India
बारीपाडा साधतंय शाश्वत विकास
धुळयातल्या साक्री तालुक्यातल्या ‘बारीपाडा’ गावाचं बदललेलं रुप.
पुणेः जगातील 78 देशांमध्ये पर्यावरण संवर्धन व त्याआधारे शाश्वत विकास कसा असावा याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमधून धुळ्यातील बारीपाडा गावाला व्दितीय क्रमांकाचा मिळाला आहे. यासोबतच बारीपाडा प्रकल्पाला अत्यंत मानाचा समजला जाणारा IFAD या आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे. यानिमित्ताने बारीपाडा गावातील आदिवासींच्या लोकचळवळीतून गावाचं रुप कसं बदललं, या प्रवासाबदद्ल सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांनी पुण्यात लोकांशी संवाद साधला.
धुळे जिल्ह्यातला बारीपाडा नावाचा आदिवासी पाडा १९९२ पूर्वी पू्र्णपणे उजाड होता. लोकांनी एकत्र येऊन पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या या परिसरात श्रमदानातून ४७० पेक्षा जास्त दगडी बंधारे, सलग समतल चर बांधले. जंगलातल्या घनदाट झाडांमुळे पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे या गावांसह परिसरातल्या इतर ८ गावांना पाणी पुरवठा होत आहे. “एकेकाळी बारीपाडयासाठी मांजरी गावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असे, परंतू आता बारीपाडयातून इतर गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातला दुर्गम असा बारीपाडा हा वनवासीपाडा आहे. बारीपाडाच्या विकासाची लोकचळवळ गावातल्या आदिवासींनी एकजुटीमुळे यशस्वी झाली आहे”, असं चैत्राम पवार यांनी सांगितलं.
या लोकचळवळीचं एक वैशिष्ट्य म्हणजे गावाच्या शेजारी ४४५ हेक्टर वन जमिनीवर लोकसहभागातून जंगल वनसंवर्धन होतंय.. त्यामुळे जैविक विविधता निर्माण करण्यात यश मिळालं. हे कसं शक्य झालं याबद्दल पवार पुढे सांगतात,” गावाने गावकऱ्यांसाठी काही कठोर नियम तयार केले. त्यासाठी गावक-यांशी सल्लामसलत करुन मग नियम बनवले. त्यात चराईबंदी, झाडांवर कुऱ्हाडबंदी, दारुबंदी केली. याचं कोणीही उल्लंघन केलं तर त्यांच्याकडून मोठया प्रमाणात दंड वसूल केला जातो. त्यामुळे अनेक प्राण्यांना, पक्षांना हक्काचं जंगल मिळून दुर्मिळ वनौषधी तसंच वनस्पतींचं संवर्धन झालं.” ते पुढे शेतीच्या परिस्थितीबद्दल सांगतात, “ पाण्याच्या मुबलक पुरवठयामुळे बागायती पिकांचं प्रमाण वाढलं. यात भात, नागली यांचं विक्रमी उत्पादन होऊ लागलं.
ऊस, कांदा, बटाटा यासारख्या नगदी पिकांचंही उत्पादन होऊ लागलंय. इथं स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वीपणे सुरु झालाय. पशुधनातही मोठया संख्येनं वाढ होऊन शेळी-पालन, कुक्कूटपालन, म्हैसपालन, मत्स्यव्यवसाय यांसारख्या शेतीपुरक व्यवसायांची जोड मिळाल्यानं लोकांच्या आर्थिक उत्पन्नही वाढलंय. रस विहिरीत गूळ तयार करणं, नागली पापड, दोर, पत्रावळी, दुग्धजन्य पदार्थ, बासमती तांदूळ , इंद्रायणी तांदूळ गावातच लोक तयार करु लागलेत. या पदार्थ, वस्तूंची मोठया शहरांतमध्ये चांगली विक्री होतेय.
पर्यावरण संवर्धनाने गावाचा आर्थिक विकास तर होत आहेच पण सामाजिक बदलासाठीही काही उपक्रमांच्या माध्यमातून काम होतंय. प्रौंढासाठी रात्रशाळा सुरु केली आहे. इथं १८ वर्षांपेक्षा जास्त काळापासून महिला बचत गट आणि पुरुष बचत गटही सुरु आहेत. गावात महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, सकस आहार, स्वच्छता, जलसाक्षरता, शौचालयाचा वापर, आरोग्यासबंधी जागृतीचे अनेक उपक्रम नियमित राबवले जाऊ लागले. पिण्याच्या पाण्याचं निर्जंतुकीकरण, लहान मुलांच्या लसीकरणाचा सातत्यानं आग्रह यामुळे एकंदरित गावाचं आरोग्य सुदृढ राहतं. कुटूंबकल्याण विभागाच्या तसंच कुंटूंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यामध्ये पुरुषांचं प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे
गावात सामूहिकरित्या सौर कुकर वापराचा प्रयोग सुरु आहे. सौर कुकरची ५० युनिट गावात आहेत. तसंच बायोगॅस निर्मीतीची ३ सयंत्रही सुरु असून त्यापासून गावासाठी वीज निर्मितीची प्रक्रिया सुरु आहे. एकूणच लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाकडे कशी वाटचाल करता येऊ शकते, यासाठी बारीपाड्याचं उदाहरण महत्वाचं आहे.