India
किलवेनमनीची ५० वर्ष
पाच दशकानंतरही किलवेनमनीचं क्रौर्य अंगावर काटा आणतं.
तामिळनाडूच्या नागपट्टीनम भागातल्या किलवेनमनी (किझवेनमनी) गावात २५ डिसेंबर १९६८ रोजी ४४ दलित, ज्यात ६ पुरुष, १६ महिला आणि २३ लहानग्यांचा समावेश होता, त्यांना एका झोपडीत बंद केलं गेलं. त्यानंतर झोपडीला आग लावून देण्यात आली आणि त्या आगीत सर्व ४४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. जळत असताना पळून बाहेर येणाऱ्या लहानग्यांना लाकडाच्या ओंडक्यांप्रमाणं परत आत फेकलं गेलं. त्यांचा दोष? त्यांनी जमीनदाराकडून मजुरीचे पैसे वाढवून मागण्यासाठी युनियन स्थापन केलं!
भारतामध्ये जमीनदारीने घेतलेले जीव असंख्य आहेत. इतिहासाच्या दस्तऐवजांमध्ये अर्थातच ते गायब आहेत, मात्र स्वतंत्र भारतातल्या काही भयंकर घटनांच्या नोंदी, सरकारी आणि सामाजिक दस्तऐवजांवर भळभळत्या जखमेप्रमाणे त्या गायब केल्या गेलेल्या इतिहासाची साक्ष देत राहतात. जातव्यवस्था ही वर्ग-मान्यता-धर्म-वर्ण यांच्या क्लिष्ट आणि विचित्र समागमातून तयार झालेली विषारी व्यवस्था, ही आधुनिकता, श्रममूल्य आणि संवैधानिक मूल्य, यांच्याशी कुठल्याच प्रकारे सुसंगत नाही, याची अनेक उदाहरणं इतिहासच नाही तर आपला वर्तमानकाळ आपल्यासमोर मांडतो.
किलवेनमनीमध्ये मोठा जमीनदार असलेला गोपालकृष्ण नायडू. याच्या शेतात मजुरी करायला अर्थातच शोषित-वंचित जातीचे मजूर येत. तामिळनाडूच्या इतिहासातही तेव्हा मोठे बदल घडत होते. जमीनदारांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसची उचलबांगडी होऊन द्रविड मुन्नेत्र कझगम (डीएमके) या पक्षाने राज्यात सरकार स्थापन केलं होतं. देशभर डावी-कम्युनिस्ट चळवळदेखील गावोगाव आपलं अस्तित्व दाखवू लागली होती. तोपर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने भारतीय कम्युनिस्ट पक्षापासून फारकत घेत आपलं वेगळं, तीक्ष्ण साम्यवादी राजकारण रेटत दक्षिण भारतात बऱ्यापैकी जम बसवला होता. तामिळनाडूच्या या गावात, गोपाळ नायडूकडे काम करणाऱ्या या वंचित मजुरांचा माकप आणि डाव्या संघटनांशी संपर्क झाला.
हळूहळू त्यांच्यातला स्वाभिमान जागा होत, आपल्या मजुरीत वाढ व्हावी आणि एकूणच जमीनदाराविरोधात आपल्याला मागण्या करण्याचा, वाटाघाटी करण्याचा अधिकार मिळावा, म्हणून या मजुरांनी युनियन स्थापन केलं. या युनियनच्या माध्यमातून ते संघटनात्मक लढा देऊ लागले. त्यांनी मजुरी वाढवून देण्यासाठी आंदोलन सुरु केलं. हरित क्रांतीने उत्पादन वाढवलं आहे, पिकाचा नफा वाढवला आहे, तर आमचा हिस्साही वाढवून द्या, अशी त्यांची मागणी होती. सर्व मजुरांच्या घरांवर लाल झेंडा फडकू लागला. याचा राग येऊन, जमीनदारांनी आपली युनियन स्थापन केली आणि त्यांच्या घरांवर पिवळे झेंडे फडकले.
