Europe

रसायनांमुळं शेतीतील जैवविविधता धोक्यात

जैविविधतेबाबत संयुक्त राष्ट्रसंघाचा सखोल जागतिक अहवाल

Credit : ec.europa.in

जगभरात अन्नधान्य म्हणून शेतीमध्ये लागवड केल्या जाणाऱ्या ६००० प्रजाती आहेत. परंतू प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून फक्त २०० प्रकारच्या प्रजातींची लागवड केली जात आहे. म्हणजेच उरलेल्या सर्व प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर जगभरातील एकूण धान्य उत्पादनाच्या दोन तृतियांशपेक्षा जास्त  प्रमाणात एका ठरावीक नऊ प्रकारच्याच पीकांची लागवड शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

जगभरातील जैवविविधता धोक्यात आल्याचं सूचक विधान करणारा एक अहवाल शुक्रवारी, २२ तारखेला प्रसिद्ध झाला. ‘द स्टेट ऑफ वल्डर्स बायोडायवर्सिटी फॉर फुड एन्ड एग्रीकल्चर २०१९’ या नावाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या फुड एन्ड एग्रिकल्चरल ऑर्गनायजेशन या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ५७६ पानांच्या अहवालात शेती, गुरे, जनावरे आणि मासेमारी करणारे शेतकरी, जंगल परिसंस्था आणि जैवविविधतेविषयी अनेक महत्त्त्वाच्या मुद्द्यांवर संशोधन आहे. जैविविधतेच्या सद्यस्थितीवरून भविष्याबद्दल भाष्य करण्याचं या अहवालात नेमकेपणाने मांडलेलं नाही,  मात्र अनेक देशांमध्ये एकाच प्रकारची पीकं घेण्यात येत असून त्याचा शेतीविषयीच्या जैविविधतेवर नकारात्मक परिणाम होत आहे हा मुद्दा यात अग्रक्रमाने मांडला गेलाय.

संयुक्त राष्ट्रसंघाने २०११-२०२० हा दहा वर्षांचा काळ ‘जैवविविधता दशक’ म्हणून जाहीर केला. पर्यावरणातील जैवविविधता किंवा जैविक विविधता याच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. १९६८ साली रेमंड दासमन या जीवशास्रज्ञाने ‘ए डिफरन्ट काइंड ऑफ कंट्री’ या पुस्तकात पहिल्यांदाच जैवविविधता हा शब्द वापरला. ढोबळमानाने जैवविविधता म्हणजे सजीवांमधील जाती-विविधता आणि जातीमधील संपन्नता. वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी अन्नधान्य पीकांच्या जातीची जैवविविधता महत्वाची आहे. एखादा कीडीला प्रतिकार करण्याची, बदलत्या पर्यावरणीय परिस्थिकीशी (इकोसिस्टमला) जुळवून घेण्याची क्षमता पिकांमध्ये नैसर्गिकपणे असण्यात जैविविधता महत्त्वाची असते.

द्राव्य स्वरुपातील रासायनिक खते तसेच कीटकनाशके यांचा पिकांसाठी होणारा वारेमाप वापर ही कृषिक्षेत्रातील पीकांच्या वाणात आढळून येणारी जैवविधता धोक्यात येण्याचं महत्वाची कारणे आहेत.

जागतिक स्तरावर पहिल्यांदाच अभ्यासलेल्या या अहवालात जैवविविधतेवर परिणाम करणाऱ्या घटकांची चर्चा केलेली आहे. लोकसंख्यावाढ, अन्नधान्याचं विक्रमी उत्पन्न घेताना जमिनीची होणारी धूप, जमिन व जलव्यवस्थापनाविषयीचे नवे बदल, कीटकनाशकांचा वाढता वापर, उपद्रवी कीटक, पीकांवरील नवे रोग, वातावरण बदल, प्रदुषण, नैसर्गिक आपत्ती, बाजारव्यवस्था, व्यापार आणि खाजगी कंपन्याकडून जैविक स्रोतांची होणारी ओरबड हे मुद्दे अभ्यासात नमूद करण्यात आले आहेत.

