India

तडजोडी करत जगणारी पोलीस लाईनची कुटुंबं

महाराष्ट्रातल्या अनेक पोलीस वसाहती राहायला जुन्या, असुविधाजनक झाल्या आहेत.

Credit : Jayali Wavhal

- जायली वाव्हळ

महाराष्ट्रात ५५० हुन अधिक पोलीस वसाहती आहेत ज्या काॅंस्टेबल, असिस्टंट सब इन्स्पेक्टर व सब इन्स्पेक्टर च्या रहण्यासाठी उप्लब्ध करुन दिल्या गेल्या आहेत. या वसाहती, इतर अनेक सरकारी वसाहतींप्रमाणे स्वतःची एक वेगळी ओळख घेऊन प्रत्येक शहरात आपलं अस्तित्व सांभाळत टिकल्या आहेत. मात्र वय झालेल्या या वसाहतींमधली परिस्थिती कालानुरूप बदलेली नाही. जुन्या इमारती, सामूहिक शौचालयं, पाण्याची समस्या अशा अनेक गोष्टी इथल्या कुटुंबांसाठी रोजच्या झाल्या आहेत.

“पोलीस अधिकाऱ्यांना धोका असतोच पण त्याच बरोबर त्यांच्या परिवाराला ही धोका असतो. त्यांना सुखरुप ठेवणे, सुविधा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. याच बरोबर,पोलीस विभाग हे सामान्य जनते पासुन थोडे वेगळे राहायला हवे, या अनुषंगाने पोलीस वसाहती बांधल्या गेल्या”, अशी माहिती मुंबई पोलीस मधल्या काॅंस्टेबल काळे यांनी दिली. एका पोलीस वसाहती मध्ये २५०-३०० कुटुंब १ BHK किंवा १ RK मध्ये रहातात.

“आम्ही पोलिस लाईनमध्ये राहतो असं सांगताच लोकांचं आमच्या सोबतचं वागणं -बोलणं बदलतं. ते आमच्याशी अगदी आदराने बोलतात, आम्हाला काही त्रास होऊ देत नाही. पण तरीही अंतर ठेवुन असतात,”  असं पोलिस वसाहतीत राहणारा सारंग कांबळे सांगत होता. कुठलेही सण असले की वसाहतीत वर्गणी गोळा करुन ते आनंदाने साजरे केले जातात. रहिवाशांमध्ये जातीधर्मावर कधीच काही वाद होत नाही; सगळे एका मोठ्या कुटुंबासारखे राहतात. खडक पोलीस वसाहती मध्ये राहत असलेले रहिवासी म्हणाले, “कोणाच्याही घरी लग्न किंवा मोठा कार्यक्रम असेल तर सगळे न विचारता मदतीला येतात. पाहुण्यांसाठी राहण्याची सोय, पाण्याची सोय इत्यादी कामे आपुलकीने करतात.”

line boys

एवढंच नव्हे तर सर्व वसाहतींमधील सर्व मुलांनी स्वत:चा एक ग्रुप तयार करुन त्याला ‘लाईन बाॅईज’ असे नाव दिले आहे. त्यांच्या गाडीवर ‘पोलिस’ किंवा ‘लाईन बाॅईज’ असे स्टिकर लावले आहेत. "काही वर्षांपूर्वी जेव्हा गोखलेनगर मधील काही युवकांनी पोलिस वसाहतीतील मुलांना मारहाण केली होती, तेव्हा हा ग्रुप वसाहतीचे ऐक्य दाखवायला तयार केला गेला होता." अशी माहिती एका 'लाईन बॉय'ने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

