार असते हे खरंच. पण कोणतंही कृत्य हे निखळ ‘पोकळीत’ घडत नाही. त्या कृत्याला साजेशी ‘संस्कृती’ समाज म्हणून आपण खुप वर्ष आधीपासून तयार करत आलेलो असतो. समाजात होणारी हिंसा ही त्या सांस्कृतिकतेचा भाग असते. प्रत्यक्ष हिंसेच्या कृत्यात आपला थेट सहभाग नसला तरी तसे कृत्य घडण्याइतपत ती कृती आपल्यासाठी सामान्य झालेली असते, आणि ते सामान्यीकरण आपण आपल्या रोजच्या वापरातील शब्दांतून केलेलं असत. गांड मारणे, आई झवली हे शब्द म्हणून जेंव्हा आपल्या रोजच्या जगण्याचा जेंव्हा भाग झालेले असतात, तेंव्हा या शब्दांच्या अर्थातून व्यक्त होणारी कृती प्रत्यक्षपणे आपल्या अवतीभोवती घडल्यावर तीचं फार काही विशेष आपल्याला वाटत नाही. याचा अर्थ असा होतो की अशी कृती सहजपणे घडण्यासाठीचं एक वातावरण समाज म्हणून आपण आधीच तयार केलेलं असत. अन्यथा एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसेला सामोरा जाणारा एखादा समूह असा एवढा निर्ढावलेला आणि त्या हिंसेप्रती इतका निद्रितावस्थेत कसा काय राहू शकतो!
स्त्री पुरुषांच्या लैंगिक अवयवांच्या साहित्यिक-भाषिक अभिव्यक्तीला विरोध असण्याचं काही कारण नाही, किंबहुना ती नितांत सुंदर असू शकते. पण ती अभिव्यक्ती जेंव्हा विषम लैंगिक सत्तासंबंधांवर आधारलेल्या कृतिशी जोडली जाते, ती जेंव्हा एकतर्फी उपभोग मूल्याची भलामण करणारी असते किंवा ती जेंव्हा शोषित वर्गासंबंधी तिरस्कार भावाने युक्त असते तेंव्हा मात्र ती त्या त्या प्रकारच्या प्रत्यक्ष हिंसक कृतीला प्रेरित करणारी असते, एवढेच नव्हे तर उदाहरणार्थ ‘गांडच मारेन’ अशा प्रकारच्या शब्दांतून ती ‘गांड मारण्यासारख्या’ कृतीला अधिमान्यता देणारी व त्या कृतीच सामान्यीकरण करणारी देखील असते. ‘धडा शिकविणे’ हा शब्द जर समाज म्हणून आपल्या रोजच्या वापरातला असेल तर ‘धडा शिकविण्याची’ कृतीही प्रत्यक्षपणे त्या समाजात कुठे न कुठे, कुणाकडून तरी घडणारच असते.
आज आपल्या अवतीभोवती बलात्कार आणि स्त्री विरोधी हिंसेच्या कृत्यांचा जो महापसारा आहे त्याचं एक प्रमुख कारण ‘आई झवाड्या आणि मादरचोद’ सारख्या शब्दांचं आपण केलेलं सामान्यीकरण व त्यांना मिळवून दिलेली सामाजिक अधिमान्यता हे देखील आहे हे लक्षात घ्यायला हवं. सामान्य माणसांविषयीची कणव, करुणा, ममत्व समाज म्हणून आपल्याला, आणि यंत्रणा म्हणून राज्यसंस्थेलाही नसणं, याच एक महत्वाचं कारण म्हणजे, आपण रोजच एकमेकांना ‘गांडीत जा’ असं म्हणत, खरं तर एकमेकांप्रती व्यक्तिगत स्तरावर जिवंत असलेल्या करुणेची सामुहिक स्तरावर मात्र कत्तल करत असतो. व्यक्तिगत स्तरावर एकमेकांसाठी आपण सर्वच अजिबात वाईट नसतांना समाज मात्र असा हिंसेने का भरलेला आहे या प्रश्नाने आपण हळहळतो पण, उत्तर न सापडल्याने ‘माझा याच्याशी काही संबंध नाही’, किंवा मी एकटा/ एकटी काय करु अस म्हणत शेवटी वाट्याला आलेलं आपलं-आपलं आयुष्य आपण गपगुमान एन्जॉय करत राहतो, वरील सर्व शब्दांच्या सोबतीने.
भाषा विकासाच्या कोणत्या टप्प्यावर हे शब्द तयार झाले असावेत ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं तस अवघड आहे, पण ते का तयार झाले यासंबंधी मात्र काहीएक तर्क काढण नक्कीच शक्य आहे. कोणतीही भाषा ही केवळ संवाद मध्यम नसते. ती समाजव्यवस्थेतील सत्ताकारणाचा थेटपणे भाग असते. जगभरामध्ये इंग्रजी भाषेच वाढलेलं महत्व व प्रभाव हा साम्राज्यशाही सत्ताकारणाचा भाग आहे. भाषा ही त्या त्या समाज-संस्कृतीच प्रतिक असते किंवा त्या संस्कृतीच प्रतिनिधित्व ती करते. जसा समाज तशी भाषा असते, व ती तशाच समाजाला कायम ठेवण्यात, पुनर्जीवित करण्यात महत्वाची भूमिका निभावते. जगभरामध्ये पुरुषाचं स्त्रियांवर वर्चस्व असल्याने स्त्रीला दुय्यम लेखणारे, स्त्रीच्या एकांगी लैंगिक उपभोगाच समर्थन करणारे किंवा तिच्या लैंगिकतेबद्दल तुच्छतावाद निर्माण करणारे शब्द हे जगातल्या प्रत्येक भाषेत आपल्याला दिसतात.
