India
महाआघाडीतच माकप - राष्ट्रवादी आमने सामने
दिंडोरी मतदारसंघातून माकपकडून जे.पी. गावित लढणार
लोकसभा निवडणुकांसाठी महाआघाडीतल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानं लोकसभेसाठी उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या. यामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीनं धनंजय महाले यांना उमेदवारी दिली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा या मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास पारंपरिक मतदार आहे. यावेळी ही जागा माकपसाठी सोडावी, तिथं कॉंग्रेस - राष्ट्रवादीनं उमेदवार न देता पाठिंबा द्यावा अशी माकपची इच्छा होती. मात्र राष्ट्रवादीनं तिथं उमेदवार दिला आहे.
या मतदारसंघातून माकपकडून प्रबळ दावेदारी आणि कळवण विधानसभा मतदारसंघाचे सध्या आमदार असणारे जीवा पांडू गावित यांच्याशी इंडी जर्नलनं संपर्क केला असता ते म्हणाले, “राष्ट्रवादीनं इथं उमेदवार देण्यापुर्वी आमच्याशी काहीच चर्चा केली नव्हती. या भागात माकपचं सुरुवातीपासूनच चांगलं काम आहे. सव्वा ते दीड लाख नेहमीचा मतदार आमच्यासोबत आहे. याचा विचार त्यांनी करायला हवा होता. आम्ही दिंडोरी मागितलं त्यांनी पालघर सांगितलं. तरीही आम्ही कोणत्याही परिस्थितीत लढणार आहोत. त्यांनी अजूनही विचार करावा.”
दिंडोरी मतदारसंघाबाबत गावित म्हणाले, “या भागात पाण्याचं मोठं दुर्भिक्ष्य आहे. माकपने या भागाला पाणी मिळण्यासाठीच्या योजनांपासून ते अगदी वस्ती वस्तीवरच्या गरीब घरांना संजय गांधी निराधार योजनेसारख्या अनेक योजनांचा लाभ मिळावा, यासाठी घरोघरी जाऊन काम केलेलं आहे. लोकांमध्ये आमचा चांगला प्रभाव आहे. या एका जागेसाठी राष्ट्रवादीनं नीट विचार करायला हवा होता. त्यांनी दिलेला उमेदवार कसा आहे, तो कोणत्या निकषांवर दिला हे आमच्यासह इथल्या लोकांनाही चांगलं माहित आहे. आमचं इथलं किसान सभेचं काम, भूमिहीनांसाठीचं काम, वनजमिनींचे निकाली काढलेले दावे, लॉंग मार्चचं आयोजन सगळं लोकांना माहित आहे. जनता मतदानातून उत्तर देईलच.”
जे.पी गावित
माकपनंही ही जागा लढवायचीच असा निर्धार केला असल्याचं काल जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीतून स्पष्ट झालं आहे. दिंडोरीतून गावित यांना उमेदवारी दिल्याचं पक्षानं काल जाहीर केलं आहे. महाआघाडीनं उमेदवार न देता या जागेसाठी माकपला पाठिंबा द्यायला हवा होता. त्यासाठी किमान चर्चा तरी करायला हवी होती, अशी भावना माकप कार्यकर्त्यांच्या मनात आहे. समाजमाध्यमांवरही याचे पडसाद उमटलेले दिसले. तर या मतदारसंघातून राष्ट्रवादीनं उमेदवारी दिलेले धनंजय महाले पुर्वी शिवसेनेत होते. त्यांच्या पक्षांतराचा तसंच डॉ. भारती पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी न दिल्यानं भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. दिंडोरी मतदारसंघात भाजपला कडवं आव्हान देत असताना या पक्षातून त्या पक्षात जात असणाऱ्यांना उमेदवारी दिल्यानंही माकप कार्यकर्त्यांच्या मनात नाराजीचा सूर दिसतो.
राज्यात महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि माकपमध्ये ही परिस्थिती असताना पश्चिम बंगालमध्येही कॉंग्रेस आणि माकपचं बिनसल्याचं चित्र आहे. जागांच्या मुद्द्यावरुनच पश्चिम बंगाल कॉंग्रेसचे अध्यक्ष सोमेंद्रनाथ मित्रा यांनी माकपसोबत निवडणकपूर्व युती संपुष्ठात आल्याचं जाहीर केलंय. रायगंज आणि मुशीर्दाबादच्या जागांवरुन आधी माकप आणि कॉंग्रेसमध्ये बरीच चर्चा झाली, त्यानंतर या दोन जागा माकपला सोडण्याचं कॉंग्रेसनं आश्वासन दिलं. मात्र त्यानंतर माकप ३१ जागांवर लढणार आणि कॉंग्रेस १२ जागांवर अशा प्रस्तावामुळे कॉंग्रेसनं एकत्र न लढण्याचा निर्णय कॉंग्रेसनं जाहीर केला आहे. त्यात माकपनं २५ जागांवर उमेदवारांची घोषणा केल्यानं कॉंग्रेसनं स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. याचा फायदा तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपला होण्याची शक्यता तर राज्यात दिंडोरी मतदारसंघातली महाआघाडीची मतं माकप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विभाजित होऊन भाजपच्या उमेदवाराला त्याचा फायदा होण्याची शक्यता निर्माण झालीय.