शहराकडे विस्थापित झालेला एक मोठा समुदाय अन्नधान्य विकत घेतो. लोकं काय विकत घेतात हे ठरवून तेच शेतकरी पिकवतात. अन्नधान्य म्हणून उत्पादित केली  जाणारी वेगवेगळी पिके नामशेष होताहेत असं या अहवालात म्हटले आहे.

उदाहरणार्थ. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका ह्याच पीकांची अन्नधान्य म्हणून बाजारात असलेली मागणी पाहता तीच पिके शेतकरी पिकवत आहेत. असं केल्यामुळे पीकांच्या अनुवांशिक जैवविविधतेवर त्याचा नकारात्मक परिणाम होतोय. आकडेवारीचा विचार करता जगभरातील ६,००० अन्नधान्य पीकांपैकी ऊस, गहू, मका, बटाटे, सोयाबीन, साखरेसाठी वापरले जाणारे बीट अन तेलबिया या उत्पादनाचा वाटा तब्बल ६६ टक्के आहे.   

एकाच खाद्य पीकांमध्ये जैविविधता नसल्याने एकाच प्रकारची कीड येऊन अख्खं पीक नष्ट होण्याची शक्यता होऊन अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते. आयर्लंडचे पोटॅटो फॅमिन हे एक उदाहरण. Hytophthora Infestans कवकाच्या (Fungus) किडीमुळे देशातील बटाट्याचे अपरिमित नुकसान झाले. बटाटे हे लोकांचं मुख्य अन्न होतं. कित्येक लोकं उपासमारीने गेली.

आपली जैवविधता टिकवून ठेवणाऱ्या एकूण सजीवांपैकी ६३ टक्के वनस्पती प्रजाती, ११ टक्के पक्षी, ५ टक्के मासे व कवकांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.   परागीकरणाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणा-या मधमाश्यांसारख्या अनेक प्रजातींचा अधिवास संपला आहे. मातीत आढळणारे जीव आणि मातीतील पोषद्रव्यातील गुणधर्म आणि जैविविधता हा मुद्दा या अहवालात गांभिर्याने येतो.

biodiversity

या अहवालात ९१ देशातून माहिती गोळा करण्यात आली. अंतिम अहवाल तयार करतांना इतर २७ सर्वेक्षणांचा आधार घेण्यात आला. यात तबब्ल १३०० लोकांनी काम केलं. जगभरातल्या अनेक संस्थातले १७५ विशेषज्ञांचंदेखील या कामात योगदान आहे.

यात नोंदवलेले मुद्दे

  • जैवविधतेचं संवर्धन करणं, खासकरून अन्न आणि कृषि क्षेत्रात, फार महत्त्वाचं आहे.
  • जैवविधतेला धोका पोहचवणारे अनेक घटक गांभिर्यानं लक्षात घ्यावे लागणार आहेत.
  • कृषिपीकांमधील जैवविविधता झपाट्यानं नष्ट होत आहे.
  • जैवविविधतेचं संवर्धन व्हावं म्हणून काही सकारात्मक प्रयत्नही होत आहेत.
  • जैविविधतेचा शाश्वत वापर करून तिच्या संवर्धनासाठी कृतिआराखडा तयार करण्याची गरज आहे.

पर्यावरणाच्या पुस्तकात शालेय अभ्यासक्रमात कधीतरी चर्चेला घेतला जाणारा जैवविधता हा विषय दारात समोर उभा येऊन ठेपला आहे. या अहवालानंतर जागतिक स्तरावर यावर चर्चा सुरू झाली आहे. या अहवालानंतर भारतासारख्या कृषिप्रधान देशाने अन्नसुरक्षा आणि शेतकऱ्यांचं हित हे दोन्ही जपण्यासाठी जैवतंत्रज्ञान, जनुकीय तंत्रज्ञान यांचा विचार करतानाचा जैवविविधता हा विषय गांभिर्याने घेण्याची गरज आहे.