India

ट्रान्सजेंडर प्रवक्तीला टी. वी. चर्चेतून वगळलं

आवाज ‘पुरुषी’ असल्यानं चॅनलच्या प्रतिनिधीचा नकार

Credit : Disha Shaikh facebook

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांना काल TV 9 मराठी वाहिनीनं एक्झिट पोल्ससंबंधी चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. रविवारी सायंकाळी ८ वाजता टीवी ९ मराठीवर होणाऱ्या या चर्चेसाठी वबआनं आपल्याकडून प्रवक्ता म्हणून दिशा शेख यांचं नाव कळवलं होतं. त्यानंतर या वाहिनीच्या प्रतिनिधीनं जेव्हा दिशा शेख यांना फोन केला, तेव्हा शेख यांचा आवाज पुरुषी असल्याचं लक्षात आल्यानं आणि वाहिनीला ‘महिला’ प्रवक्ती चर्चेसाठी अपेक्षित असल्याचं सांगून त्या प्रतिनिधीनं दिशा शेख यांना बदलून दुसरा प्रवक्ता पाठवण्याची विनंती वबआच्या माध्यम प्रतिनिधीकडे केली, तर दुसरीकडे शेख यांना, तो चर्चेचा कार्यक्रम रद्द झाला असं एसएमएसद्वारे कळवण्यात आलं. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडिया हॅंडल्सवरुन प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दिशा शेख आणि वंबआच्या माध्यम प्रतिनिधीशी झालेला टी.वी.9 मराठीचा संवाद

फोटो क्रेडिट- वंचित बहुजन आघाडी /फेसबुक


शेख यांना टीवी ९ मराठी वाहिनीच्या कार्यालयातून गेस्ट को ऑर्डिनेटरचा चर्चेला येण्याबाबत फोन आला होता, फोनवर शेख यांचा आवाज ‘पुरुषासारखा’ आल्यानं, त्या गेस्ट को ऑर्डिनेटरनं दिशा शेख यांना बदलून दुसरा प्रवक्ता द्यावा अशी विनंती वबआच्या माध्यम प्रतिनिधी आम्रपाली तांबे यांच्याकडे केली. ‘दिशा शेख यांना बदलण्यात यावं’ असा मेसेजही तांबे यांच्या मोबाईलवर टी वी ९ च्या गेस्ट को ऑर्डिनेटरकडून पाठवण्यात आला तर दुसरीकडे शेख यांना ही चर्चा रद्द केल्याचं एसएमएस करुन कळवण्यात आलं, मात्र ही चर्चा रद्द करण्यात आली नव्हती.


या प्रकारामुळे आज टीव्ही ९ मराठीच्या लाईव्ह चर्चेत वबआचे प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी निषेध व्यक्त केला आणि चर्चेवर बहिष्कार टाकला. या प्रकाराबद्दल जोवर वाहिनीकडून माफी मागितली जात नाही, तोवर या वाहिनीच्या चर्चेत वबआचे प्रवक्ते सहभागी होणार नाहीत, अशी भूमिका वबआनं जाहीर केली आहे. दिशा शेख यांनीही घडलेला प्रकार आपल्या फेसबुक वॉलवर लिहिला आहे. याबाबत दिशा शेख इंडी जर्नलशी बोलताना म्हणाल्या, “ट्रान्सजेंडर्सना सर्व ठिकाणी नागरिक म्हणून स्वीकार मिळण्यासाठी आम्ही आणखी काय करणं अपेक्षित आहे? वृत्तवाहिन्या आपल्या कार्यक्रमांतून - धोरणांतून लोकांची मानसिकता घडवू शकतात पण इथं या मोठ्या वृत्तवाहिनीनं आपली तृतीयपंथीयांप्रती असलेली मानसिकताच उघड केली आहे. या गोष्टी केवळ गेस्ट को ऑर्डिनेटरच्या हातात असतात, असं मला वाटत नाही, याला संपादकीय विभागही जबाबदार आहे.”


याबाबत टीवी ९ मराठीचे संपादक रोहित विश्वकर्मा यांच्याशी इंडी जर्नलनं संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितलं, “ या प्रकाराबद्दल मला अद्याप माहिती नाही, मी माझ्या सहकाऱ्यांकडून माहिती घेतो.” तर टीवी ९ मराठीच्या ज्या गेस्ट कोऑर्डिनेटरचा यात सहभाग आहे, त्या मुख्तार शेख यांच्याशी आम्ही संपर्क करुन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फोनवर उपलब्ध न होऊ शकल्यानं त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.