India

पोलिसांना न जुमानता अल्पवयीन तरुणीचा विवाह

कंजारभट समाजाच्या एका कुटुंबात १५ वर्षाच्या मुलीचं लग्न लावून देण्यात आलं आहे

Credit : इंडिया टाइम्स

पुण्यातील वाघोली परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आला आहे. १५ वर्ष वय असणारी ही मुलगी कंजारभाट जमातीची असून ती वाघोली परिसरात तिच्या आई – वडिलांसोबत राहत होती. मुलीचे आई वडिल दारुविक्रीचा पारंपरिक व्यवसाय करतात. रावळकर (मुलीचे) कुंटूंबियांनी कोल्हापूरला नेऊन तिचे लग्न लावले आहे.

याबाबत कंजारभाट समाजातील एका सजग सामाजिक कार्यकर्त्याला समजले असता, त्याने कोल्हापूरमधील एका स्थानिक पत्रकाराच्या मदतीने चाईल्डलाईनला संपर्क करुन हा प्रकार कळवला. १२ डिसेंबरला कोल्हापुरातील राजेंद्रनगर येथे मुलीचा विवाह होणार होता. तशा लग्नपत्रिकाही वाटल्या गेल्या होत्या. मात्र चाईल्डलाईनने बाल कल्याण समितीला कळवले होते. कोल्हापूर बाल कल्याण समितीने राजारामपुरी पोलिसांची मदत घेऊन घटनास्थळी जाऊन ते लग्न रोखलं. त्यानंतर बाल कल्याण समितीने मुलीचा जबाब नोंदवून तिच्या आई – वडिलांनाही समज दिली. १८ वर्ष पूर्ण होण्याआधी मुलीचे लग्न करणार नाही, अशी लेखी हमीसुद्धा बाल कल्याण समितीने तिच्या आई – वडिलांकडून लिहून घेतली.

त्यानंतर मुलीसह आई – वडिलांना घरी पाठवण्यात आले. मात्र त्याच दिवशी म्हणजे १२ डिसेंबरला रात्री मुलीच्या पालकांनी कोल्हापूरमध्येच एका मंदिरात नेऊन गुपचूप तिचे लग्न लावले पण पोलिसांच्या, बाल कल्याण समितीच्या भीतीपोटी तिला अजून सासरी पाठवलेले नाही, अशी माहिती कंजारभाट समाजातील एका सामाजिक कार्यकर्त्यांने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर इंडी जर्नलला दिली. (मुलीची लग्नपत्रिका व शाळेचा दाखला – वयाचा पुरावा इंडी जर्नलने तपासला आहे.) इंडी जर्नलने मुलीच्या आईशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन संपर्काबाहेर असल्याने त्यांचे याबाबतीतले म्हणणे समजू शकले नाही.

या मुलीचे गुपचूप लग्न लावण्यात आल्याचे समजल्यानंतर याबाबत कोल्हापूरच्या बाल कल्याण समिती अधिकारी दिलशाद मुजावर यांना याबाबत विचारले असता, त्यांनी माहिती दिली, १२ डिसेंबरला मुलीच्या आई – वडिलांना बाल कल्याण समितीसमोर हजर करुन समजावण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मुलीच्या वयाचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असे सांगितले होते. यावेळी त्यांच्याकडून मुलीला १८ वर्ष पूर्ण होण्याआधी तिचे लग्न करणार नाही, असे हमीपत्रही आम्ही लिहून घेतले. यानंतरही मुलीचे लग्न लावले गेल्याचे तोंडी माहिती आम्हाला मिळाली आहे. मुलीच्या वयाचा दाखलाही आज मिळाला आहे. आम्ही पोलिसांना मुलीच्या लग्नाबाबतचा तपास करुन माहिती सादर करण्याचे आदेश देणार आहोत. ती माहिती आल्यानंतर बाल कल्याण समितीकडून कारवाईचे आदेश देण्यात येतील.

हे प्रकरण पुढे आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले,‘पुण्यासारख्या शहरात बालविवाह करणं अवघड गेलं असतं, शिवाय इथे पटकन पोलिसांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं असतं, त्यामुळे मुलीचे आई वडिल तिला कोल्हापूरला घेऊन गेले’. मात्र ही गोष्ट लक्षात येताच, चाईल्डलाईनशी संपर्क केला. बाल कल्याण समितीनेही त्वरित ते लग्न रोखलं, तरीही आई – वडिलांनी रात्री गुपचूप लग्न लावलं, याचं कारण म्हणजे कंजारभाट समाजातील जात पंचायत, पंचायतीचे पंच आणि अनिष्ट रुढी. अवघ्या पंधरा वर्षाच्या या मुलीला आता कौमार्यचाचणी (वर्जिनिटी टेस्ट) द्यावी लागून तिच्यावर आणखी मोठा अन्याय होण्याची शक्यता आहेच. बाल कल्याण समितीने तर लवकर कारवाईचे आदेश दिले, तर निदान ते तरी टाळता येऊ शकेल.