पोलिस वसाहतीमध्ये राहण्याचा अजून एक फायदा म्हणजे तुम्ही कुठेही गेलात तरी सुरक्षित असता. खडक पोलिस वसाहतीमध्ये राहणारी स्नेहल शिंदे भारतासाठी कबड्डी खेळते. अनेकदा ती स्पर्धेनंतर विमानतळावरुन रात्री उशिरा घरी येते पण तिला भीती वाटत नाही. सोमवार पेठ पोलिस वसाहतीत राहणारी एक युवती म्हणाली की, "लहानपणीच वडिलांनी आम्हाला स्वसंरक्षणाचे धडे दिले होते जे आज कुठल्याही संकटाच्या वेळी खूप कामी येतात. काॅलेजमध्ये कुठल्या मैत्रीणीला त्रास मुलं देत असतील तर त्या मुली माझ्याकडे येतात. मी न घाबरता मधे पडते व त्यांना परत त्रास होऊ नये याची काळजी घेते.”

मात्र पोलिस वसाहतीत राहण्यात जितका फायदा आहे तितकाच त्रासदेखील आहे. एक दिवसाआड येणारे पाणी, अस्वच्छता, वीज नसणे आदि समस्यांना येथील रहिवाशांना अनेक वर्षांपासून तोंड द्यावे लागत आहे. पुण्यात ५००० पेक्षा जास्त परिवार हे पोलिस वसाहतीत राहतात. प्रत्येक वसाहतीतील रुम ह्या काॅंस्टेबल, असिस्टंट सब इन्स्पेकटर व सब इंस्पेक्टर यांना वापरायला दिल्या जातात. वसाहतीच्या मेंटेनन्ससाठी प्रति महिना रु.३०० एवढी रक्कम रहिवाशांकडून घेतली जाऊनही वसाहतीत सुविधांची वानवा आहे, अशी खंत रहिवाशांकडून व्यक्त केली जाते.

गेल्या अनेक महिन्यांपासून काही वसाहतींत दोन दिवसात एकदाच पाणी यायचे. उन्हाळ्यात परिस्थिती अजून गंभीर झाली व अखेरीस रहिवाशांना प्रशासनास पत्र लिहिणे भाग पडले. भवानी पेठ व खडक पोलिस वसाहतीत आता दिवसाला दोन वेळा पाणी येते परंतु अन्य पोलीस वसाहतींमध्ये पाण्याचा प्रश्न अद्याप सोडवला गेला नाही. “दिवसातून फक्त एक तास पाणी येतं, पण ते ही कमी पडतं. पाण्याची टाकी नियमितपणे साफ केली जात नाहीआणि ती कधी फुटून खाली पडेल हे सांगता येत नाही," अशी माहिती बाॅडीगेट येथे राहत असलेल्या लक्ष्मी पिंगळे यांनी दिली.

वीजेचा त्रास रोज जरी नसला तरी वसाहतीमधील पथदिवे नीट काम करत नाहीत, अशी तक्रार रहिवाशांकडून केली जाते. स्वारगेट पोलिस वसाहतीमध्ये राहत असलेल्या नीलम मोरे म्हणाल्या, “पथदिवे बंद असतात त्यामुळे रात्री रस्त्यावर खूप अंधार होतो म्हणून सहसा कोणी बाहेर पडत नाही. आवारातील अर्धे दिवेसुद्धा काम नाही करत. गेले ७-८ महिने झाले तरी हीच अवस्था आहे व यामुळेच आम्ही कित्येक सणदेखील नीट साजरे केलेले नाहीत.”

काही वसाहतीत रहिवाशांसाठी ६ ते ८ स्वच्छतागृहे बांधलेली आहेत. त्याच्या साफसफाईसाठी काही कामगार मेंटेनन्स व्यतिरिक्त अधिक पैसे घेतात. औंधमधील बाॅडीगेट वसाहतीतील महिलांनी या संदर्भात प्रशासनाकडे पत्र लिहून तक्रार केली. तरीदेखील बॉडीगेटसह इतर पोलीस वसाहतींमधील परिस्थिती जैसे थेच आहे.

line

"रुमचे भाडे गेल्या ५ वर्षांमध्ये ५५% वाढविले गेले असून, रहिवाशांना ३०० रुपये इतकी रक्कम मेंटेनन्ससाठी द्यावी लागते. त्याशिवाय कामगारांना शौचालय, टाकी व आवार इत्यादी स्वच्छ करण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतात जे पूर्णपणे चूकीचे आहे," असेही रहिवाशांकडून सांगण्यात आले.

