India
मुंबईत ३ दिवसांपासून ‘बेस्ट’ कर्मचारी संपावर
मराठी कामगारांच्या संपाचा शिवसेनेने काढून घेतला पाठिंबा
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मोठा भार वाहणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून साधारण ४० हजार बेस्ट कर्मचारी संपावर गेले आहेत. आज संपाचा तिसरा दिवस आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आज एकही बेस्ट बस धावू शकली नाही. शिवसेनेच्या बेस्ट वर्कर्स युनियनने संपांचा पाठिंबा काढून घेऊन संपफुटीचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरल्याने आज बुधवारीही बेस्ट बस सेवा ठप्प राहिली. चालक - वाहकांनी एकजुटीने यशस्वी केलेल्या संपाचं गांभीर्य लक्षात घेऊन बेस्ट प्रशासनानं अजूनही कर्मचाऱ्यांच्या मागण्या- संप यावर तोडगा काढला नाही. संपात सहभागी कर्मचार्यांशी बोलणी करण्याऐवजी त्यांच्यावर ‘ मेस्मा’ कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना बेस्ट वसाहतीतली घरं खाली करण्यासाठी बुधवारी बेस्ट प्रशासनानं नोटीस दिल्या आहेत. भोईवाड्यातील ज्या कर्मचाऱ्यांना या नोटीस देण्यात आल्या, त्यांच्या कुटूंबीयांसह इतरही कर्मचारी व त्यांची कुटूंबे एकजुटीने घरं खाली करण्याच्या नोटीसविरोधात उभी राहिली.
बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी काही प्रमुख मागण्या केल्या आहेत, प्रशानाने त्या मान्य कराव्यात, यासाठी बेमुदत संपाची हाक दिली आहे. बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबतच्या मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करावी. २००७ पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची ७,३९० रु. सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी.एप्रिल २०१६ पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू कराव्यात. २०१६-१७ आणि १७-१८ साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा. कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा. अनुकंपा तत्वावरील भरती तातडीनं सुरू करावी. या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागण्या आहेत.
बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बेस्ट मुख्यालयात बोलावलं होतं, मात्र या चर्चेतूनही तोडगा काढण्यात बेस्ट प्रशासन अयशस्वी ठरलं. अद्यापही या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाशी बोलणी सुरु आहेत.
दरम्यान शिवसेनेची कर्मचारी युनियन असलेल्या बेस्ट कामगार सेनेने या संपाला पाठिंबा का दिला नाही, याबाबत युनियनचे अध्यक्ष सुहास सामंत यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं, "संपाअगोदरच्या बैठकीला इतर सर्व युनियन्सच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला बोलावलं नव्हतं. तरी आम्ही कामगारांच्या प्रश्नासाठी पहिल्या दिवशी संपात सहभागी झालो. हा एकदिवसीय संप यशस्वी झाला. मात्र जेव्हा बेस्ट महाव्यवस्थापकांकडे आम्ही चर्चेसाठी गेलो, तेव्हा आम्ही संप फोडणारे आहोत, असं आमच्याबाबतीत माध्यमांसमोर बेस्ट संयुक्त कृती समितीच्या शशांक राव यांनी सांगितलं," व पुढे म्हणाले, "त्यामुळे आम्ही आमच्या ११,००० कामगारांना कामगारांना कामावर रुजू व्हायला सांगितलं. कामगारांच्या अडचणी पाहता आमचा संपाला नैतिक पाठिंबा आहे. मात्र संपात आम्ही सहभागी नाही. आता शशांक राव यांनीच नेतृत्व करावं आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करुन आणाव्या. मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून संपातून त्यांनी कामगारांसाठी काय पदरी पडतं, ते घेऊन यावं.”
शिवसेनेच्या या कर्मचारी युनियनच्या भूमिकेने काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बेस्ट संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर सेनेच्या युनियनवर संपफुटीचा आरोप केला तर त्याच वेळी या युनियनं म्हणजेच बेस्ट कामगार सेनेच्या नेत्यांनी आपली भूमिका व आपला संपातला सहभाग - पाठिंबा माध्यमांसमोर का सांगितला नाही? ११,००० सदस्य असणाऱ्या बेस्ट कामागार सेनेला त्यांची संपाबाबतची सुरुवातीची पाठिंब्याची भूमिका एखाद्या पत्रकार परिषदेतूनही सांगता आली असती, तसं का केलं गेलं नाही? आपल्यावर संपफुटीचा आरोप झाला तर तो चुकीचा आहे, आणि आपला संपात सहभाग असेल अशी भूमिका घेण्याऐवजी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांऐवजी मानापमान नाट्य जास्त महत्वाचं का वाटावं?
मराठी माणसाच्या मुद्द्यावरुन राजकारण करणाऱ्या सेनेला मराठी कामगारांच्या हिताचा प्रश्न यावेळी का महत्वाचा वाटला नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे मु्ंबईतील प्रवाशांचे हाल झाले आहेत, त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी याचिकाही बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान हा वृत्तांत लिहिताना, कर्मचाऱ्यांच्या मागण्या व संप या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासन - मुंबईचे महापौर आणि बेस्ट संयुक्त कृती समितीची सध्या महापौर निवासस्थानी बैठक सुरु होती.