कंजारभाट समाजातील क्रौमार्यचाचणी या अनिष्ट रुढीविरोधात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते विवेक तमाईचीकर यांनी सांगितले, कंजारभाट समाजात शिक्षण, रोजगाराचा अभाव असल्याने एकूणच याबाबतीत लोक जागृत नाहीत. जातपंचायतीच्या घट्ट विळख्यातून लोक सुटलेले नाहीत. त्यामुळेच क्रौमार्यचाचणीसारख्या अमानुष आणि पुरुषवर्चस्ववादी परंपरेतून कंजारभाट समाजातील स्त्रियांची सुटका झालेली नाही. आमच्यासारखे काही लोक ही प्रथा बंद व्हावी यासाठी काम करतात, तेव्हा आम्हालाही सामाजिक बहिष्कार, जातपंचायतीचा दबाव याला सामोरं जावं लागतं. काही महिन्यांपुर्वी चिंचवडमध्ये माझी पत्नी नवरात्र उत्सवात दांडिया खेळायला गेली होती, त्यावेळी तिथल्या आयोजकांनी, माझ्या पत्नीने आमच्या लग्नानंतर कौमार्यचाचणीला विरोध केला होता, व ती याबाबत जनजागृती करते, म्हणून तिला कार्यक्रमात सहभागी होऊ दिले नव्हते, तिच्यावर बहिष्कार घातला होता. हा समाज मागास असल्याने सुधारणांचा वेगही कमी आहे. मात्र काही सजग तरुण - तरुणी अशा प्रथांना आता विरोध करु लागले आहेत, कायदेशीर मार्गाने बालविवाह, कौमार्यचाचणी रोखू लागले आहेत, ही एक जमेची बाजू आहे.

कंजारभाट समाजातील अनिष्ट रुढींविरोधात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते व मुंबईत सनदी अधिकारी म्हणून काम करणारे कृष्णा इंद्रेकर यांचंही या घटनेबद्दल मत जाणून घेतलं असता ते म्हणाले.. या मुलीची कौमार्यपरीक्षा होणं हा तिच्यावरचा बलात्कारच होय. मुलगी सज्ञान नसल्याने तिच्या संमतीचाही प्रश्न येत नाही. त्यामुळे लग्नानंतर पतीने तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले तर तो बलात्कारच आहे. यामध्ये या मुद्द्याचाही विचार करुन हे वेळीच रोखलं पाहिजे. अनेकदा क्रौमार्य चाचणी थांबवताना किंवा त्यानंतरही पोलिसांची मदत लागते. जातपंचायतीने हे थांबवण्याचं मान्यच केलं नाही, बहिष्कार टाकला आणि पंचायतीविरोधात गुन्हा दाखल करायला गेलं, तरी पोलीस गुन्हा दाखल करुन घेत नाहीत. ‘आपसात मिटवा’ असा त्यांचा दृष्टीकोन असतो. आपल्याकडे सामाजिक बहिष्कार कायदा आल्यावरही पोलिसांच्या या दृष्टीकोनात बदल नाही. एका बाजूला समाजात जागृती होणं जसं महत्वाचं आहे, तसंच यासंदर्भाने जेव्हा इज्जत, जात- पंचायतीच्या समाधानासाठी बाईला वस्तू समजून तिच्याविरोधात अनेक क्रुर कृत्ये केली जातात तेव्हा त्याविरोधात गुन्हा दाखल करुन कायद्याने गुन्हेगाराला शिक्षा होणंही महत्वाचं आहे. त्यामुळे केवळ बालविवाहाच्या अनुषंगाने कारवाई न होता, क्रौमार्यचाचणीच्या रुढीचा विचार होणंही या प्रकरणात महत्वाचं आहे.

 

(एडिट, सा. ९.५८, १४ डिसेंबर, या बातमीचा आधीच मथळा, पुणे पोलिसांना न जुमानता अल्पवयीन मुलीचा विवाह, असा झाला होता, या प्रकरणाशी पुणे पोलिसांचा काहीच संबंध नव्हता. मथळा बदलण्यात आला आहे.)