मजूर नाराज झाले. ते इरेला पेटले होते. त्यांनी काम थांबवलं. भाताच्या पिकाचा एक हिस्सा त्यांनी रोखून धरला आणि पुन्हा मजुरी वाढवून देण्याची मागणी केली. जमीनदारांनी बाहेरून मजूर आणले आणि धान्य काढायला सुरुवात केली. एक स्थानिक दुकानदार मजुरांच्या बाजूने होता. त्याचं अपहरण करून त्याला प्रचंड मारहाण केली गेली. वातावरण चिघळत चाललं होतं. आंदोलकांनी अपहरणकर्त्यांना बदडलं अनु त्यात जमीनदारांच्या बाजूच्या एकाचा मृत्यू झाला.
२५ डिसेम्बर रोजी, पोलिसांच्या गाड्यांमध्ये जवळपास २०० गुंड गावाला सकाळपासून वेढा घालून बसले. त्यांनी सोबत बंदुकी आणि रॉकेल आणलं होतं. त्यांनी स्त्रिया आणि मुलांवर गोळीबार करायला सुरुवात केली. लोक जीव वाचवून धावू लागले. त्यातल्या काहींनी ८ फूट बाय ९ फूटच्या एका झोपडीत आसरा घेतला. जमीनदाराच्या आदेशावर गुंडानी त्या झोपडीला आग लावली. होरपळून बाहेर येणाऱ्या दोघांना सुऱ्याने भोकसून पुन्हा आत टाकलं गेलं. काही लहान मुलांना आत अडकलेल्या त्यांच्या पालकांनी बाहेर टाकलं तर त्या लहानग्यांनाही उचलून परत आत टाकण्यात आलं. हे हत्याकांड संपवून हे सर्व वरच्या जातीचे गुंड पोलीस स्टेशनला पोहोचले आणि सुरक्षेची मागणी केली. पोलिसांनी त्यांना सुरक्षा देऊ केली!
तामिळनाडूचं राजकारण ढवळून निघालं. सरकारनं व्यापक जमीन पुनर्वितरणाची भूमिका घेतली आणि मंदिर आणि मठाच्या जमिनी भूमिहीनांना वितरित केल्या गेल्या. खटला दाखल झाला. १० जमीनदारांना १० वर्षांची कैद झाली. मात्र अपील कोर्टात ती शिक्षा रद्द होऊन त्यांना पुराव्यांअभावी मुक्त करण्यात आलं. कोर्टानं विधान केलं, इतक्या उच्च जातीची व्यक्ती, रॉकेलचे डब्बे हातात घेऊन झोपडी पेटवूच शकत नाही! गोपाळ नायडू मुक्त हिंडत होता. पण तेव्हाच नक्सलबारीच्या उठावामागं असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष - मार्क्सवादी लेनिनवादी, नायडूला एका दिवशी गाठलं आणि त्याची प्रतिशोधात हत्या केली.
मारला गेलेला गोपाळ नायडू. फोटो - एस. तामिळसेल्वन
५० वर्ष झाली. आज हिंसेची परिमाणं बदलली आहेत, स्वरूप बदललं आहे. दलितांविरोधात सवर्णांच्या हिंसेने नवे कंगोरे आत्मसात केले आहेत. सोबत स्वतः सवर्ण जमीनदार सुद्धा आता जागतिक भांडवलाचे शोषित झालेत. काव्यात्मक न्यायपालिकडे, शोषणव्यवस्था या एखाद्या मान्यतेभोवती जरी एकत्र व्यक्त होत असल्या, तरी त्यांच्या मुळाशी श्रमांची चोरी आणि त्यासाठी धर्माची किंवा रूढीमान्यतेची असलेली झालर असते. कालचा शोषक, उद्याचा शोषक बनणारच असतो, पण शोषण करण्याच्या कैफात अनेक जण हे सत्य विसरतात. आणि ४४ स्तंभांचं वेनमनी स्मारक, आजही या सत्याचं प्रतीक म्हणून देशभर धगधगतंय.