एकूणच काय तर सामाजिक राजकीय व लैंगिक सत्ता संवर्धन करणे व त्यासाठी स्त्रियांबद्दल द्वेष, दुय्यमत्व व हीनता दर्शविणारे शब्द पुन्हा पुन्हा वापरणे ही पुरुषांची सत्ता अबाधित ठेवण्याची गरज असते. त्या गरजेपोटीच भाषेत अशा वेगवेगळ्या शब्दांचा उगम झालाय असं म्हणणं वावग ठरणार नाही. मुळात समाज जेंव्हा विषमतामूलक, द्वेषावर आधारलेला असतो, तेंव्हा त्या समाजातील भाषा ही त्या विषमतेची, द्वेषाची वाहक असते. आणि केवळ पुरुषसत्तेच्या संदर्भानेच नाही तर सर्व प्रकारच्या सामाजिक सत्ताकारणात भाषा ही अशा पद्धतीने सत्ताधारी वर्गाचं प्रतिनिधित्व करत ती सत्ता जतन करण्यात महत्त्वाचं योगदान देत असते.
लहान मुलांवर वाईट परिणाम होऊ नये, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून आपण नेहमीच धडपडतो, पण आपली भाषा ही आपल्यावरील संस्कारांचं एक प्रमुख माध्यम आहे हे मात्र सोयीने विसरतो. आपली भाषा आपलं भोवताल निश्चित करत असते. आपली भाषा ही समूह-संस्कृतीचा एक प्रमुख भाग असते. कोणतीही विषमता, हिंसा ही केवळ राजकीय प्रक्रियेचा भाग म्हणून अस्तित्वात असते किंवा वाढीस लागते असे नाही तर ती समूह-संस्कृतीच्या वेगवेगळ्या स्तरावर विकसित होत जाते. भाषा ही समूह संस्कृतीचे प्रमुख अंग आहे. म्हणूनच जेंव्हा विषमता ही राजकीय धोरणांत असते, तेंव्हा ती साहित्य आणि भाषेतही येते.
त्यामुळेच विषमतेला विरोध करतांना विषमतापोषक भाषा किंवा तिच्यातील शब्दांच्या वापराला नकार द्यावा लागतो. पण हा नकार विधायक असावा लागतो, शिवाय तो केवळ त्या शब्दांपुरता असून चालत नाही. म्हणजे आजकाल काही स्त्री पुरुष समतावादी लोक स्त्रीयांवरून शिव्या न देता ‘बापघाल्या’ वगैरे शब्द वापरावेत असं म्हणत आता पुरुषकेंद्री शिव्या-शब्दांची निर्मिती करायला हवी अस म्हणत आहेत. एक तर अशी निर्मिती समाज पातळीवर प्रभाव पाडू शकेल इथपत ती कधी होणारच नाही, कारण समाज मुळात पितृसत्ताक आहे आणि त्यामुळे त्याची भाषाही तशीच असणार. एखादी गोष्ट नाकारतांना तिला लगेच पर्याय हवा याची फारच घाई आपल्याकडे होते. त्यामुळे केवळ शब्दांची अदलाबदल केल्याने मूळ हिंसेचा विचार संपणार नाही हे लक्षात घ्यायला हवे. आणि कोणत्याही रूपाने हिंसेचा विचार जेंव्हा अस्तित्वात असतो तेंव्हा प्रत्यक्षातल्या हिंसेचं स्वरुप ‘बळी तो कानपिळी’ ह्या म्हणी प्रमाणे ‘सत्ताधारी वर्गाकडून सत्ताहीन वर्गावर होणारी हिंसा’ असेच असते. त्यामुळे मूळ हिंसेला नकार देणं हाच त्यावरील उपाय असू शकतो, आणि तो हिंसासमर्थक भाषा, शब्द नाकारण्यातूनच पुढे जाऊ शकतो. त्यामुळे या सर्वच स्तरावर एका बाजूला हिंसेच समर्थन करणारं वा तिला वाढीस लावणारं साहित्य, विचार, भाषा, शब्द आणि दुसऱ्या बाजूला हिंसेला विरोध करणार साहित्य, विचार, भाषा आणि शब्द अशी प्रत्यक्ष विभागणी आपल्याला करावीच लागते. आणि या विभागणीत आपण कोणत्या गटाचे प्रतिनिधी आहोत हे आपल्याला ठरवावं लागतं.
आणि जरी या विभागणीत आपण स्वत:ला हिंसाविरोधी गटाचे प्रतिनिधी समजत असलो व प्रत्यक्ष हिंसेत कुठेही सहभागी होत नसलो तरीही आपली एकूणच रोजची विचार-अभिव्यक्ती व भाषा कोणत्या गटाला पोषक अशी संकृती निर्माण करते याची शहानिशा आपणच करण आवश्यक आहे, त्याशिवाय आपण पूर्णत: हिंसाविरोधी आहोत असं म्हणण ही स्वतःची व मुख्य म्हणजे हिंसापिडीतांची फसवणूक केल्यासारखे होईल.