Quick Reads
फ्रेडी : संगीताचा अनभिषिक्त 'क्वीन'
फ्रेडी मर्क्युरीचा आज स्मृतिदिन

२४ नोव्हेंबर १९९१ ला फ्रेडी मार्क्युरीचा मृत्यू झाला तेव्हा मी जन्मून ३ दिवस झाले होते. अर्थात मला फ्रेडी मर्क्युरी माहित नव्हता, अगदी वर्षभरापूर्वीपर्यंतही माहित नव्हता. पण मी फ्रेडीबद्दल लिहू शकतो कारण त्याच्या जन्माच्या ७१ वर्षानंतरही (५ सप्टेंबर १९४६) तो माझ्याशी बोलतो. त्याच्या गाण्यांमधून, त्याच्या एकेका शब्दातून आणि आवाजाच्या आर्त फेकेतून. फ्रेडी मर्क्युरी साधसुधा गायक नव्हता, फ्रेडी जादुगार होता, ज्यानं १९८५ मध्ये ७२,००० लोकांना एकाच वेळी, एका स्टेडीयममध्ये स्वतःच्या जादूने एकसुरात गायला आणि टाळ्यांच्या तालात थिरकायला लावलं. ज्याच्या नावाने एका धुमकेतूचं नामकरण झालं आणि ज्याच्या आवाजाला ध्वनी तज्ञांनी अभ्यासांती, 'अद्वितीय आवाज' अशी पदवी देऊ केली...फ्रेडी मर्क्युरी जादुगार तर होताच, पण फार कमी लोकांना माहितीये, की तो भारतीय वंशाचा होता.
फारोख बलसाराचा जन्म १९४६ मध्ये पूर्व आफ्रिकेतल्या झांजीबार येथे झाला. त्याचे वडील बोमी आणि जेर, गुजरातच्या वलसादचे होते. त्यावरूनच त्यांचं आडनाव 'बलसारा'. फारोख लहान असताना आईवडिलांसोबत भारतात राहायला आला.पाचगणीच्या सेंट पीटर्स शाळेत त्यानं शिक्षण घेतलं. त्याच्या तारुण्यात तो परिवारासह ब्रिटनमध्ये स्थायिक झाला. तिथं त्यानं अनेक शालेय रॉक ग्रुप्समध्ये सहभाग घेतला आणि नंतर 'द हेक्टिक्स' नावाचा स्वतःचा एक बॅँडही स्थापन केला. पुढं त्यानं संगीतात करियर करायसाठी घर सोडलं. त्याच्यासोबत त्याची प्रेयसी मेरी ओस्टीन होती. त्याने तिच्यासोबत कधी शर्ट विकण्याचा छोटा व्यवसाय तर कधी एअरपोर्टवर छोट्यामोठ्या नोकऱ्या केल्या.
१९७० मध्ये त्यानं ब्रायन मे आणि रॉजर टेलर यांच्यासोबत 'क्वीन' बॅँड स्थापन केला. फ्रेडीचा अफाट आवाज, गाण्यांचे काळजाला हात घालणारे शब्द आणि उत्तम संगीतजुळणी यांनी लवकरच 'क्वीन' गाजू लागलं. काही वर्षातच त्यांची गाणी जगभरच्या संगीतप्रेमीना झुलवू लागली. फ्रेडी आपल्या आवाजानं जगावर अधिराज्य गाजवत होता. फ्रेडी समलैंगिक होता. त्याला स्वतःला याची जाणीव झाल्यावर त्यानं त्याच्या प्रेयसीला, मेरीला ही गोष्ट सांगितली ज्यानंतर ते वेगळे झाले. मात्र मेरी त्याची आयुष्यभराची मैत्रीण झाली. तो तिच्याबद्दल म्हणतो "मी सर्वाना सांगायचो. माझी फक्त एक मैत्रीण आहे, ती मेरी. तिचा आणि माझा तसा सामाजिक विवाहच होता. मी तिच्याशी मनातून लग्नच केलं होतं."