राहण्याचे हाल आहेतच पण त्याच बरोबर काही युवकांना रोजगार शोधताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सोमवार पेठेत राहणारा राहुल सकपाळ म्हणाला, “काॅर्पोरेट कंपनीत मुलाखतीसाठी गेलो की माझा पत्ता बघून ते मला नाही म्हणतात. पोलिस वसाहतीतील मुले त्रास देतील याची त्यांना भीती असते.” शासनाने पोलिस विभागातील नोकरीसाठी पोलिस वसाहतीच्या रहिवाशांना ५% आरक्षण दिले आहे पण याचा जास्त उपयोग नाही." असेही त्याने सांगितले. शहरात जास्त पगार आहे म्हणून बाहेरगावची लोक इथे येऊन त्या ५% जागा घेतात. तर मग आम्ही कुठे जायचं?” असा प्रश्न उपस्थित करत त्याने पुढे आरक्षणाचा काही फायदा नसल्याचे सांगितले.

पोलिस नोकरीतील फायदे, पगार, सरकारी सवलती या गोष्टी युवकांना पोलीस विभागात भरती होण्यासाठी आकर्षित करतात. परंतु खूप कुटुंबांमध्ये काॅंस्टेबल किंवा सब इंस्पेक्टर असलेले आई-वडील आपल्या मुलांना पोलिसांच्या नोकरीपासून लांब राहायला सांगतात. याबद्दल आणखी माहिती देताना एक रहिवासी म्हणाले, “आमचे वडील सतत सांगत असतात की पोलिस म्हणून काम करताना अनेक धोक्यांना सामोरे जावे लागते. यात रात्री अपरात्री कामावर बोलवणे, रहायच्या जागेचे हाल या गोष्टी आहेतच . त्यामुळे ते आम्हाला म्हणतात की आम्ही बाकी काही केले तरी चालेल, मात्र पोलिसाची नोकरी नको.”

वेळीअवेळी कामावर बोलवून घेतले जाते, यामुळे पोलिसांच्या नोकरीत असलेल्या आई किंवा वडिलांना आपल्या मुलांसोबत जास्त वेळ राहता येत नाही आणि जर दोन्ही पालक कामावर जात असतील, तर मुलांना एकटे एकटे वाटते व त्यांच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. शिवाजीनगर पोलिस वसाहतीमध्ये राहत असलेला एक युवक म्हणाला, “आई वडील दोघे कामावर जायचे आणि शेजारचे माझ्यावर लक्ष ठेवायचे. मी त्यांच्याकडेच जेवायचो व खेळायचो. घरी फक्त रात्री जायचो. हळूहळू आई- वडील आणि माझ्यात दुरावा येत गेला तो अजूनही ही मिटला नाही.”

तो पुढे म्हणाला की पालकांच्या अनुपस्थितीचा अनेक वेळा गैरफायदा घेतला. “लक्ष ठेवायला कोणी नव्हतं, मग आम्ही पोरं नको तिथे लाईनीतले असल्याचा माज करायचो. छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडणं, मारामारी, हे रोजचंच असायचं. कधी पोलिसांनी पकडलं की लाइनमध्ये राहत असल्याचा फायदा घ्यायचो.” परंतु या गोष्टी आता प्रशासनाने दखल घेतल्यानंतर कमी झाल्या आहेत असे स्पष्टीकरण त्याने पुढे दिले.

"३६५ दिवस आमच्या घरचे देशाची सेवा करतात, पण त्यांना व त्यांच्या कुटुंबाला निदान मुलभूत सुविधा मिळाव्यात याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे." अशी खंत एका शाळकरी मुलीने व्यक्त केली.

जायली वाव्हळ इंडी जर्नलसाठी प्रशिक्षणार्थी पत्रकार आहेत.