त्यानं अनेक समलैंगिक संबंध ठेवले. रॉकस्टारचं असतं तसं स्वच्छंद आयुष्य तो जगला. एका ऑस्ट्रियन नटीसोबतही त्याचे प्रेमसंबंध होते. मात्र त्यानं कधी उन्मत्तपणा दाखवला नाही. त्याच्याबद्दल सर्वच लोक सांगत, तो लाजाळू, एकलकोंडा होता. स्टेजवर असणारा फ्रेडी आणि व्यक्तिगत आयुष्यातला फ्रेडी खूप वेगळे होते. मात्र त्याचा सर्वात दृढ आणि जवळचा प्रियकर आणि विवाहाने झालेला जीवांसाठी म्हणजे जिम हटन. १९८६ मध्ये फ्रेडीला एच.आय.व्ही असल्याचं कळलं. जिम हटनसुद्धा एच.आय.व्ही ग्रस्त होता. फ्रेडीच्या आयुष्याची शेवटची काही वर्ष उरली होती. मात्र फ्रेडी तरीही सर्व झुगारून स्टेजवर येत होता, गाणी म्हणत होता आणि जवळच्या लोकांना भरभरून प्रेम देत होता. कदाचित हे सगळं वाचून तो भारतीय असल्याचा गर्व बाळगावा की आपल्या संकुचित नजरेतून त्याच्या समलैंगिक असण्यावर खिजावं, हे अनेकांना कळणार नाही. पण असो.
आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही फ्रेडी तितकंच उत्साही होता. ब्रायन मे त्याबद्दल म्हणतात, "फ्रेडी म्हणत असे, 'माझ्यासाठी आणखी लिहा. लिहित राहा. मला फक्त गायचं आहे आणि ते झालं, मी निघून गेलो, की तुम्ही ते पूर्ण करा.' फ्रेडीला भीती नव्हतीच असं वाटायचं." फ्रेडीनं क्वीन सोबतचं आपलं काम जून १९९१ मध्ये थांबवलं. त्यानंतर त्याची तब्येत बिघडत गेली. स्वतःचा मृत्यू स्वीकारून त्यानं औषधं आणि अन्न घ्यायचं बंद केलं. २२ नोव्हेंबर रोजी त्यानं सावतःला एड्स असल्याचं एका पत्रकातून जाहीर केलं. २४ तारखेला, वयाच्या ४५ व्या वर्षी फ्रेडी निघून गेला.
फ्रेडीची गाणी आजही जगाला भुरळ घालत आहेत. फ्रेडीनं म्हटलेलं 'वी आर द चॅम्पियंस' असो किंवा 'वि विल रॉक यू' असो, या गाण्यांनी उर्जेला अनेकपटीनी उभार दिला. 'बोहेमियन र्हेपसोडी' मधून त्यानं शेकडो प्रकारच्या लायी एकत्र केल्या आणि एका अद्भुत अनुभवाला जन्म दिला. 'आय वॉन्ट टू ब्रेक फ्री' मधून त्यानं आपल्या सगळ्यांच्या घुसमटीला शब्द दिले आणि एच.आय.व्हीचा सामना करत आयुष्याच्या शेवटाकडे प्रवास करताना, स्वतःचा मृत्यू स्वीकारून 'द शो मस्ट गो ऑन' म्हणत रडवून गेला....
फ्रेडी मर्क्युरी अजूनही मला तुम्हाला थिरकवू शकतो, हसवू शकतो, घरी एकटं असताना किंवा नसताना नाचायला लाऊ शकतो आणि अनेकवेळी डोळ्याची कड ओलसरही करून जाऊ शकतो...फ्रेडी मार्क्युरी अजूनही जिवंत आहे आणि त्याचं संगीत निखळ पाण्यासारखं प्रवाही...या प्रवाहात तुम्हीही सामील व्हाल अशी अपेक्षा....
त्याचा जीवनपट 'बोहेमीयन ऱ्हापसोडी' या आत्ता प्रदर्शित झालेल्या सिनेमातून तुम्ही पाहू शकता, मात्र तोपर्यंत, माझी फ्रेडीची काही आवडती गाणी :
१. वी विल रॉक यु.
२. 'वी आर द चॅम्पियंस
३.बोहेमियन र्हेपसोडी
४.आय वॉन्ट टू ब्रेक फ्री
5.द शो मस्ट गो ऑन